डबल सीट

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

संध्याकाळचे ट्रफिक सिग्नल जरा लांब पल्ल्याचे असतात. अशाच एखाद्या सिग्नलवर घरी जाता जाता तुम्ही कंटाळून उभे असता.

. . .

एखादं कपल, टू व्हिलरवर, तुमच्या बाजूला किंवा थोडं पुढे उभं राहतं. कष्टाळू. कामाहून घरी चालेललं. दोघही थकलेली. अख्खा दिवस अंगावरून गेलेला. त्यामुळे बुरसेटलेले. काही तरी गहन विषयावरून तुटकतुटक डिस्कशन चालेललं.
हॉर्नसचा कलकलाट. त्यांचं बोलणं फारसं ऐकू येत नाही. मात्र हावभावातून थोडं फार कळतं. 

. . .

अश्याच काही कष्टाळू कपलस् ची मी बऱ्याचं दिवसांपासून केलेली काही निरीक्षणं :

कर्ती स्त्री मागे आपली फाटायला आलेली पर्स, नवऱ्याची काळी तेलकट बॅग, त्याचा डबा असे सगळे धरून बसलेली असते. खंबीर. निर्विकार चेहऱ्याने.

काही जणींची नजर सभोवतीच्या दुकानांवर झरझर भिरभिरत असली तरी कान नवऱ्याकडेच असतात.

‘मला ही नाही आवडलं ते’ अशी एखादी कंमेन्ट देऊन परत इकडे तिकडे बघणे. मधेच ‘हो…हो’ म्हणणे वगैरे सहज पाहायला मिळतं.

शर्टाच्या खिशात हिशेबाची जाड डायरी, मोबाईल, पेन, कोंबलेली बिलं असे सगळे सांभाळत उभे असलेले भिंगाच्या चष्म्यातले काका, काही तरी मिश्किल बोलल्याने हळूच लाजलेल्या काकुही पाहिल्यात मी.

काही जण शांत उभे असतात. ट्रफिक बघत. आपापल्या विचारात. आपल्या मागे कुणी बसलंय किंवा आपण कुणाच्या मागे बसलोय हे ही विसरलेले.

दिवसभराताल्या एखाद्या जोकवर खळखळून हसणारी कपल दिसतात. पण फार विरळ.

. . .

शहराच्या या टोकावरून त्या टोकाला घरी जाणारी ही लोकं,
कधी पोहचत असतील?
ती कधी जेवण बनवत असेल?
घरी गेल्यावर एकमेकांशी बोलत असतील का? असे बरेच प्रश्न पडतात.

रोजच्या परतीच्या प्रवासात बरीच प्लॅंनिग होत असतील. बरीच डीसिजन्स होत असतील. शहराच्या प्रदूषणात काही विरून जात असतील, काही टिकत ही असतील.

. . .

अश्या रोज दिसणाऱ्या कपल्स बद्दल मला अतीव आदर वाटतो.

आम्हीही आयुष्याची बरीच उलटीपुलटी डीसिजन्स अशीच गाडीवर फिरतांना घेतली.

. . .

पुढच्या वेळी लांब पल्ल्याच्या सिग्नलला एखाद्या संध्याकाळी थांबलात तर आजूबाजूला बघा एखादं डबल सीट कपल दिसतंय का?

इतर पोस्ट्स