अवकाळी पाऊस

(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

त्या संध्याकाळी आभाळ भरून आलं होतं. काळया आभाळावर अंगणवाडी पांढऱ्या ठीपक्या सारखी दिसत होती. अंगणवाडीच्या मोठ्ठया पटांगणात विजा लख्ख चमकत होत्या. कुणीतरी दोघं अंगणवाडीत राहतात, असं आजच पाटलांच्या कानावर आलं होतं. न सांगता पोरांच्या शाळेत असं कोण राहतंय म्हणून पाटलांचा पारा चढला होता. दुपारी शेतावर झालेल्या भांडणाची सल अजुनही टोचत होतीच. पाटील पटांगणातून अंगणवाडीकडे झपझप चालत होते. मोठ्या मिश्या. करारी डोळे. पांढरा कुर्ता. धोतर. पायात कोल्हापुरी वहाणा. पाटील – एकंदरीत भारदस्त माणूस. त्यात, आज डोक्यात राग.

दरवाजा उघडाच होता. लाईट गेल्याने, खोलीत अंधार होता. पाटील आत घुसले. बाहेर रपरप पाऊस सुरू झाला. ती दोघं पाटलांना पाहून उभी राहिली. एक जण उंच पण स्थूल होता. दुसरा बारीक, अशक्त. एका कोपऱ्यात त्यांचं सामान होतं. अंगणवाडी चे पत्रे कोसळणाऱ्या पावसामुळे ताडताड वाजू लागले. पाटलांनी त्यातल्या उंच व्यक्तीची कॉलर धरून, वर उचललं. दुसरा पळत बाहेर अंगणवाडीच्या व्हरांड्यात गेला. पाटलांचे डोळे रागाने लाल झाले होते. ते रागातच म्हणाले, “पहाटेस्तोवर अंगणवाडी खाली करायची.” त्याला झटकून खाली सोडलं. पाटलांचा हा अवतार बघून त्याची बोबडीच वळली. तो घाबरून पायात डोकं घालून बसला. दुसरा व्हरांड्यात थरथरत उभा होता. पाटील त्याला हाताने बाजुला करायला गेले. जोरात दिलेल्या धक्क्याने तो व्हरांड्याच्या पायऱ्यावरून खाली पडला. जोरात विव्हळलला. त्याच्यात उठण्याची ताकदच नव्हती. वरून पाऊस त्याच्यावर अक्षरशः आदळत होता. पाटलाने त्याला पायानेच बाजुला केलं. आले त्याच वेगाने पाटील फाटकावर उभ्या केलेल्या आपल्या जीपकडे गेले. अवकाळी आलेल्या पावसाने फार जोर पकडला होता. वातावरण धूसर झालं होतं. 

पाटलांनी गाडीला स्टार्टर मारला. शेतावरच दुपारचं भांडण, अंगणवाडीत घुसलेले हे दोन लोकं या सगळ्यांचा राग घेऊन जीप अंधार आणि पाऊस चिरत पळू लागली. पाटलांना संध्याकाळीच शहरात पोचायचं होतं. या प्रकारामुळे उशीर झाला. त्यात असा अवकाळी पाऊस. उद्याचं मेव्हण्याच लग्न होतं. “लवकर या!” पाटलीन बाईने सकाळीच ठणकावून सांगितलं होतं. ती मंगल कार्यालयाच्या दारावर छत्री घेऊन उभीच होती. रस्त्याच्या वळणावर जीप दिसली. तिचा जीव भांड्यात पडला. पाटील आवरून मेव्हण्याला भेटले. जेवणं उरकली. पाटलीन उद्याच्या धावपळीत होती. पाटील झोपायला वरच्या खोलीत गेले. शहरात राहणारा – पाटलांचा हा मेव्हणा, जवळच्या खेड्यावर शिक्षक. अख्ख्या खानदानात एकटा व्यक्ती शिकलेला. पाटलांना त्याचा फार अभिमान. ‘मास्तर’ म्हणायचे पाटील त्याला. स्वतः पाटलाने कधी शाळेत पाय ठेवला नाही. पण शिक्षकांबद्दल फार आदर. शाळेची जागा कमी पडते म्हणून गावालगतच्या स्वतःच्या शेतात, अंगणवाडी बांधून दिली होती पाटलांनी. सगळ्या सोयी करून दिल्या होत्या. गावातली लहान लहान लेकरं यायची तिथे. मोठ्ठ्या पटांगणात दिवस भर खेळायची. शेतावर जातांना, पाटील गाडी थांबून कौतुकाने बघायचे. त्याच अंगणवाडीत कुणी कसं काय घुसून राहतंय? पाटील परत बेचैन झाले. “मी असं होऊ देणार नाही” मनाशीच पुटपुटत ते झोपी गेले. अवकाळी आलेला हा पाऊस कोसळत राहिला, रात्रभर.

सकाळच्या मुहूर्तावर लग्न होतं. पाऊस थांबून लख्ख उन पडलं होतं. पाटील-पाटलीन खुश होते. दोघांनी जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले. खरंतर हे लग्न पाटलांमुळे झालं. मुलीच्या घरचे, मेव्हन्याची मास्तरकी आणि परिस्थिती बघता तयार नव्हते. पण पाटलांनी मध्यस्ती केली. शिक्षक म्हणजे समाजातील महत्त्वाची व्यक्ती, हे मुलीकडच्यांना पटवून दिलं. एका शिक्षकाच्या नवीन आयुष्याची आपण सुरुवात करून दिली, याचं पाटलाला फार समाधान होतं. 

पंगती सुरू झाल्या. पाटील काय हवं नको ते बघत होते. गावातला तुक्या पाटलाला कोपऱ्यात घेऊन गेला, “पाटील, अंगणवाडीत काहीतरी झालंय. अख्खा गाव जमा झालाय. पोलिस आलेत.” पाटलांनी ताबडतोब जीप काढली. गावच्या दिशेनं निघाले. अवकाळी पावसानं रात्री सगळीकडे प्रचंड नासधूस केली होती. रस्त्यात ठीकठिकाणी झाडं पडली होती. पाटील पोहचले तेव्हां, गावातली लोकं फाटकाजवळ गर्दी करून उभे होते. हवालदार त्यांना मागे रेटत होता. पाटलाला पाहून त्याने फाटक उघडले. पटांगणात झालेला चिखल तुडवत, पाटील अंगणवाडीच्या दिशेनं जड पावलांनी निघाले. सगळं वातावरण सुन्न होतं. बाहेर उभ्या असणाऱ्या लोकांची कुजबुज कानावर येत होती. अंगणवाडीच्या त्या खोलीजवळ दोन तीन पोलिस उभे होते. एक जण काही तरी लिहीत होता. दोघांचं सामान बाहेर आणून ठेवलं होतं. उंच, स्थूल माणूस पायात डोकं घालून बसला होता. त्याच्या पुढ्यात पांढऱ्या कपड्यात प्रेत गुंडाळून ठेवलेलं होतं. पाटील व्हरांड्यापाशी पोहोचले. पाटील काही बोलण्याच्या आधी, त्यातला एक पोलिस प्रेताकडे पाहून म्हणाला, “पाय घसरून पडला. डोकं दगडावर आपटलं. रात्रभर पावसात पडून होता. कधी जीव गेला कळलं नाही. हा दुसरा तापानं फणफणतोय. काहीच बोलत नाही.” प्रेताजवळ बसलेला तो, पाटलाकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होता. तोवर शाळेचे मुख्याध्यापकही पोहचले. पाटलाकडे बघून म्हणाले, “फार दुर्देवी झालं. मीच अंगणवाडीची चाबी दिली होती या दोघांना. राहण्याची सोय होईस्तोवर रहा म्हटलं इथे. आपल्या शाळेत आलेले, नवीन शिक्षक होते हे दोघं.” 

इतर पोस्ट्स