आंबा

(रीडिंग टाईम 14 मिनिटं )

मोहर

मारोतरावांच्या वडिलांची परिस्थिती तशी जेमतेमच. घरातलं सोनं मोडून त्यांनी शेत घेतलं. दूर. गावाबाहेर. ते या शेताला काळ सोनं म्हणायचे. त्यांची पत्नी म्हणजे; मारोतरावांची आई नवऱ्यासोबत खंबीर उभी राहिली. माळावरची ही ओसाड जमीन या दोघांच्या मेहनतीने फुलली.थोडे बरे दिवस आले. शेताच्या कडेला रस्ता होता. बैलगाड्यांचा, गुरांचा, कच्चा रस्ता. शेताच्या बांधावर उभे राहून मारोतरावांचे वडील कौतुकाने पिकाकडे बघत. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारत. तसं ते माळरान सपाट होतं. दूरवर कुठेही झाड नाही. छोटी छोटी विरळ झुडप. गावातली घरं शेतावरून ठीबक्या सारखी दिसायची.

एकेदिवशी वडिलांच्या मनात आलं, त्यांनी शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला आंब्याची दहा रोपं लावली. लहानगा मारोत त्या रोपांना रोज आपल्या सोबत आणलेलं पाणी घालत असे. मारोतरावांचे वडील नेहमी म्हणायचे, “या आंब्यांनी आपली भरभराट होईल.” पुढे दहा पैकी एकच आंबा जेमतेम टिकला. आंब्याच्या नादात बाप लेकानी दुसरी झाडंही लावली नव्हती. त्यामुळे पंचक्रोशित मोठ्ठं म्हणावं असं एकच झाड. झाड मोठं होऊनही त्याला मोहर येईना. मारोतरावांचे वडील वृध्दपकाळाने गेले. त्यांनी लावलेल्या झाडाचा आंबा त्यांच्या नशिबी आला नाही.

मारोतरावांचंही आंब्यांचं वेड हळूहळू कमी झालं. शेतीच्या कारभारात ते व्यस्त झाले. पुढे त्यांचं लग्न झालं. नवरा बायकोने मिळुन शेती बहरास आणली. थोडे पैसे जमा झाल्यावर विहीर खोदण्याचं ठरलं. पाणाड्याला बोलवलं. शेतभर फिरून त्यानं आंब्यालगतची जागा सांगितली. खोल-खोल मोठ्ठी विहीर खोदण्यात आली. शेवटच्या कुदळीत धबधबा कोसळावा तसं पाणी उसळलं. विहिरीला खुप पाणी आलं. मारोतरावांनी शेती बागायती केली. सुगीचे दिवस आले. मारोतरावांनी गावात वाडा बांधला. घरी, शेतात गडी माणसं काम करू लागली. आंब्याच्या गर्द सावलीत बसून मारोतराव मजुरांवर देखरेख करत. विहिरीवर मोट होती. मोटीच पाणी विहिरी लगतच्या हौदात पडायचं. मग रस्त्याच्या कडेला केलेल्या छोट्या कालव्यातून पाणी शेताच्या चारी बाजूस फिरे. येणारे जाणारे आंब्यापाशी थांबत, विहिरीच पाणी पीत. मग पुढे जात. गाडीचे बैल, गुरं कालव्यातलं पाणी प्यायला थांबत. मारोतराव आणि त्यांची बायको दोघंही मजुरांसोबत आंब्याखाली भाकरी खात. बऱ्याचदा येणारे जाणारेही आपली शिदोरी इथेच उघडत. पिकामागून पिकं गेली. हंगाम गेले. पण आंब्याला काही मोहर येईना. याची खंत मारोतरावांना नेहमी सलायची. आंबा हे फळ सोडलं तर या झाडाने मारोतरावांना सगळं काही दिलं. दर हंगामात ते मोहोर येण्याच्या आशेने आंब्याकडे बघत. पण हंगाम तसाचं जाई.

एका हंगामात मात्र मोहोर आला. आंब्याच गर्द हिरव झाड पिवळ झालं. मारोतरावांचा आनंद गगनात मावेना. कैऱ्यांनी झाड लदबद झालं. मारोतरावांच्या बायकोने कैऱ्यांच लोणचं घालून शेजारी पाजारी वाटलं. रस्त्यावरून जाणारा येणारा एकतरी कैरी घेतल्या शिवाय जात नसे. मारोतराव स्वतः कैऱ्या तोडायला मदत करत. कैऱ्यांचे पुढे गोड रसरशीत आंबे झाले. पिकलेल्या आंब्यांची पहिली टोपली जेव्हा वाड्यावर आली तेव्हा मारोतरावांना वडिलांची फार आठवण आली. पहिला आंबा त्यांनी वडिलांच्या फोटोखाली ठेवला आणि दुसरा देव्हाऱ्यात. मारोतरावांनी स्वतः आंबे घरोघरी वाटले.त्या वर्षी अख्ख्या गावाने मारोतरावांच्यां आंब्याचे आंबे खाल्ले. पुढची दोन चार वर्ष हाच उपक्रम.

हळूहळू लोकं मात्र शेफारली. न सांगता कैऱ्या तोडू लागली. नासधुस करू लागली. काही जण कैऱ्या तोडून तालुक्याला विकायला लागली. मारोतरावांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण त्रास फारच वाढला. एके वर्षी तर मारोतरावांना एक आंबा ही मिळाला नाही.

* * * 

किसना

किसना लहानपणापासून आपल्या आईसोबत मारोतरावांच्या वाड्यावर यायचा. त्याची आई मारोतरावांकडे धुणी भांडी करायची. मारोतरावांची बायको किसनाला फार जीव लावायची. त्याला जेवू खाऊ घालणं. कपडे लत्ते करणं. असं सगळं करायची. मारोतरावांना मुलबाळ नव्हतं. दोघंही नवरा बायको प्रेमळ. कुठल्याही गडी माणसाला नोकरासारख वागवलं नाही. त्यांच्या सोबत आंब्या खाली जेवणं. अडीअडचणीला पैशाची मदत करणं. पोरीबाळींच्या लग्नाला हातभार लावणं. हे सगळं मारोतराव मन लाऊन करायचे. बायको प्रमाणे त्यांचाही किसनावर फार जीव होता. किसना लहानाचा मोठा मारोतरावांकडेच झाला. आंब्याची पहिली टोपली किसनानेच वाड्यावर आणली होती. वडिलांच्या फोटोखाली आणि देव्हाऱ्यात आंबा ठेवल्यावर मारोतरावांनी पुढचा आंबा किसनालाच दिला होता. किसना मारोतरावांसोबत सावली सारखा असायचा. तेही त्याला मुलाप्रमाणेच वागवायचे. किसना रात्री वाड्याच्या ओसरीतच झोपत असे. तसं तर किसनाच घर वेशीपाशी होत. घर म्हणजे झोपडीच होती. त्यात त्याचे आई बाप राहत.

किसनाचा बाप पाटलाकडे कामाला होता. गावचा पाटील बेरकी वृत्तीचा. दृष्ट सावकार. कर्ज देऊन देऊन गरिबांच्या जमिनी हडपलेल्या. किसनाच्या बापावरही दारू मुळे कर्जाचा डोंगर झालेला. स्वतःच्या बापावरून किसनाची फार चिडचिड व्हायची. दोघं एकमेकांसमोर आली की भांडणं व्हायची. त्यामुळे किसनाने रात्री घरी जाणं बंदच केलं होतं. मारोतराव त्याचं कर्ज फेडायला तयार होते पण किसनाने तसं करू नाही दिलं. आपला बाप दारू पिऊन परत कर्ज करून ठेवेल याची त्याला खात्री होती. किसनाची आई, बाप – लेकाच्या वैरामुळे मारोतरावांच्या बायकोकडे फार रडायची. किसनाच्या बापाला मारोतरावांनी समजावुन सांगावं अशा विनवण्या करायची. पण किसनाचा बाप पुर्णपणे दारू आणि पाटलाच्या आहारी गेला होता. पाटलाची वसुली करणे, दारू आणणे, पार्ट्यांची तयारी करणे, तमाशाचे फड लावणे, वगैरे, वगैरे. शेजारच्या गावातली श्रीमंतांची पोरं जेव्हा गायब झाली तेंव्हा पोलीस किसनाच्या बापाला घेऊन गेले होते. पाटलाच्याच सांगण्यावरून त्यानं ही पोरं पळवली अशी चर्चा गावात होती. पुढं पाटलानेच किसनाच्या बापाला जामीन वर सोडवून आणलं. ‘किसनाला माझ्या कडे कामाला आण तुझी सगळी कर्ज माफ करतो’ ,असं तो नेहमी किसनाच्या बापाला म्हणत असे. यावरून बापलेकांमध्ये नेहमी वाद व्हायचा.

या वतिरिक्त किसनाच्या बापाचा वडिलोपार्जित एक धंदा होता. अंतयात्रेसमोर’ डफड ‘ वाजवण्याचा. डफड हे ओबडधोबड वादय डफली सारखंच असतं, जे सहसा अंतयात्रेत वाजवतात. जाड्या भर्ड्या चामड्याच्या पात्यावर टीपरूने जोरात दणका मारायचा आणि एक ठोका निघायचा. हा ठोका सगळी शांतता चिरून टाकायचा. या डफड्याचा आवाज आला की, गावात कुणी तरी मेलं हे समजायच. हा ठोका ऐकून खेळणारी पोरं घरात पळून जायची. चव्हाट्यावर बसलेले उठून उभे राहायचे. दुकानं बंद व्हायची. बैलगाड्या रस्त्याच्या कडेला लागायच्या. बायका पोरी खिडकीत उभ्या राहायच्या. जोर जोरात रडण्याचे आवाज यायचे. आणि काळजाचा ठोका चुकवेल असा या डफड्याचा ठोका यायचा. त्या मागून सुरात ‘ राम बोलो भाई राम बोलो ‘ ऐकु यायचं. सगळं वातावरण सुन्न व्हायचं. किसनाचा बाप प्रत्येक अंतयात्रेत दारू पिऊन वाजवायचा. डुलत डुलत एक एक ठोका मारत तो समोर चालायचा. त्याच्या वेगावर अंतयात्रेचा वेग ठरायचा. या प्रकारामुळे लोक वैतागायचे. किसनाने डफड वाजवाव म्हणून सांगायचे. पण किसनाला हा सर्व प्रकार काही आवडत नसे. एखादं वादय एवढी स्मशान शांतता का तयार करतं हेच त्याला कळेना. यातून वेगळे सुर निघत असावेत आणि ते काढावेत असं त्याला सारखं वाटत असे. पण बाप त्याला डफड्याला कधी हातही लावू देत नसे. डफड हे कुणी मेलेकीच वाजवयाच असा त्याच्या बापाचा पक्का समज होता. एरवी ते वाजवणे अभद्र मानल जायचं. त्यावेळी जे सुर निघतील ते आपले मानायचे असं त्याचा बाप म्हणायचा. एकदा बाप घरी नसतांना किसनाने डफड वाजवायला सुरुवात केली. किसना तेव्हां लहान होता. आजूबाजूचे लोक गोळा झाले. बंद कर, नाहीतर कुणी तरी मरेल म्हणू लागले. एकाने पाटलाच्या वाड्या वरून त्याच्या बापाला बोलावले. बापाने किसनाला खुप बदडले. त्या नंतर किसनाने डफड्याला हात नाही लावला.

एके दिवशी पाटलाच्या शेताच्या बांधावर किसनाचा बाप पडलेला सापडला. दारू पिऊन मेला असावा असं सगळे म्हणाले. पण पाटलाची शांतता किसनाला टोचत राहिली. त्याने मारोतरावांना ती बोलून ही दाखवली. पण मारोतरावांने त्याला शांत राहून आई कडे लक्ष द्यायला सांगितले. नवऱ्याच्या अशा जाण्याने तिने घराबाहेर जाणं बंद केलं. किसना तिच्या सोबत झोपडीत राहू लागला. डफड नेहमी साठी दाराच्या खुंटीला लटकलं. अंगणात, खाटेवर पडल्या पडल्या खुंटीवरच डफड किसनाला अस्वस्थ करायचं. यातून वेगळे सुर आपण काढू शकू असं वाटायचं.

* * *

डफड

लोकांच्या कैऱ्या चोरण्याला मारोतराव पुरते वैतागले होते. हंगामात ते सारखे आंब्याच्या अवतीभवती रहायचे. लोक पहाटे चोरी करतात म्हणून चार वाजताच विहिरीवर जाऊन बसायचे. दबकत आलेल्या चोरांना टॉर्चच्या उजेडाने आणि हाताततल्या कुऱ्हाडीने घबरावयचे. मारोतराव तसे अंगा पिंडा ने दणकट. तलवारी सारख्या मिश्या, पांढरे शुभ्र धोतर, पांढरे शर्ट, डोक्यावर रुबाबदार फेटा. सहा फुटाच्या मारोतरावाला बघून चोरांच्या तोंडचे पाणी पळायचे. मारोतरावांचा हा अवतार पाहून जाणारे येणारे ही कैऱ्या मागायला धजावत नसतं. मारोतराव जर तालुक्याला गेले तर किसनाची ड्युटी लागायची. किसनाही मारोतरावांसारखा रांगडा पैलवान गडी. शेजारच्या गावातून येणारे हे चोर किसनाला फार घाबरून असतं.पहाटे कुणी शेताकडे फिरकला तर किसना त्याला धरून आणायचा उलट सुलट उत्तरं मिळाली की चोपून काढायचा. मारोतराव आणि किसनाच्या या गस्ती मुळे त्या वर्षी खुप आंबे लागले. मारोतरावांच्या वाड्यातील एक खोली आंब्यानी भरली. किसनाच्या ओळखीने तालुक्याच्या एका अडत्याला आंबे विकण्याचे ठरले. एवढे आंबे पाहून अडत्याचे डोळेच पांढरे झाले. छोट्या छोट्या लाकडी पेट्यांमध्ये गवता सोबत त्याने आंबे भरले. या लाकडी पेट्यांच्या गाड्यांच्या गाड्या मारोतरावांच्या वाड्याहून तालुक्याला गेल्या. अडत्याने आंब्याला खुप चांगला भाव दिला. आंब्याच उत्पन्न शेतीच्या पिकांपेक्षा जास्त झालं. आलेल्या पैशात मारोतरावांनी ‘ राजदुत ‘ नावाची मोटारसायकल घेतली. गावात आता दोन राजदुत झाल्या. एक पाटलाची आणि दुसरी मारोतरावांची. आता तालुक्याला जाणं सोपं झालं आणि वरचे वर वाढलंही. मारोतराव कधी कधी बायकोला तालुक्याला घेऊन जाऊ लागले. त्यांची बायको चालत चालत वेशी बाहेर यायची आणि कुणी बघत नाही याची खात्री करून मग राजदुत वर बसायची. रस्त्यात चुकून कुणी मारोतरावांना राम राम केला तर तिच्या जिवाचं लाजेन पाणी पाणी व्हायचं. पण किसना सोबत ती बिनधास्त वाड्याहूनच बसून जायची. लेकाच्या मागे बसायची कसली आली लाज. असं ती नेहमी मारोतरावांना म्हणायची.

आंबा भरभराट आणत होता. नफाही दरवर्षी वाढतच होता. पण चोरट्यांचे कारनामे काही केल्या कमी होईनात. मारोतराव आणि किसनाच्या गस्तीने पहाटेच्या चोऱ्या थांबल्या. चोरांच्या टोळक्याने नवीन शक्कल काढली. आठ दहा जण एकत्र येऊन रात्रीच माल पसार करू लागली. कैऱ्या ऐन भरात येत होत्या. पण चोरी रात्रीच होते हे मारोतरावांच्या लक्षात आलं. किसना म्हणाला मीच रात्री गस्त घालतो, बघतोच कोण येतो ते. रात्री जेवण करून किसना आंब्या खाली आला. राजदुत विहिरी पाशी लावली. आंब्याला दोन चार घिरट्या मारल्या. बारा एकच्या दरम्यान त्याचा डोळा लागला. दोन तीनच्या सुमारास टोळकं आलं. किसना गाढ झोपलेला पाहून त्यांनी कैऱ्या तोडण्यास सुरू केले. पडलेल्या कैऱ्यांचे पोते भरणे सुरू झाले. चालू असलेल्या हालचालीने किसना ला जाग आली. तो चवताळून उठला. सोबत आणलेली कुऱ्हाड घेऊन चोरांवर धावून गेला. पोती तिथेच सोडून चोर पसार झाले. सकाळीच वाड्यावर जाऊन त्याने मारोतरावांना झालेला प्रकार सांगितला. मी जागी आहे हे चोरांना दुरूनच कळावे असे काही तरी करावे लागेल या विचारातच तो घरी आला. त्याच लक्ष बापाच्या डफड्यावर गेलं. तसही बाप मेल्या पासून गावातल्या अंतयात्रेत डफड वाजवन बंदच झालं होतं.

रात्री जेवण झाल्यावर त्यानं डफड पाठीला टांगलं आणि आंब्यावर निघाला. बऱ्याच वर्षांची डफड्यातून काही निराळे सूर काढण्याची त्याची इच्छा होतीच. गाव पासून दूर असल्याने त्याने डफड वाजवलेलं कुणाला फारसं कळणार ही नव्हतं. झोप यायला लागली की तो ते वाजवत आंब्याला घिरट्या घालत बसला. चोरांनी दुरूनच कानोसा घेतला डफड्याचा आवाज ऐकून ते पसार झाले. सकाळ झाली. किसनाने डफड आंब्याच्या फांड्यांमध्ये लपवलं आणि तो घरी आला. वाड्यावर जाऊन त्याने आपली शक्कल मारोतरावांना सांगितली. त्यांना मजा वाटली. तालुक्याला जाऊन चांगला बँडच आणुयात म्हणाले. किसना नाही म्हणाला. म्हणाला, ही माझ्या बापाची आठवण आहे. बापाने आयुष्य भर अंतयात्रेत हे डफड वाजवलं. वातावरणात स्मशान शांतता पसरवली. पोरं बाळांना घाबरवलं. मी याच वाद्यातून काही तरी सुंदर काढेल. मारोतरावांना किसनाचं कौतुक वाटलं. ते म्हणाले वाजव, “तुला वाटेल तसं.”

* * *

गस्त

रोज रात्रीचा किसनाचा कार्यक्रम ठरला. जेवण अाटोपलं की आंब्यावर निघायचं. बारा एक नंतर डफड वाजवायला सुरू करायचं. वेगवेगळे प्रयोग करून बघायचे. पण त्या मुर्दाड डफड्यातून एकच सुर निघे. प्रत्येक ठोका रात्रीची शांतता चिरत जाई.

एका रात्री तालुक्याहून उशिरा परत येणाऱ्या एकाने दुरूनच डफड्याचे ठोके ऐकले. तो जागीच गार झाला. रस्ता सोडून शेतातून सैरावैरा पळत सुटला. प्रत्येक मिनिटाला ऐकु येणारा ठोका त्याचा जीव घेत होता. जीव मुठीत घेऊन, धापा टाकत तो गावात पोहोचला. घामाने ओला चिंब. अंग तापाने फणफणतेय. तोंडातून शब्द बाहेर निघत नाही आहे. त्याची ही अवस्था बघून बायको घाबरली. तिने आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं. तो अंगणात खाटेवर पडलेला. काय झालंय कळेना. एका म्हातारीने काळा बिबा गरम केला. त्याचं तेल काढलं आणि त्याचा कपाळी लावलं. तो शांत झाला. थोड्या वेळानं बोलला, “किसनाचा बाप परत आलाय. आंब्याखाली डफड वाजावतोय.”

जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. बायका मुलांना घेऊन घराकडे निघाल्या. गावच्या चावडीवर घोळका झाला. पाटलाने मारलेल्या किसनाच्या बापाच भुत सूड घ्यायला आलय अशा चर्चा सुरू झाल्या. त्यात आज अमावस्या असल्याचं कळलं. चार पाच उत्साही तरुण, “आपण जाऊन बघुयात.”म्हणाले. ते वेशीपासून थोडे दूर आल्यावर, डफड्याचे ठोके स्पष्ट ऐकु येऊ लागले आणि त्यांची पळता भुई थोडी झाली. ती रात्र गाव जागी होता.

सकाळ झाली. लोकं पाटलाच्या वाड्यावर गेली. रात्री पिऊन पडलेल्या पाटलाला काय घडलं ते ठाऊकच नव्हतं. ‘ किसनाचा बाप कसा परत येईल. मी तर त्याला गळा दाबून मारलं होतं. तडफडत त्याचा जीव जातांना मी पहिलं होतं ‘ पाटलाच्या मनांत विचार आला. पण त्याने तो मनातच ठेवला. “आज रात्री बघु” म्हणत वाड्यावर झालेली गर्दी त्याने पांगवली. इकडे किसना घरी आला तेंव्हा आईच्या रडण्याचा आवाज येत होता. अंगणात आईभोवती बायका बसलेल्या. त्याला पाहून आई त्याच्या गळ्यात पडली. “किसना तुझा बाप परत आलाय. बघ, डफड घेऊन गेलाय. आंब्या खाली वाजवतोय.”किसनाने हसु दाबलं. बायकांना घरी जाण्यास सांगितलं. आईला घरात नेलं. खाऊ पिऊ घातलं. आणि ती शांत झोपली. किसना हसत हसत मारोतरावांच्या वाड्यावर आला. घडलेला किस्सा सांगितला. मारोतराव आणि त्यांची बायको खुप हसले. मग मारोतराव म्हणाले हे गुपित कुणालाच नाही सांगायचं. यामुळे आपले आंबे वाचत आहेत.

त्या रात्री पाटील पोरांसोबत वेशी बाहेर आला. त्याने डफडयाचे ठोके ऐकले आणि तो हादरलाच. तरी, तो तावातावाने आंब्या कडे निघाला. पोरांनी पाटलाला अडवलं. वाड्यावर आणलं. पाटलाच्या वाड्यावर डफड्याचा आवाज ऐकू येत होता. पोरं हळूहळू पांगली. पाटलाला काही केल्या झोप येईना. किसनाच्या बापाचं भूत आपला सूड घेणार या विचाराने त्याला झोप येईना. वाड्यावर स्पष्ट ऐकु येणारे डफड्याचे ठोके त्याला बेचैन करू लागले.

आंब्याखालच्या भुताचं पेव फार वाढलं. लोक दिवसाही बिचकत जाऊ लागले. पण मारोतरावांना सांगायची कुणाची हिम्मत होईना. मारोतराव आणि किसना मात्र खूष होते. कैऱ्या पिकायला सुरुवात झाली होती. यंदा दुपटीने आंबे येणार हे स्पष्ट होतं. त्या दिवशी आंब्याचं पीक बघायला अडत्या गावात आला. यंदा आंबा थेट मुंबईला पाठवू म्हणाला. “मुंबईचा व्यापारी उद्या तालुक्याला येणार आहे, तुम्ही बोलणी करण्यासाठी या.” अडत्या मारोतरावांना म्हणाला. मारोतराव किसना कडे बोट दाखवत म्हणाले, “आंब्याचे सगळे व्यवहार आजपासून आमचा किसना बघेल. तोच येईल उद्या बोलणी करण्यासाठी.” किसना चमकला आणि खुशही झाला. त्या रात्री किसनाने डफड खुप बदडलं. पाटलाचं पिण फार वाढलं होतं. डफड्याच्या आवाजाने त्याला झोप येईना. तो पिसाळलेल्या लांडग्या सारखं झाला होता. एकदा जाऊन त्या भुताचा सोक्षमोक्ष लावूनच टाकावा असं त्याला वाटतं होतं. पण हिम्मत होईना.

सकाळ झाली. किसना घरी आला. तयार होवून मारोतरावांच्या वाड्यावर आला. दोघांनी मिळुन न्याहारी केली. मारोतरावांनी जबरदस्ती त्याच्या खिशात पैसे कोंबले. “अंधार झाला तर तालुक्यालाच थांब. सकाळी ये.” मारोतराव काळजीने म्हणाले. बाप लेकांचा हा संवाद ऐकून दारात उभ्या असलेल्या मारोतरावांच्या बायकोचे डोळे भरून आले. किसना तालुक्याला पोहोचला. आंब्याला दरवर्षी पेक्षा खुप जास्त भाव मिळाला. आंबेपण झाडावरून व्यपारीच उतरवणार होता. अडत्या मिळालेल्या कमीशन मुळे खुश. किसना पहिलीच बोलणी यशस्वी झाली म्हणून खुश. पण ही मीटिंग संपता संपता फार उशीर झाला. रात्र बरीच उलटून गेली म्हणून किसना जवळच्याच लॉज मध्ये थांबला. सकाळी कधी एकदाचं मारोतरावांना सांगतो असं त्याला झालं.

इकडे गावात, किसना अंधार पडल्याने आता येणार नाही म्हणून,मारोतराव स्वतः आंब्याच्या गस्तीसाठी निघाले. आंब्याखाली बराच वेळ इकडे तिकडे केल्यावर, त्यांना आंब्याच्या फांद्यांमध्ये लपवून ठेवलेलं डफड दिसलं. गंमत म्हणून आपण ही थोडा हात फिरवून बघुया, म्हणून त्यांनी ते काढलं आणि वाजवायला सुरुवात केली. थोडं वाजल्यावर त्यांना मजा आली. मग त्यांनी ते बदडायला सुरुवात केली. वाजवत वाजवत आंब्याशी गोल गोल फिरू लागले.

डफड्याचे आवाज ऐकुन आज पाटलाला असह्य झालं. उरली सुरली दारूची बाटली घश्यात ओतून त्याने आपली कुऱ्हाड काढली. झोकांड्या मारत राजदुत काढली आणि आंब्याकडे निघाला. जसा जसा आंबा जवळ येत होता, डफड्याचा आवाज मोठा होत होता. रात्रीच्या थंड हवेने त्याचं डोकं सुन्न झालं होत. डफड्याच्या आवाजात त्याला राजदुतचा आवाजही येत नव्हता. पाटील घामाने लदबद झाला होता. थंड हवेने त्याला कापरं भरलं होतं. त्यानं राजदुतचा हेड लाईट बंद केला. वेग कमी केला. आंब्यापासून थोड्या अंतरावर राजदुत रस्त्यावर झोपवली. कुऱ्हाड खांद्यावर घेतली आणि सगळी हिम्मत एकवटून आंब्याकडे पळत सुटला. मारोतराव डफड वाजवण्यात मग्न होते. आंब्याला घिरट्या घालत होते. पाटील आंब्यापाशी पोहचला तेंव्हा मारोतराव पाठमोरे होते. पाटलाने खांद्यावरची कुऱ्हाड मारोतरावांवर उगारली. पाटलाच्या एका दणक्यात मारोतरावांच मुंडकं धडापासून वेगळं झालं. मारोतराव डफड वाजवण्यात एवढे गुंतले होते की ते बिना मुंडक्याच धड डफड वाजवत पुढे गेलं आणि मग कोसळलं. पाटील धड कोसळण्या आधीच ते वाजवणारं धड बघून पळाला. पळतांना त्याला खालची जमीन जाणवतच नव्हती. कसाबसा तो राजदुतपाशी आला आणि राजदुत उचलतांनाच ती अंगावर घेऊन तो कोसळला. भीतीने पाटील तिथेच मेला. मारोतराव रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. धड वेगळं, मुंडक वेगळं.

सकाळी मारोतरावांचे मजूर वाड्यावर पळत आले. मारोतरावांची बायको, बातमी ऐकुन जागीच बसली. कसेबसे सावरत मजुरांनी तिला आंब्यावर आणलं. एव्हाना सारा गाव गोळा झाला होता. धडापासून वेगळे झालेले मारोतराव बघून तिने जो हंबरडा फोडला की सारं गाव विव्हळल. तिला श्वासच घेता येईना. बायका तिला आवरत होत्या. थोड्या वेळानं ती शांत झाली. मोठी हिम्मत करून उठली. लोकं रस्त्यावर अंतयात्रेची तयारी करण्यात जुंपले होते. हिने मारोतरावांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. चेहऱ्याला लागलेली माती आपल्या पदराने पुसली. एकदा मनभरून मारोतरावांना पाहिलं आणि क्षणाचा ही विलंब न करता स्वतःला शेजारच्या विहिरीत झोकून दिलं. एकच आरडाओरड झाली. तिला वाचवण्या साठी लोकांनी पटापट विहिरीत उड्या टाकल्या. तिला वर काढलं पण तोवर तिने जीव सोडला होता. नवऱ्या सोबत जाण्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं.

सकाळीच तालुक्याहून निघालेला किसना एव्हाना आंब्यापर्यंत येऊन पोहचला. गर्दी बघून त्याने राजदुत दूरच थांबवली. आणि पळतच आंब्यापशी आला. समोरचं दृश्य पाहून तो खालीच बसला. सगळं सुन्न झालं. कुणाचेच आवाज ऐकू येईनासे झाले. गावकऱ्यांनी त्याला सावरलं. किसनाने सख्ख्या पोराप्रमाने मारोतराव आणि त्यांच्या बायकोचे अंत्य विधी केले. गावातल्या थोरल्यांच्या सांगण्याहून किसना वाड्यावर राहू लागला. ठरल्या प्रमाणे व्यापाऱ्याची माणसं आंबे उतरवून घेवून गेली. त्या दिवशी किसना लहान मुलासारखा रडला.

हंगाम ओसरला. किसनाने शेत कामात मन लावून घेतलं. पुढच्या वर्षी आंब्याला पुन्हा मोहर आला. कैऱ्या येऊ लागल्या.पण आता आधी सारखी रात्रीची गस्त द्यावी लागत नाही.कारण, बिना मुंडक्याचं मारोतरावांचं धड, डफड वाजवत गस्त घालतं, दरवर्षी.

इतर पोस्ट्स