कॉलेजमध्ये बरं होतं.
मित्र होते.
कट्टा होता.
वेळही होता.
रोज कट्ट्यावर चक्कर टाकणे हा नियम होता.
आणि सवयही.
हळू हळू एक एक जण जमायचा.
चहा कॉफी सोबत, गप्पा, जोक्स, किस्से व्हायचे.
आय टी वाला,
फायनान्स वाला,
मार्केटिंग वाला
अशी कुणाला लेबलं नव्हती.
मित्र फक्त मित्र होते.
हसत खिदळत कॉलेज संपलं.
ऑफिस आलं.
येण्या जाण्याचे रस्ते वेगळे झाले.
कट्टा सुटला.
मित्र ?
आहेत.
व्हॉट्सअपच्या ग्रुप वर.
कॅफे आपो, सीसीडी किंवा स्टारबक्स सारखं नाही.
कारण ती कुठली यशस्वी फूड चैन नाही.
तर कुणाचं तरी पॅशन आहे.
आणि ते तुम्हाला सारखं जाणवतं.
एक तर, आपण ऑकवर्ड मीटिंग उगाच कॅजूअल् वाटावी म्हणून कॅफेत भेटतो.
किंवा “कुठे घरी बोलवायचं ?” असं न म्हणता “कन्व्हेनीयंट ठिकाणं आहे!” म्हणुन कॅफेत भेटतो.
कॅफेत बसल्यावर, जो रस्त्याकडे तोंड करून बसतो, तो निम्मा वेळ बाहेरच्या ट्रॅफिकची हालचाल पाहतो.
आणि समोरचा, भिंतीवरचं सारखं सारखं तेच वाचतो.
आपो ला मोठ्ठया खिडक्या आहेत. लख्ख प्रकाशलेल्या.
पण जनरली कॅफेतून दिसणारी बाहेरची ट्रॅफिक नाही.
बाहेर सुंदर झाडी आहे.
येलो आणि व्हाईट कॉम्बिनेशन असलेल्या सुंदर भिंती आहेत.
भिंतीवर बरीच आर्ट वर्क्स आहेत.
मिस मॅच चेअर्स आणि त्याला शोभतील अशी टेबल आहेत.
मोठ्ठ्या ग्रुपने आरामशीर बसून दंगा करावा एवढी ऐसपैस सोय आहे.
गोष्टी परफेक्ट नसून प्रत्येकाला एक ह्यूमन टच आहे.
पॅशन आहे.
तीच गोष्ट फूड मध्येही आहे.
कॉफीत ही आहे.
एकदा तुमचं ठरलं, की सगळं सगळं पॅशनेटली होतं.
सुनेत्रा आणि सार्थक या कपलचही असच झालं असावं.
आणि कॅफे आपो जन्माला आलं.
“आम्हाला कुल जागा बनवायची होती जी एक कट्टा असेल, सगळ्यांसाठी!” दोघंही सांगत होती.
दोघं नवरा बायकोचं स्वप्न दिसतं त्यांच्या डोळ्यांत.
आपो खरंच कुल आहे. कोझी आहे.
परफेक्ट नाही. ह्यूमन आहे. आपलं वाटावं असं आहे.
आपो हे फिलिपीन्स मधलं कासावांसाठी प्रसिध्द असलेलं एक बेट.
कासव म्हटलं की मला उगाच आपण ससा आहोत असं वाटतं.
खरं तर आपण रेस मधले उंदरं आहोत.
शेवटी जिंकणार कासवच.
माहीत आहे. सगळयांना.
अगदी लहानपणपासूनच.
आणि आपो सारख्या ठिकाणी आलो की कासवाच जिंकण स्वाभाविक वाटतं.
या रेस मध्ये आपलं काय मागे सुटलं ते जाणवतं.
मित्र सुटले.
कट्टे सुटले.
कट्टया वर रोज चक्कर मारायची सवय सुटली.
तास अन् तास च्या गप्पा सुटल्या.
“जॉब नही, कुछ और कर दिखांयेगे” वाले स्वप्न सुटले.
आपले या ह्रदयी चे त्या हृदयी असलेले सगळे संवाद सुटले.
म्युट केलेले व्हॉटसअप चे ग्रुप आणि फॉरवर्ड मेसेजेस उरलेत.
म्हणून आज कॅफे आपो ला आलो तेंव्हा कुणास ठाऊक का, वाटलं :
हळू हळू एक एक जण येईल आता.
आणि पुन्हा सुरू होतील गप्पा…
कधी ऑफिसच्या ब्रेक मध्ये,
तर कधी ऑफिस मधून घरी जाता जाता,
सुनेत्रा आणि सार्थकच्या या कट्टयावर चक्कर टाका.
बघा हा अनुभव येतो का?