दादांची परीक्षेला फेस करण्याची एक सॉलिड सिस्टीम होती. कॉलेजात जुनं वास्तव्य असल्याने दादांना सगळे ओळखायचे. रोल नंबरची सेटिंग अशी केली जायची की दादांचा नंबर कुठल्या ना कुठल्या खिडकीत यायचाच. आमचे सगळेच पेपर पहिल्या मजल्यावर व्हायचे.
तर, दादांची सिस्टीम अशी होती:
– दादा हॉल मध्ये येतांना मागच्या वर्षीची जुनी प्रश्न पत्रिका घेऊन येणार.
– या वर्षीच्या प्रश्न पत्रिका वाटून झाल्या की, दादा ही नवीन प्रश्न पत्रिका खिडकीतून खाली भिरकावून देणार. सोबत आणलेली जुनी डेस्क वर काढून ठेवली जाणार.
– खिडकी खाली आधीच दोघं तिघ दादांचे पंटर्स तैनात असणार.
– प्रश्न पत्रिका खाली पडली रे पडली की दोघं जण बाईक वर जाऊन पटकन झेरॉक्स करुन आणणार.
– हॉल मध्ये एक विद्यार्थी उशिरा जाणारा. तो दादांची यंदाची प्रश्न पत्रिका घेऊन हॉल मध्ये येणार.
– आपल्या जागेवर जाता जाता, नवीन प्रश्न पत्रिका परत दादांकडे.
– खाली यंदाची प्रश्न पत्रिका आणि ज्यांचा आज पेपर नाही असे ज्युनियर रेडीच असणार.
– मग हे ज्युनियर, पुस्तकातुन उत्तरं शोधून भरभर लिहिणार.
– त्याचे बोळे बनवून टॉयलेटच्या तुटलेल्या खिडकीतून आतमध्ये फेकले जाणार.
– एका विशिष्ट पद्धतीने बाइकचा हॉर्न वाजवून दादांना सिग्नल मिळणार.
– मग दादांचा बाथरूम ब्रेक!
– टॉयलेट मधले दगडाला बांधून आलेली सगळी उत्तरे दादा गोळा करून हॉल मध्ये आणणार.
( ही उत्तरे म्हणजे, ज्युनियर लोकांनी जेवढे कळले आणि जेवढे पुस्तकात सापडले ते सगळे कागदावर भरभर उतरवून दिलेले. )
दादा शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसणार.
अल्फाबेटीकली दादा अमोलच्या मागच्या बेंच वर यायचे. अमोल म्हणजे युनिव्हर्सिटी टॉपर.
हॉलवर असलेल्या मास्तरांची नजर चुकवून, दादा आणलेल्या कागदांमधून एक कागद हळूच बाहेर काढणार. समोर बसलेल्या, पेपर लिहिण्यात मग्न असलेल्या अमोलला तो कागद दाखवत विचारणार,
“या उत्तराचा प्रश्न कोणता?”
अमोलसाठी दादांचा हा प्रश्न परीक्षेतल्या प्रश्नांपेक्षा अवघड असायचा.
. . .
एकदा, ठरल्याप्रमाणे दादांनी प्रश्न पत्रिका खाली भिरकावली.
नेमके त्याच वेळी एचओडी खालून चालले होते. ते दिसल्यामुळे खाली प्रश्न पत्रिकेसाठी उभी असलेली मंडळी गायब झाली होती. दादाने फेकलेली ती पत्रिका सरांच्या अंगावर पडली.
कुणाचा तरी पेपर खाली पडला म्हणून ते वर आले.
“ही प्रश्न पत्रिका कुणाची?” त्यांनी खडसावून विचारलं.
कुणी सांगे ना.
मग वर्गावरच्या मास्तरला सगळ्यांच्या प्रश्न पत्रिका चेक करायला लावण्यात आल्या. दादांकडे मागच्या वर्षीची जुनी प्रश्न पत्रिका होतीच ती उघडून त्यांनी ठेवली. मास्तर काही पाहिलं पानं चेक करतच नव्हते.
“सगळ्यांच्या पत्रिका जागेवर आहेत तर ही खाली कुणाची पडली ?”
असं सर विचारातच होते तेंव्हा, ठरल्या प्रमाणे उशिरा येणारा आत आला.
“एवढ्या उशिरा का आला?”
असं झापझाप झापून सरांनी ती प्रश्न पत्रिका त्याच्या हातात टेकवली.
तो ही मुकाट्याने आपल्या जागेवर जाऊन बसला.
त्या दिवशी, दादांकडे प्रश्न जुनेच होते पण उत्तरे मात्र नव्हती.
. . .
जुन्या आणि नवीन प्रश्न पत्रिकेची ही सेटिंग एव्हाना बऱ्याच जणांना कळली होती. दादा विरुध्द बोलण्याची कुणाची हिम्मत नव्हती. कुजबूज मात्र सगळी कडे होती.
एका दिवशी, वर्गावरच्या हुशार मास्तरने दादांना प्रश्न पत्रिका भिरकवतांना पाहिलं. त्याने एकेकाच्या प्रश्न पत्रिका निरखुन पाहायला सुरुवात केली. दादा जवळ येता येता मास्तरला बराच वेळ झाला.
मास्तर दादांच्या डेस्कपाशी आला आणि ठरलेला उशिरा येणारा गडी हॉल मध्ये आला.
“प्रश्न पत्रिका टेबलवरून घे” मास्तरने दादा जवळूनच सांगीतलं.
तो गडी, दादांकडे बघत, आपल्या जागेवर जाऊन बसला. दोन प्रश्नपत्रिका घेऊन.
सगळा वर्ग पेपर लिहिणे सोडून “आज काय होणार?” म्हणुन दादांकडें बघू लागला.
दादा चुळबुळ करू लागले.
दादांची प्रश्न पत्रिका मास्तरने हातात घेतली तेव्हा वर्गातला एका जण दबक्या आवाजात बोलला,
“मागच्या वर्षीची आहे ”
कळू नये म्हणून दादाने नेहमी प्रमाणे मधलं पान उघडून ठेवलं होतं. मास्तरने पहिलं पानं पाहिलं आणि त्या मुलाला उद्देशून बोलला,
“नाही, या वर्षीचीच आहे !”
दादाने प्रश्न पत्रिका मास्तरच्या हातातून हिस्कावली आणि स्वतः चेक केली.
खरंच या वर्षीचीच होती.
म्हणजे जी खिडकीतून खाली गेली ती मागच्या वर्षीची होती.
जुन्या प्रश्नांची उत्तरं टॉयलेट मध्ये फेकून, पंटर्स खालून हॉर्न मारून गेले. पण त्या दिवशी दादांनी बाथरूम ब्रेक काही घेतला नाही.
एकंदरीत, आम्ही परीक्षेच्या आधी जीवाचा आटापिटा करायचो आणि दादा परीक्षेत.
रिलेटेड पोस्ट : संकट