उशीर

(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

ड्रॉइंग शीटवर ‘ रिपीट ‘ असा रिमार्क घेऊन, मी जागेवर येऊन बसलो. 

ड्रॉइंग हॉलमध्ये अक्षरशः गोंधळ सुरू होता. कुणी दोन-दोन, तीन-तीनचे ग्रुप करून डिस्कशन करीत होते. कुणी हॉलमध्ये उगाच इकडे तिकडे हिंडत होते. कुणी बाहेर ये-जा करीत होते. दोघं-तिघं आपली पूर्ण झालेली शीट घेऊन, सरांसामोर उभे होते. इंजिनीयरिंग ड्रॉइंगच्या प्रॅक्टिकलला हे सर आले की, आधी फळा भरून ड्रॉइंग काढायचे आणि नंतर पुढचे दोन तास निवांत बसायचे. हॉलमध्ये पोरं कितीही गोंधळ घालू देत, या माणसावर कसलाही परिणाम होते नसे. दोन तासाच्या या प्रॅक्टिकलला ते काहीच बोलत नसतं. आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून वर्गाकडे बघून, ते गालातल्या गालात फक्त हसायचे. हसणं मात्र फार उपहासात्मक असायचं. 

त्या गालातल्या गालात हसण्यामागे, काय असेल, याचा अंदाज लावणे फार अवघड.

मी पूर्ण झालेली शीट घेऊन त्यांच्याकडे गेलो. मूर्ती निस्तब्ध बसली होती. मी शीट हळूच टेबलावर सरकवली. ते तंद्रीतून बाहेर आले. माझ्याकडे बघितलं. टेबलावरची शीट थोड्यावेळ न्याहळल्यावर, त्यांनी पेन्सिल मागितली. एक दोन  करेक्शन स्वतःच केले. शीट दोन्ही हातात धरून जरा दुरून पहिली. गालातल्या गालात हसले. पेन्सिल उचलली. आणि उजव्या कोपऱ्या वर रिमार्क मारला –  रिपीट .

त्यांच्याकडे शीट चेकिंगला गेल्यावर तीन शक्यता असायच्या – सही, करेक्शन, किंवा रिपीट. रिपीट म्हणजे संपूर्ण शीट पुन्हा ड्रॉ करा. दोन आठवड्यापासून काढत असलेली ती शीट, पुन्हा काढायचा मला जाम कंटाळा आला होता. 

काय करावं? म्हणून मी इकडे तिकडे बघत बसलो होतो. पोरं आपापली शीट चेकिंगला नेत होती. कुणाला सही, तर कुणाला रिपीट असं चक्र सुरू होतं. सही कुणाला मिळाली आणि कुणाला रिपीट मिळालं हे मला दुरूनच कळत होतं. अर्धा तास, हा पॅटर्न बारकाईने स्टडी केल्यावर, तो कसा वर्क होतोय मला कळलं.  मी शीटवर पेन्सिलने लिहिलेलं ‘ रिपीट ‘ इरेझरने व्यवस्थित खोडलं. शीट तशीच उचलून सरांकडे गेलो. त्यांनी शीट पहिली. 

माझ्याकडे पाहून ते गालातल्या गालात हसले. आपल्या खिश्याचा बॉल पेन काढला. आणि सही मिळाली.

प्रोबॅबिलिटी झिंदाबाद !

.  .  .

गुरुवारी त्यांचं पहिलं लेक्चर असायचं. अगदी वेळेवर सुरू व्हायचं. उशीरा येणारे – मे आय कम इन, सर – चा तगादा लावायचे. असं दोन-चार लेक्चरला झाल्यावर, सर क्लासमध्ये आले की, वर्गाचं दार आत मध्ये ओढून बंद करायला लागले. 

दार बंद. प्रवेश बंद. लेक्चर सुरळीत सुरू. 

त्या गुरुवारी उशीर झाला. मी धापा टाकत, व्हरांड्यातच होतो. सर वर्गाचं दार आत ओढतच होते. मी दाराशी पोहचलो आणि दार बंद झालं. सर दार बंद करून फक्त वळलेच असावेत, म्हणून मी पटकन दार बाहेर ओढलं. सरांनी मागे वाळून पाहिलं. दारातून लख्ख प्रकाश आत आल्यामुळे, जाड भिंगाचा त्यांचा चष्मा चमकला. मी केविलवाण्या नजरेने पाहिलं. 

वळलेले सर, गालातल्या गालात हसले. मान हलवून ‘नाही’ म्हणाले. मी बाहेर सरकलो. 

दाराचे लाकडी, उंच दोन्ही तावदानं, आवाज होणार नाही असे हळूच आत ढकलले. आणि सवयी प्रमाणे बाहेरून दाराची कडी घातली. 

व्हरांड्यातून चालेल्या एका सरांनी, मला कडी घालतांना पाहिलं. हाक मारून थांबवलं. अवधानाने झाल्यामुळे, मी काय केलं हे मला कळलं नाही. त्यांनी रागात माझं बखोट धरलं. दाराची कडी काढली. 

“सर, हा दाराला बाहेरून कडी घालत होता.” मला आत नेत ते म्हणाले. 

आमचे सर, माझ्याकडे बघून गोड हसले. खुणेनेच जागेवर बस म्हणाले. 

दार पुन्हा बंद. लेक्चर सुरू.

सर संपूर्ण वर्गात फेऱ्या मारत शिकवीत. मी शेवटच्या रांगेत, मध्ये कुठेतरी बसायचो. तो तास म्हणजे, माझ्या मनात नाही-नाही ते विचार येऊन गेले. लेक्चर काही संपेना.

शेवटी, लेक्चर संपता संपता, आमच्या रांगेतून जातांना, त्यांनी इशाऱ्यानेच मला उभं राहायला सांगितलं. मला क्रॉस करून ते पुढे गेले. सगळा वर्ग माझ्याकडे बघत होता. आणि मी त्यांच्याकडे. वर्गाच्या मागच्या भिंतीपाशी पोहचल्यावर त्यांनी नाव विचारलं. मी दबक्या आवाजात सांगीतलं. 

ते रांगेतून परत आले. फळ्यापाशी असणाऱ्या टेबलाजवळ उभं राहून, त्यांनी उशीर का झाला विचारलं. माझ्याकडे अर्थातच उत्तर नव्हतं. बराच वेळ त्यांनी उत्तराची वाट पाहिली. तोवर त्यांची दुसऱ्या रांगेतली फेरी संपवुन ते परत फळ्यापाशी आले. माझ्याकडे पाहून त्यांनी, “आता उत्तराची अपेक्षा नाही.” अश्या सुरात, फक्त मान हलवली. टेबलावरचं आपलं पुस्तक बंद केलं. खडू आणि डस्टर गोळा केले. 

“सुटलो!” मी उभ्याउभ्याच निःश्वास टाकला. 

जाता जाता, क्लासकडे बघत त्यांनी विचारलं, “प्रॅक्टिकलला आपल्या किती शीटस् झाल्यात?”

“बारा!” पहिल्या बाकड्यावर बसणाऱ्याने पटकन सांगितलं.

सर गालातल्या गालात हसले. 

माझ्याकडे बघून म्हणाले, “रिपीट.”

इतर पोस्ट्स