काँजुरिंग

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

पैसे देऊन घाबरवून घेण्याचा हा सिनेमा. ‘फाडून घेण्याचा’ही म्हणू शकता.

मुलांना उगाच गाणी म्हणणारी, तालासुरात वाजणारी खेळणी घेऊ नयेत, हे पार्ट वन ज्यांनी पहिला त्यांना माहीतच आहे. याही वेळेस ते सांगायला डायरेक्टर विसरला नाही.

सायरन वाजवणाऱ्या लाल दिव्याच्या फायर ब्रिगेड च्या गाडया ही घेऊ नये. ‘खेळिया’त जाऊन अश्या गाड्या कुणाला बर्थडे गिफ्टही देऊ नये. रात्री तुम्ही गाढ झोपेत असताना अशी छोटी गाडी सायरन वाजवत जर घरभर फिरली तर काय होईल जरा विचार करा.

olx वर जुनं फर्निचर घेतांना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात:

आपण विकत घेत असलेली ती अँटिक आर्म चेअर कधी कुण्या आजोबांच्या जिवाभावाची ही असेल.
काय ठाऊक आजोबा त्याच आर्म चेअर मध्ये गचकले असतील.
नातवाने ती चेअर olx वर टाकली आणि तुम्ही घरी आणली.
आता आजोबा रोज रात्री त्या चेअर वर येऊन निवांत बसले तर…

तुम्ही घरात बसून ‘चला हवा येऊ द्या’ बघताय आणि चेअर मधल्या आजोबांना जर ‘दहाच्या बातम्या’ बघायच्या असतील तर…

आपल्या घरात भूत आहे एवढं कळणे पुरेसं नाही. भुताचं नाव काय असेल हे जाणण्याचा प्रयत्न करावा.
त्याला विचारावे, “बाबारे काय नाव तुझे?”
भूत सांगतं बिच्चारं.
या सिनेमात वयही सांगतं.

आपल्या घरातली उपकरणे सारखीच बंद पडत असतील तर सिरियसली विचार करण्याची गोष्ट आहे.
परदेशात भुतं काढायला आलेली एक्स्पर्ट मंडळीच हि उपकरणे दुरुस्त करतात.

आपल्या कडे उपकरणे दुरुस्ती वाली ही भुतं शोधून आणावी लागतात.

असे सिनेमे पाहून पाहून सापडलेल्या काही फाईडिंग्स :

१.थिएटर मध्ये जेव्हा सगळे जोर जोरात हसत असतात तेव्हा
सगळ्यांची टरकली आहे हे समजावे. त्या आवाजात तुम्ही किंचाळलात तरी चालतं.

२.कान बंद ठेवले की भीती कमी वाटते असे माझ्या बायकोचं म्हणणे आहे. हा सल्ला घरीही कामी येतो.

३.असे सिनेमे शक्यतो दिवसा बघावे, बाहेर आल्यावर दिवस बघून जरा हायसं वाटतं.

४.बाहेर आल्यावर जरा तास भर गर्दीच्या ठिकाणी वावरावे. आजूबाजूची जिवंत भुतं बघून जरा बळ येतं.

५.रविवारी अश्या सिनेमाचा बेत करावा म्हणजे ‘उद्या ऑफिस!’ या भावनेनं आणि त्या ‘हॉरर’ जागेच्या आठवणीने आपण किती शूर आहोत याची खात्री येते.

बाकी, असे सिनेमे अधून मधुन बघत राहावेत.

इतर पोस्ट्स