‘महाराज !’ म्हणायचो आम्ही त्याला. कारण? आम्हाला मिळणारी प्रजेसारखी ट्रीटमेंट. प्रजेसारखी ही ट्रीटमेंट आम्ही मात्र फार एन्जॉय केलीय. महाराजाचं एक इमॅजिनरी ‘संस्थान’ तयार केलं. घडणारी प्रत्येक घटना जर संस्थानांत घडली असती तर महाराजांनी कसं रिॲक्ट केलं असतं, काय डिसिजन दिलं असतं, यावर तासनतास डिस्कशनस् व्हायची. तो ही त्याचं राजेपण आणि संस्थान एन्जॉय करायचा. पाच साडे पाच फुट उंची. अंगाने काकट. केसांचा डावीकडे पाडलेला फुगा. शर्ट असो वा टी शर्ट, व्यवस्थित टक इन केलेलं. पायात स्पोर्ट्स शुज. चेहऱ्यावर निखळ भाव. एका वेगळ्याच रुबाबात चालणं. अशा या साधारण व्यक्तीचं एक सूत्र होतं – “एकदा ठरलं की ठरलं.” मग त्यात कधीच आणि कुणीच, कुठलाच बदल करू शकत नव्हता. माझा निर्णय तुम्ही मान्य करावा असा हट्ट नाही. पण मी करणार असंच!
तर या महाराजांचे काही आठवणीतले क्रोनिकल्स – म्हणजेच इतिहासात नमूद करून ठेवावेत असे प्रसंग. घडलेले सगळे पराक्रम हे महाराजांचे एकट्याचे आहेत. प्रजा फक्त साक्षीदार होती.
मेसचे बंड
आयुष्यात चांगली मुलगी आणि चांगली मेस मिळणे फार अवघड. अत्रे काकूंची मेस मुळातच आमच्या घर मालकीण काकूंच्या प्रयत्नांतून सुरू झाली. आमच्या आधीच्या मेस चे हाल पाहूनच आमच्या काकूंनी अत्रे काकूंना मेस साठी कसं तरी तयार केलं. ही मेस मुळातच जन्माला आमच्या साठी आली होती. आम्ही सगळे मिळून सहा जण त्या मेसचे मेंबर्स झालो. अत्रे काका – काकू फारच उत्साहात होते. मेस चालविण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने, काकुंचं जरा ट्रायल आणि एररच चाललं होतं. आम्ही पण ‘नवसाची मेस’ म्हणून धकवत होतो. त्यांचं मिळमिळीत जेवण कुणाला काही पटेना. पण एवढा खटाटोप करून सुरू झालेली मेस बंद नको पडायला म्हणून आम्ही गप्पपणे गिळत होतो. महाराजांना हे काही सहन होईना. जेवणात लक्ष लागे ना. प्रजेने एक दोनदा समजूत काढली. “अत्रे काकू नवीन आहेत एवढा स्वयंपाक त्यांना झेपत नसेल. हळू हळू होईल बरोबर.” पण कसलं काय, सांगून काही फरक नाही. ऐकतील ते महाराज कसले? एके दिवशी महाराजांनी मेस वर जाऊन आपल्या कराऱ्या आवाजात सांगीतलं, “मला तुमचं जेवण आवडत नाही. उद्या पासून माझा डबा देत जाऊ नका.” अत्रे काका – काकू शॉक! काकूंना तर रडूच कोसळलं. पण महाराज डळमळले नाही. बोलून शांतपणे आपल्या रूमवर निघून गेले. काकूंनी उरलेल्या प्रजेला बोलावलं, छोटीशी फीडबॅक मीटिंग झाली. क्वालिटी बद्दल चर्चा झाली. बदल सुचवण्यात आले. महाराजांना परत येण्याची विनंती करण्यात आली. पण एकदा ठरलं की ठरलं, त्यात बदल नाही. नंतर महाराजांनी दुसरीकडे डबा वगैरे लावला. महाराजांच्या या बंडामुळे प्रजेचं मात्र कल्याण झालं.
जिन्यातून सुटका
रॅगिंग घेणे अलाऊड नव्हतं आमच्या कॉलेज मध्ये. पण ज्युनियर्सचे इंट्रो घ्यायला बंदी नव्हती. इंट्रो म्हणजे नाव गाव विचारायचं. दोन तीन फालतू प्रश्न विचारायचे. म्हणजे बघा, “कॉम्प्युटरला मराठीत काय म्हणतात?” पोरं सांगायची, “संगणक !” खरा प्रश्न पुढचा, “संगणक या शब्दात अनुस्वार स वर आहे की ग वर?” इथे पोरांची विकेट पडायची. तेवढीच आमची मजा. आमच्या सोबत महाराज असायचेच, पण कधी काही बोलायचे नाहीत. एकदा म्हणाले, “उद्या मी घेतो इंट्रो !” आम्ही काही फार सिरीयसली घेतलं नाही. पण महाराजांचं, ठरलं म्हणजे ठरलं. दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंटच्या जिन्यात महाराज एकटेच ज्युनियर्सच्या घोळक्यात उभे दिसले. काय चाललंय बघावं म्हणून सहज जिन्यातून गेलो. तर पठ्ठ्या स्वतःच इंट्रो देत होता. ज्युनियर्स पोरं पोरी हसत होती, महाराजांना प्रश्न विचारत होती. प्रकरण जरा हाताबाहेर गेलेलं होतं आणि मला एकट्याला आवरणारंही नव्हतं. मी त्याच पावलांनी खाली गेलो प्रजेची एक तुकडी तयार करून जिन्यावर हमला केला आणि महाराजांची सुखरूप सुटका केली.
कलाश्रय
महाराजांना कलेची कदर आणि हौस दोन्ही होत्या. कॉलेज – प्रेम – कविता हे सर्कल वर्षानुवर्षे फिरतय. आमच्या डिपार्टमेंटच वॉल मॅगझिन होतं. तिथे प्रेमविरांच्या बऱ्याच कविता प्रकाशित होत. आवडलेली प्रत्येक गोष्ट करून बघायचे महाराज. कविता आवडल्या. कराव्या वाटल्या. पण प्रेमाच्या भानगडीत महाराज कधी न पडल्याने जरा गोची झाली. त्यांनी झाड, पक्षी, माणूस अश्या सामाजिक विषयांवर कविता करायला सुरुवात केली. मग काय? एकावर एक कविता. कविता तयार झाली की महाराज आमच्या रूमवर. ऐकण्यासाठी आणि दाद देण्यासाठी हक्काची प्रजा होतीच. कवितांचे बरेच प्रयोग महाराजांनी केले. काही फसले काही वॉल मॅगझिनवर गेले. पण कवितेनं महाराजांच्या पदरी आश्रय घेतला तो कायमचा.
मोहीम
प्रत्येक गोष्ट एखाद्या मोहिमेला चाललोय या सारखी चोख करण्याची सवय. पैशांचे काटेकोर नियोजन. महिन्याभराच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या. प्रजेने कितीही विनवण्या केल्या तरी ठरलेल्या दिवशीच पाणीपुरी खाऊ घालायचे, महाराज.
आम्ही सगळ्यांनी जिम लावली. सहा महिन्याचे पैसे भरले. सकाळी सहाची बॅच. महाराज पाऊने सहाला हजर. बाहेरून आवाज द्यायचे. आम्ही घोडे विकून झोपलेलो. दोन तीन दिवस गेलो होतो आम्ही, नंतर त्या जिमच तोंडही पाहिलं नाही. महाराज मात्र रोज जायचे आणि आम्हाला न चुकता आवाज द्यायचे. आजूबाजूचे लोकं उठत पण आम्ही कधी उठून बाहेर आलो नाही. एकही दिवस जिमला दांडी मारली नाही त्यांनी. कारण सोप्प होतं, पैसे भरलेत, मग वसुल करावेच लागणार. जिमची मोहीम महाराजांनी फत्ते केली, पण हातास आणि अंगास काही लागलं नाही.
महाराजांची मोहीम एकदा पुण्याला होती. पैशाचं काही तरी कॅल्क्युलेशन करून, फोन आला, “शिवाजीनगरहून कोथरुडला यायला ऑटोने किती पैसे लागतात?” तोपर्यंत मी कधी स्पेशल ऑटोकरून शिवाजीनगरहून आलो नव्हतो. तरी मी अंदाजे ठोकलं, “तीस रुपये होतील, मीटरने.” महाराज येणार म्हणून मी स्वतः खाली रिसिव्ह करायला गेलो. महाराज रागातच ऑटोतून उतरले आणि म्हणाले, “ऐंशी रुपये लागले!” चिडलेले महाराज पाहून मनातून आनंद झाला पण मी आधी सॉरी म्हणालो आणि मग विचारलं, “कसा आहेस?”
. . .
तो शाळेत होता माझ्या. पण वेगळ्या वर्गात. डिप्लोमाला एका वर्गात आलो. खरंतर, कॉलेज लाईफ मधला हा माझा पहिला मित्र. दोघंही सामान्य बॅकग्राऊंड मधून आलेले. एकमेकांना सपोर्ट करत करत आम्ही पुढे जात राहिलो. सेकंड इअर नंतर तो मागे पडला. इंजिनीअरिंगला आम्ही पुन्हा एका कॉलेज मध्ये आलो. त्याची रूमही माझ्या रूम जवळच होती. आमचं शाळा- डिप्लोमाचं कनेक्शन अजुन घट्ट झालं. काही लोकं त्यांच्या युनिक स्वभावामुळे लक्षात राहतात. सगळ्यांचं शांतपणे ऐकून त्याला वाटेल तेच करणारा होता तो. इंजिनिरिंग झाल्यावर कॉन्टॅक्ट कमी झाला. पुढे त्याने मास्टर्स केलं. प्रत्येकाची स्टोरी जशी पुढे सरकत जाते तशी बदलत जाते. त्याचा काही वर्षांचा प्रवास मी अगदी जवळून पाहिलाय. मित्रांमध्ये मिसळण्यासाठी त्याने स्वतःला भरपूर डेव्हलप केलं. आता मुंबईत स्थाईक आहे. परवा त्याचा फोन आला आणि झरझर सगळं आठवलं. मित्र म्हणून खरंच राजा माणूस. तुम्ही एकदा त्याचे मित्र झालात की मागे वळून पाहण्याची गरज नाही.
महाराज ! या पोस्टसाठी, क्षमा असावी.