एकंदरीत, खाण्याकडून माझ्या अगदी माफक अपेक्षा आहेत. म्हणजे बघा –
पोहे असतील तर ते वाफाळलेले आणि लुसलुशीत हवेत. प्लेट मध्ये त्यांचा डोंगर तयार व्हावा. त्यात फ्रेश हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता असावा. सोबतीला लिंबाची फोड. असे कोरडे पोहे घश्याखाली जात नाहीत म्हणून त्या सोबत वाटीभर मटकी किंवा चण्याचा झणझणीत तर्री रस्सा हवा.
तीच गोष्ट मिसळची ! बारीक कापलेला पांढरा स्वच्छ कांदा, त्यावर शिपंडलेला कोथिंबीर, लोळत पडलेल्या लिंबाच्या फोडी. गुबगुबीत आणि खुसखुशीत फरसाण. छोट्या भांड्यात उकळतं सँपल. टवटवीत ताजे पाव. सोबत ताक किंवा मठ्ठा. मिसळ रांगडी हवी, पहिल्या घासात डोक्याला घाम यायला हवा.
बेत साऊथ इंडियन असेल तर पहिला मान इडलीचा. इडली रवेदार आणि स्पंजी हवी. ती गुबगुबीत इडली दोन्ही हातांनी तोडली तर त्यातून तिच्या सारख्याच पांढऱ्या शुभ्र वाफा निघायला हव्या. सांबार सेपरेट – एका वाटीत – पातळ आणि किंचित तिखट हवा. सोबत नारळाची चटणी, तिला हलकीशी फोडणी दिलेली हवी. लाल चटणी जास्त आंबट नको.
डोसा हा नेहमी घी – डोसाच हवा. तोही क्रिस्पी ! बट्याट्याची भाजी सेपरेट, डोस्यात गुंडाळून वगैरे नको. भाजी मऊ आणि पिवळीधम्म हवी. सोबतचा सांबार वाटी तोंडाला लावून पिता येईल इतपत गरम आणि पातळ असावा. इडली सोबत आलेल्या दोन्ही चटण्या तर ओघाने आल्याच. डोसा झाल्यावर आप्प्याचा एक राऊंड चालेल. आप्पे ओबधोबड चालतील पण पूर्ण झालेले असावेत. सोबत नारळाची चटणी एक्स्ट्रा हवी.
सांबार सोबत मेदू वडाच हवा, बटाटा वडा नको. मेदू वडा सांबारात बुडवून नको. सांबार सेपरेट. मेदू वड्याची वरची लेयर लाल तांबूस आणि खमंग हवी. आत मध्ये वडा जाळीदार हवा. सांबारात वड्याचा तुकडा बुडविला की त्याने वाटीतला सांबार अधाश्या सारखा शोषुन घ्यावा.
साऊथ इंडियन शेवट, फिल्टर कॉफीने व्हावा. स्ट्रोंग आणि साखर कमी. कॉफी टिपिकल छोट्या ग्लास आणि वाटीत मिळावी.
बटाटा वडा, सँपल सोबत मस्त जातो. सँपल झणझणीत असेल तर वरून थोडा बारीक चिरलेला कांदा आणि सोबत एखादी पाव जोडी हवी.
समोसा, कचोरी, वडापाव आणि ब्रेड पॅटीस हे संध्याकाळचे आयटमस्. समोस्यासोबत गरम गरम रगडा हवा. समोस्याचा सगळा ईगो खोल बाउल मध्ये कुच्करून, त्यावर शिगोशिग गरम रगडा घातलेला असावा. वरून बारीक चिरलेला कांदा. सोबत तळलेली मिरची.
तळलेली मिरची वडापाव, कचोरी आणि पॅटीस सोबत तर हवीच. तेलातून काढून मीठा मध्ये घुसळवलेल्या पोपटी रंगाच्या या मिरच्या म्हणजे सोबतच्या पदार्थाला उठल्या कुठे नेऊन ठेवतात.
कचोरी कुरकुरीत असावी. आतलं सारण जरा कमीच असावं. तसचं ब्रेड पॅटीस मध्ये बट्याट्याची भाजी उगाच जास्त कोंबलेलेली नसावी. पॅटीस चे ब्रेड ताजे असावेत नाहीतर ते खूप तेल पितात. बेसनाचा लेयर पातळ असावा. पॅटीस चे समान चार काप करून सोबत पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंचेची आंबट गोड चटणी हवी. मूग भजी सोबत सॉस पण चालेल. पण कांदा भजी असतील तर मात्र कढी हवी. कढी आणि भजी तर डेडली कॉम्बिनेशन !
पाणीपुरीचा ओघ अखंड सुरू असावा. उगाच कुणी किती प्लेट्स झाल्या सांगुन, टोकु नये. पुरी जरा लाल, जळालेली आणि टपोरी असावी. त्यात रगडा टाकणार असाल तर तो एवढा गरम असावा की तोंड पोळलं पाहिजे. पुदिण्याचं पाणी तिखट तर चिंचेची आंबट गोड चटणी थिक हवी. सुकी पुरी बनविणे एक कला आहे. त्यामुळे ते बनवणारा दर्दी असावा.
. . .
जेवणात, वरणभात असेल तर भात थोडा मोकळा हवा. वरण एवढं घट्ट हवं की भाताला सोडून ताटात इकडे तिकडे पळायला नको. त्यावर गावरान तुप ओघाने आलेच. सोबतीला मस्त वांग्याची भाजी हवी. भाजीला थोडा अंगी रस्सा तर हवा. जमलंच तर सोबत कोशिंबीर, पापड, लोणचं आणि एखादी चटणी.
भरलेली वांगी छोटी छोटी आणि काटेरी असावीत. त्यातला मसाला थोडा काळपट आणि आतलं खोबरं किंचित जळलेलं असावं. वांग्याचं देठ बोटांनी दाबले तर वांग्याच्या फुला सारख्या पाकळ्या खुलाव्या. सोबत भाकरी बेस्ट.
डाळ पालक असेल तर डाळ मूगाची हवी. डाळ कमी, पालक जास्त. हिरव्या मिरच्या शिजवतांनाच टाकलेल्या असाव्या. सोबत जरा जास्त पाणी घालून शिजवलेला इंद्रायणी तांदळाचा भात असावा. एखादा पापड.
मेथी मध्ये मात्र लाल मिरची टाकलेली असावी. तिला थोडं पाणी सुटलेलं असावं. सोबत कडक भाकरी. लाल मिरच्यांची चटणी. आणि पापड.
वांग्याचं भरीत हे खान्देशी हिरव्या वांग्याचं हवं. ते अगदी मऊ होऊन त्याला मस्त तेल सुटलेलं हवं. भरीत तोंडात टाकताच विरघळलं पाहिजे. सोबत हिरव्या मिरच्यांचा ठेचा, कांद्याची पात. आणि भाकरी – ज्वारीची किंवा कळन्याची. कळन्याच्या भाकरी सोबत लाल मिरच्यांची चटणी हवी. भरीत पुरी पण मस्त बेत आहे. सोबत खमंग कढी, पापड किंवा बिबड.
पिठलं भाकरी. पिठलं अंगीच तिखट हवं. कडक भाकरीला आलेला पोपडा काढायचा आणि त्यावर पिठलं घ्यायचं. सोबत ओला कांदा, ठेचा किंवा लाल मिरच्यांची चटणी.
शेव भाजी, पाटवडीची भाजी या भाज्या अश्या तिखट हव्या की पहिल्या घासात डोक्याला घाम आला पाहिजे. भाजी एवढी पातळ हवी की भाकरीचा कुचकरून काला करता आला पाहिजे. सोबत लिंबू आणि कांदा हवा. चपाती असेल तर जरा जाडजूड हवी. तिचे पापुद्रे निघाले पाहिजे.
साधी खिचडी मूग डाळीची हवी. त्यावर लसूण, जिरे आणि लाल मिरची घालून केलेले फोडणीचे तेल हवे. सोबत भाजलेला पापड. खिचडी फोडणीची असेल तर सोबत कढी हवी.
पुरण पोळी घरंदाज, कडक आणि जाडजूड हवी. महत्त्वाचं म्हणजे ती हाताला चटका लागेल एवढी गरम हवी. वरून गावरान तुपाची धार. पोळी एकच पुरे, उगाच आग्रह नको.
जीभ पोळेल एवढा गरम हलवा. गुलाबजाम सोबत व्हॅनिला आइस्क्रीम. जिलेबी सोबत रबडी. ही सगळी गोड मंडळी एकएकटे किंवा जोडीने आले तरी हरकत नाही.
तर, खाण्याचे तसे माझे फार नाटकं नाहीत.