गणिताचे क्लास

(रीडिंग टाईम 6 मिनिटं )

शर्मा मास्तरची ट्युशन

नववी ते दहावी असे दोन वर्ष मी शर्मा मास्तरची ट्युशन केली. शाळेत असताना क्लासला ‘ट्युशन’ म्हणायचे.  नववीत आल्याआल्या शर्मा मास्तर स्वतः म्हणाले “बेटा, गणित की ट्युशन तो लगानी ही पडती हैं ” मी पण घरी तेच सांगीतलं. “लगानी ही पडती हैं !” सकाळी सहाची बॅच होती. रोज भल्या पहाटे उठा. सायकल वरून दूर राहणाऱ्या त्या मास्तरच्या घरी जा. असा गणिताच्या क्लासचा प्रवास सुरू झाला.

शर्मा मास्तरचं घर एका लांब डब्यासारखं होतं. पण दुमजली. म्हणजे एकमेकांवर दोन डबे ठेवल्यासारखं. वरच्या डब्ब्यात, म्हणजे मजल्यावर लांब हॉल होता. खास क्लास साठी बनवलेला. त्यावेळी मास्तरांची घरं तशीच बांधली जायची. एक स्वतंत्र रूम क्लाससाठी.  शर्मा मास्तरच्या या हॉल मध्ये साठ ते सत्तर जण बसतील अशी सोय होती. एका तीन पायाच्या लाकडी स्टँड वर मोठ्ठा काळा फळा ठेवलेला होता. खाली आमच्या साठी सतरंज्या अंथरलेल्या. त्यावर आम्ही मांडी मारून बसायचो. ट्युब लाईटस् आणि फॅन्स सोडले तर बाकी त्या हॉल मध्ये काहीच नव्हतं. 

शर्मा मास्तर म्हणजे गोरंपान, स्थुल, बुटकं व्यक्तीमत्व. केस भरपूर तेल लावून एकीकडे चोपून लावलेले. तोंडात सदैव खर्रा. त्यामुळे तोंडातल्या तोंडात बोलायचे. कधी कधी काय बोलले कळायचे पण नाही. मराठी फार नाही यायची. आठवी, नववी आणि दहावी मिळुन भरपूर बॅचेस चालायच्या. शर्मा मास्तरकडे हिरव्या रंगाची स्कूटर होती. त्या वेळी फारच कमी लोकांकडे गाड्या होत्या. ज्यांचे क्लास तुडुंब भरलेले ते गाड्या आणायचे आणि बाकी शिक्षक मंडळी सायकली वरून यायची. असो! 

मास्तर शाळेत आणि क्लास मध्ये काहीच वेगळं शिकवायचे नाही. स्टाईल तीच. फक्त शाळेत कमी गणितं व्हायची आणि क्लास मध्ये जास्त. जेवढी जास्त गणितं तेवढे जास्त मार्क्स, असं सरळ साधं गणित होतं. मास्तर पुस्तकांतून गणितं फळ्यावर लिहायचे. आम्ही फळ्यावरून वहीत लिहायचो. मग त्या वहीतून प्रॅक्टिसच्या वहीत. आणि प्रॅक्टिसच्या त्या वहीतून थेट पेपरात. सगळी गणितं याच वाटेनं फिरत राहिली. डोक्यात कधी गेलीच नाहीत.    

शर्मा मास्तरच्या या क्लास मुळे माझे मार्क्स  काही वाढले नाही. मुळात गणितात मार्क्स वाढावेत हा विचार ही कधी नव्हताच. पास झालो तरी मिळवली. आमच्या वेळेस  गणिताचा पेपर दीडशे मार्क्सचा असायचा. आधीच भीती वाटणाऱ्या या विषयाचा पेपर दीडशे मार्क्सचा का ठेवायचे देव जाणे. गणितात मार्क्स बरे पडले तर क्लास मुळे आणि मार्क्स कमी आले तर, तु प्रॅक्टिस कमी केल्यामुळे. म्हणजे गणिताच्या मास्तरचं महत्त्व कधीच कमी झालं नाही.

. . .

वाघ मास्तरचा क्लास

कॉलेजला येईस्तोवर गणिताचं ‘ मॅथ ‘ होतं आणि ट्युशनचा ‘ क्लास ‘.

काहीही करून मॅथ निघाला पाहिजे म्हणून धावपळ सुरू होते. मी डिप्लोमाला असतांना मॅथ साठी वाघ मास्तर फारच फेमस होता. खरं तर एकच मास्तर होता जो मॅथस् चे क्लासेस घ्यायचा.

वाघ मास्तरचं घर साधं होतं. दहा बाय बाराची एक पक्की रूम होती आणि मागे टीनाचं छोटं घर. रुममध्ये एक भला मोठा कॉट होता आणि काही लोखंडी खुर्च्या. भिंतीला लटकवलेला छोटा कापडी फळा. आमची बॅच सकाळी सहाची. मास्तर च्या घरासमोर येऊन रूमचा दरवाजा उघडण्याची वाट बघायची. सहा – पाच, सहा – दहा पर्यंत मास्तर दार उघडायचे. सकाळच्या क्लासला सुगंधी अगरबत्ती लावलेली असायची. साधारण आठ ते नऊ जण कॉटवर बसायचे. बाकी खुर्च्यांवर. कॉटवर बसायला मिळणे म्हणजे नशीबच. कारण सकाळी सकाळी कॉट वर झोप चांगली लगायची. बहुतेक वेळा मी पोहचायचो तोवर दार उघडलेले असायचे. त्यामुळे कॉटवर बसायचा चान्स फार आला नाही. उलट, जो उशिरा यायचं तो रूम लहान असल्याने मास्तरच्या अगदी पुढ्यातच जाऊन बसायचा. 

वाघ मास्तर वयाने तरुण, पण त्याच्या शिकवण्याच्या स्टाईल मुळे फेमस. मास्तरने कधीच शिकवतांना पुस्तक बघितले नाही. हा व्यक्ती कुठेही शिक्षक नव्हता. डिप्लोमाचे क्लासेस हीच त्याची कमाई. पांढरा शुभ्र झब्बा घालून मास्तर शिकवायचा. सहसा गणित शिकवणाऱ्या मास्तरांचं अक्षर चांगलं नसतं, पण वाघ मास्तर याला अपवाद होता.  वाघ मास्तर एकदम नो- नॉनसेन्स माणूस. या मास्तरला दोन वर्षात मी कधीच हसतांना पाहिले नाही. मास्तरच्या रूमची साइज छोटी होती त्यामुळे बॅचेस जास्त होत्या. शेवटचं गणित झालं की मास्तर बाहेर जाऊन उभा राहायचा. आतली बॅच बाहेर जाऊन, बाहेरची बॅच आत सेटल होईपर्यंत मास्तर शून्यात बघत उभा राहायचा. मुलींची बॅच असली की मास्तरला जरा जास्त वेळ थांबावं लागायचं – मुली आत येई पर्यंत आणि बाहेरची सगळी मुलं घरी जाई पर्यंत.

दोन वर्ष आम्हाला गणित शिकवून वाघ मास्तरने आम्हाला तर काठाला लावलं. पण सगळ्या बॅचेस हाऊसफुल चालवून सुध्दा पैशांचं गणित काही मास्तरला सुटलं नाही. वर्षानुवर्षे झाले मास्तरची आर्थिक परिस्थिती तशीच होती. याचं दुःख त्या रस्त्याने कधीही गेलं की वाटतं. 

काही गणितं, हाडाच्या गणिताच्या मास्तरला ही सुटत नाहीत हे मात्र खरं.

. . .

जोशी सरांचा क्लास

इंजिनीयरिंगला आल्यावर मॅथस् चे ‘ एम ‘ होतात. 

एम-वन, एम-टू, एम-थ्री, एम-फोर. 

हे ‘ एम ‘ यमाचे लहान भाऊ असल्यासारखे वागतात. एकदा सुटला तर सुटला. नाही तर तो सुटता सुटत नाही. असं म्हणतात, एम-थ्री, एम-फोर निघाले की इंजिनीयरिंग झालं. असे चिवट ‘ एम ‘ आयुष्यातून घालवण्यासाठी गणितातला  कर्मठ संन्याशी लागायचा. जोशी सर त्यातलेच एक.

जोशी सर मॅथस् चे रिटायर्ड प्रोफेसर. आमचा क्लास घ्यायला त्यांनी स्पष्ट नाही सांगीतलं. त्यावेळी ते फक्त पार्ट टाईम बी ई करणाऱ्या काका लोकांचा क्लास घेत. आम्ही तीन चार जणांनी खुप रिक्वेस्ट केली आणि ते कसेबसे तयार झाले. सकाळी सातच्या या क्लासला आम्ही तिघे – चौघे आणि पंचवीस – तीस काका लोकं. ही काका लोकं घरी गेल्यावर क्लासच्या वहीत ढुंकूनही पाहत नसतील हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचं.

जोशी सरांचा क्लास त्यांच्या बंगल्याच्या मागच्या रूम मध्ये व्हायचा. टापटीप ठेवलेली रूम. व्यवस्थित मांडून ठेवलेल्या खुर्च्या. दारापाशी भला मोठ्ठा फळा. जोशी सर म्हणजे अगदी चिअरफुल व्यक्तिमत्त्व. एक रिटायर्ड आनंदी माणूस. पैशांसाठी वैगरे ते क्लास घेत नव्हते. आपण सकाळी बिझी राहावं आणि पार्ट टाईम शिकणाऱ्यांना मदत व्हावी एवढंच क्लासच अेम. आम्ही रेगुलरवाले कसे तरी मधे कोंबलेले. 

सर त्या वयातही फार उत्साहात शिकवायचे. सातच्या ठोक्याला क्लास सुरू करायचे. सात नंतर सहसा कुणी येण्याची हिम्मत करीत नसे.  चुकून कुणी सात नंतर आलाच तर शिकवणे थांबून सर आपल्या खास शैलीत म्हणायचे, “या s s s !” आलेली व्यक्ती मेल्याहून मेल्यासारखी येऊन बसे. हा प्रसंग माझ्यावर इतक्यांदा आला की मला मरणाची भीतीच वाटेनाशी झाली. 

सरांची शिकवण्याची पद्धत मात्र जुनीच होती. त्यांच्या वहीतुन गणितं फळ्यावर, फळ्यावरून आमच्या वहीत, आमच्या क्लासच्या वहीतुन प्रॅक्टिस च्या वहीत. आणि त्या वहीतुन डायरेक्ट पेपरात. सर शिकावतांना मध्येच प्रश्न विचारायचे आणि कुणी उत्तर नाही दिलं की म्हणायचे ” प्रॅक्टिस s s s” आम्ही ‘एम’ पासून वाचण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस केली. गणितं डोक्यात गेली नाहीत तरी पाठ केली. शेवटी एम-थ्री आणि एम-फोर च्या गराड्यातुन सुटलो.

आणि इंजिनीअरिंग झालं. 

मॅथस् शी संबंध सुटला. 

पण गणितं मात्र तशीच राहिली. 

म्हणजे बघा :

का आपण ऐन जवानीतल्या सकाळी खराब करून घेतल्या? 

पहाटे उठून शिकलेल्या डेरेव्हेटीव्ह आणि इंटिग्रेशनने पुढे आयुष्याची फार गणितं सुटली असही नाही. 

दहा रुपये पाव, म्हणजे चाळीस रुपये किलो !

“एक किलो घेतो, पस्तीसला द्या!” 

एवढंच गणितं वापरलं मी आतापर्यंत. 

आणि जर भाजीवाल्या कडे कॅल्क्युलेटर असलं, तर विषयच संपला. 

टेक्नॉलॉजी वर माझा पूर्ण विश्वास आहे.

बरं शाळेपर्यंत ठीक होतं, नंतर तर देवही मदत करत नसेल. नाहीतर एम-थ्री, एम-फोर राहणाऱ्यांची संख्या कमी झाली असती. समजा एखाद्या इंजिनीरिंगच्या पुंडलिकाला देवाने मदत करायची ठरवलीच, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचे सिलॅबस वेगळे. पुण्या – मुंबई मध्ये फक्त एम-थ्री, औरंगाबाद मध्ये एम-थ्री, एम-फोर, अमरावती, नागपूर वाल्यांच तर भलतंच. 

म्हणजे भक्तांसाठी देवाने किती डेटाबेस गोळा करायचा ?

गणित विषय आवडणारे लोक पण आहेत. 

पण त्यांना गणितं जमतात म्हणून गणित आवडतं की त्यात गंमत वाटते म्हणून आवडतं, हे सांगणं कठीण आहे. 

आज माझा बॉस सोडला तर कुणाचेच पाढे पाठ नाहीहेत. पण त्याने काय घंटा फरक पडतोय? कॅल्क्युलेटर आहेत की आमच्याकडे. आणि आम्ही थोडीच ऑफिसात पाढे म्हणायला जातो. 

असो ! या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत भल्या पहाटे ‘गणिताचे क्लास’ असेच सुरू राहतील, येणाऱ्या जनरेशनच्या सोनेरी सकाळी आणि साखर झोपा खराब करत.