गाडी सुटली

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

जुलै २००३.

संध्याकाळ.

पाऊस कोसळतोय.

ओलं वातावरण. 

रेल्वेचा गजबजलेला फलाट.

लोकांचा कलकलाट. 

इंजिनाचे सुस्कारे.

गाड्यांच्या अनाउन्समेंट

एका डब्या जवळ, खिडकीचे गज घट्ट पकडून उभा मी.

डब्यात मोस्टली अंधार. 

आत प्रवाशांची हळूवार हालचाल.

ती. 

खिडकीत बसलेली. 

स्वतःत रमलेली.

“चल”, तिचा अगदी सहज अलविदा.

मी हो म्हणून मान डोलावली.

मोठ्ठा सुस्कारा सोडत गाडी मागे-पुढे झाली. 

“कधी ये माझ्या गावी” ती.

माझी पावलं आणखी खोल आत रुतली.

कॉलेज संपून महिना झालाय.

पैशांची चणचण आहे तशीच आहे.

नोकरीची शोधाशोध सुरू आहे.

पहिली मिळेल ती नोकरी धरू.

थोडे पैसे गोळा झाले की जाऊ, तिच्या गावी.

गाडीने पुन्हा सुस्कारा टाकला आणि निघाली.

भानावर येऊन, मी केविलवाणं हो म्हटलं.

गजबजलेल्या रेल्वेच्या फलाटाहून मी आयुष्याच्या फलाटावर निघालो.

.  .  .

इंटरव्ह्यू वर इंटरव्ह्यू.

हे ऑफिस, ते ऑफिस.

पांढरा शर्ट. फाईल. रेझुमी.

वडापाव. 

नवा दिवस. 

नवा इंटरव्ह्यू. 

तोच नकार.

या गावात नोकरी मिळणार नाही हे कळायला सहा महिने लागले.

पुण्यात कुठली तरी मोठ्ठी कंपनी इंजिनिअर शोधतेय अशी जाहिरात पाहिली.

आजचंच तिकीट काढलं. 

संध्याकाळची ट्रेन. 

वडापाव खाल्ला.

गाडीत बसलो.

खिडकीतल्या थंड हवेत डोळा लागला.

दहा वाजलेत साधारण. 

गाडी करकर करत थांबली.

स्टेशनावर कुठे चहा मिळतोय का म्हणून मी खिडकीतून बाहेर डोकावलो.

एक दोन प्रवासी उतरलेत. 

काही हमाल धावले. 

बाकी फलाट, स्टेशन शांत. 

निर्मनुष्य.

दूरवर अंधारात, गावाचं नाव सांगणारा पिवळा बोर्ड.

तिचं गाव!

ध्यानात आलं, तोवर गाडी निघाली.

अंधारात गुडूप होऊन शांत झोपलेलं गाव.

दूरवरच्या कुण्या मंदिरातून कानी येणारे भजनाचे स्वर.

आपण कधीही न गेलेल्या गावातील रस्त्यांवर फिरणारे माझं मन.

आणि

मनात गुदमरणारी सुरेश भटांची जुनी कविता :

‘ दुःखाच्या वाटेवर, गाव तुझे लागले,

थबकले ना पाय जरी, हृदय मात्र थांबले.

वेशी पाशी आर्त, हाक तुझी ऐकली,

अन् माझी पायपीट, डोळ्यांतून सांडली. ‘

त्या अंधारात गाव, गाडी, सगळ्या आठवणी आणि मी विरून गेलो

सकाळ झाली.

पुणे आलं.

. . . 

जुलै २०२२

पुणे पुरतं आपलंस झालंय आता.

बाहेर पाऊस कोसळतोय.

स्पॉटीफायवर संदीप खरेची कविता चालु आहे,

‘गाडी सुटली, पडले चेहरे, 

क्षण साधाया, हसरे झाले ‘

रीलेटेड पोस्ट : चहाची टपरी