चहाची टपरी

(रीडिंग टाईम 5 मिनिटं )

चहाच्या टपरीने, दिवस सुरू होण्याचे, दिवस होते ते. 

टपरीवरचा चहा कसा आहे याला महत्त्व नव्हते. त्या चहाची टपरी कुठे आणि कशी आहे यावर तिचं महत्त्व ठरायचं. “अ लॉट कॅन हॅपेन ओव्हर कॉफी”असं म्हणतात. पण चहा आणि चहाच्या टपरीवर बरचं काही घडतं. अश्याच काही लक्षात राहिलेल्या टपऱ्या. 

चहा आणि पेपर

आम्ही राहायचो तिथून जवळच्या चौकात चहाची एक गाडी लागायची. सकाळी साडे-सहा, सात पर्यंत एक काका ती गाडी लावायचे. सात पर्यंत चहा बनायचा. आम्ही आधीच येऊन चहाची वाट बघत बसलेलो असायचो. गरम गरम चहाचा ग्लास एकदाचा हाती आला की दिवस सुरू व्हायचा. 

गाडी साधी होती. गाडीच्या पुढ्यात लाकडी फ्रेमचा काचेचा बॉक्स. गाडीच्या तीन बाजूला लाकडी फळ्यांचे कान. गॅसची शेगडी, सिलेंडर. चहा-दुधाची भांडी. काळी लोखंडी कढई. वडे-भजी ठेवण्यासाठी अल्युमिनियमच्या पराती. पावासाठी टिनाचा चौकोनी डबा. काचेचे ग्लास. प्लास्टिकच्या प्लेट्स. वडा-रस्सा खाण्यासाठी इलीपस् आकाराच्या स्टीलच्या खोल प्लेट्स.  पाण्याची स्टीलची छोटी टाकी. त्यावर दोन एक ग्लास. प्लेट्स धुण्याच्या साठी, एक प्लास्टिकचं टोपल. दोनतीन प्लास्टिकचे स्टूल, चार पाच खुर्च्या.  गाडीचे मालक म्हणजे काका रोज हा पसारा गाडीत लोड करून आणायचे आणि संध्याकाळी घरी घेऊन जायचे. काका राहायला नीटनेटके. पांढरा हाफ शर्ट. व्यवस्थित ठेवलेली दाढी. चष्मा. डोक्यावर विरळ केस. नेहमी हसतमुख. हाताला भारी चव. वडा आणि सोबत मटकीचा रस्सा म्हणजे बहारच. चहा घेऊन आम्ही वडा तयार होण्याची वाट बघत असू. काकांचा वडा आणि रस्सा साधारण साडे-आठपर्यंत रेडी व्हायचा. 

काकाच्या गाडी समोर, आमचा पेपरवाला त्याचा छोटासा स्टॉल लावायचा. पेपर आमच्या रूमवर टाकण्याआधीच आम्ही गाडीवर हजर असायचो. पेपर तो मग आमच्या हातातच  टेकवायचा. त्याने पेपर कधी रूम वर टाकल्याच आठवत नाही. बऱ्याचदा स्टॉल आमच्या भरवशावर सोडून तो इतर ठिकाणी पेपर टाकून येई. आम्ही तोपर्यंत, त्याच्या स्टॉल वरचे इंग्लिश मराठी सगळे पेपर वाचून काढत असू. त्याची ही हरकत नव्हती. फक्त वाचलेल्या पेपरची नीट घडी करून ठेवायची एवढीच अट. सगळे पेपर वाचून होईस्तोवर काकांचा वडा तयार होई. 

सुट्ट्या पैशांच्या अडचणीतून सुटण्यासाठी काकांनी आमच्या साठी एक वही बनवली. जे काही खाल्लं ते तारखेनिशी स्वतःच वहीत लिहून ठेवायचं. हिशेब लावून पैसे महिनाअखेर द्यायचे. हे दोघांना ही सोईस्कर होतं. वही खातं बनल्यामुळे आम्ही तर सुटलोच. वडा सिंगलचा आपोआप डबल झाला. नंतरचा एक चहा वाढला. चहा, वडा आणि सोबत पेपर – रोजची सकाळ धमाकेदार व्हायला लागली.

.   .   .

मिनिमलिझम

अण्णा अगदी मिनीमल चहा वाला होता. छोटीशी टपरी. आत बसण्यासाठी एक लाकडी छोटा बाक. तसाच एक बाक बाहेरही. एक गॅसची भट्टी. मोजून तीन भांडे. एक मोठ्ठं दुधाच. दोन चहाचे. छोटं स्पेशल चहासाठी. मोठं रेगुलर चहाचं. साखर आणि चहाचे मिळून दोन डबे. दोन अल्युमिनियमच्या केटल्या. काचाचे दहा-बारा ग्लास. ग्लास नेण्यासाठीचे तारेचे स्टँड. टपरीचा रंग आतून बाहेरून एकच – निळा. कुठे चहाचे डाग नाही. कुठे पाणी सांडलेले नाही. सगळं स्वच्छ. सुटसुटीत.

अण्णा टिपिकल साऊथ इंडियन. मोठ्ठं पोट. त्यावर तरंगणारा शर्ट. खाली पायजामा. डोक्यावर टक्कल. पक्का काळा रांग. चहाची गरम वाफ चेहऱ्यावर आली की जसा त्रासलेला चेहरा होतो, तसा चेहरा. गरम गरम चहा सारखा हातावर घेऊन टेस्ट करण्याच्या सवयी मुळे पोळून जाड झालेली जीभ. त्यामुळे घोगरा आवाज. तसंही अण्णा फार काही बोलत नसे. त्याच्या टपरीवर तेलगू मधलं एक वृत्तपत्र नेहमी असायचं. फावल्या वेळात अण्णा ते वाचित बसे. सोबतीला एक जुना रेडिओ पण होता. एका खुंटीला टांगलेला. पण रेडिओ ऐकण्याचा योग कधी आला नाही. 

कॉलेज सुटलं की, संध्याकाळी घरी जाता जाता, आम्ही हमखास अण्णाच्या या टपरीवर थांबायचो. आम्ही जायचो त्या वेळी अण्णाची आवराआवर सुरू असायची. केटली मध्ये दिवसाचा शेवटचा चहा भरून  बाकड्यावर अण्णा निवांत बसलेला असायचा. आम्ही दोघं तिघ असलो आणि चहा तेवढा नसेल तर अण्णा स्पष्ट चहा संपला सांगायचा. त्यावेळी कितीही लोकं आली तरी अण्णाचा पवित्रा तोच. गिऱ्हाईक येतय म्हणून परत चहा बनवायचं वैगरे त्याच्या तत्वात नव्हतं. 

अण्णाची टपरी फक्त चहाचीच होती. बाकी काहीच मिळत नसे. एकाच  गोष्टीवर वर्षानुवर्षे फोकस असल्याने अण्णाने गिऱ्हाईकं नाही तर फॅन्स मिळवले. आमच्या सारखे. जे तिथे थांबल्या शिवाय पुढे गेले नाहीत. चहा म्हणजे चहा. त्यात कुठला मसाला नाही, आलं नाही, गवती चहा नाही. सगळं गणित प्रपोर्शन्स आणि एक्सपेरिएन्सचं. अण्णाच्या टपरीवर बसून नेहमी वाटायचं, साधी माणसंच मिनिमलिझम चांगलं फॉलो करतात.

.   .   .

चहा आणि इतर ड्रग्स

‘रामू काका’ अतिशय कॉमन नाव. पण चहा मात्र अन-कॉमन. शंकर नगर गार्डनच्या कोपऱ्यावर रामू काकाची टपरी होती. टपरी म्हणजे हातगाडीवर तयार केलेली. हातगाडी वर्षानुवर्षे जागची कधी हलवली नाही म्हणून त्याची टपरी झाली. गार्डनचे कंपाऊंड आणि गाडीचं छत या दोघांना बांधलेली ताडपत्री. टपरी मध्ये अगदी जुजबी समान. बसण्यासाठी स्टूल किंवा खुर्च्या नाही. कंपाऊंडचा बाहेर निघालेला कठडा, रस्त्याच्या खोदकामात बाहेर काढलेला एखादा सिमेंटचा हुम पाइप, अश्या गोष्टीवर बसायचे किंवा उभे राहायचे. 

रामू काका म्हणजे बुटकं, हाडकुळं व्यक्तीमत्व. नेहमी चौकडीचा हाफ शर्ट. ढीली-ढगळी पँट. पुढे आलेले दात. वयानुसार विरळ झालेले केस. रामू काका नेहमी भांड्यात चहा घोटतांना दिसायचा. चहाच्या भांड्यात चमच्याने घोटतांना, रामू काका स्वतःशीच काही तरी पुटपुटत असे. त्याच्याकडे स्टीलची एक छोटी डबी होती. चहा शिजत आला की हळूच त्या डबीतून मसाल्याची चिमूट तो चहात  टाकायचा. मी खूपदा विचारलं, “काय आहे त्या मसाल्यात?” त्यावर रामू काका म्हणायचा, ” हर एक का अपना सिक्रेट फॉर्म्युला होता है, बाबू !”  मला तर अजूनही वाटतं, हा माणूस नक्कीच चिमूट भर कुठला तरी ड्रग टाकत असावा. नाहीतर एवढी लोकं का येतात मरत-मरत. रामू काकाची टपरी आणि चहा अड्डिक्शन होतं. रामू काका सकाळी सहाला टपरी चालू करायचा ते थेट रात्री दहाला बंद. गर्दी मात्र कुठल्याच वेळेला कमी होईना. बऱ्याचदा रामू काका आपलं आवरून, टपरी बंद करून निघून जायचा. लोकं तशीच बसून राहायची, गप्पा मरत. खरं तर रामू काकाची टपरी नसून तो कट्टा होता. प्रत्येक वयोगटातील लोकं इथं येत. वेळा फक्त वेगवेगळ्या. रामू काकाच्या टपरी वरून एकच चहा पिऊन कुणी परत गेला असं झालं नाही. आणि एकदा चहा पिल्यावर कुणी परत आला नाही असं ही झालं नाही. रामू काकाच्या चहाची नशाच तशी होती.

.  .  .

या टपऱ्यांना नावं नव्हती. कुणी त्यांना रेटिंगचे स्टार नाही द्यायचं. त्या फेसबुक किंवा गुगल वर सापडत नाहीत. आठवणीत मात्र आहेत. 

चहाच्या टपरीने, दिवस सुरू होण्याचे, दिवस होते ते.

इतर पोस्ट्स