आपल्या अवतीभवती झोम्बीज आहेत हे मला मान्य आहे.
पण एकमेकांना संसर्ग करण्या इतपत त्यांची अजुन मजल गेली नाही.
ते फारतर फार डोकेदुखी देतात किंवा बी पी वाढवतात.
झोम्बी खरंच आले किंवा झाले तर रोजच्या जीवनात फार फरक पडेल असं काही वाटत नाही.
बरं, आपली लोकसंख्या एवढी आहे की सगळे झोम्बी होण्यास बराच वेळ लागेल. तोवर अजुन एखादा पॅनडेमिक येऊन जाईल.
आजवर जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे झोम्बीज बद्दल आहे त्यानुसार आपण झोम्बीज पासून वाचायचं कसं यावर भर दिलाय. म्हणजे सर्व्हाव्हल!
पण आपणच झोम्बी झालो तर?
मग हे वाचत बसल्या पेक्षा हळू हळू चालत तुम्ही मलाच शोधत याल.
बरं, कोण झोम्बी आहे आणि कोण नव्याने झालंय हे शोधणं ही कठीण.
म्हणजे बघा, जगात हा:हाकार माजलाय.
तुम्ही ऑफिस मध्येच आहात.
एवढं हातातलं काम संपवतो आणि मग घरी जातो असा लॉयल विचार तुमच्या मनात आहे.
कॉर्नर ऑफिस मध्ये बसलेला बॉस तुमच्यामते आधी पासूनच झोम्बी होता.
त्यामुळे तो खरंच झोम्बी झाला तर फार काही फरक पडणार नाही. तुमच्यासाठी त्याचं असं सारखं-सारखं झोम्बी होणं काही नवं नाही.
काम संपवलं, तुम्ही बाहेर पडलात.
रस्त्यावर पळापळ सुरू आहे.
ट्रॅफिक जाम झालंय. गुगल मॅप सगळं रेड दाखवतोय.
“छे ! हे रोजचंच आहे!” असं म्हणून तुम्ही गाडी काढता.
“ट्रॅफिक जरा व्हॉईलंट आहे आज.” तुम्ही मनाशीच म्हणता आणि पुढे सरकत राहता.
(झोम्बी सारखं संकट आलं तर आपण ट्रॅफिक मध्येच अडकून मरू असे विचार मला सारखे येतात. असो! )
मजल-दर-मजल करत तुम्ही घरी आलात.
बेल वाजवली.
बायकोने दार उघडलं.
ती बिच्चारी भाजी आणायला गेली तेंव्हाच झोम्बी होऊन आली.
पण “रोज सारखीच तर दिसतेय!” म्हणून तुम्ही इग्नोर करता.
“फार ट्रॅफिक होतं आज” म्हणत तुम्ही ए बी पी माझा लावता. ज्ञानदा बातम्या देतेय. “कुणी तरी आजही कुठला तरी पक्ष सोडून चाललाय. त्याच्या मागे अख्खा पक्षच निघालाय.” ज्ञानदाचा आवाज जरा विचित्र वाटतोय, पण ठीक आहे म्हणून तुम्ही इग्नोर करता.
कधी नव्हे ते, बायको तुमच्या शेजारी बसलेली पाहून, तुम्ही म्हणता “जेवणांच काय?”
आणि तुमचा झोम्बी गालातल्या गालात गोड हसतो.
दी एण्ड.