नेटफ्लिक्स आणि मल्टीप्लेक्सच्या आधी असणाऱ्या सिंगल स्क्रीन टॉकीज बद्दल थोडंस :
गावात नवा सिनेमा लागला की तीन-चाकी-सायकल रिक्षा प्रमोशनसाठी फिरायची. तिला दोन्ही बाजुला सिनेमाचे पोस्टर्स आणि समोरून बाहेर निघालेला अल्युमिनियमचा लांब भोंगा असायचा. “श्याम टाकिज मे रोजाना चार खेलो में देखिए…” असं ओरडत हा भोंगा गाव भर फिरायचा. सिनेमा कुठलाही असो – टॉकीज कुठलीही असो, नवीन सिनेमाची ही जाहिरात, कुण्या एकाच माणसाच्या आवाजात रेकॉर्ड केलेली असायची.
सिनेमाचे मोठ्ठाले पोस्टर्स फक्त टॉकीजच्या भिंतीला दिसायचे. आणि छोटे छोटे पोस्टर्स तर कुठल्याही भिंतीला चिकटवली जात. एकाच भिंतीवर अशी सेम पोस्टर्स एका रांगेत लावण्याची पद्धत होती.
थियटरच्या पॅसेज मध्ये, नोटीस बोर्ड सारख्या काचेच्या बॉक्स मध्ये, एखादा सिन दाखवणारे काही फोटोज् लावलेले असायचे. त्या फोटोज् मधून प्रत्येक जण स्टोरी गेस करत टाईम पास करायचा.
रफ पेपरवर प्रिंट केलेले- लाल, निळा, पिवळा असे भडक शेडस मधले तिकिटं असतं. त्यावर तिरपा तारपा कसाही तारखेचा शिक्का मारलेला असे. हॉलच्या दारात अर्धे तिकीट फाडून घेतल्या जायचं. हिट सिनेमाला टॉर्च घेऊन चालू पिक्चरमध्ये तिकीट चेकिंग पण व्हायचं.
‘गजानन’ टॉकीजचं दारच थेट रस्त्याला लागून होतं. तशीच तिकीटाची खिडकीही. तिकीटासाठीची रांग नेहमी रस्त्यावर. टॉकीज समोरचा रस्ता ब्लॉक झालं की समजायचं, पिक्चर हिट आहे.
बऱ्याच टॉकीज मध्ये सीटला नंबर्स नव्हते. फर्स्ट कम – फर्स्ट सर्व्ह. त्यामुळे मागची सीट पकडायला झुंबड उडायची. चेंगरा चेंगरी व्हायची. माझ्या ओळखीच्या एकाला तर हॉल मध्ये पोहचल्यावर कळलं, शर्टाची एक बाही आपण गर्दीत गमावली.
‘सादिया’चा मालक जुन्या सिनेमातल्या व्हीलन सारखा होता. उंच पुरा. पांढरे शुभ्र केस, पांढरीच दाढी. पांढरे कपडे, पांढरे शूज. आणि जुन्या काळातली लांब पल्ल्याची पांढरी मर्सिडीज. हा माणूस प्रत्येक शोची तिकीटं स्वतः हॉलच्या दारात उभं राहून फाडायचा.
‘स्मृती’ आणि ‘लिबर्टी’ मध्ये ब्लॅक फार चालायचं. बाहेर उभ्या असलेल्या गर्दीतून ब्लॅक वाला ओळखायचा, त्याला नजरेनेच विचारायचं. त्याचा सिग्नल मिळाला की, किती तिकिटं हवेत हे इशाऱ्याने सांगायचं. मग आपल्यातल्या एकानं जाऊन डील फायनल करायची. हे नेहमीच होतं.
पेपरच्या आधी स्ट्रेस ब्रस्टर म्हणून पिक्चर पाहिले. पेपर खराब गेला म्हणून पिक्चर पाहिले. पेपर चांगला गेला म्हणून ही पिक्चर पाहिले.
परत-परत वेळ वाया घालवण्यापेक्षा, वेगवेगळ्या पिक्चर्सचे दोन शोज लागोपाठ पाहणे, हे अगदी नॉर्मल होतं. आजही आहे.
टॉकीज नुसार तिथला ऑडीयनस बदलतो. ‘दिल चाहता है’ मी आमच्या गावात पाहिला होता. अक्षय खन्ना ने लाँग पॉज घेतला की अख्खी टॉकीज हसायची. लोकं ओरडायची,”अबे, अब तो बोल!”
‘सुदामा’ मध्ये पिक्चर सुरू व्हायला उशीर झाला की लोकं खालून ओरडायची, “सुधाकर, चालु कर.” प्रोजेक्टर रूम मधल्या त्या माणसाचं नाव खरंच सुधाकर होतं की प्रोजेक्टर ऑपरेटरला सुधाकर म्हणतात, देव जाणे !
‘सुदामा’ लोकांना एवढी घरची टॉकीज वाटायची की, आमिरचा ‘मंगल पांडे’ बघतांना लोकांनी स्वयंघोषित एक इंटर्वल घेतला होता. आणि सुधाकरने पिक्चर थांबवलाही होता.
पिक्चर चालू असताना लाईट जाणे फार कॉमन. जनरेटर सुरू व्हायला पाच – दहा मिनिटं लागायची. तोपर्यंत अंधार. कल्ला हल्ला आणि शिट्टया. लोकं अख्खं थिएटर डोक्यावर घेत.
‘बाल्कनी’ नावाचा एक सेक्शन, वर असायचा. तिथे बसणारी लोकं म्हणजे सभ्य, असा जनरल समज होता. ती लोकं शांतपणे पिक्चर बघायला आलेली असायची. जागेसाठी मरमर नाही. कल्ला हल्ला, शिट्टया, काही नाही.
अनिमॅशन मूव्हीच फार वेड होतं. आजही आहे. ‘हनुमान रिटर्न्स’ हा सिनेमा बघायला पवन आणि मी गेलो तेव्हा सर्व बाल गोपालांमध्ये आम्ही दोघंच मोठी होतो. आमच्या आजूबाजूला बसलेली सगळी लहान मुलं, स्क्रीनच्या मध्ये समोरच्या खुर्च्या येतात म्हणून, उभे राहून सिनेमा बघत होते.
‘लक्ष्मी’ थिएटरची साऊंड सिस्टीम जबऱ्या होती. मी आणि कप्या एक हॉरर पिक्चर बघून थिएटरच्या बाहेर पडलो. आवाजाचा आणि सिनेमाचा इम्पॅक्ट एवढा होता की, भर दिवसा आम्ही एकमेकांचा हात धरून घरी आलो होतो.
‘इन्सेप्शन’ हा पिक्चर समजला नाही म्हणून चारदा पहिला होता. पहिल्या वेळेस तर सब-टायटल्सही नव्हती. टॉकीज मध्ये जाऊन इतक्यांदा पाहिलेला हा एकमेव पिक्चर आणि तो ही कळला नाही, म्हणून.
‘टायटॅनिक’ आणि ‘जुरासिक पार्क’ हे दोन पिक्चर्स सोडले तर, रसेल क्रो चा ‘ग्लॅडियेटर’ हा टॉकीज मध्ये पाहिलेला, पहिला इंग्लिश पिक्चर. त्याच्या भव्यतेचा इम्पॅक्ट आजही आहे.
‘लगान’ ची शेवटची मॅच आम्ही उभं राहून पहिली होती. ‘हॉबिट ‘ ट्रायओलॉजीचा शेवटचा पार्ट सुरू झाला, ‘हॉबिट’ हे नाव स्क्रीन वर झळकलं आणि थिएटरभर टाळ्या वाजल्या होत्या. फॅन्सचा तो रिस्पॉन्स, आजही अंगावर शहारे आणतो.
दिवसागणिक सगळे स्क्रीन अपग्रेड झाले. मल्टीप्लेक्स आले. नेटफ्लिक्स आलं. आणि टॉकीज, कल्ला हल्ला, शिट्टया आणि अंगावर शहारे आणणारे क्षण कमी झाले.