इंजिनीअरिंग ड्रॉइंग या विषयात भरपूर ड्रॉइंग शिटस् काढाव्या लागत. ह्या शिटस् पूर्ण करण्याचे दोन टप्पे होते. पहिला- शिट ड्रॉ करणे. आणि दुसरा- पूर्ण केलेल्या शिटवर मास्तरची सही घेणे. दोन्ही टप्प्यातलं ऍडव्हेंचर आणि मेहनत सेम होती.
टप्पा पहिला: शिट ड्रॉ करणे
एक ड्रॉइंग शिट ए-वन साइजची, म्हणजे ५९ बाय ८४ सेंटिमीटर असते. म्हणजे कॅरम बोर्ड पेक्षा मोठी. वर्षभरात साधारण अशा वीस ते पंचवीस शिटस् काढव्या लागतात. खरं तर ह्या शिटस् ड्रॉइंगच्या प्रॅक्टिकल मध्ये संपवणं अपेक्षित असतं. पण कुणा कडून त्या कॉलेजेमध्ये कधी संपल्याच नाहीत. मग घरी काढण्या शिवाय पर्याय नव्हता.
हा बॅकलॉग घरी पूर्ण करण्यासाठीच ‘टोपो’ या तंत्राचा जन्म झाला असावा. एखाद्याच्या रूमवर याच प्लानिंग व्हायचं. एक भली मोठी काच, लाईट बल्ब, सोबत होल्डर आणि रूम भर फिरेल एवढी वायर. तीन चार जाड पुस्तकं एकमेकांवर ठेऊन दोन सपोर्ट तयार करायचे. त्यावर काच ठेवायची. खालून बल्ब लावायचा.
एखाद्याची पुर्ण झालेली शिट काचेवर ठेवायची.
वर आपली कोरी शिट ठेवायची.
बल्ब सुरू करायचा.
खालच्या प्रकाशामुळे, पूर्ण झालेली शिट तुमच्या कोऱ्या शिटवर दिसू लागते.
मग ती शिट आपल्या शिट वर ट्रेस करायची.
एवढं सोप्प टेक्निक !
सोपं असलं तरी हे प्रकरण जरा डेलिकेट होतं.
काही वेळाने बल्बच्या प्रकाशाने काच गरम होते आणि तडकण्याची भीती असते. मग थोडं थांबावं लागतं.
चुकून काच गरम झाली तर पूर्ण झालेली काचे वरची शिट पिवळी पडायची.
कोऱ्या शिटवर फार दाबून ट्रेस केलं तर खालच्या शिटच्या रेषा आपल्या शिटवर मागून उमटायच्या.
फार वरवर ट्रेस केलं की टोपो मारला आहे पटकन कळायचं.
शिट चेक करणारे मास्तर या सगळ्या प्रोसेस मधून गेलेले असल्याने त्यांच्या पासून वाचणं हे मोठ्ठं स्किल.
त्याच्या काही प्रो टिप्स पण होत्या.
जसं की, आपल्या शिटवर उगाच खाडाखोड करायची.
शिटवरचं लेटरींग टोपो न मारता स्वतः करायचं.
शिटचा कोपरा मुद्दाम दुमाडायचा, वगैरे, वगैरे.
. . .
एका रात्रीत साधारण तीन ते चार शिटस् टोपो मारून व्हायच्या. त्या दिवशी पहाटेचे चार वाजले असतील. आमच्या तीन शिटस् टोपो मारून झाल्या होत्या. टोपो मारलेल्या तीन आणि ओरिजनल एक अशा चार शिटस् च्या सेपरेट गुंडाळ्या टेबलवर ठेवल्या. टोपोचा बल्ब बंद केला. काच थंड होई पर्यंत पाठ मोकळी व्हावी म्हणून पडलो. थंड झाल्यावर काच भिंतीला लावून ठेवली. ड्रॉइंग बोर्डस, ड्राफ्टर, बॅग्स आवरून ठेवल्या. सकाळ झालीच आहे तर थोडं बाहेरून फिरून यावं म्हणून आम्ही बाहेर पडलो.
थंडी कमी होत आली होती.
उजाडायला अजुन वेळ होता.
पाखरांची किलबिल सुरू व्हायची होती.
घरं शांत.
रस्ते शांत.
झाडं शांत.
बंद असलेली दुकानं, शांत.
रस्त्यावर एखादी पांढरी पेंगलेली कार, शांत.
घाई घाईत तिरप्या लावलेल्या आणि रात्र भर तश्याच उभ्या असलेल्या काही बाईकस्, सायकली पण शांत.
ही शांतता अनुभवत, “कुठे चहा मिळतोय का?”, हे आम्ही शोधत होतो.
कोपऱ्यावरचा एक टपरीवाला नुकताच आला होता.
दुधाची पिशवी अजुन सायकलीलाच होती.
तो म्हणाला, “चहाला पंधरा मिनिट लागतील!”
“चहा पिऊनच जाऊ” असं म्हणून आम्ही रस्त्या लगतच्या कठड्यावर बसलो. ‘जिंदगी’ या विषयावर गप्पा रंगल्या.
तोवर दहा पंधरा मिनिटं गेली आणि चहा आला.
हळूहळू उजाडयला लागलं.
किलबिल सुरू झाली.
पेपरवाले, दुधवाले सायकलीवर दिसू लागले.
उत्साही मंडळी फिरायला निघालेली दिसली.
मग दुसरा चहा संपवुन, आम्ही परत निघालो.
जातांना शांत असणाऱ्या बहुतेक घरांमध्ये एक तरी लाईट लागलेला होता.
कुठे रेडिओवर भक्तीगीते ऐकु येत होती.
सगळं वातावरण रिफ्रेशिंग करणारं होतं. रात्रभराचा सगळा थकवा निघून गेला होता.
“हा चहा प्यायला रोज जायला पाहिजे!”, असं म्हणत आणि रूमवर आलो.
दार उघडून पाहतो तर काय: ओरिजनल शिटची गुंडाळी टेबलावरून घरंगळून खाली ठेवलेल्या कच्छवा छाप अगरबत्तीवर पडली होती. शिट जळून तिला मोठ्ठं भोक पडलं होतं. सकाळ झाल्यामुळे अगरबत्ती संपली म्हणून पूर्ण शिट न जळता फक्त भोकच पडलं.
आम्ही एकमेकांकडे पाहिलं.
टोपोचा सेट-अप परत लावला.
सकाळी नऊपर्यंत आळीपाळीने काम करून टोपोवरून टोपो करून ओरिजनल शिट बनवली.
आणि ज्याची होती त्याला, काहीही न सांगता, नेऊन दिली.
टप्पा दुसरा : मास्तरची सही घेणे
मास्तरची सही घेण्यासाठी केबिन बाहेर रांग लागे. आज सगळा वर्ग वैतागला होता. प्रत्येकाची काही तरी चूक काढून मास्तर परत पाठवत होते. आज प्रत्येक जण दोनदा तरी आत मध्ये जाऊन आला. कुणालाच सही मिळेना. श्याम माझ्या समोर एकदा परत आलेला. मी दुसऱ्यांदा परत आलो तेंव्हा हा पठ्ठ्या शांत बसलेला.
मी विचारलं, “का रे, सही?”
तो म्हणाला, “झाली!”
टोपो तर आम्ही सोबतच मारला मग याला कशी सही मिळाली आणि मी का केबिनच्या येरझारा घालतोय,
म्हणून मी विचारलं, “कशी काय?”
तो म्हणाला, “सर आज कुणालाच सही देत नाही आहेत. मग मी सरांची सहीच टोपो मारून टाकली !!” .
म्हणजे शिटही टोपो आणि मास्तरांची सहीपण टोपो !
मी आपली शिट घेऊन मुकाट्याने रांगेत उभा राहिलो.
. . .
मास्तरांच्या सहीचा अजुन एक किस्सा आहे.
काही प्रॅक्टिकलस् वर सरांच्या सह्या नव्हत्या. आणि सबमिशनचा शेवटचा दिवस. ढगे घाबरला. त्याने स्वतःच सरांच्या सह्या ठोकल्या. खरं तर त्या सरांच्या सह्या करण्याची काहीही गरज नव्हती. कारण ते सबमिशनसाठी कधीही त्रास नाही द्यायचे. त्यांनी ढगेला सह्या दिल्याही असत्या. पण पॅनिक होऊन याने गोंधळ केला. सबमिशनच्या आधी फाईल चाळतांना ढगे पकडल्या गेला. ढगेचे तर पायच गळाले.
सर चिडून ढगेला म्हणाले, “कॉल यूर पॅरेंट्स, आफ्टर लंच.”
आणि ते तावातावाने लंचसाठी निघून गेले.
“कॉलेजमध्ये पॅरेंट्स?”
आम्हालाही थोडं ऑड वाटलं पण ढग्याने पराक्रम ही तसाच केला होता.
ढगेचे आई-बाप गावाकडे. हा आपल्या आजी सोबत शेजारच्या खेड्यात राहायचा. नाईलाज म्हणून तो घरी आला, तर आजी शेतात गेलेली. मग शेतात गेला. आजीला सोबत घेतलं. काय घडलं ते सांगितलच नाही आणि कॉलेजात आला. येतायेता चार वाजले होते. आपल्या नातवाच्या शाळेत काहीतरी झालं, एवढंच आजीला कळलं. ती बिचारी हातातले कामं टाकून तरातरा आली होती. उन्हात आल्याने दमली होती. तिला केबिन बाहेरच्या स्टूलावर बसवून ढगे सरांची वाट पाहू लागला.
सर लेक्चरला गेलेले. अर्ध्या तासाने ते आले तेंव्हा, त्यांना आधी ढगे दिसला आणि मग घामाघूम झालेली, स्टूलावर बसलेली आजी.
सरांनी ढगेला विचारलं, “ह्या कोण?”
ढगे म्हणाला, “सर, पॅरेंट्स.”
तोंडापर्यंत आलेलं ‘मूर्खा!’ त्यांनी आवरलं.
आजी बाईंना कॅबिन मध्ये घेऊन गेले. पाणी दिलं.
पाणी पिता पिता आजीचा प्रश्न, “काय केलं माह्या नातवान, सर?”
सर एक आवंढा गिळून म्हणाले, “काही नाही आजी, जा तुम्ही घरी. काळजी करण्यासारखं काही नाही.”
सर ढग्याकडे पाहून म्हणाले, “जा, सोडून ये घरी.”
आजीला काही कळेना.
बाहेर जाता जाता ती आपल्या नातवाला म्हणाली,
“पाणी प्यायला कशाले बोलीवल रे मले?”
कॅबीन मध्ये सर आणि बाहेर आम्ही जोरात हसलो.
ढग्या मूळे सबमिशनचं टेन्शन थोडं का होईना हलकं झालं.