इंजिनीअरिंगच्या आयुष्यात ड्रॉइंग हॉल येतोच.
एक मोठ्ठा हॉल.
त्यात पन्नास ते साठ मोठी टेबलं.
प्रत्येक टेबल एवढा मोठा की ड्रॉइंग बोर्ड ठेवल्यावर, ड्राफ्टर, पेन्सिल्स, पेन, सोबत आणलेली एखादी वही किंवा स्केच बुक ठेऊन बरीच जागा उरेल.
एवढा टेबल प्रत्येकाला एक.
त्याच्या समोर एक उंच स्टूल.
टेबालाची उंची एवढी की सहज उभे राहून ड्रॉइंग काढता येईल.
स्टूलची उंची एवढी की त्यावर बसून लिहिता येईल.
हॉलच्या एका भिंतीला तीन फळे. हिरव्या रंगाचे.
त्यापैकी एकावर ग्राफ सारखे चौकोनी रकाने काढलेले.
सरांसाठी तीन फळ्यांच्या मधोमध एक लांब टेबल आणि एक स्टूल.
सरांचं हे टेबल आणि स्टूलच सेटअप एका डायस वर ठेवलेलं.
हे डायस ही लाकडाचं.
लाकडी डायसच्या खाली कागदांचे बोळे.
डायसवर फळ्याच्या खाली पडलेली खडुची पावडर.
सरांच्या टेबल वर डस्टर. रंगीबिरंगी खडूंचे तुकडे.
एखादा बिनकामाचा कागद.
खडूंची पावडर इथेही, टेबल भर.
एका भिंतीवर तीन चार स्वीच बोर्डस, जवळ जवळ बसवलेले.
त्यावर काळया रंगाचे गोल स्विचेस.
छताला ठिकठिकाणी लोंबकळत फॅन्स आणि ट्यूब लाईट्स.
छताच्या कोपऱ्याला जाळे. ठीक ठिकाणी.
फळ्यांचा भिंतींच्या कोपऱ्यात एखादं रिकाम टेबल.
त्यावर जुन्या शीटस्.
जर्नल्स च्या फायलींची कव्हर्स.
त्यावर धूळ.
टेबल, शीटस् आणि फाईल्स कुणालाच कधी दिसतच नाहीत अश्या पडलेल्या.
आमच्या टेबल वर पेन ठेवण्यासाठी दोन खाचा.
ठिकठिकाणी शाईचे डाग.
परीक्षेचे रोल नंबर्स चिकटलेले कागद. काही फाडलेले, काही तसेच.
टेबलावर अगम्य अक्षरात काहीतरी लिहिलेलं.
ड्राफ्टर घासून घासून लाकडावर कोरल्या गेलेल्या रेषा.
टेबलावर वर्षानुवर्षापासून लिहिलेली नावं.
बदामी आकाराने जोडलेली काही जुनी नाती.
तर काहिंतून आरपार गेलेले बाण.
त्या टेबलाला सहजासहजी न उघडता येणारा एका मोठ्ठा ड्रावर.
त्या ड्रावरमध्ये धुळीचा थर.
एखादा कागद किंवा कागदाचा बोळा.
दोन फळ्यांचा रुंद फटीत व्यवस्थित घडी करून लपवलेली कॉपी.
टेबलाच्या सोबतीला उभा असलेला स्टूल.
पिढ्यानपढ्या बसून गुळगुळीत झालेला.
त्याला उचलण्यासाठी मध्ये एक भोक.
खाली सिमेंटच फ्लोरिंग.
त्याला काळया रंगाचे जॉइंट.
काही ठिकाणी उखडलेले.
त्यातून घरांगळणारे वाळूचे खडे अगदी पायाशी पोहचलेले.
कोपऱ्यात पाय तुटलेला, धुळीत माखलेला एखादा स्टूल.
एकटाच.
हॉलला मोठ्ठ्या खिडक्या.
पण त्यावर बारीक लोखंडी जाळी लावलेली. त्यामुळे दबकत येणारा प्रकाश. खिडक्यांच्या बाहेर अशोकाची उंच झाडं, रस्ता. रस्त्यापलीकडलं हॉस्टेल. सायकल स्टँड.
हॉलला दोन तावदाने असलेलं मोठ्ठं दार.
दारावर बाहेरील बाजूस परीक्षेच्या वेळेस चिकटवलेली रोल नंबर्स ची लिस्ट.
दार नेहमी अर्ध बंद.
या हॉल मध्ये आम्ही फक्त ड्रॉइंग काढली असं नाही.
सगळी सबमिशन केली.
परीक्षा दिल्या.
खरं तर या हॉल ने आमचं इंजिनीअरिंग पाहिलं
आणि तो ही जगला आमच्या सोबत.
रोज संध्याकाळी, कॉलेज मधून घरी जातांना, हॉल मध्ये डोकावून बघण्याची सवय होती मला. त्याचं किणकिणत दार हळूच बाहेर ओढायचं आणि आत डोकावून बघायचं.
हॉल शांत, तृप्त.
सगळी मंडळी पांगल्यावर एकटा उभा असलेल्या मंडपासारखा.