बायकोच्या शाळेतल्या वर्ग मैत्रिणींच गेट टू गेदर होत काल.
कुठला ड्रेस घालू यावर चर्चा सुरु झाली,
मग बोल चाल झाली
आणि शेवटी भांडणाने निर्णय झाला.
चांगली फिटिंग आहे असं म्हणुन एक अतिशय टाइट जीन्स मलाही घालावी लागली! नंतर खिशातही हात घालता आला नाही ती गोष्ट वेगळी. चांगली फिटिंग म्हणे.
दोन्ही पाय कडक करून मी तिच्या सोबत पोहचलो.
मुलींच्या गप्पा सुरु झाल्या.
कोण आधी कसे बारिक होते आता कसे वजन ‘पुट ऑन’ झाले. कोणी कसे हेयर स्ट्रैट केलेत. वगैरे वगैरे…
नवरे मंडळीनी एकमेकांना हाय हैलो केले.
एकदा एकमेकांच्या पोटांकडे पाहिले.
शक्य तेवढे पोट आत घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.
आणि मग आमच्या गप्पा…
यंदा फार उन होते. सगळे सहमत!
पाऊस कमी होईल यंदा. सगळे सहमत!
मोदीने आता काम करायला पाहिजे. सगळे सहमत!
साधारण पंधरा मिनिटांत सगळी चर्चा संपली.
मग सगळे नवरे सवयीप्रमाणे ‘म्यूट’.
एरवी घरात दोनच गोष्टी म्यूट होतात. टीव्ही आणि नवरा.
पुढचा अर्धा तास ताटात जे येईल ते आणि जेवढे येईल ते पोटात घातले.
तिकडे गप्पाचा ओघ सुरूच होता.
नंतर सेल्फ़ी सेशन झालं. ऑकवर्ड नवरे म्यूट मध्येच हसत, पोट आत घेत उभे राहिले.
मग असं मजल दर मजल करत गेट टू गेदर संपल.
येतांना त्या चांगल्या फिटिंगच्या जीन्सची एक हुक उघडूनच मी घरी आलो.