दुपारी घरी जाता जाता रामबाग कॉलनीच्या वळणावर ही ऊसाची गाडी दिसली. गर्द झाडाच्या सावलीत उभी असलेली. हाताने उसाचा रस काढणारं हे कपल बघून मी आणि जयश्री थांबलो. त्या सावलीत फूटपाथ वर बसून मस्त रस पीला. शांत वाटलं. हाताने काढलेल्या उसाच्या रसाला जी चव असते ती मशीनवर काढलेल्या रसाला येत नाही.
आम्ही बराच वेळ बसून त्या कुटुंबाची लगबग बघत होतो.
गाडी स्वच्छ, नीटनेटकी. नेमके सामान. व्यवस्थित कापून ठेवलेले ऊस.स्वच्छ सात आठ ग्लासेस, रस गाळण्यासाठी पांढरे शुभ्र कापड, पैसे जमा करण्यासाठी छोटीशी ज्युटची पिशवी, पाणी साठवण्यासाठी स्टीलची टाकी, पिण्याच्या पाण्यासाठी छोटा काळाशार माठ, झाडाच्या बुंध्याशी त्यांचा डबा. असा सगळा संसार आम्ही दोघं कुतुहलाने बघत होतो.
लोकं जाता येता थांबत होती. रस पिऊन पुढे जात होती. काही जण बॉटल मध्ये नेत होती. गर्दी कितीही असो ही दोघं शांत काम करत होती. प्रत्येकाशी हसून बोलत होती. थोडा अबोल, हसऱ्या चेहऱ्याचा हा गडी दिवस भर रसासाठी तो घाणा ओढतो. बायको पण खांद्याला खांदा देऊन समर्थपणे उभी.
थोडी गर्दी ओसरल्यावर सवयीप्रमाणे आम्ही गप्पा मारल्या. धनाजी नाव त्याच. रांगडा सोलापूरचा गडी. सकाळी नऊ वाजता हे कुटुंब आपला हा छोटासा बिझीनेस सुरू करतात. रात्री साडे दहा पर्यंत लोकं येतात म्हटले. मग घरी जायला बारा वाजतात. घरी गेल्यावर कुकर लावायचा काहीतरी बनवायचं आणि खायचं. सकाळी पुन्हा सुरू.
“समोरच्या मशीनवाल्या रसवंती वर फार गर्दी असते. आम्हाला हातांनी रस काढायला थोडा उशीर लागतो म्हणून लोकं थांबत नाहीत. पण आम्ही आमच्या कष्टात खुश आहोत. तसंही दोघांच्या संसाराला काय हवं?” दोघं बराच वेळ बोलत राहिली आणि आम्ही दोघं कौतुकान ऐकत राहिलो.
नंतर मी फोटो काढले. धनाजी जातांना जवळ येऊन म्हटला “साहेब, यातले काही फोटो धुऊन द्या, आमच्या होणाऱ्या पोरांना दाखवीन, आमची ही ऊसाची गाडी.”
या उन्हाळ्यात, कुण्या वळणावर झाडाच्या सावलीत अशी ऊसाची गाडी दिसली तर जरूर थांबा.