दत्त दत्त

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

आज सासुबाई आल्या.

जळगावहून साधारण सकाळी साडे पाचच्या दरम्यान बस पुण्यात पोहचते.
सासुबाई यथावकाश घरी आल्या.
गप्पा झाल्या.

पंधरा वीस मिनिटांनी….
त्यांची पर्स बस मध्येच राहिल्याच लक्षात आलं. सकाळी सकाळी एकच गोंधळ.
पळापळ. रडारड. आणि बरचं काही.

मुलीने आई साठी पटापट फोन लावले.
आईने आज ‘गुरुवार’ असल्याने दत्ताचा धावा सुरु केला.

बस शेवटी कुठे उभी राहते हे एका मित्राने अर्ध्या झोपेतच सांगितले.
बस शोधत असतांनाचे माझ्या डोक्यात आलेले काही विचार:
….

” सासुबाईनीं दत्ताचा धावा सुरु केल्यावर दत्ताचा गाभारा दणाणला असावा. दत्तासहित त्याचा सारा स्टाफ घाबरून इकडे तिकडे पळत असेल.

कुठली पर्स होती, कोणती बस होती याचं एनालिसिस सुरु झालं असेल. बस आता उभी असलेलं लोकेशन सैटेलाइट वरुन मागवन्यात आलं असेल.

बस मध्ये असलेल्या गणपतीला संपर्क करण्यात आला असावा.

वेळ सकाळची असल्याने गणराया पेंगलेले असतील.

बसचा ड्राईवर माझी कशी हेळसांड करतो… त्या पर्स हरवलेल्या बाईंनी चढतांना माझ्या कडे कसे लक्षही दिले नाही… अशा नाना प्रकारच्या तक्रारी गणरायांनी केल्या असतील.

येणाऱ्या सुट्टीच्या मूड मध्ये असणारे गणराज वैतागले असतील. ऑफिशीयल ईमेल आल्याशिवाय आम्ही इनक्वायरी पुढे नेत नाही असेही ठणकावुन सांगितले असावे.

सगळा इगो आणि गाई वासरे बाजूला ठेवून दत्तानी आपल्या लाडक्या भक्ता साठी रिक्वेस्ट केली असेल.

मग गणरायानी ‘फक्त तुम्ही आहे म्हणून’ असे म्हणून, “ड्राईवरला सांगतो!” म्हणत फोन आपटला असेल “
…..

दरम्यान आम्ही बसपाशी पोहचलो. बसच्या ड्राईवरने प्रामाणिकपणे पर्स परत केली. आम्ही त्याला बक्षीसही दिलं.

पण…
पर्स ड्राईवरच्या प्रमाणिकपणा मुळे मिळाली
की दत्ताच्या फोन कॉल मुळे
की गणरायाच्या कृपेने
हे मात्र देवच जाणे !

इतर पोस्ट्स