दोन बाल्कनी

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

बाल्कनीत बंगई आहे. त्यावर शांतपणे बसून काका चहा घेत असतात. पांढरी दाढी. पांढरे केस. काळा टी शर्ट – काळीच थ्री फोर्थ. साठीतला, निवांत रिटायर झालेला माणूस. आणि माझ्या बाल्कनीतून रोज दिसणारं हे दृश्य का कोण जाणे मला नेहमीच हेवा वाटून अस्वस्थ करतं.

. . .

आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहणारे हे काका- काकू.
त्यांच्या घराला दोन बाल्कनी.
पहिली – बंगई असणारी.
आणि दुसरी बेडरूमला जोडलेली, ऐसपैस.

पहिल्या बाल्कनीत,
लोखंडी पाईपची फ्रेम. एक टोक भिंतीला तर दुसरं रेलिंग वरून काढलेल्या कॉलमला. त्या फ्रेमला रुबाबात झुलणारी लाकडी बंगई.
दोन कुंड्या, दोन कोपऱ्यात रेलिंगला खेटून उभ्या.
त्या कुंड्यांमध्ये कुठलिशी छोटी रोपटी.
एक शू रॅक, खिडकी खाली.
दोन डस्ट बिनच्या बादल्या. निळ्या रंगाच्या.
अडगळीतलं एक छोटंसं कपाट.
त्यावर काकांची तंबाखू ची पुडी आणि चुन्याची डबी. बहुदा लपून ठेवलेली.
बाल्कनीला वर कपडे वाळू घालण्यासाठी दोरीने खाली घेता येतं असं इझी ड्रायर.
त्यावर लोळत पडलेले कपडे.
बाल्कनीच्या भिंतींना बिल्डिंगचाच पांढरा रंग. रेलींग मात्र काळी.
या बाल्कनीत सहसा काकूंचा वावर नसतो. मात्र काका सारखे दिसतात.

याच्या एकदम विरुद्ध दुसरी बाल्कनी.
ती काकूंच्या निगराणी खाली असणार.
या बाल्कनीला तिन्ही बाजू मोकळ्या.
त्यामुळे तिन्ही बाजुस कुंड्या ठेवलेल्या.
कुंडीच्या प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घेतलेली.
रोपांच्या आधारासाठी ठिकठिकाणी बांबूच्या चौकटी तयार केलेल्या. त्यांना पांढरा शुभ्र रंग दिलेला.
एक वेल कॉलम वर सर सर चढत गेलेली.
तिला पांढऱ्या रंगाची छोटी छोटी फुलं.
साठीतल्या या काकू कधी कधी सकाळी सकाळी आपली ही छोटी बाग कौतुकानं न्याहाळताना दिसतात.
कधी वेलीची फुले वेचतांना दिसतात.
या बाल्कनीत एक उभी ठेवलेली केरसुणी.
पांढऱ्या रंगाची छोटीशी चेअर. एकच. काकुंसाठी.

त्या छोट्याश्या बागेला पक्षी ही कुतूहलाने बघतात.
पण ते आत येऊ नयेत म्हणून बाल्कनीला संपूर्ण नेट लावलेली.
पक्ष्यां प्रमाणेच काकाला सुध्दा इथे प्रवेश नसावा. ते नाही दिसत फारसे इथे.

काकू मात्र बाल्कनी पेक्षा किचनच्याच खिडकीत जास्त दिसतात.
किंवा सोफ्यावर बसून निवांत टी व्ही बघत असतात.
एरवी शांत चहा पित बसलेले काका, बिलकुलही शांत नाहीत.
तिथल्या तिथे सारखी काहीतरी धावपळ सुरू असते.

चहा पिऊन झाला की पटकन कप बशी आत नेऊन ठेवणार.
इकडे तिकडे कानोसा घेऊन, तंबाखू चोळून पटकन तोंडात टाकणार.
झटदिशी आत जाणार, आतून मोबाईल आणणार, उगवत्या सूर्याचा फोटो काढणार.
मग बंगईत बसून, तो फोटो फॉरवर्ड करीत बसणार.
कुणाच्या रिप्लायची वाट न बघता, परत आत जाणार.
केरसुणी घेऊन उगाच बाल्कनी झाडणार.
तंबाखू नीट ठेवली आहे की नाही चेक करणार.
मग दोरी खाली ओढून कपडे खाली घेणार, घड्या करणार.
त्यांची लगबग सारखी खिडक्यांमधूनही दिसत राहते.

बऱ्याच वर्षांच्या संसारानंतर नवरा बायको आपल्या रूम वाटून घेतात म्हणे, तश्या बाल्कनी पण वाटून घेत असावेत.
मात्र एखाद्या संध्याकाळी काका काकू दोघंही बंगईत चहा घेताना दिसतात.
आणि त्यांना पाहून माझं हे वाटणं चुकीचं वाटायला लागतं…

इतर पोस्ट्स