मास्तर वर्गात आले.
फळा पुसला.
“हं, कुठला धडा आहे पुढचा?”आपल्या पांढऱ्या शबनम मधून मराठीचं पुस्तक काढता-काढता त्यांनी विचारलं.
“ब.. ग.. ळा.. ! ” आम्ही सगळे एका दमात ओरडलो.
नववी मराठीला, आम्हाला ‘बगळा’ नावाचा धडा होता. बगळ्याचा पांढरा शुभ्र रंग, चालतांना डोलात हलणारी मान, एका पायावर उभे राहून मासे पकडणं, वगैरे वगैरे, असं सुंदर वर्णन या धड्यात होतं.
आम्ही नववीत येईस्तोवर आमच्या शाळेतली मास्तरांची जुनी पिढी रिटायरमेंटला आली होती. आमचे मराठीचे मास्तर याच गँग मधले. पांढरा शुभ्र झब्बा पायजमा, खांद्यावर पांढरी शबनम, पांढरे केस, सडपातळ आणि उंच बांधा. ‘बगळा’ म्हणून त्यांची ख्याती अख्ख्या शाळेत होती. ते चालतांना त्यांची मान बगळ्या सारखीच हलायची. आपल्याला मागे ‘बगळा’ म्हणतात याची त्यांना कल्पना असावी. त्यामुळे कुठल्याच बॅचला, ते हा धडा शिकवित नसत. आम्हालाही शिकविणार नाही हे ठाऊक होतं.
“तो तुम्ही घरी वाचून घ्या. आपण पुढचा धडा घेऊ.” मास्तर, थोडे अस्वस्थ होत म्हणाले.
“सर, तुमच्यावरच आहे हा धडा. शिकवा ना!” मागून कुणीतरी दबक्या आवाजात बोललं.
वर्षांनुवर्षे एकाच वर्गात मुक्कामी असणारी बरीच मंडळी आमच्या वर्गात होती. त्यामुळे आमचा वर्ग ‘ढ’ म्हणून प्रसिद्धही होता. त्यांना मराठीच्या या धड्याची हिस्टरी चांगलीच माहिती होती.
मागून आलेल्या या कॉमेंट वर सगळा वर्ग खळखळून हसला.
मास्तर चिडले.
बगळ्याने मासा चोचीत धरून पाण्यावर आपटावा तसा एकेकाला आपटायला सुरुवात केली. पहिल्या रांगेतील पाच-सहा पोरं धुतल्यावर, मास्तरांना धाप लागली.
ते खुर्चीवर येऊन बसले. एक हात टेबलावर आणि दुसरा हात गुडघ्यावर ठेऊन ते खुर्चीवर रेलले. वर्ग घाबरून शांत झाला.
“सर, पाणी देऊ का?” पहिल्या बाकावर बसणारं हुशार पोरगं म्हणालं.
“नको, बाळा.” मास्तर श्वास सोडत म्हणाले.
“मग काय गोमूत्र देऊ?” मागून कॉमेंट आलीच.
मास्तर परत उठले.
पुन्हा उरलेले पोरं झोडत सुटले. कशीबशी एक रांग झोडपून झाली. आणि ते थकून परत खुर्चीवर टेकले. ते टेकलेच होते की हळूच दबक्या आवाजात जयघोष झाला, “गजानन महाराज की sss….” सगळया वर्गाने एका सुरात दाद दिली, “जयsss !” मास्तरांच्या वडिलांचं नावही गजानन असणे हा योगायोग नव्हता.
पुन्हा पिटाई सुरू होणारच होती.
पण तास संपला.
जेवणाची सुट्टी झाली.
बगळा रागाने लाल होऊन वर्गा बाहेर गेला.
सकाळची प्रार्थना संपली.
आमच्या वर्गाला ग्राउंडवरच थांबण्याची घोषणा झाली.
बाकीची पोरं आपापल्या वर्गात गेली. कालच्या प्रकरणाची चौकशी असणार, हे आमच्या एव्हाना लक्षात आलंच होतं. कालच्या बगळ्याच्या हल्ल्यात विनाकारण जखमी झालेली पहिल्या रांगेतील पोरं शांत बसली होती. कुणाचा गाल, कुणाचा कान तर कुणाची पाठ सुजली होती. झालेल्या प्रकारामुळे मास्तर शाळा सोडून गेले अशी चर्चा होती. काल घरी गेल्यावर, त्यांना हार्ट ॲटक आला आणि त्यांची तब्येत गंभीर झालीय, अशीही एक खबर फिरत होती.
शाळेच्या भल्या मोठ्या पटांगणात आमचा वर्ग बसून होता.
बराच वेळ झाला, पण कोणी येईना. उन्हात आता कचकच व्हायला लागली होती. तहान लागली होती. पोरं कुजबुज करून थकली होती. खरंतर ‘बगळा’ म्हणून त्यांना चिडविनारा आमचा काही पहिलाच वर्ग नव्हता. पण “गोमूत्र प्या!”, म्हणणारा नक्कीच पहिला असावा.
बऱ्याच वेळाने आमचे क्लास टीचर आणि प्रिन्सिपॉल मॅडम आमच्याकडे येतांना दिसल्या.
प्रिन्सिपॉल मॅडम टेरर होत्या.
शाळेतली पोरंच काय, सगळी शिक्षक मंडळी त्यांना घाबरायची.
आमचं प्रकरण त्यांच्या पर्यंत गेलं, म्हणजे बगळ्याने, चिमण्यांची तक्रार, थेट वाघिणीलाच केली होती. मॅडमला बघून, “आज आपण मेलो”, हा विचार बसलेल्या प्रत्येकाच्या मनात येऊन गेला. आमचे क्लास टीचर अगदी मृदू स्वभावाचा माणूस. त्यांनी कुणाला मारणं तर दूर, पण साधी शिक्षा केल्याचं आठवत नाही. एकदम गाय माणूस.
वाघीण आणि सोबत गरीब गाय हे चित्र कॉमेडी असलं तरी हसू कुणाला येत नव्हतं.
“एका सीनिअर शिक्षकाची टिंगल करतांना लाज नाही वाटली तुम्हाला?” मॅडमने आल्या आल्याच डरकाळी फोडली.
“नववीत आलात म्हणजे फार शिंग फुटली का तुम्हाला?”
“कुणी खोडी काढली होती काल?” गरागरा डोळे फिरवत मॅडमने विचारलं.
ग्राउंड मध्ये वाहणारं वारं पण अचानक थांबलं.
“कुणी टवाळक्या केल्या काल…?” त्यांनी परत विचारलं.
पिन ड्रॉप सायलेन्स.
कुणीच बोलत नाहिये पाहून त्यांचा पाराच चढला.
“हा वर्ग नकोच आहे मला.”
“सर, द्या ह्या सगळ्यांच्या टी. सी. परत.” मॅडम, क्लास टीचरच्या हातातल्या पेपरच्या गठ्ठ्याकडे बघत म्हणाल्या.
“नको मॅडम. माफ करा. मुलंच आहेत. पुन्हा नाही करणार ते, असं काही. उगाच एक वर्ष वाया जाईल सगळ्यांचं. पुढचं दहावीचं वर्ष आहे.” क्लास टीचर आमची बाजू घेत म्हणाले.
“तेवढी अक्कल आहे कुठे, त्यांना? नववीतच हे दिवे लावले, तर दहावीत काय करतील?”
“ते काही नाही. रोल नंबर नुसार, द्या त्यांच्या टी. सी. परत.”
आमची तर पुरती फाटली.
“मॅडम पुन्हा विचार करा, प्लिज.” क्लास टीचर काकुळतीला येऊन म्हणाले.
मागून आम्ही सगळे फक्त “प्लिज” म्हणालो.
रागाने लाल झालेल्या मॅडमने डोळ्यावरचा चष्मा नीट केला.
“तू, उभा राहा. सांग… इंग्लिशचा पहिला धडा कोणता?” मॅडमनी नेमकं वर्गातल्या हुशार मुलाला उभा करून, सोप्पा प्रश्न विचारला.
“अ लेटर टू मदर अर्थ” ते पोरगं पटकन म्हणालं.
याला पाहिलं धडा विचारला म्हणजे माझा नंबर येईपर्यंत किमान बारावा धडा विचारतील. माझं कॅलक्युलेशन रेडी होऊन, मी निवांत झालो.
“तू, उभा रहा.” मॅडम माझ्याकडे बोट दाखवत म्हणाल्या.
दुसऱ्या धड्याचं नाव मी आठवतच होतो.
“तू सांग… मराठीच्या पहिल्या धड्याचं नाव, काय आहे?” त्या म्हणाल्या.
थोडा विचार केला आणि मी म्हणालो, “भारतीय लोकांचा व्यापार.”
“ठीक आहे. जा तुम्ही दोघं. बसा वर्गात.” मॅडम म्हणाल्या.
आम्ही दोघांनी क्लास टीचरकडे पाहिलं.
“निघा!” त्यांनी नजरेनंच म्हटलं.
आम्ही बसलेल्या पोरांमधून वाट काढत वर्गाकडे निघालो.
आमच्या सोबत अजुन कुणाला तरी सोडतील, या आशेवर, आम्ही हळूहळू चाललो होतो.
अर्धे अंतर कापल्यावर, मी मागे वळून पाहिलं.
एव्हाना कुणीतरी माफीचा साक्षीदार झाला होता.
पाच-सहा जणांना समोर उभे होते.
कधी अंगालाही हात न लावणारे, आमचे क्लास टीचर, लाथा बुक्क्यांनी हाणत होते.
प्रिन्सिपॉल मॅडम दूर उभ्या होत्या.
बसलेले काही जण आमच्याकडे वळून-वळून बघत होते.
“वाचलो!” सोबतच्या माझ्या हुशार गड्याला मी म्हटलं.
माझ्याकडे रागाने बघत तो म्हणाला, “काय वाचलो? मराठीचा पहिला धडा तू आठवीतला सांगितला.”
रीलेटेड पोस्ट : पेढ्यांचा बॉक्स