ढगळा पांढरा शर्ट आणि पायजामा. पायात टायरच्या चप्पल. डोळे बारीक करून बघण्याची सवय. डोक्यावर बारीक केस. खुरटी दाढी. खांद्यावर उपरण. अंगाने दणकट. त्याला बोलतांना फारसा कुणी ऐकलं नाही. सगळ्यांना माहीत असणारा पण कुणात न मिसळणारा. आपल्या कामाशी काम ठेवणारा हा गडी. पुरुषोत्तम.
पुरुषोत्तमची परिस्थिती तशी बेताचीच. छोटं मातीच घर. त्यावर टिनाचं छप्पर. तो, बायको, मुलगा आणि मुलगी असं चौकोनी कुटुंब. पुरुषोत्तम अंगकाम करणारा. विहिरी खोदणे, रस्त्याच्या कडेने नाल्या खोदणे, माती वाहणे अशी कामं तो अंगावर घ्यायचा. बायको इतर बायकांसोबत शेतात जायची. तीही नवऱ्या प्रमाणे फारशी कुणात न मिसळनारी. मुलगी इतर पोरींसारखी. त्या घरात मुलगा तेवढा बडबडाआणि चंचल.
बाप कधी कुठे बोलला नाही आणि मुलगा कुठे शांत बसला नाही.
एकंदरीत हे कुटुंब, शांत.
त्या छोट्याश्या घरातून कधी भांडणाचे स्वर ऐकू आले नाही.
तसे कधी हसण्याचे ही नाही.
तसं खाऊन पिऊन सुखी कुटुंब.
‘ कष्ट करायचे ‘ हा एकच मंत्र.
. . .
नवरा बायकोची आठवड्याची मजुरी जमा झाली की, पुरुषोत्तम गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात जायचा. हा आठवडी बाजार त्याला फार आवडे. गुरुवार म्हणजे कामाला सुट्टी. सकाळी उठून, तयार होऊन, भाकरी वगैरे खाऊन हा गडी, पायी पायी बाजारात निघायचा. एरवीही पुरुषोत्तम सगळीकडे पायीच फिरायचा. तालुक्याला भरणाऱ्या या बाजाराची त्याला फार ओढ होती.
पंचक्रोशीत भरणारा हा सर्वात मोठा बाजार. एका मोठ्या ग्राउंड वर हा बाजार भरे. गर्दीतून रस्ता काढत आत शिरलं की आधी कपड्यांचा बाजार. रंग बिरंगी रेडिमेड कपडे विकणारे, कापडाचे ताव घेऊन बसलेले कापड व्यापारी, ताबोडतोब शिवून पायजमे देणारे शिंपी असे सगळे या बाजारात बसलेले असत. मग भांड्यांचा बाजार. भांडी विकणारे. कलही करणारे. जुन्या भांड्यांची मोड घेणारे. या सर्वांची दुकानं चमकत असतं. त्याला लागून धान्याचे व्यापारी आपापली मोठी दुकानं लाऊन बसत. नंतर गावा गावातून आलेले भाजीवाले शेतकरी, कांद्या बतातेचे अडते, मसाल्याचे व्यापारी यांची दुकानं. मग फळांवाले. वेगवेगळी फळं थाटात रचून ठेवलेली दुकानं. पिवळ्या पिवळ्या केळांनी लदबदलेल्या एका रांगेत उभ्या असलेल्या हातगाड्या. हिरवीगार खायची पानं घेऊन बसलेल्या म्हाताऱ्या, इत्यादी. हिवाळ्यात ग्राउंडच्या, एका कोपऱ्यात उसाच्या गाड्या लागत. आणि उन्हाळ्यात तिथेच आंबे वाले बसत. ग्राउंडच्या कडेला जुना बाजार. जुन्या वस्तू स्वस्तात मिळण्याचे ठिकाण. कधी चोरीचा माल पण विकला जाई. लोखंडी टेबलं, खुर्च्या, डबे, जुन्या सायकली असं सगळं. शेवटी गुरांचा बाजार. शेतातल्या कामासाठी बैल विकणारे. भरपूर दूध देण्याची हमी देणारे म्हशी वाले, बकऱ्या विकणारे, ओझी वाहण्यासाठी लागणारी गाढवं विकणारे असे या गुरांच्या बाजारात उभे असत. शेजारीच या गुरांचा चारा विकणारी दुकानं पण मांडलेली असायची. असा हा मोठ्ठा बाजार एकदा फिरून यायचं म्हटलं तरी दोन तास सहज जायचे.
जुना बाजार आणि त्याला लागून असणारा गुरांचा बाजार पुरुषोत्तमचा कुतूहलाचा विषय.
पोरांच्या अभ्यासा साठी टेबल खुर्ची बघणार.
मग मजुरीचे गणित मांडून पुढे जाणार.
जुन्या सायकली निरखून बघणार.
‘पोरगा मोठा झाला की घेऊ’ असा विचार करत पुढे.
मग गुरांच्या बाजारात रेंगळणार. बैलं बघणार. म्हशींच्या किमती ऐकणार. म्या म्या करणाऱ्या बकऱ्यांच्या पिल्लांवरून हात फिरवत कुरवळणार.
मुळातच स्वभाव अबोल असल्याने कुणाशी न बोलता सगळ्या बाजारात फेरफटका मारणार. दुपारची उन्हं कलली की मग भाजी कडे वळणार. भाजी लवकर विकून घरी जाण्याच्या घाईत असल्याने भाज्या जरा स्वतही होतात हे त्याला चांगलच ठाऊक होतं. सोबत आणलेल्या दोन पिशव्या भरून भाजीपाला, कधी केळी, कधी फळं घेणार. मग एक पिशवी डोक्यावर आणि एक हातात घेऊन पुढल्या खेपेस काय काय विकत घेऊ असा विचार करत, तो घरी येई.
रात्री, आपली खाट घराबाहेरच्या रस्त्यावर टाकून तो शांत आकाशाकडे बघत पडणार. आपण ही बाजारात काही तरी विकू असा विचार करत, दर गुरुवार जाई.
. . .
सणा सुदीला बाजारातून एक कापड घेऊन त्यात स्वतःला आणि पोराला शर्ट शिवून घ्यायचा. पोरीला रेडिमेड फ्रॉक. बायकोला कधीतरी नवीन साडी.
नवीन कपड्यांचा सण बहुदा दिवाळी असे. बायको काही तरी गोडधोड करी. झाला सण.
पोरांनी कधी फटाक्यांचा हट्ट केला नाही.
दुसरी पोरं फटाके फोडताना बघायची यातच आनंद.
न फुटलेले फटाके गोळा करायचे. उन्हात वळवायचे आणि फोडायचे.
बाकी सगळे सण कोरडेच !
बाजाराचा दिवस मात्र या कुटुंबाचा फार आनंदाचा असे, जणू सणच.
पुरुषोत्तमच तर आयुष्यच हा बाजार तो पुढचा बाजार असे फिरत असे.
. . .
वर्ष लोटली.
. . .
पोरं मोठी झाली.
पुरुषोत्तमच बाजारावरच प्रेम काही कमी झालं नाही.
पोरंही बापासोबत बाजारात जाऊ लागली. कधी बायको पण जात असे.
पोरगा आठवीत गेल्यावर, पुरुषोत्तमने जुन्या बाजारातून सायकल घेतली. सायकलचे सीट बखोट्यात दाबून, एका हाताने सायकलचा दांडा आणि एका हाताने हॅण्डल पकडून, पोराने सायकल फार दामटली. पुरुषोत्तम फक्त मजा बघायचा. त्याने स्वतःहून कधी पोराला सायकल शिकविली नाही. पोरगं त्याचं त्याचं शिकलं आणि सायकलघेऊन शाळेतही जाऊ लागलं. बहीण भाऊ सोबत सायकलवर जाऊ लागले.
गुरुवारी मात्र सायकल पुरुषोत्तमच्या ताब्यात असे.
पोरांना शाळेत सोडून द्यायचं आणि आपण थेट बाजारात.
परत येताना लेकरांना घेऊन यायचं.
सायकल मुळे आयुष्याला थोडा वेग आला होता.
पोरगा मात्र शेफरला.
सायकलवर इकडे तिकडे हुंदडायला लागला.
शाळेला दांड्या मारणं सुरू झालं.
त्याच्याकडे लक्ष द्यायला त्या मजूर माय-बापाला खरं तर वेळही नव्हता. वयाप्रमाणे दोघं ही थकत चालले होते.
. . .
मुलीने हट्ट करून स्वतःसाठी नवीन सायकल मागितली. पुरुषोत्तमने पोरीचा लाड पुरवलाही.
अपेक्षेप्रमाणे पोरगं दहावीत नापास झालं आणि शाळा सुटली.
पुरुषोत्तम खट्टू झाला. पोरावर राग राग झाला पण बायकोने आवरलं म्हणून तो काही बोलला नाही.
पुरुषोत्तमने त्या दिवशी पोराकडून सायकल हिसकावून घेतली.
. . .
पोराच्या उनाडक्या काही कमी झाल्या नाही.
पोरगं कधी कधी आईसोबत शेतावर जायचं.
इकडे तिकडे फिरायचं. दिवस भर उनाडक्या करायच्या.
रात्री कट्ट्यावर बसून गप्पा मारायच्या. रात्री बेरात्री घरी यायचं.
. . .
पुरुषोत्तम आणि त्याच सारखं वाजायला लागलं.
घरातून पुरुषोत्तम जोरजोरात बोलण्याचे आवाज यायला लागले.
पोराने त्या घराची शांतता घालवली.
पुरुषोत्तम हताश झाला होता.
त्याच कामात मन लागे ना.
बाहेर खाट टाकून एकटाच बसून राहायचा.
आठवडी बाजारातही त्याचं मन रमेना.
हळू हळू तर त्याने बाजारात जाणंच बंद केलं.
. . .
पुरुषोत्तम आता थकला होता. डोक्यावरचे आणि दाढीचे केस पांढरे झाले होते. पूर्वी सारखं कामही होत नव्हतं. पोराची मदत घेऊन कामं खरं तर लवकर उडवता येणार होती. पोरगं पुरतं वाया जाण्याआधी पुरुषोत्तमने त्याला आपल्या सोबत कामावर न्यायला सुरुवात केली.
पोरानेही बापाला कामात हातभार लावला. दोघं मिळून कामं घेऊ लागली. विहीर खोदून देणे, खड्डे खोदून देणे.
कामं जोरात सुरू झाली.
पुरुषोत्तमला धीर आला.
जरा चांगलं चालायाला लागलं.
पुरुषोत्तमचं बाजारात जाणं नियमित सुरू झालं.
. . .
हे सगळं मात्र काही दिवसच टिकलं. पोरग उडंत होतंच. एका कामात त्याच फार काळ लक्ष लागे ना. खुप कामं आंगावर घेऊन ठेवली आणि बापाला एकटा सोडून, त्याच दांड्या मारणं सुरू झालं.
पुरुषोत्तम एकटाच सगळी कामं ओढू लागला.
सोबत त्याची चीडचीड ही वाढली.
कुठल्याच कामात पोरगा फार दिवस टिकत नव्हता.
पोरासाठी काही तरी करून द्यावं या विचारात तो नेहमी असायचा.
आपलं पोरगं शिकलं नाही, याची खंत तर होतीच.
. . .
एका गुरुवारी, आठवडी बाजारातून पुरुषोत्तम बकरीची दोन छोटी पिल्लं घेऊन आला. घराच्या दारापाशी दोन खुंटे ठोकून ती पिल्लं त्याने बांधून ठेवली. हुंदडून रात्री घरी आल्यावर पोराला पुरुषोत्तमने थोडं रागातच सांगीतलं. ‘ ही पिल्लं उद्यापासून रानांत घेऊन जायची. त्यांना चारायचं. पाणी पाजयचं. संध्याकाळी घरी घेऊन यायचे. बकऱ्यांची वाढ जोरात होते. सहा महिन्यांनी त्यांची चांगली किंमत मिळते.’ पुरुषोत्तमने बाजारातून सगळी माहिती काढून आणली होती. आणि या व्यवहाराचा हिशेब ही फार सोपा होता. पोरगा ही गुंतून राहिलं आणि पैसे ही मिळतील. बापाच्या या हुशारीवर पोराला आधी हसु आलं. पण परत कटकट नको म्हणून त्याने पण मान्य केलं.
सकाळी भाकरी बांधून निघायचं. कुणाच्या तरी शेताच्या बांधावर बकऱ्या सोडून द्यायच्या. आणि आपण निवांत गप्पा ठोकत बसायचं. पोरासाठी हे काम फारच सोप्पं होत. दिवस रानात फिरल्याने पोरगं घरी आलं की मुकाट्याने झोपून जायचं. बकऱ्यापाशी आपली खाट टाकून गालातल्या गालात हसत पुरुषोत्तम झोपी जाई. नवऱ्याच्या या हुशारीवर बायको आणि मुलगी पण खुश होते.
. . .
बघता बघता महिने निघून गेले.बकऱ्या मोठ्या होऊ लागल्या. कडकडीत ऊन पडू लागलं. शेतांच्या बांधा वरचं गवत वाळून गेलं. पोराच्या ते ध्यानी मनी ही आलं नाही. त्याचं आपलं रूटीन तसचं. सकाळी बकऱ्या घेऊन जायच्या आणि स्वतः इकडे तिकडे फिरायचं. संध्याकाळी बकऱ्या ओढत घरी घेऊन यायच्या.
बकऱ्या उपाशी राहू लागल्या.
रात्रभर म्या – म्या करू लागल्या.
रात्री बेरात्री उठून पुरुषोत्तम त्यांना पाणी पाजायचा.
तास दोन तास गप्प बसल्या वर पुन्हा तसंच म्या – म्या.
. . .
त्या दिवशी गुरुवार होता. बाजारातुन आल्यावर पुरुषोत्तम खाटेवर पडला होता. आज गुरांच्या व्यापाऱ्याशी तो बोलून आला होता. पुढच्या गुरुवारी बकऱ्या घेऊन जाऊ. चांगले पैसे मिळतील या विचारात त्याचा डोळा लागला. मध्यरात्री बकऱ्यांची म्या – म्या सुरू झाली आणि पुरुषोत्तमला जाग आली. नेहमी प्रमाणे त्याने टोपल्यात पाणी आणलं आणि बकऱ्यासमोर ठेवलं. थोडं पाणी पिऊन त्या परत ओरडायला लागल्या.
आज मात्र त्याचा पारा चढला. बाजारातुन आणलेली सगळी भाजी त्याने बकाऱ्यांसमोर टाकली. त्यांनी ती हपापल्या सारखी फस्त केली. आपल्या बकऱ्या तहानेनी नाही तर भुकेने ओरडतात ते त्याच्या लक्षात आले. तावातावात घरात जाऊन त्याने झोपलेल्या पोराला जोरात लाथ घातली. ‘बकऱ्या भुकेल्या कश्या राहतात’ त्याने मारता मारता विचारले.
बायको मुलगी खडबडून उठल्या.
एकच रडारड सुरू झाली.
त्या दिवशी बाप लेकाच खुप भांडण झालं.
सगळी गल्ली जागी झाली.
‘तुमच्या बकऱ्या, तुम्हीच चारा’ असं म्हणत पोरगं पारावर झोपायला निघून गेलं. पुरुषोत्तमच हे रूप कुणीच पहिलं नव्हतं.
बायकोने त्याला शांत केलं.
पोटभर भाज्या खाऊन बकऱ्या झोपी गेल्या होत्या.
कधी गुरुवार येतो आणि या बकऱ्या विकून टाकतो अश्या विचारात पुरूषोत्तमला झोप आली नाही.
सकाळी पोरगं घरी आलं.
तोवर पुरुषोत्तम कामावर निघून गेला होता.
पोराने चहा पिला.
भाकरी सोबत न घेताच त्याने बकऱ्या सोडल्या
आणि रानात निघून गेला.
त्या दुपारी पोराने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
बापाने खोदलेल्या विहिरीत पोराने जीव दिला.
पुरूषोत्तम तिथे पोहचेपर्यंत त्याला बाहेर काढलं होतं.
पुरूषोत्तमने जो हंबरडा फोडला की सगळं गाव हळहळल.
बायकोची दातखिळी बसली.
त्या कुटुंबाचं दुःख पाहून बरीच लोकं आवरायला गेली.
पुरुषोत्तम पुरता खचला.
आधीच अबोल असणारा हा आता एक शब्दही बोलेनासा झाला.
. . .
पुढल्या गुरुवारी बकऱ्या घेऊन तो बाजारात गेला. बाजाराचा शेवटच्या टोकपर्यंत जाणे त्याला अशक्य झाले.
पोरासाठी पहिल्यांदा घेतलेले कपडे आठवले.
सायकल घेतली तो दिवस आठवला.
त्याच सायकल शिकणं आठवलं.
गुरांच्या बाजारात जाई पर्यंत त्याचे पाय जड झाले होते.
बकऱ्या कश्या तरी फरफटत मागे मागे जात होत्या.
बकऱ्यांच्या बाजारात पोहचल्यावर त्याला जाणवलं की आपल्या बकऱ्या फारच सुदृढ आहेत. ताज्या तवाण्या आहेत. आणि बाकी बकऱ्या पेक्षा त्या कमी ओरडतात.
काळीज चिरत जावं असं झालं.
पण जे घडलं ते बरोबर करताही येणार नव्हतं.
अपेक्षेपेक्षा खुप जास्त भाव बकऱ्याना मिळाला.
झालेल्या घटनेची व्यापाऱ्याला माहिती होती.
त्याने पुरूषोत्तमला समजावलं.
‘आयुष्य तर पुढे जगावं लागणार आहे. पोरगा गेला मान्य, पण घरी बायको आणि मुलगी आहे. त्यांचा विचार कर.’ त्या व्यापाऱ्याने वडिलकीच्या नात्याने समजावुन सांगीतलं.
मिळालेल्या पैशातून काही पैसे बाजूला ठेवत अजुन चार बकऱ्यांचे पिल्लं घेऊन दिली.
पुरुषोत्तम त्या दिवशी ते चार पिल्लं आणि रिकाम्या पिशव्या घेऊन घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बकऱ्या रानांत घेऊन गेला.
बकऱ्या चरायला सोडून तो एकटा झाडा खाली बसून राहायचा.
. . .
गावातल्या एका म्हातारीने तिच्याही बकऱ्या रोज रानात घेऊन जायची विनंती केली. सोबत महिन्याला पैसे ही देण्याचे कबुल केले.
पुरुषोत्तम घेत असलेली काळजी बघून बऱ्याच जणांनी आपल्या बकऱ्या, गायी वासर त्याच्या सुपूर्त केले.
मोठ्ठा कळप तयार झाला.
महिन्याकाठी चांगले पैसे मिळू लागले.
कळपातल्या गुरांची खरेदी विक्रीची जबाबदारी पण पुरुषोत्तमने स्वीकारली.
. . .
दर गुरुवारी गुरांच्या बाजारात तो स्वःता गुरे विकण्यासाठी उभा राहू लागला. त्या म्हाताऱ्या व्यापाऱ्याने त्याला जागा ही करून दिली.
ओळखीही करून दिल्या आणि हळू हळू आपला कारभार ही पुरुषोत्तमवर सोपवला.
. . .
भरभराटीचे दिवस आले.
गुरांचा व्यापारी म्हणून पुरुषोत्तमची पंचक्रोशित ओळख तयार झाली.
मोठ्ठं घर बांधलं.
मुलीचं थाटात लग्न झालं.
पण या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे आठवलं की आजही पुरुषोत्तमच मन भरून येतं
आणि पुढे उभा असलेला अख्खा बाजार निरर्थक वाटायला लागतो.