तो पूल हायवे आणि कॉलेजच्या मध्ये आहे. पूलापासून अर्ध्या किलोमीटरवर हायवे आणि साधारण एक किलोमीटरवर कॉलेज. हा छोटासा पूल एका कोरड्या ओढ्यावर आहे. जेमतेम दहा फूट रुंद असणारा हा पूल आता जीर्ण झालाय. त्याच्या कडांनी तो पुरता ढासळला आहे. कडेला दोन तीनच छोटे कठडे उरले आहेत. पूलावर आता डांबराचा थर नाही. काँक्रीटचे खडे उखळून पडलेत. पूल फारच बुटका असल्याने पावसाळ्यात वाहून आलेली झुडूपं त्यात अडकून तिथेच वाळली आहेत. ओढ्याच्या काठावर, वेडी वाकडी वाढलेली भकास बाभळीची झाडं आहेत. ओढ्यात माती सारखी वाळू उरली आहे. उघडे पडलेले काही विरळ दगड आहेत. ओढ्याच्या पात्रात दाट झुडूपं वाढली आहेत.
हायवे ओलांडून आत रस्त्याला लागलं की, रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच आणि मोठ्ठी झाडं आहे. झाडं एवढी दाट आहेत की रस्त्यावर कधीच ऊन पडतं नाही. या रस्त्यावर नेहमी अंधारलेलं आणि गार वाटतं. थेट हाडांपर्यंत जाणारा गारवा या रस्त्याला लागलं की जाणवायला लागतो. रस्त्यावर सहसा वर्दळ नसते. भर दुपारी तर शुकशुकाट असतो. रस्त्याच्या उजव्या बाजूस एनसीसी बटालियनचा शिस्तबध्द पण रुक्ष परिसर आहे. या परिसरात सहसा कुणीच नसतं. रस्त्याच्या डाव्या बाजूला, बऱ्याच वर्षांपासून बंद असलेलं, कॉलेजचं बोटनिकल गार्डन आहे. गार्डन जंगल वाढावं तसं अक्राळविक्राळ वाढलं आहे. हे गार्डन पूलापासून हायवे पर्यंतच्या अर्ध्या किलोमीटर पर्यंत आहे. त्याच्या कुंपणावर जंगली वेलींचं साम्राज्य आहे. वेली एवढ्या दाट वाढल्या आहेत की रस्त्यावरून आतलं काहीच दिसत नाही. गार्डनचं मोठ्ठं कमानीच्या आकराचं गेट जीर्ण झालंय. लोखंड गंजून त्याच्या खपल्या पडतायेत. गेटच्या दोन्हीं बाजुला कमरे एवढं गवत वाढलं आहे. गवत वाळून गेलंय. हे गेट गार्डनचं न वाटता, गावाबाहेर असलेल्या सूनसान स्मशानभूमीचं वाटतेय. गार्डन मध्ये मोठ्ठाली उंच झाडं आहेत. त्या झाडांनाही जंगली वेलींनी वेटोळे घातले आहेत. वाळलेले पिवळे उंच गवत गार्डन भर आहे. गेट मधून गवतात उभी असलेली विहीर पुसटशी दिसतेय. तिच्या बाजूला पंप हाऊससाठी टीनाची एक खोली आहे. ती एका कोपऱ्यातून कोडमडली आहे. त्या खोलीच्या छोट्याश्या खिडकीतून आतला फक्त अंधार दिसतो. विहीर एका भव्य पिंपळाच्या झाडाखाली आहे. पिंपळाच्या पानांची सळसळ अखंड सुरू आहे. पिंपळावर बरेच कावळे आहेत. त्यांची विचित्र कावकाव तेवढी सुरू आहे. बाकी गार्डनमध्ये, रस्त्यावर, पलीकडच्या बटालियन मध्ये, सगळीकडे भयाण शांतता आहे. मोकाट वाढलेल्या गवतामुळे गार्डन मध्ये आता कुठलीच पाऊलवाट उरली नाहीय. सगळीकडे झाडांचा पाचोळा आहे. सगळं वातावरण प्रचंड गूढ आहे.
एखाद्या दुपारी, आपण रस्त्यावरून एकटे जात असताना गार्डनच्या गेटपर्यंत पोहचतो. गेटमधून दिसणाऱ्या, गार्डनमधल्या विहिरीपासून कुणीतरी आपल्या सोबत चालण्याचा भास होतो. आपण रस्त्यावर आणि ते गार्डनमध्ये. वाळलेले गवत हालचालीने सरसर बाजुला होतंय, पायाखाली पाचोळा येतोय हे त्या कमालीच्या शांततेत कळतं आपल्याला. आपल्या वेगाप्रमाणे गार्डन मधली हालचाल होते. आपण चालत असू तर चालतांनाची, सायकल किंवा गाडीवर असू तर पळण्याची. पिंपळावरचे कावळे खाली साप पहिल्या सारखा जिवाच्या आकांताने ओरडत, आपल्या सोबत, ह्या झाडाहून त्या झाडावर जात राहतात. आपण पूलापशी आल्यावर गार्डन संपत. पूलावर आल्यावर फार अस्थिर वाटतं. ओढ्यावरची भयावह बाभळीची झाडं. समोर छोट्या टेकडावर दूरवर असलेलं कॉलेज. पूल आणि कॉलेजच्या मध्ये असणारा ओसाड माळरान. या माळरानावर एक झुडूपही नाही. काही क्षणांसाठी आपण पूलावर असतो. कावळे ओढ्याच्या काठी असणाऱ्या बाभळीवर येऊन बसतात आणि गार्डन कडे बघून ओरडत राहतात. गार्डन मधली हालचाल कुंपणा जवळ येऊन थांबते. आपण पूल ओलांडेपर्यंत कुंपणापलीकडून कुणीतरी आपल्याकडे एकटक पाहतंय असं वाटत राहतं. पूल ओलांडला की कावळे उडतात आणि पुन्हा विहिरीकडे निघतात.
भर दुपारी, या पूलावर, माझी सायकल जर पंक्चर झाली आणि दोन मिनिटं मी या पूलावर उभा थांबलो. तर ओढ्याच्या पात्रात अवास्तव वाढलेली ती झुडूपं, वेडीवाकडी वाढलेली बाभळीची झाडं, त्यावरचे कावळे, कुंपणापलीकडचं कुणीतरी, सगळी जण माझ्याकडे वळून बघतील. पूलाखाली अडकलेल्या झुडूपातून कुणीतरी बोलावेल आणि ओढेलही. मी जिवाच्या आकांताने ओरोडलो तरी कुणीच ऐकणार नाही आणि बाभळीवरचे कावळे उडून जातील.
रिलेटेड पोस्ट : आंबा