पेढ्यांचा बॉक्स

(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

वाटाणे ऑल क्लिअर झाला.

बस मागे पुढे करत स्टँडहून धकली. हऱ्या मुळे जो उशीर व्हायचा तो झालाच.  वाटाणेला खरंतर कॉलेजात पोहचण्याची घाई होती. कारण ही तसचं होतं. दोन वर्षे ए टी के टी त गटांगळ्या खाल्ल्यानंतर फायनल इअरला वाटाणे ऑल क्लिअर झाला. मार्क शीट घेण्यासाठी तो उतावीळ झाला होता. रिझल्ट कळल्यापासून तो या दिवसाची वाट पाहत होता. मार्कशीटस् दोन दिवसांपूर्वीच आल्यात हे हऱ्याने काल रात्री सांगीतलं. आपली ऑल क्लिअर मार्क शीट मास्तरकडे दोन दिवस झाले पडून आहे या विचाराने तर तो अजुन कासावीस झाला. 

गर्दीने खचाखच भरलेल्या बस मध्ये, तो एव्हाना घामाने चिंब झाला होता. हऱ्या खिडकीपाशी बसून खारे दाणे खात होता. हऱ्या मुलुखाचा खादाड. त्याला सतत काहीतरी खायला लागे. ए टी के टी देण्याची परंपरा हऱ्याने मात्र कायम ठेवली. वाटाणे आणि हऱ्या लहानपणापासून मित्र. दोघं शाळेपासून एकाच वर्गात, एकाच बाकावर बसत आले. वाटाणेच्या ऑल क्लिअर होण्याने आपण मागे पडलो असं त्याच्या गावीही नव्हतं. उलट, वाटाणे ऑल क्लिअर झाला यावर त्याचा विश्वासच नव्हता. वाटाणेची मार्क शीट बघायला म्हणून तो सोबत आला होता.

कॉलेज मध्ये पोहचेर्यंत साडे बारा – एक होऊन गेला. 

वाटाणे केबिन मध्ये शिरला. मास्तर आणि त्यांचे इतर मास्तर मित्र नुकतेच जेवण करून बसलेले होते. 

“सर, मार्क शीट?” वाटाणे दबकत.

“पेढे कुठं आहेत?” वाटाण्याच्या खाली हातांकडे बघून, मास्तर.

“सर…विसरलो”

“अरे जा मग, घेऊन ये!” 

मास्तरांनी आपल्या मित्रांकडे तोंड फिरवलं.

पेढ्यांचा बॉक्स मास्तरच्या टेबलावर ठेवायचा आणि आपली फायनल इअरची मार्क शीट घ्यायची. ही आता प्रथाच झाली होती. पुन्हा थोडीच या मास्तरचं तोंड पहायचं आहे म्हणून ऑल क्लिअर झालेला प्रत्येक जण पावभर पेढ्यांचा बॉक्स घेऊन येई. चांगले मार्क्स मिळालेले, हसत हसत बॉक्स आणत आणि आपलं ‘प्रगती पुस्तक’ घेऊन जात. असंतुष्ट लोकं, जड मनाने पेढे ठेऊन जात. वाटाणे सारखे, अनपेक्षित रिझल्टवाले फार उत्साहात येत. 

सगळे जण एकाच हलवायाकडून, एकाच प्रकारचा, स्वस्तातला, पेढा आणत. पावभर पेढ्यांच्या चौकोनी बॉक्सची उतरण मास्तरच्या टेबलावर लागे. कॉलेज संपलेले असल्याने, प्रत्येक जण आपापल्या सोईने येऊन, मार्क शीट घेऊन जात. बॉक्सची उतरणही त्यानुसार कमी जास्त होत असे. कधी कधी दहा बारा बॉक्सेस म्हणजे तीनचार किलो पेढे एकदम येत. तर कधी, आज सारखा, एकही बॉक्स येत नसे. ही प्रथा एवढी फोफावली की पेढ्यांविना मार्क शीट मिळेना. 

एवढ्या उन्हात, गावात जाऊन पेढे आणायचे म्हणजे दीड दोन तास जाणार. शिवाय दुपारी कॉलेजपाशी ऑटो मिळत नाहीत. म्हणजे नाक्यापर्यंत, दोन किलोमीटर, पायी चालत जाणं आलं. या विचारात वाटाणे बाहेर आला. हऱ्याला सांगीतलं. 

“गावात जायची गरज नाही. संजुभाऊच्या टपरीवर असतात पेढे.” हऱ्या पटकन म्हणाला.

संजुभाऊची टपरी कॉलेजच्या बाहेरच होती. 

“भाऊ, पेढे हैं क्या?” हऱ्याने संजुभाऊला मोठ्या तोऱ्यात विचारलं.

तोंडात खर्रा कोंबलेल्या, संजुभाऊने काऊंटर वरच्या, लाल झाकणाच्या, काचेच्या बरणी कडे बोट दाखवलं. 

त्या बरणीत नेमके दोनच पेढे होते.

“द्या! पण बॉक्स मध्ये द्या”, वाटाणे हतबल होऊन म्हणाला.

संजुभाऊ मिश्किल हसले, रद्दीच्या कागदांमधून एक कागद फाडला, बरणी उघडली,आणि कागदावर दोन्ही पेढे उताणे केले. संजुभाऊ पुडी बांधणार तोच हऱ्याने त्यातला एक पेढा उचलला आणि तोंडात टाकला. 

“बहोत भुख लगी थी, यार.” हऱ्या लाल झालेल्या वाटाणेकडे बघून म्हणाला. 

हऱ्याला मारायची सुध्दा ताकद आता वाटण्या मध्ये नव्हती. संजुभाऊ, कागद आणि त्यावरचा एकमेव पेढा हातात घेऊन दोघांकडे बघत होते.

“बांधा!” वाटाणे वैतागून म्हणाला. हऱ्या तोंड दाबून हसत होता.

दहा पंधरा मिनिटं भयाण शांततेत गेली. दोघांनी मग चहा घेतला. समोर ठेवलेली पेढ्याची पुडी हऱ्याने उचलली. संजुभाऊ कडून चार पाच कागद घेतले. पुडीवर पुडी बांधत पावभर पेढ्यांची दिसेल अशी पुडी तयार केली. तिला व्यवस्थित दोरा गुंडाळला. पुडी वाटाणेच्या हातावर ठेवत म्हणाला, “चला!” 

सगळी हिम्मत आणि पुडीत बांधलेला एक पेढा घेऊन, वाटाणे आत गेला. हऱ्या, डिपार्टमेंटच्या झाडाखाली, आपण केलेल्या पराक्रमावर हसत उभा राहिला. 

आत गेलेला वाटाणे, थोड्याच वेळात बाहेरही आला. 

त्याने हऱ्याच्या एका हातावर मार्क शीट आणि दुसऱ्या हातावर पेढ्याची पुडी ठेवली. हऱ्या आ वासून बघत राहिला. 

“घाबरत आत घुसलो. सरांसमोर आपल्या क्लास मधली रश्मी बसली होती. सर तिला करीयर गाईडन्सचे धडे देत होते.”

“तिच्या हातात एक किलो पेढ्यांचा, चकचकीत, मोठ्ठा, बॉक्स होता. चांगला महागडा.” 

“मला बघताच, सरांनी माझी मार्क शीट काढून दिली. मी आपली पेढ्याची पुडी पुढे करत म्हणालो, “सर, पेढे.” सरांनी माझ्या पुडी कडे पाहिले, आणि म्हणाले, “अरे, राहू देत.” रश्मीच्या हातातले, किलोभर पेढे, आज घरी न्यायला मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.” 

“तसंही, त्या मोठ्ठ्या बॉक्स पुढे, आपला हा टपरी वरचा पेढा कसा टिकला असता? मी आलो पटकन् बाहेर.” 

वाटाणे आणि हऱ्या बोलतच होते तोवर रश्मीही बाहेर आली. 

दोघांच्या हातावर ऐक ऐक पेढा ठेवत, किलोभर पेढ्यांचा तो चकचकीत बॉक्स तिने हळूच पर्स मध्ये ठेवला आणि पार्किंग कडे निघून गेली.

इतर पोस्ट्स