पेन

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

‘रेनॉल्ड्सच्या‘ पेनची तर क्रेझ होती तेव्हां. 

निळ्या टोपणाचं, पांढरं शुभ्र असं हे पेन वर्गात सगळ्यांकडे असायचं. त्यावेळी पेनचं असं डिझाईन एकदम नवीन होतं. 

त्या आधीचे पेन म्हणजे अगदी सुमार. निळी आणि लाल रीफिल एकत्र असणारे. जाडे भरडे. कुठलीही रीफिल टाका. चालायचे बिचारे. रीफिल संपायला आली की जास्त शाई सोडायचे. घट्ट शाईचे ठिपके वहीवर पडायचे. रेनॉल्ड्सच्या पेनने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. 

शिवाय, रेनॉल्ड्सची जाहिरात थेट टीव्ही वर यायची. हा पेन इंग्लंडहून भारतात आलाय वैगेरे, वैगेरे. 

तशी, पेन बाहेरून भारतात येण्याची प्रथा जुनी असावी. 

‘मेड इन चायना’ असं बारीक अक्षरांत लिहिलेलं, गोल्डन टोपणाचं, ‘हिरो’चं पेन मिळायचं. बाकी पेन पेक्षा हे पेन महाग. हे पेन म्हणजे स्टेटस सिम्बॉल! वरतून  फाऊंटन पेन.  त्यामुळे हे वापरणाऱ्याचं अक्षर पण सुरेख दिसायचं. 

त्यावेळी मिळणारे, साधे फाऊंटन पेन डोक्याला ताप आणि हाय मेंटेनन्सवाले असायचे. सांभाळून ठेवावे लागत, नाही तर कुठे शाई टपकेल नेम नाही. 

‘हिरो’चं पेन मात्र छान होतं. कधी जास्त शाई सोडायची नाही की काही नाही. महाग असल्याने, वर्गात अगदी एक दोघांकडे अशी पेन असायची. 

आम्ही बाकी सगळे, रेनॉल्ड्स वाले! 

लक्झरचं एक पांढऱ्या रंगाचं पेन होतं. त्याला स्टीलची गोल, एक छिद्र असणारी निप असायची. शाई किंवा रिफिल टाकण्याची सोय नव्हती. शाई संपली की पेन फेकून द्या. 

ही म्हणजे, त्या वेळी फारच चैनीची वस्तू असल्यासारखी होती. शिवाय त्या पेन ची शाई पण जरा वेगळ्या रंगाची होती. ना धड निळी ना हिरवी. त्यामुळे असं पेन जर मध्येच संपलं तर वांदे व्हायचे. काही हौशी मंडळी परीक्षेसाठी असे पेन वापरायची.  

पुढे, संपूर्ण काचाचे असावेत असे, पारदर्शक रोटोमॅक्स, मोंटेक्स, सेलो या कंपन्यांचे पेन आले. ते ही भरपूर चालले. रोटोमॅक्सच्या तर टीव्ही वरील जाहिराती प्रचंड फेमस झाल्या. 

कॉलेजात येईपर्यंत रेनॉल्ड्सचं ‘जॉट्टर’ नावाचं पेन आलं. 

परत तसचं, सगळ्यांकडे तेच पेन ! 

मग हळू हळू ‘जेल’ पेन आले. अगदी स्मूथ. अक्षर चांगलं यायचं या पेननी. परीक्षेला हमखास हे पेन वापरले जायचे. जेल पेन तर अजुन ही मार्केटमध्ये चालतातेत.


वेगवेगळ्या पेनने लिहिलेले पेपर, चेक करणारे मास्तर मात्र साधेच पेन वापरायचे. दोन रिफिलवाले. जाडे भरडे. भडक रंगाचे. 

शर्टाच्या वरच्या खिशाला लावलेलं अगदी जुनं पेन. एक छोटी डायरी. चष्म्याचं लेदरचं पाकीट. असं सेम सेटअप असणारे वेगवेगळे सर मला अजुनही आठवतात.


‘कुठलं पेन वापरायचं?’ या बाबतीत माझं कन्फ्युजन अजुनही कायम आहे. त्यामुळे, फेवरेट पेन कुठलं? असं पटकन सांगता येत नाही. 

परवा, लॅमीचं चकचकीत पेन घेतांना हे सगळं आठवलं. 

नशिबाने आता पेपर लिहावे लागत नाहीत. परीक्षा मात्र रोज असते, खिशाला पेन असो की नसो.

रीलेड पोस्ट : सायकलचं दुकान