बस, स्टँडवर उभी राहिली. रेगेंनी खिडकीतून बाहेर पाहिलं. बसने उडालेल्या धुराळ्यात, लोकांचे लोंढे बसच्या दाराशी येत होते.
उतरणारे – चढणारे दारात दाटी करू लागले. एका हाताने खांद्यावरची बॅग सांभाळत, दुसऱ्या हाताने चढणाऱ्यांना मागे रेटत, रेगे खाली उतरले. फलाटावर उभ्या असलेल्या बसेस खचाखच भरत होत्या. स्टँडच्या गेटवर उभे असलेले ऑटोवाले ओलांडून, रेगे रस्त्याला लागले. मार्केट मधल्या एका साधारण लॉज वर ते थांबले. रस्त्या पलीकडे असणाऱ्या छोट्या हॉटेलात दुपारचं जेवण केलं. लॉजवर जाऊन पडल्यापेक्षा, गावात फेरफटका मारावा म्हणून ते निघाले.
गावा शेजारच्या जंगलात कोळसा सापडला. कोळश्यासाठी खाणी खोदण्यात आल्या. थर्मल पॉवर प्लांट आला. खाणीत काम करणारे मजूर, प्लांट मध्ये लागणारे कामगार, ठेकेदार, इंजिनीयर सगळे या गावात राहायला आले. मजुरांच्या वस्त्या झाल्या. कॉलोनी झाल्या. जंगलात, आजूबाजूच्या खेड्यात राहणारे आदिवासी खाणीत काम करायला आली. गाव वेगानं वाढलं. खाणींचा पसारा वाढत गेला. जंगलं झपाट्याने कापली गेली.
अलीकडे, पर्यावरण प्रेमी लोकांनी आंदोलनं केली. मोर्चे काढले. धरणे धरली. शेवटी, खाणी बंद पडल्या. पर्यायी, थर्मल पॉवर प्लांट ही बंद करावा लागला. प्रचंड प्रमाणात गावात आलेली मजुरांची फौज, बेरोजगार झाली. लोकं आपल्या गावी परतायला लागली. पुन्हा मोठ्ठं स्थलांतर सुरू झालं. वस्त्या रिकाम्या झाल्या. मार्केट ओसाड पडलं. जत्रा उठून गेल्या सारखी गावाची आता अवस्था होती. पॉवर प्लांट मुळे हवेत असणारा कोरडेपणा आणि जळका वास रेगेंना फिरताना जाणवत होता. प्लांट चे उंच दोन कुलिंग टॉवर्स खिन्नपणे गावाकडे बघत होते. पुन्हा खाणी सुरू होतील या आशेवर काही लोकं मागेच थांबली. चौकाचौकात, अशी रिकामी मंडळी घोळके करून बसली होती. संध्याकाळ होईस्तोवर रेगे लॉजवर परतले.
दुसऱ्या दिवशी, सकाळीच, लोकेशनचे कोऑर्डीनेटस् लिहिलेली, छोटी डायरी घेऊन रेगे निघाले. डायरीत लिहिलेले लोकेशन शोधत, गावाबाहेर, टेकडीच्या पायथ्याशी, एका बंद खाणी जवळ ते थांबले.
पी एच डी झाल्यापासून कॉलेज मधली मटेरियल टेस्टिंगची लॅब रेगेकडे होती. विविध मटेरियलची ताकद मोजण्याची कामं तिथे केल्या जात. जुन्या इमारती, पूल, पाण्याच्या टाक्या यांची उरलेली लाईफ आणि ताकद सुध्दा रेगे मोजून देत. तोडफोड न करता जुन्या गोष्टींची ताकद मोजण्यात त्यांचा हातखंडा होता. या विषयावर त्यांचे तीन चार प्रबंध ही प्रकाशित झाले होते. गेली पंधरा वर्षे ते या कामात सतत व्यस्त होते. ‘अर्थक्वेक इंजिनीयरिंग’ म्हणजे भूकंप शास्त्र मध्ये त्यांची पी एच डी होती. या विषयावर त्यांना संशोधन करायचं होतं. पण कामाच्या व्यापात राहून गेलं. काही वर्षा पूर्वी त्यांनी लॅब मध्ये एका कोपऱ्यात खोल खड्डा करून त्यात ‘सिस्मोग्राफ’ बसून घेतला होता. सिस्मोग्राफ भोवतालच्या जमिनीत होणाऱ्या हालचाली नमूद करून ठेवतो. सभोवताली बसणारे भूकंपाचे धक्के त्यावर नोंदवले जातात.
काही दिवसांपासून या गावाजवळ सौम्य भूकंपाचे धक्के सिस्मोग्राफवर नोंदवल्या गेले. खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे सुध्दा भुकंपासारखे धक्के जाणवतात. पण अलीकडचे हे धक्के, खाणीतल्या स्फोटांमुळे नक्कीच नव्हते. शिवाय खाणीतील कामं सुध्दा बंद होती. या धक्क्यांचा ‘इपि सेंटर’ म्हणजे केंद्र बिंदू सारखा-सारखा एकच येत होता. त्यामुळे त्याचे कोऑर्डीनेटस् घेऊन रेगे या गावात आले होते. या धक्क्यांच कारण कळालं तर भविष्यात येणारा मोठ्ठा भूकंपाचं भाकीत आधीच करता येईल. शिवाय या विषयावर एखादा प्रबंध इंटरनॅशनल पातळीवर प्रकाशित करता येईल, असा रेगेंचा विचार होता. “सर, इकडे कुठे?” बंद खाणीच्या तोंडाशी विचारात उभे असलेले रेगे या प्रश्नानी भानावर आले.
टेकडी उतरत प्रकाश त्यांच्या दिशेनं येत होता. प्रकाश. रेगेंचा जुना विद्यार्थी. आता पॉवर प्लांट मध्ये इंजिनिअर आहे. प्लांट बांधकामाच्या वेळी, बऱ्याचदा तो मटेरियल टेस्टिंग साठी कॉलेजात येऊन गेला होता. त्यामुळे ओळख चांगलीच वाढली होती. रेगेंनी प्रकाशला सिस्मोग्राफ वर दिसलेल्या धक्क्या बद्दल सांगीतलं.
“आमच्या प्लांट मधल्या सिस्मोग्राफ वर पण सेम ऑब्सर्वेशन आलेत.” प्रकाश म्हणाला. “म्हणून आमची एक स्पेशल टीम या खाणीत गेली. ही गावातली सर्वात जुनी आणि मोठी खाण. बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. टीम आत गेल्यावर कळलं, जमिनितल्या पाण्याची पातळी वर्षांनुवर्षे वाढत गेली. खाणीच्या प्रत्येक टप्प्यात पाणी भरत गेलं. पाण्याचं प्रेशर इतकं वाढलं की जमिनीतल्या हालचाली बदलल्या. त्यामुळे हे धक्के जाणवत असावेत, असं स्पेशल टीमचा रिपोर्ट आहे.” कोयना परिसरात, धरणाच्या साठलेल्या पाण्याच्या प्रेशरमुळे भूकंपाचे धक्के जाणवतात, हे रेगेंना ठाऊक होतं. एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही. उगाच वेळ फुकट गेला, म्हणून रेगेंनी डायरी बंद करत लांब उसासा टाकला. “त्यांचा डिटेल रिपोर्ट मी तुम्हाला मेल करतो.” प्रकाश सर आले म्हणून उस्ताहात होता. “सर, आलेच आहात तर, या टेकडीवरच्या मंदिरात चला. इथली देवी जागृत आहे.” तसंही आता दुसरं काही काम नाही, म्हणून रेगेंनी चला म्हणून मान डोलावली.
दर्शन घेऊन दोघं आवरातल्या एका दगडावर बसले. दगडात बांधलेले छोटंसं मंदिर. देवीची पुरातन मूर्ती. समोर मोकळी जागा. आजूबाजूला मोठाले दगड. “पाण्याच्या प्रेशरने हे धक्के बसत असतील यावर माझा विश्वास नाही, सर” प्रकाश, मंदिर न्याहळणाऱ्या रेगेंकडे बघून म्हणाला. “देवीचा कोप आहे हा, साहेब !” रेगेंच्या हातावर प्रसाद ठेवत एक म्हातारा पुटपुटला. जवळच्या वस्तीतला आदिवासी खाण कामगार असावा. त्याने प्रकाशाच्या हतावरही प्रसाद ठेवला आणि निघून गेला. “माझाही विश्वास नाही” रेगे, म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष करीत, म्हणाले. “कोयना परिसरातले भूकंप पाण्याच्या प्रेशर मुळे होतात हे अजुन सिध्द झालं नाही. त्यामुळे असे डायरेक्ट निष्कर्ष काढू नयेत.” प्रकाशने होकारार्थी मान हलवली. त्यांच्या पी एच डी च्या वेळी प्रकाश फायनल इयरला होता. त्याने रेगेंना एक्सपेरीमेंटस् मध्ये मदत केली होती. त्याने पुढे याचं कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करावं आणि आपला रिसर्च स्वतः पुढे न्यावा अशी त्यांची फार इच्छा होती. घरची परिस्थिती बघता प्रकाशने नोकरी करणे योग्य समजलं.
परतल्यावर, लॉजच्या पलीकडच्या हॉटेलमध्ये दोघांनी जेवणं केली. रेगे लॉजवर परत आले. परतीची गाडी उशिरा संध्याकाळची होती. चहासाठी पाचच्या दरम्यान ते पलीकडल्या हॉटेलात आले. बाहेरच्या बाकावर बसत चहा मागवला. धूळ उडवत चाललेली रस्त्यावरची वर्दळ बघत ते चहा पीत होते. “देवी आईचा कोप आहे, साहेब ” रेगे या वाक्याने भानावर आले. मंदिरातला म्हातारा जणू त्यांच्या मागेच आला होता. “कोप वगैरे काही नसतो, काका!” रेगे हसत म्हणाले. “चहा पिणार का?” म्हाताऱ्याने मानेने ‘हो’ म्हटलं. बाकावर न बसता म्हातारा कडेला गुडघे वर करुन बसला. “भूकंपाचे धक्के बसतात हे मला माझ्या गावी कळलं. म्हणून बघायला आलो होतो. इथे येऊन कळलं पाण्याचे प्रेशर वाढल्याने असं होतंय.” चहाचा ग्लास म्हाताऱ्याला देत रेगे म्हणाले. “देवीने बोलावलं तुम्हाला.” म्हातारा म्हणाला. “तसं समजा हवं तर” रेगे हसत म्हणाले.
“साहेब, ती गावातली पहिली खाण. खाण सुरू झाली तेंव्हा मी तरुण होतो. मंदिरातली देवीची मूर्ती या खाणीतच सापडली. आम्ही मजुरांनी मूर्ती सापडल्याने पुढे खोदकाम करू नका, असं मालकाला सांगीतलं. त्यावर मंदिर बांधून देण्याचं आमिष देऊन त्याने वर्षांनुवर्षे, रात्रंदिवस, काम सुरूच ठेवलं. शेवटी मंदिर आम्हीच बांधलं. ती अख्खी खाण टेकडीच्या खाली आहे. देवी-आई वरून बघत होती. आम्ही करीत असलेला ऱ्हास तिला सहन झाला नाही. एका रात्री, खाणीत पाणी भरलं. आमचे बरेच लोकं अडकून मेले. प्लांट मध्ये बातमी कळली. मजुरांच्या जिवास धोका आहे म्हणून खाण बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पाणी वाढतच गेलं.” म्हातारा सांगत असतांना, त्याच्या सोबतचे दोघं तिघ, बाजूला येऊन बसली. रेगे गोष्ट म्हणून ऐकत होते.
“दैवी शक्ती असेल असं आपण मान्य केलं तर खाण बंद झाल्यावर ती आता का भूकंपाचे धक्के देईल?” रेगेंनी मिश्किल हसत प्रश्न टाकला. एव्हाना अंधार झाला होता. “धक्के का बसतात हे बघायचे असेल तर रात्री चला आमच्या सोबत” म्हातारा गंभीर चेहरा करून म्हणाला. सोबतच्या इतरांनी माना डोलावल्या. “चला! किती वाजता जायचं?” काही नाही, तर एखादी गोष्ट घेऊन घरी जाऊ या विचारात रेगेंनी विचारलं. ” दहा! आम्ही इथं येतो” म्हातारे उठत म्हणाले.
“साहेब, या लोकांच्या नका नादी लागू. कामधंदा नाही त्यामुळे अश्या श्टोऱ्या बनवून सांगतात, हे. कुणी येणार नाही, दहा वाजता. रात्री दारू पिऊन पडतील कुठे तरी.” आतापर्यंत काहीही न बोललेला काउंटर वरचा हॉटेल मालक म्हणाला. “या गोष्टींमध्ये माझी गाडी तशीही चुकली आहे” घड्याळात बघत रेगे म्हणाले. “रात्री मुक्कामाशिवाय पर्याय नाही. ते आले तर, जाऊन येईन”
त्याच हॉटेलात रात्री जेवण करून रेगे लॉजवर आले. दहाच्या सुमारास ते खाली आले. हॉटेल बंद करतांना मालकाने रेगेंना हात दिला. रेगे लॉज समोर फेऱ्या घालत होते. रस्त्यावर पुरेसे दिवे नसल्याने बऱ्यापैकी अंधार होता. थोड्या वेळानं, सगळं सामसुम झाल्यावर, तिघे जण हॉटेलपाशी उभे होते. त्या म्हाताऱ्याच्या हातात कंदील होता. रेगे रस्ता ओलांडून पलीकडे गेले. तिघांनी अंगावर घोंगडं घेतलं होतं. कंदील घेतलेला म्हातारा रेगेंकडे पाहून हसला. रेगेंनी हातानेच ‘चला’ अशी खूण केली. म्हातारा आणि त्याचे सोबती पुढे आणि रेगे मागे. गाव झोपलं होतं. रस्त्यावर दोन चार कुत्री, एखादा दारुडा दिसत होता.
“आपण सायन्सचे स्टूडंट आहोत. आपण का अश्या गोष्टींना चालना देतोय?” रेगेंच्या मनात विचार येऊन गेला तोवर त्यांनी गाव ओलांडलं होतं. टेकडीवरच्या मंदिरात अंधुक प्रकाश दिसत होता. खाणींच्या बाहेर पडलेले मातीचे ढीग, काळे ठीमम् दिसत होते. पॉवर प्लांटचे कुलिंग टॉवर्स अंधारात पांढरे शुभ्र दिसत होते. हवेत गारठा आणि जळका वास होता. म्हातारे शांत चालत होते. रेगेंनीही ती शांतता तोडण्याचा प्रयत्न केला नाही. ते मागे मागे चालत राहिले.
मंदिराच्या टेकडीला वळसा घालून ते मागच्या बाजूस आले. टेकडी मध्ये असणाऱ्या गुहेत म्हातारे शिरले. ‘आत जावं की नाही?’ या संभ्रमात रेगे बाहेरच उभे राहिले. कंदील घेतलेला म्हातारा रेगेंना नेण्यासाठी बाहेर आला. चाचपडत रेगे आत गेले. गुहा आत मध्ये मोठ्ठी होती. समोर देवीची भली मोठी, दगडात कोरलेली, मूर्ती होती. सगळीकडे मशाली लावल्या होत्या. देवीची लाल जीभ बाहेर आलेली होती. डोळे मोठे आणि लाल होते. तिच्या समोर पन्नासएक जण उभे होते. बहुतेक सगळे आदिवासी कामगार होते. म्हाताऱ्याने कंदील रेगेंकडे दिला आणि स्वतः गर्दीतून वाट काढत पुढे गेला.
समोर जाऊन लोकांकडे बघून तो म्हणाला, “देवी-आईचं आपल्यावर प्रेम आहे. आपण केलेल्या चुकांमुळे ती कोपली. भूकंपाचे धक्के देऊ लागली. आईचा हा कोप मैलो दूर या माणसाला पण जाणवला.” म्हातारा रेगेंकडे बोट दाखवत म्हणाला. रेगे गालातल्या गालात हसले. “एवढ्या दुरून आईने त्याला बोलावलं. आईचा शाप दूर करण्यासाठी, आपण जो बळी शोधत होतो, त्याला आई स्वतःच घेऊन आली.” रेगेंच्या पाया खालची जमीनच सरकली. ते बाहेर जाण्यासाठी झटकन वळले, तोच दोघांनी त्यांना धरून पुढे नेलं. “मी प्रोफेसर आहे. कॉलेजच्या यंत्रावर हे भूकंपाचे धक्के उमटतात. त्याचं कारण शोधायला मी इथे आलो.” रेगे आपले हात सोडवत म्हणाले. “…आणि कसला बळी? त्याने काही होणार नाही.”
“देवी-आईला बळी दिल्या खेरीज हा कोप संपणार नाही” म्हातारा रेगेंची पूजा करत म्हणाला. त्यांना तीन चार जणांनी धरून ठेवलं. त्यांच्या गळ्यात फुलांचा हार टाकण्यात आला. एक धिप्पाड माणूस भली मोठी कुऱ्हाड घेऊन आला. रेगेंचं डोकं देवीच्या पायाशी ठेवण्यात आलं. कुऱ्हाड चालणार, तोच रेगेंना जाग आली.
बस, स्टँडवर उभी राहिली. रेगेंनी खिडकीतून बाहेर पाहिलं. बसने उडालेल्या धुराळ्यात, लोकांचे लोंढे बसच्या दाराशी येत होते.
रीलेटेड पोस्ट : अवकाळी पाऊस