गर्दीमुळे आम्ही क्लिनिकच्या दारातच उभे होतो.
सकाळी थोडी कणकण आहे म्हणत, दुपार पर्यंत चांगलाच ताप चढला. श्यामला ताप आला की डॉक्टरांना दाखवाव लागतं. मागे, कणकण आहे म्हणून त्याने अंगावर काढलं आणि नंतर ॲडमिट करावं लागलं होतं.
भर दुपारी ऑटो मिळणे कठीण.
गावी जातांना मित्र त्याची बाईक आमच्याकडे सोडून गेला होता. या इमेर्जन्सीला, ती गाडी काढण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीचे चालू होऊन-बंद पडणे, मागे-पुढे झटके देणे, असे सगळे प्रकार करून झाल्यावर, गाडी सुरू झाली आणि आम्ही निघालो.
हळूहळू चालवत गाडी खड्ड्यातून जाणार नाही याची काळजी मी घेत होतो. पावसाने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येतच होता असं नाही. दोन चार खड्ड्यांमध्ये गाडी घालून, जोरदार झटके देऊन झाले होते. स्वेटर, कानटोपी घालून मागे बसलेल्या श्यामला, हे झटके मुकाट्यानं सहन केल्याशिवाय पर्यायही नव्हता. तो माझे खांदे घट्ट पकडून बसला होता. घरी दिलेल्या क्रोसिनमुळे हा मागच्या मागे झोपू नये याची भीती होती. मधून-मधून मी त्याला काहीही प्रश्न विचारत होतो. तो हां-हुं करून रिस्पॉन्स देत होता.
थोड्यावेळाने मात्र श्यामराव माझ्या पाठीवर डोकं ठेऊन झोपले.
‘मित्र आजारी पडल्यावर आपण मदत तर केलीच पाहिजे. . . या डॉक्टरांचं क्लिनिक फार दूर आहे. . . जवळच्या डॉक्टरकडे जायला, हा गडी नाही म्हणतो. . .’ मी माझ्याच विचारात मग्न. ‘सकाळ पासून गुमसुम होता. . . तेंव्हाच आपल्या लक्षात यायला हवं होतं. . . डॉक्टरकडे यायला आता उशीरच झालाय. . .’
अचानक समोर आलेला खड्डा चुकवण्यासाठी मी गाडी वळवली, आणि ती स्किड होऊन, आम्ही आपटलो! बेसावध असल्याने, श्याम जोरात पडला. स्वेटर, कानटोपी घातलेलं ते लेकरू मोठ्याने ओरडलं. थोड्यावेळ फुटपाथवर बसलं आणि मग पायीपायीच निघालं. क्लिनिक तसं जवळच आलं होतं.
मी गाडी ढकलत मागे मागे गेलो.
क्लिनिकमध्ये गर्दी. अंगात ताप. त्यात आमच्या दुचाकी अम्बुलेन्सला झालेला अपघात. वैतागून श्याम क्लिनिकच्या दारातच बसला. मी तर, केलेल्या पराक्रमामुळे काही बोलूही शकत नव्हतो. मदत करणे आपले कर्तव्य! म्हणून पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण काही रिस्पॉन्स मिळाला नाही.
गर्दी ओसरत, पाऊण-एक तासाने, नंबर लागला. तोवर आमचा पेशंट कण्हतच होता.
डॉक्टरांनी श्यामला तपासलं. खुर्चीवर बसत, माझ्याकडे पाहून ते म्हणाले,
“व्हायरल आहे! तीन दिवसांच्या गोळ्या देतो, बरं होईल. हात मात्र फ्रॅक्चर आहे. तीन आठवडे बांधून ठेवावा लागेल.”
हात गळ्यात अडकवून श्याम ऑटोने, आणि मी गाडी ढकलत रूमवर आलो.
रिलेटेड पोस्ट : हिरो, हिरोईन आणि आम्ही