पक्षी

(रीडिंग टाईम 3 मिनिटं )

सकाळी कोकिळेच्या कुहू कूहू ने जाग आली.
मोबाईल मध्ये वेळ पहिला – पाचच वाजलेत !

(सकाळी सकाळी ही कोकिळा काय ” वसंत आला गड्यांनो…” असं सांगतेय.
लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या आम्हां गड्यांना ‘ वसंत ‘ काय आणि ‘ शरद ‘ काय एकूण एकच.)

. . .नंतर हळू हळू सगळेच पक्षी उठले.
किलबिलाट सुरू झाला.

मनात आलं, माणसानं का नाही पक्ष्यांसारखं सिंपल ठेवलं?

सकाळी उजाडलं की गाणं गात गात उठायचं.
मावळलं की झोपायचं.
पण एवढंच नाही,
बऱ्याच गोष्टी पक्ष्यांसारख्या कराव्या लागल्या असत्या.

दिवस उजाडला की माणसं किलबिलाट करत उठली असती. अर्थातच उडता येत नसल्याने, इकडे तिकडे पळाली असती.
(आपल्या भाषेत त्याला ‘ मॉर्निंग वॉक ‘ किंवा ‘ जॉगिंग ‘ म्हणतात, काहीजण.)
पण समजा सगळीच पळायला लागली असती, तर ?
मग पळता पळता, पकडापकडीचा खेळ खेळली असती.
आणि तोंडाने गाणं सुरूच.

नंतर काय दिवसभर अन्नासाठी शोधाशोध !

(बाल्कनीत रोज येणाऱ्या पोपटांसाठी दाणे टाकता टाकता बायको म्हणाली ” अरे! असे दाणे कोण टाकेल माणसांसाठी? “
मी: “जे बिझिनेस वाले आहेत ते टाकतील की. ते थोडीच पक्षी होणार होते. असले विचार तर ‘ वर्क फ्रॉम होम ‘ करणाऱ्या नोकरदार मंडळींचे आहेत ना ! “)

मग पोट भरलं की इकडे तिकडे हुंदडायला मोकळे.
नको नको त्या गॅलरीत, खिडकीत, बाल्कनीत जाऊन बसून बघायचे. उगाच काहीतरी गुणगुणत मोर्चा पुढे.

एखाद्या तारेवर मीटिंग भरवायची. सगळ्यांनी एकदम बोलायचे आणि तण तण करत निघायचे…
थोडं करेक्शन आहे –
तारेवर दहा बारा माणसं लोंबकळत बरी नाही दिसणार. महा वितरण वाले ‘ लोड शेडींग ‘ करतील.
मीटिंग आपण रस्त्याच्या कडेला एखाद्या कठड्यावर भरवू.

आयुष्यात टी व्ही नाही. मोबाईल नाही. आणि ऑफिस ने दिलेला लॅपटॉप पण नाही. त्यामुळे उडता उडता म्हणजेच पळता पळता दिसलाच कोणी तर द्यायचा निरोप.
पण त्यात ही भेदभाव आलाच.
कावळे कबुतरांशी बोलणार नाही.
आणि कबुतरं पोपटांना बघून माना मुरडणार.

दिवसभर ड्रोन सारखं उडत शहराचा ‘ बर्ड आय व्ह्यू ‘ घ्यायचा.
थोडं बाहेर पडून नदीवर जायचं.
झाडांच्या गर्द सावलीत नदीच्या पाण्यात खेळायचं.
एकमेकांवर पाणी उडवत गाणी म्हणायची.
असा सगळीकडे आनंदी आनंद.
उगाचच्या ऑनलाईन मीटिंग नाही. कॉन कॉल्स नाही.

संध्याकाळ झाली की थवे करत घराकडे परत.
घरं मात्र आता जशी आहेत तशीच ठेवावी लागतील.

रात्रभर, झाडांच्या फांदयांवर, वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या वजनाचे माणसं झोपवणे शक्य नाही.
मुळातच माणसांना पुरतील एवढी झाडाचं नाहीत शहरात.
काहींना शहराबाहेर दूर झाड घ्यावं लागेल. मग जाण्या येण्याचा प्रॉब्लेम.
आणि सगळी माणसं झाडावर राहू लागली तर पक्षांचं ‘ पुनर्वसन ‘ करावं लागणार.

समजा झाडावर झालीच सोय,
तर माणसं सवयी प्रमाणे वेगवेगळे आवाज काढत झोपणार.
त्यात इंजिनीअरिंगचे काही वटवाघूळ जागीच.
उरलेल्यांना नेटफ्लिक्स बघावं वाटणार.
पण टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप नाही.
जाऊ देत, मरू देत ते नेटफ्लिक्स!!

शेवटी, अशी मजल दर मजल करत, तुम्ही झोपलाच.

सुंदर पहाट झाली…
आणि तुमच्या बाजूला झोपलेली कोकिळा कुहु कूहु करत उठली,
तर उगाच कावळ्या सारखे काव काव करू नका.
लॉकडाऊन् सुरू आहे अजुन.

इतर पोस्ट्स