“तुमच्या सोबत राहतो. सोबतच अभ्यास करतो. मग हा एकटा कसा नापास झाला?” सकाळी-सकाळी मी ब्लँकेट मधून डोकावून पाहिलं. पश्याचे वडील श्यामला विचारत होते. आमच्याकडे असलेल्या एकमेव खुर्चीवर ते बसले होते. चष्म्यातून डोळे वटारत श्यामने माझ्याकडे पाहिलं. मी चटकन उठून बसलो. सकाळचे साडे सहा, सात वाजले असतील. पश्याचे वडील नुकतेच उतरले होते. “काय आहे काका”, श्यामराव जरा समजूत घालण्याच्या स्वरात म्हणाले. “मी रात्री लवकर झोपतो, तर प्रशांत माझ्यासोबत झोपतो. आणि हा…” माझ्याकडे बघत श्यामराव, “हा, रोज उशिरा उठतो तर प्रशांत याच्यासोबत उठतो. त्यामुळे त्याला अभ्यासाला वेळच मिळत नाही.” काकांनी माझ्याकडे रागाने बघत, मान हलवली. पश्या लेकाचा, गालातल्या गालात हसत होता. त्याचं नापास होण्याचं खरं कारण आम्हां तिघांनाही माहिती होतं.
. . .
पश्या सकाळीच उठून फर्स्ट इयरचे क्लासेस चालतात तिथे जायचा. गल्लीतल्या पोस्टाच्या पेटी शेजारी, ती क्लास मध्ये जाईपर्यंत, उभा राहायचा. ती एकदा क्लासला गेली की हा परत रूमवर. एवढ्या सकाळी रूमवर आल्यावर काय करणार? म्हणून मग झोपायचा. त्याचं हे रूटीन बऱ्याच दिवसांपासून अखंड सुरू होतं. ती होती आमच्याच कॉलेजची, पण दुसऱ्या ब्रांचची, शिवाय डिपार्टमेंट वेगळं. आमचं डिपार्टमेंट आणि बिल्डिंग वेगळी त्यामुळे ती दिवसभर दिसण्याची शक्यता नव्हती. म्हणून सकाळचा हा आटापिटा असायचा.
एवढ्या दिवसांत एक कळलं, की ती लोकलाइट आहे. आम्ही त्याला जरा उचकावलं. “रोज सकाळी उठून तिच्या क्लासला गेल्यापेक्षा, तिचं घर कळलं तर तुला कधीही जाता येईल.” त्यालाही आयडिया पटली. तिचा क्लास सुटल्यावर पश्याने तिच्या मागे-मागे घरापर्यंत जायचं ठरलं.
ती कुठे राहते, हे शोधण्यासाठी पश्याला एक महिना लागला. तिच्याकडे स्कुटी होती आणि पश्याकडे सायकल. क्लास सुटला की ती भूरकन उडून जायची. हा सायकल दामटत फार तर पुढच्या चौकापर्यंत पोहचायचा. या शर्यतीत आपण टिकणार नाही हे कळल्यावर, रोज वेगवेगळ्या टप्प्यांवर उभं राहत-राहत त्याने घर शोधलं.
घर शोधल्यावर मात्र तो तिकडे कधी फिरकला नाही. खरं तर प्रत्येक ठिकाणी तिच्या मागे जाऊन तिला स्टॉक करता आलं असतं. पण त्याने कधी तसा विचारही केला नाही. तिच्याशी कधी साधं बोललाही नाही. त्याला सकाळची ती छोटी भेटच आवडायची. त्यात कुठली कंडीशन नव्हती. कुठलं एक्सपेक्टेशन नव्हतं. क्लासेसच्या गर्दीत तो विरून जायचा. तिला असं कुणी आहे, हे ठाऊक ही नसेल.
या नादात सेमीस्टर झरकन निघून गेलं. रिझल्ट आला आणि सोबत पश्याचे वडीलही आले. आता हे सगळं त्यांना सांगणं अशक्य होतं.
. . .
“तू कधीच तिच्याशी का बोलला नाहीस, उगाच दिवस फुकट घालवलेस” आम्ही त्याला नेहमी डिवचायचो. तो हसण्यावर न्यायचा.
आज इतक्या वर्षांनी वाटतं, बरं झालं तो नाही बोलला.
फार तर फार काय झालं असतं?
ती बोललीच नसती किंवा बोलली असती. यातली पहिलीच शक्यता जास्त होती पण आपण दुसरी पडताळून बघुयात. ती बोलली असती. मैत्री झाली असती. एखादी चहा-कॉफी झाली असती. याची सायकल स्टँडवर लाऊन तिच्या स्कुटीने गावभर भटकंती झाली असती. एखादा मूव्ही झाला असता. सेमीस्टर गेले असते. वर्ष गेली असती.
(दरम्यान, तिला चुकून एखादा आवडला असता तर आपला गडी डिलीटही झाला असता. पण आपण नको ऑफ ट्रॅक जायला.)
समजा, सगळं सुरळीतच सुरू असतं. सरता सरता इंजिनीयरिंग संपलं असतं. हा तिला सीनिअर असल्याने, याचं होपफुली आधी संपलं असतं. याने जॉबसाठी पुणे गाठलं असतं. हजार खेटे घेत जॉब केला असता. तिचं इंजिनीयरिंग झाल्यावर तिनेही पुण्यातल्या सिलिकॉन व्हॅलीत जॉब धरला असता.
दोघांनी घरी सांगीतलं असतं. घरच्यांनी आधी नाही-नाही म्हणत, नंतर लग्न लावून दिलं असतं. पुढच्या टप्प्यात दोघांनी पुण्यातल्या एखाद्या नवीन स्कीम मध्ये घर बुक केलं असतं. रोज सकाळी जीच्या मुखदर्शनासाठी मरत-मरत जाणारा हा, लेकराशी खेळत-खेळत टीव्ही बघत बसला असता. आणि ती, ‘आज काय भाजी करू?’ या विचारात किचन मध्ये भांडी आपटत असती.
मग आज जे आहे तेही बरंच आहे ना!
ती कुठेतरी परदेशात आहे.
आणि आपला पश्या लेकरासोबत टीव्ही बघतोय, स्वयंपाक कधी होईल याची वाट बघत.