मॅकडोनाल्ड्स आणि इमोशनल इंटेलिजन्स

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

मॅकडोनाल्ड्स

जेमतेम परिस्थितीतलं, साधारण तिशितलं जोडपं.
त्याच्या पाठीवर जड काळी कुळकुळीत बॅग. दिवसभर अंगावर धूळ घेऊन मळलेले कपडे. पायात रबरी बूट.
तिच्या पायात लग्नकार्यासाठी घेतलेली चप्पल. नीटनेटकी साडी. एका खांद्यावर कधीतरी वापरातली पर्स. दुसऱ्या हाताने उड्या मारणाऱ्या लेकराचा हात घट्ट पकडलेला. लेकरू अनवाणी. मोकळ्या हाताने शक्य त्या वस्तूला स्पर्श करण्याच्या खटपटीत.
असा हा त्रिकोण मॅकडोनाल्ड्सच्या भल्या मोठ्या आयाताकृती मेन्यू बोर्ड कडे ‘आ‘ वासून काउंटरवर उभा.

समोरील स्क्रीनवर सारखं टॅप टॅप करणारी काउंटरवरची मुलगी.
जोडप्याचा उडालेला गोंधळ तिला कळला.
तुम्ही इथे काय-काय विकत घेऊ शकता हे तिने सविस्तर समजुन सांगितलं. बर्गर, फ्राईज असले शब्द पहिल्यांदा ऐकलेल्या दोघांनी फक्त माना डोलावल्या. चित्रं बघून दोन-तीन गोष्टी ऑर्डर केल्या.
काउंटर वरच्या मुलीने जोरजोरात स्क्रीन वर टॅप टॅप केलं.
एक लांब लचक बिलाचा कागद सरसर करत बाहेर आला.
आपल्या नेहमीच्या स्वरात मुलगी म्हणाली, “फाइव्ह-थर्टी-फोर ! पाचशे चौतीस !!” 
“अहो !!” नवऱ्याचा हात करकचून दाबत ती डोळ्यांनीच म्हणाली.
“गप गं, काही नाही होत.” त्यानेही डोळ्यांनीच समजावलं.
“इथे खाणार की पार्सल?” काउंटरवरची मुलगी.
“पार्सल” ही पटकन म्हणाली.

पार्सलची कागदी बॅग त्याने बॅगेत कोंबली. लेकरू उड्या मारायला लागलं. तिने भिरभिरत्या नजरेनं एकदा सगळीकडे बघितलं. खांद्यावरची पर्स नीट केली, लेकराचा हात अजुन घट्ट पकडला.
आणि हे कुटुंब ‘अमेरिकन ड्रीम‘ आपल्या पाठीवर घेऊन निघालं.
टेबलावर बसलेली, हसणारी-खिदळणारी लोकं बघत लेकरू आईमागे फरफटत चाललं होतं.
निघतांना सेक्युरिटीने हळूच दार उघडलं.
याने मान हलवून थँक्यू म्हटलं. 

“मॅडम, ऑर्डर?”, स्क्रीनवर टॅप टॅप करत काउंटर वरच्या मुलीने विचारलं, आणि मी भानावर आले.
(बायकोने सांगितलेला तिचा हा अनुभव)

. . .

इमोशनल इंटेलिजन्स

इमोशनल इंटेलिजन्स चार भागांत मोजता येतं.
एक, इमोशन्स् तुम्ही कसे आकलन करता (परसिव्ह).
दोन, तुम्ही इमोशन्स् चा कसा वापर करता (युज) .
तीन, तुम्ही इमोशन्स् कसे समजुन घेता (अंडरस्टँड).
चार, तुम्ही इमोशन्स् कसे सांभाळता (मॅनेज). 

यातील पहिला भाग, तुम्हाला स्वतः बद्दल किती जाणीव आहे हे दाखवतो. 
तुम्ही स्वतःला किती आणि कसे सांभाळू शकता हे सांगतो दुसरा भाग.
तिसरा भाग, सामाजिक भावनेबद्दल तुम्हाला काय जाणीव आहे हे दाखवतो.
तर चौथा भाग, तुम्ही तुमचे रिलेशन्स कसे मॅनेज करता हे सांगतो. 

थोडक्यात, इमोशन्स् आकलन करणे, समजुन घेणे, जाणीव पूर्वक वापरणे आणि मॅनेज करणे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स.
इमोशनल इंटेलिजन्स ही ॲबिलिटी आहे. स्किल आहे. गिफ्ट नाही. हे इम्प्रूव्ह करता येतं. 

इतर नोट्स


इतर पोस्ट्स