वरात : लाईफ लेसन्स

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

भर दुपारचं ऊन. लग्नाची वरात. झिंगाटवर नाचणारी मंडळी. उस्फुर्तपणे ट्रॅफिक सांभाळणारे पाहुणे. लाल-पिवळ्या कपड्यातले बँडवाले. डोळ्यात कौतुक घेऊन आलेली जेष्ठ मंडळी. उडया मारणारी पोरं. बँजो वाल्याची मोठ्ठी गाडी. मागे लगबग करणाऱ्या, यंदा ‘कर्तव्य’असणाऱ्या काही पोरीबाळी. वरातीच्या शेवटी, घोडीवर बसलेला ‘आनंदी जीव’! एकंदरीत उत्साही वातावरण.

. . .

या सर्वांत, ‘बँजो वाला’ ही व्यक्ती अत्यंत अध्यात्मिक. अलिप्त. उदास. कुठलंही गाणं अगदी थंड रक्ताने वाजवणारा कलाकार. नाचणाऱ्यांकडे उदासपणे बघायचं. बँजोवर लीलया बोटे फिरवायची. बँजो वाजवतांना मोबाईल वर व्हाट्सअप्प खेळतानांही पाहिलय मी. कमाल मास्टरी!

. . .

लाल-पिवळे बँडवालेही त्यातलेच. आपला बँजोवाला मित्र काहीही का वाजावो, ह्यांचा सूर एकच. धडाम-धुडुम. धुडुम-धडाम. नागीण डान्स करणाऱ्या आणि रुमलाचा फणा असणाऱ्या नागा समोर मधुन मधुन मान हलवणे हे त्यांचे आद्य कर्तव्य. पण तेही निर्विकार चेहऱ्याने. ‘आता उरलो उपकरा पुरता…’ ह्या भावनेने.

. . .

आपल्याच वरतीतले सगळे ‘लाईफ-लेसन्स’ हा ‘आनंदी जीव’ नंतर फार ‘हार्ड-वे’मधून शिकतो, याच मात्र दुःख वाटतं.

. . .

म्हणजे बघा ना, आयुष्यात कुठंलही गाणं असलं तरी बँजोवाल्या सारखं राहिलं पाहिजे.
शांत. कोल्ड ब्लडेड.
आपण गाणं वाजवायचं.
त्याच काय करायचं हे नाचणारे बघतील.
कुणी मुंगळा म्हटलं तर मुंगळा.
कुणी झिंगाट म्हटलं तर झिंगाट.

नाहीच जमलं तर बँडवाल्या सारखं जगायाचं.
गाणं कुठलंही असो. सूर एकचं.
धडाम-धुडुम. धुडुम-धडाम.
घरातील नागीण फणा काढून गुरगुरली तर मधुन मधुन मान हलवायची. निर्विकार. भावना तीच, ‘आता उरलो उपकरा पुरता…’

. . .

आयुष्यातली मंडळी वरातीतल्या सारखीच असते.

नाचणारे नाचतात.
सोबतीने चालणारे सोबत चालतात.
काही उगाच प्रोब्लेमची ट्रॅफिक सांभाळल्या सारखे करतात.

दुरून सगळा आनंद सोहळा.

आपली ही आयुष्याची वरात आपण सांभाळावी.
आपला सूर टिकवून ठेवावा.
धडाम-धुडुम. धुडुम-धडाम.

बघा पटतंय का.

इतर पोस्ट्स