आज्जी. सुबक, ठेंगणी, गोड. रंगबिरंगी फुलं असलेला पांढरा सलवार. पायात पिंक स्पोर्ट्स शूज. डोळ्यांवर काळा गॉगल. वाऱ्यावर उडणारी केसांची पांढरी शुभ्र लट. फूटपाथच्या वळणावर, झाडाच्या सावलीत फोनवर कुणाशी तरी बोलण्यात मग्न.
त्याच फूटपाथवर, समोरून येणारे एक आजोबा. सडसडीत बांधा. अंगात पांढरा इस्त्री केलेला शर्ट. निळ्या रंगाची पँट. कॉलरच्या खाली एक रंगीत रुमाल घडी करून लावलेला. पायात कापडी शूज. वरच्या खिशात छोटासा मोबाईल, डायरी, पेन वगैरे. केसांचा देव आनंद सारखा कोंबडा काढलेला. क्लीन शेव. काळ्या फ्रेमचा चष्मा. हातातली कापडी पिशवी मिरवत आजोबा चाललेले.
वळणावर उभ्या असलेल्या आज्जींकडे त्यांचं लक्ष जातं आणि चालण्यात अचानक तरतरी येते. आधी, हातातली कापडी पिशवी खिशात. फूटपाथ वर डोकावणाऱ्या फुलझाडाची एक लहानशी फांदी ते अलगत हिसका देऊन तोडतात आणि ती फांदी हातात मिरवत ते आज्जीच्या दिशेने चालायला लागतात. हवेची छोटीशी झुळूक फांदी आणि आजोबा दोघांना सुखावून जाते. क्षणभर घरचं आपलं वादळ ते विसरतात. तुरूतुरु चालत आजोबा आज्जीला क्रॉस झाले. दोघांची नजरानजर झाली. आज्जी गोड हसल्या. आजोबांच्या मनात देव आनंदच गाणं सहज तरळून गेलं असेल –
मिल ही जाती हो तुम, मुझको हर मोड़ पे.
चल देती हो कितने, अफ़साने छोड़ के.
ख़्वाब हो तुम या कोई हक़ीक़त, कौन हो तुम बतलाओ.
देर से कितनी दूर खड़ी हो, और करीब आ जाओ.