विमान

(रीडिंग टाईम 3 मिनिटं )

आम्ही त्या गर्दीत कधी मिसळून गेलो कळलंच नाही. 

दरवर्षी, हजारो भाविक, हनुमान जयंतीच्या आधल्या रात्री, पायी पायी भद्रा मारुतीच्या मंदिरात जातात. यंदा, आम्हीही चाललो होतो. जायचं ठरलं त्या दिवसापासून, उत्तम, एकदम उत्साहात होता. त्याने शेजारून टाळ आणि वारकऱ्यांची टोपी  आणली होती. आम्ही, रात्री हिंडायला मिळणार म्हणून एक्साईटेड! रात्रीच्या अंधारात, कुठे तरी, काहीतरी दिसावं अशी माझी फार इच्छा. तसंही, मारुतीला जात असल्याने, भूतं आमचं काय वाकडं करणार?

आम्ही राहायचो तिथून मंदिर तीस किलोमीटर. 

गर्दीचा आणि उत्तमचा उत्साह मॅच झाला. त्याने टाळ कुटायला सुरुवात केली – “जय जय राम कृष्ण हरी . . .” 

आम्ही त्याच्या मागे टाळ्या वाजवत निघालो. थोड्या अंतरावर, रस्त्याच्या दोन्ही बाजुस, भाविकांसाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. पिण्याचे पाणी, सरबत, केळी, साबुदाण्याची खिचडी, फराळी चिवडा, बिस्कीटचे पुडे मोफत वाटण्यात येत होते. आम्ही तर हे इमॅजिनच केलं नव्हतं. 

पहिल्याच स्टॉलला, आम्ही उत्तमला सोडला.

आधीच्या पाच सहा स्टॉल्स वर भरपूर हादडले. पोट भरल्याने, पुढच्या स्टॉल्सवर, सोबतच्या बॅगा भरायला सुरू केल्या. फराळी चिवडा, चिप्स, बिस्कीटचे पुडे, फ्रुटीचे छोटे बॉक्सेस, पाण्याच्या बॉटल्स, असं प्रत्येकाने आपापल्या बॅगेत कोबूंन भरलं. रात्रभर चरत जाता येईल एवढं सामान आमच्याकडे होतं. जवळ जवळ दीड एक तास आम्ही, त्या पंचवीस तीस स्टॉल्सवर रेंगाळत होतो. जणू या स्टॉल्स पर्यंतच येणे, हाच आमचा उद्देश होता. मारुतीरायांकडे पायी निघालेल्या या भक्तांच्या अंगी बळ यावं, आणि सोबतीला आपल्या पदरी ‘अन्नदानाचं ‘ पुण्य पडावं – एवढी निर्मळ भावना स्टॉल्स थाटण्यामागे असावी.

पुढच्या प्रवासासाठी लागणारी भरपूर सामग्री गोळा करून, आम्ही ते प्रेमळ स्टॉल्स एकदाचे सोडले. आमच्या अंगी बळ न येता, आळस मात्र आला. रस्त्यावरची इतर मंडळी झपझप निघाली होती. त्यांच्या स्पीडशी आमचा स्पीड काही मॅच होईना. मागून येणारा प्रत्येक ग्रुप आम्हाला क्रॉस करून पुढे जात होता.

बारा वाजले असतील.

दहाऐक किलोमीटर, आम्ही पार केलं असेल. हनुमंताच्या जन्माला अजुन सहा तास होते. कितीही हळूहळू गेलो, तरी जन्माच्या आधी आरामात पोहचू, एवढा इंजिनिअरचा कॉन्फिडन्स तर होताच. जर आरामातच पोहचणार आहोत, तर थोडा आराम करूयात म्हटलं. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतांमध्ये पाय मोकळे करण्यासाठी लोक बसत होते. पाणी प्यायचं, थोडा आराम करायचा आणि परत सुरू.

“जय जय राम कृष्ण हरी . . .” च्या गजरात, जेव्हां उत्तमने मागे वळून पहिलं – तेव्हा त्याच्या मागे, तीस चाळीस जणांची, दोन दोनच्या रांगा करून दिंडी तयार झालेली. उत्तमला आता थांबणं अशक्य होतं. त्याने तर स्टॉल पाहिलेही नसतील, कदाचित. तो रस्त्यात भेटलाच, तर आमच्या एवढंच त्यालाही पोटभर खाऊ घालू, अशा तयारीत आम्ही होतो.

पावसाची वाट बघत असलेल्या त्या शेतात, आम्ही पाय मोकळे करण्यासाठी टेकलो. मातीच्या ढेकळांचा सुगंध. वर चांदण्यांनी भरलेलं आकाश. गार वारं. रस्त्यावरून टाळ मृदुंगाची संथ किणकिण. एखाद्या मोठ्ठ्या पडद्यावर हे सगळं  आपण बघतोय असं वाटतं होतं. 

या वातावरणाला चिरत, एक विमान, शहरातून आकाशी झेपावलं.  चांदण्यांनी भरलेल्या आकाशात, पौर्णिमेच्या चंद्राकडे जाणारे  विमान बघणे म्हणजे थ्रीलींग अनुभव होता. ढेकळांवर पाठ टेकवून, चंद्राकडे झेपावणारं ते विमान, आम्ही मुग्ध होऊन बघत होतो. मारुतीराया आकाशी उडतांना असेच दिसत असावेत. असेच एकदा, भद्रसेन राजाचं गाणं ऐकून मारुतीराया खाली आले. गाण्याने मुग्ध होऊन, ते कुशीवर कलले आणि जिथे ते निद्रावस्थेत गेले तिथे आज हे मंदिर आहे.

सकाळी जाग आली. 

रात्रीतून, किती विमानं उडून गेली, देव जाणे ! 

आम्ही मात्र, रात्रभर त्या शेतातच पसरलो. जन्म सोहळा पहाटेच आटोपला होता. हिरमुसून, आम्ही शेतातून घराकडे निघालो. रस्त्यात स्टॉल्सची आवराआवर सुरू होती. 

दुपारी उत्तम घरी पोहचला तेव्हा आम्ही स्टॉल्सवर गोळा केलेल्या सामानाची भेळ करून, ताव मारत होतो.

जय जय राम कृष्ण हरी.

इतर पोस्ट्स