व्हाइट हाउस डाऊन

(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

काल रात्री व्हाईट हाऊस डाउन नावाचा सिनेमा बघता बघता झोप कधी लागली कळलंच नाही. अमेरिकन प्रेसिडेंटचं व्हाईट हाऊस कसं नेस्तनाबुत करतात अशी कथा आहे.

गोळ्यांचे आवाज, आकाशात भिरभिरणारे हेलिकॉप्टर्स, लोकांच्या किंकाळ्या, सगळीकडे धूर धूर…अश्या सगळ्या वातावरणात मी झोपेत, झोपेेतून स्वप्नात, आणि स्वप्नातून थेट व्हाईट हाऊस ग्राउंड झिरो वर पोहोचलो.

अडीअडचणीत नेहमी सोबत येणारा जितू सोबत होताच.

बायकोला असल्या विषया वरील सिनेमे आवडत नसल्याने, तिला घरीच ठेवले होते.

अर्थात आम्ही पोहोचलो तोवर सकाळ झाली होती. व्हाईट हाउसच्या अंगणातच या सिनेमाचं शुटींग सुरु होतं. भली पहाट असली तरी बरीच गर्दी होती. धुळीने माखलेले आर्टिस्ट इकडे तिकडे पळत होते. दोन वारकरी पहिल्यांदा पंढरीत आल्यागत आम्ही भिरभिर सगळीकडे बघत होतो. जितू कॅमेरे आणि मी शुटींगच सेटअप न्याहाळत होतो.

थोडं कवडसं पडलं होत, गर्दीतून आमचा डायरेक्टर मित्र आला, त्यानी सगळा सेट फिरवला. ( डाय हार्ट फॅन मित्रच असतात हो!)

व्हाईट हाऊसच्या एका गॅलरीत शांत उभे राहून ‘ओबामा’ बघत होते. पेठेतल्या एखाद्या गॅलरीतुन विसर्जनाची मिरवणूक बघायला मिळावी असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एज एक्सपेकटेड, मला पाहताच स्वारी खुश झाली. “wait downstairs, I’m coming” ओबामांनी आरोळीच ठोकली. यथावकाश ते खाली आले. समोरच्याच लॉन मध्ये टेबल खुर्च्या मांडण्यात आल्या. चहा कॉफीच्या केटल आल्या. मी, जितू आणि ओबामा, गेल्या गेल्याच वैशालीत जागा मिळावी अश्या आनंदात बसलो.

गप्पा सुरु झाल्या.
मी: “Thanks for your time Mr President. We are honored.”
ओबामा : “No. No. Pleasure is mine! I always like to meet new people around the world. And you know, Some Indians are my good friends.”
इंडियन फ्रेंड वर जितुने हळूच खालून लाथ मारल्याची ओबामाला ही कळली. नंतर बऱ्याच गप्पा झाल्या. अमेरिका-इंडिया, ऍमेझॉन -फ्लिपकार्ट, उबर-ओला आणि बरंच काही… शेवटी विषय सध्या सुरू असलेल्या शुटींगवर आला.
मी: “Sir, how do u allow people to shoot movie here. यामुळे अडथळे येत नाहीत का?” ओबामांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला माझी चूक कळाली. मी लगेचच सावरून, म्हणालो, “Sorry Sir, I spoke in Marathi.”

त्यावर ओबामा म्हणतात कसे, “बोल रे, कळते मला मराठी. तुम्ही साले हो, लहानपनी इंग्लिश शिकत नाही अन मग आम्हाला मराठी शिकावी लागते.”

मी आणि जितुने एकमेकांकडे पाहिलं आणि एकदा ओबामांकडे.
शांतपणे कॉफी प्यायलो.
आणि आपल्या पुण्यात परत.
अमृतात पैजा जिंकणारी आमची मराठी आम्ही अमेरिकेतही जिंकून आणली.

इतर पोस्ट्स