श्रावण फक्त श्रावणासारखा वागतोय. क्षणांत येती सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे, वैगरे!
बाकी सगळ्यांचं डामडोलच.
हवामान खात्याचे रेड-ऑरेंज अलर्टचे अंदाज अंदाजे चुकतायेत.
रस्ते स्वच्छ धुवून निघतायेत. ते धुण्याचं पाणी त्यांच्याच खड्ड्यात साचतयं.
जाणारी-येणारी वाहनं त्या खड्ड्यांतून पाणी उडवत परत रस्ते रंगवतायेत.
हा खेळ सरसर येणाऱ्या शिरव्यां सारखा सतत सुरू आहे.
एका रस्त्याच्या कडेला खड्डे बुजवण्यासाठी खडीचा मोठा ढीग टाकलाय.
ढीग स्वतःच हळूहळू रस्त्यांवर पसरतोय. खड्डे तो आपल्या कडे येण्याची वाट बघतायेत.
येणारी-जाणारी माणसं ढीग बघतात. खड्डे बघतात. ढीग मोठा की खड्डे याचा अंदाज बांधत पुढे जातात.
महानगर पालिकेच्या ओसाड मोकळ्या जागेत गवत ओसंडून वाहतेय. हिरवळ दाटे चोहीकडे!
डासांनी आपल्या कॉलनी तिथे प्रस्थापित केल्यात.
गर्द झाडीच्या रस्त्यांवर महानरपालिकेचा उद्यान विभाग रस्त्यावर येऊ बघणाऱ्या फांद्या तोडताय.
त्या फांद्याचा हिरवा पाला पाचोळा रस्त्यावर पसरलाय.
रस्ता हिरवा झालाय.
लहान लहान घरांची छपरं ताडपत्रीने निळी झालीयेत.
न सुकणारे कपडे गॅलरीत लोबंकळत कुब्बट झालीयेत.
श्रावणाचा ऊन-पाऊस त्यांना ना धड ओलं, ना धड कोरडं होऊ देतोय.
मानसी कुठलाही हर्ष न ठेवता लोकंही ना ओले, ना कोरडे फिरतायेत.
बाकी श्रावणांच आपलं बरं चाललंय.
श्रावण श्रावणासारखा वागतोय.