दादाने ड्रॉइंग बोर्डवर शीट लावलं. जेमतेम स्वतःचं नाव लिहिलं. सर अजुन फळ्यावर ड्रॉइंग काढतच होते. ड्रॉइंग हॉल मध्ये नेहमीचा गोंधळ सुरू होता. संध्याकाळची उन्हं हॉलच्या जाळीदार खिडकीतून आमच्या टेबलांवर पसरली होती. दादा हॉलच्या एका कोपऱ्यात गुमान बसला होता. या सरांबद्दल त्याला फार रिस्पेक्ट. नाही तर, दादा कुणाला म्हणून घाबरत नव्हता. सर हॉलमध्ये आहेत म्हणूनच दादा मुकाट्याने जागेवर बसला होता. सर तसंही अर्ध्या तासात आपलं ड्रॉइंग काढून निघून जायचे. तोवर दादा टंगळमंगळ करायचा. एकूणच, ड्रॉइंग वैगेरे काढण्यात त्याला काही इंटरेस्ट नव्हता. सगळ्या शीटस् दादा कुणाला तरी पकडून काढून घ्यायचा.
. . .
सर वर्गावरून गेले.
दादाने आपली जागा सोडली.
‘कुणाला ड्रॉइंग काढायला लावायचे?’ म्हणून हॉल मध्ये दादांचा राऊंड सुरू झाला.
“तेरा ड्रॉइंग अच्छा है !” स्वारी माझ्यापाशी येऊन थांबली.
हे प्रकरण कुठे चाललय ते पटकन माझ्या ध्यानात आलं. पण दादाला नाही म्हणून पंगा कोण घेणार. मागच्या वर्षी, शर्मा दादाला भर वर्गात ड्रॉइंग काढायला नाही म्हणाला. दादा तेंव्हा काही बोलला नाही. रात्री, त्याला हॉस्टेलवर उचलून आणलं. त्या रात्री शर्माने कुणाकुणाच्या किती शीटस् काढल्या, देव जाणे!
“अरे नही दादा, मला तर ही शीट रिपीट मिळालीय.” वेळेवर जे सुचलं ते मी बोललो.
“मग कुणाचं चांगलं आहे?” शीट मध्ये बघत, दादाने भुवया उंच करून विचारलं.
संकट फेस नाही करता आलं तर पास-ऑन तरी करता आलं पाहिजे.
मी इशाऱ्यानेच मागे बसलेल्या सदशिवकडे बोट दाखवलं. सदाशिवने मनातल्या मनात दिलेली शिवी मला थेट ऐकु आली. असो! मी तरी काय करणार?
दादाने सदशिवचं शीट आणि एकूण ड्रॉइंग पाहिलं. काहीच न बोलता मोर्चा पुढे वळवला. सदाशिव आणि मी, ‘आता कुणाचा नंबर लागतो’ म्हणून मागे वाळून बघत होतो.
सदाशिव नंतर मुलगी बसली होती. दादा मुलांमध्ये कितीही मोठा डॉन असला तरी मुलींशी कधी आयुष्यात बोलला नाही. आताही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. ती, दादा बोलणार म्हणून उठून उभी पण राहिली. दादाने तोंडातून ब्र जरी काढला असता तर ती तयार झाली असती. पण दादा तिच्याकडे न बघता तसेच पुढे निघाले. हिरमुसून ती खाली बसली.
आज लागणार कुण्या मुलाचीच होती.
तिच्या नंतर बसलेला रमेश ड्रॉइंग काढण्यात एवढा गुंग होता की काय चाललंय याची त्याला कल्पनाही नव्हती. सदाशिव, मी आणि ती – आम्ही तिघे आणि एव्हाना सगळा वर्ग हातातली कामं सोडून, दादा काय करणार याची वाट बघत होता.
“मेरा ड्रॉइंग तू निकालके देगा!” तीन रिजेक्शन नंतर रिस्क न घेता, दादाने जवळजवळ डीक्लियरच केलं.
“का रं? आम्ही का काढायची ड्रॉइंग तुझी, तुला झेपं ना, व्हय रं?” वर न बघता, ड्रॉइंग काढता काढता, रमेश आपल्या कोल्हापुरी खाक्यात बोलला.
त्या स्तब्ध हॉल मध्ये रमेशच्या रिस्पॉन्स वर समोरची मुलगी भस्सकन हसली. दादांनी तिच्याकडे पाहिलं. दाढी वरून हात फिरवला. आणि काही न बोलता दादा, थेट ड्रॉइंग हॉलच्या बाहेर निघून गेला.
रमेशच्या लेखी काही घडलंच नाही. तो त्याचं ड्रॉइंग पूर्ण करत बसला. ती मुलींच्या घोळक्यात मिसळली. मग सगळ्याच जणी हसत सुटल्या. काय झालं आणि पुढे काय होणार, हे मुलांच्या मात्र ध्यानात आलं.
सदाशिव आणि मी ‘सुटलो’ म्हणत आपापल्या ड्रॉइंग बोर्ड कडे वळलो.
. . .
हॉल मधले जुनाट पंखे गरगरत राहिले आणि दोन तास सहज उडून गेले.
‘उरलं सुरलं नंतर काढू’, म्हणत आम्ही शीटस् गुंडाळल्या. त्यांना रबर बँड लावता-लावता मागे वळून रमेश कडे पाहिलं. तो गडी, आज शीट संपवण्याच्या बेतात होता. मी ‘ चल ‘ म्हणून हाक मारली. त्याने हातानेच, तुम्ही व्हा पुढे सांगीतलं. दादा आणि त्याची गँग सायकल स्टँडवर बसली होती. मी आणि सदाशिव बाहेर जाऊन व्हरांड्यात उभे राहिलो.
. . .
बऱ्याच वेळाने रमेश, हातात शीटची गुंडाळी घेऊन बाहेर आला.
“झाली का शीट?” दादाने रमेशला बोलावत विचारले.
“झाली, की !” आमच्याकडे न येता, रमेश तिकडेच गेला.
त्याच्या हातातली शीट दादाने हिस्कावली. तो काही बोलणार तेवढ्यात, चुरगळून फाडून टाकली. पुढच्या क्षणाला, दादा आणि त्याचे पंटर्स गाड्यांना किक मारून निघून गेले.
मला वाटलं तसचं झालं. रमेशची एवढी मेहेनत काही सेकंदात सायकल स्टँडवर विखुरली.
आम्ही जड पावलांनी रमेश पाशी गेलो.
रमेश शीटच्या तुकड्यांकडे बघत म्हणाला, “खुळं ! त्याची कोरी शीट हॉल मध्येच सोडून आलं. मी घेऊन आलतो, पठ्ठ्याने फाडून टाकली.”
मी आणि सदाशिव, रमेशच्या पाठीवर लावलेल्या शीट कंटेनरकडे पाहत, हसलो.
रिलेटेड पोस्ट : उत्तराचा प्रश्न