शहरातला रोबोट एकदा गावात येतो.
सुख म्हणजे काय? माझ्याकडे बघा म्हणतो.
. . .
गावातला गडी, शेतातून दमून आलेला – मातीत खेळून आलेला.
रोबोटची ‘थ्री फोर्थ’ बघून, आपले कपडे झटकतो.
. . .
खाट टाकून तो अंगणात पडतो – चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली.
मोबाईलच्या उजेडात चमकणारा रोबोटचा चेहरा, त्याला भोवतालचा अंधार दाखवतो. कूस बदलून, तो डोळे मिटतो. अंधारातच.
. . .
पहाट होते.
बायकोने बांधलेली भाकरी घेऊन तो शेतावर निघतो.
रोबोट झोपलेला पाहून तो हसतो – गालातल्या गालात – स्वतःच्या टायमिंगवर.
. . .
सूर्य डोक्यावर येता येता, रोबोट उगवतो.
पोहे खातो – कॉफी पितो – मोबाईल खेळतो.
. . .
साइट सीईंग म्हणून शेतावर येतो.
खळखळ पाणी शेतात सोडून, गडी झाडाखाली निवांत बसलेला.
रोबोट, आपल्या मोबाईल मध्ये टिपतो – हिरवा रंग – गड्याच्या आयुष्यातला.
. . .
दोघं भाकरी खातात – झाडाखाली – गर्द सावलीत.
गडी पुन्हा मातीत.
रोबोट मोबाईलमध्ये.
. . .
आपल्या चाकाच्या बॅग्स घेऊन रोबोट निघतो.
आज शेतातलं पाणी सोडून, गडी त्याला सोडायला जातो – चाकाची बॅग, डोक्यावर घेऊन.
शहरातला रोबोट एकदा गावात येतो.
रीलेटेड पोस्ट : मिस्ड कॉल