आम्ही इंग्लिश मुळातच पाचवीत शिकलो.
माजगावकर सर. आमचे पाचवीत क्लास टीचर.
इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्हीं भाषा तेच शिकवायचे.
पुर्ण टक्कल, सोबतीला राहीलेले शेवटचे काही केस. टकला एवढंच ठळक पोट. डोळ्यांवर लाल दांड्यांचा, जाड भिंगाचा चष्मा. हाफ शर्ट. खांद्याला कापडी शबनम. हाताला कायम खडूची पांढरी पावडर लागलेली आणि ती पँट पर्यंत पोहचलेली. तोंडात कधी कधी पानाचा तोबरा. असं काहीसं स्थुल पण हसरं, गोंडस व्यक्तिमत्व.
तुम्हाला आठवत असेल, इंग्लिश साठी तीन रेघी एक स्वतंत्र वही असे. माजगावकर सर वर्गात येतांना एक लांब लाकडी पट्टी आपल्या सोबत घेऊन येत. मग इंग्लिशच्या त्या तासामधले काही मिनिटं आमच्या वहीत आहेत तश्याच तीन रेघा फळ्यावर काढण्यात जातं. त्या दरम्यान जर कोणी कुजबुज किंवा गडबड केली तर “अरे ओ हिऱ्या !!” असे ते जोरात खेकसावत. मग तो हिरा गोंडस सरांचा हा अगोंडस अवतार बघूनच शांत बसे.
माजगावकर सरांच्या लेखी आम्ही सगळे हिरे होतो. पैलू पाडण्याचं काम त्यांचं. आणि पैलू पण इंग्लिशचे! मग ते हळू हळू आमच्या कडून ए – बी – सी – डी गिरवून घ्यायचे.
माझं अक्षर जे काही चांगल आहे ते माजगावकर सरांमुळे. पुढे बऱ्याच मस्तारांमुळे अक्षर सुधारलं आणि बिघडलं. म्हणजे माझ्या मोत्या सारख्या अक्षराला ही पैलु पडले म्हणा. असो.
तर माजगावकर सरांनी आम्हाला इंग्लिश आणि हिंदी चे बाळकडू पाजले.
इंग्लिशशी अजून लढतो आहे आणि पुण्यात राहत असल्याने हिंदीची मी फार चिंता करीत नाही.
लहानपणी नवनीत प्रकाशनचे “शब्दार्थ” नावाचं, डायरीच्या आकाराचं, छोटंसं, आडवं पुस्तक यायचं. प्रत्येक इय्यतेसाठी, दरवर्षी मी हे पुस्तक विकत घेतलं आहे. पण शब्द आणि त्यांचे स्पेलिंग कधी पाठ नाही झाले. पुढे बिल गेट्स ने स्पेल चेक आणून वाचवलं. (ऑटो करेक्ट या ऑप्शन बद्दल आपण नंतर कधी सेपरेट बोलू.)
. . .
माजगावकर सर इतक्या वर्षांनी इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये दिसल्याने मी थोडा गोंधळलो. सगळी हिम्मत एकवटून मी त्यांच्यापाशी गेलो.
” सर, मी तुमचा स्टूडेंट! तुम्ही पाचवीला मला क्लास टीचर होतात”
ते प्रसन्न हसले.
बरेच म्हातारे झाले होते पण हसू तसचं होतं.
आपल्या कारखान्यातील एक हिरा या शो रूम मध्ये! असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
” तुम्ही इथं कसे?” मी विचारलं.
“माझ्या मुलासोबत आलोय एडमिशनसाठी.”
‘म्हणजे घरीच पैलू पडलेला हिरा म्हणा की.’ मी शब्द मनातच गिळून घेतले.
पण तो होम मेड हिरा बघण्याची उत्सुकता मला लागली . . .
. . .
त्या हिऱ्या बद्दल म्हणजेच,
पुढे माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक झालेल्या या अवलिया बद्दल नंतर कधीतरी .