हिरो, हिरोईन आणि आम्ही

(रीडिंग टाईम 7 मिनिटं )

ही घटना एका दिवशी दुपारी सुरू होऊन, दुसऱ्या दिवशी दुपारी संपली.  या घटनेचे तीन साक्षीदार आहेत. 

आम्ही म्हणजे मी आणि श्याम. 

हिरो – जो श्यामचा मित्र आहे. 

आणि हिरोईन अर्थात जी हिरोचीच आहे.

या सगळ्यांत कर्ता करविता हिरो असला तरी निमित्त हिरोईन आहे.  आणि आम्ही?  आम्ही प्रेक्षक! रसिक प्रेक्षक म्हणा हवं तर.

.  .  .

” दिवस पहिला “

{ दुपार }

(आम्ही):

औरंगाबादेत, मी कॉलेज मध्ये बसलोय. लेक्चर्स वर लेक्चर्स सुरू आहेत. जरी डोळे उघडे असले, तरी आतून मी झोपलोच आहे.  

“जाऊ दे, झोप आता !” असं जर कुणी म्हटलं तर मी तिथेच आडवा होईल, अशी परिस्थिती आहे.

श्याम कुठल्या तरी डिबेट ग्रुप मध्ये कुठल्या तरी विषयावर चर्चा करतोय. ‘ कॅट ‘ ही एक्झाम प्रीपेयर करणारे सहसा असच काही तरी करत असतात.

(हिरो): 

शेगाव इंजिनीरिंग मध्ये शिकणारा हा गडी आपल्या मित्रांसोबत अकोल्याला नुकताच रिलीज झालेला ‘ मोहब्बतें ‘ नावाचा पिक्चर बघायला आला आहे. (शेगाव – अकोला अंतर 50 किमी)  शेगाववाले ‘न्यू रिलीज’ बघायला इतके दूर नेहमीच येतात. त्यामुळे उगाच कौतुक नको.

(हिरोईन):

कॉलेजमध्ये लेक्चर्सही असतात हे माहीतच नसलेलं  ‘फ्री बर्ड’. हॉस्टेलच्या मेस मध्ये जेवण झाल्यावरही, कॅन्टीन मध्ये मॅगी खात बसलेलं. हसणं, खिदळनं ओघाने आलचं.

.  .  .

” दिवस पहिला “

{ संध्याकाळ }

(आम्ही) :

मी सगळं नॉलेज झेलून घरी निघालोय. आपल्याला झोप नाही, भूक लागली आहे, हे वडापावची गाडी पाहिल्यावर कळलं. एकच वडापाव खाऊन, मन मारून कसा तरी मी रूमवर आलोय. 

श्यामराव टाईम्स ऑफ इंडिया वाचत बसले आहेत. आपला जाड भिंगाचा चष्मा नीट करून, श्यामराव म्हणाले, ” ईथनशिया इज एथिकल ऑर नॉट?” (Euthanasia is ethical or not?) 

मला वाटलं, ईथनशिया म्हणजे इंडोनेशिया पासून वेगळा झालेला देश असावा आणि तो एथिकल आहे की नाही असा श्यामला प्रश्न पडला असावा. 

तरी मी आपला मध्यम वर्गीय – मराठी मिडीयम प्रश्न विचारलाच, 

“ईथनशिया म्हणजे काय?” 

श्यामरावांनी हातातला टाईम्स बाजूला ठेवला. 

आणि ‘कुठे शिकलास रे?’ असं न विचारता म्हणाला, 

“ईथनशिया म्हणजे इच्छामरण, इच्छामरण नैतिक की अनैत्तीक?” 

इंजिनीयरिंग करणे म्हणजेच ईथनशिया आहे असं समजणारा मी,  पटकन म्हणालो, “अनैतिक! अनेथिकल आहे ते!” 

बसलेले श्यामराव उभे राहिले. रुममध्ये फेऱ्या घालत सांगू लागले,

“एखादा खुप दुःखात आहे, जगणं असह्य झालं आहे, तर इच्छामरण नैतिकतेला धरून आहे. हाच माझा पॉईंट आहे, उद्याच्या डीबेटचा.” 

तर, पाणी इथे मुरतंय हे कळलं.  चूप बसण्याशिवाय पर्याय नव्हता. 

मी आता मेस वर जाण्याची वाट बघत बसलोय.

(हिरो): 

दुपारी ‘ मोहब्बतें ‘ बघून शेगावी परत न जाता हा हिरो थेट औरंगाबादच्या एसटीत बसला होता. 

(अकोला – औरंगाबाद अंतर अंदाजे 250 किमी) 

एव्हाना संध्याकाळ झाली होती. 

बस प्रत्येक छोट्या छोट्या गावात थांबत थांबत चालली आहे. घरी जाणारी मंडळी दाटीवाटीने जमेल तिथे बसलेत, उभे आहेत. कंडक्टर गर्दीतून रस्ता काढत, हातातलं तिकिटाला भोक पडण्याचं पंचींग जोरजोरात वाजवतोय.  बायका बडबड करतायेत. लेकरं रडतायेत. म्हातारी मंडळी खोकतायेत. कुणी खारे शेंगदाणे खातंय. कुणी भजी बांधून आणलीयेत. सगळ्या बस मध्ये घामाचा, वेगवेगळ्या पदार्थांचा वास येतोय. गोंगाट सुरू आहे. बस रस्त्यातील खड्ड्यातून उसळते आहे. लोकं एकमेकांवर आदळले जात आहेत. 

आणि हिरो?

हिरो खिडकीपाशी बसलाय. 

थंड हवेची झुळूक येतेय. 

मागे व्हायोलिनचे मंद स्वर कानावर येतायेत.

बाहेर झाडं पळतातेय. शेतं बहरली आहेत. 

आकाशाला संध्याकाळची लाली चढली आहे.

गुडघा भर वाढलेल्या पिकातून, 

आपली ओढणी वाऱ्यावर उडवत, 

हिरोईन पळते आहे…

व्हायोलिनचे स्वर फास्ट आणि

गाडी स्लो मोशन मध्ये धावते आहे.

सगळं, सगळं रोमँटिक झालं आहे…

(हिरोईन):

हॉस्टेल समोरच्या टपरीवर, मैत्रिणी सोबत चहा आणि क्रीम रोलचा रतीब सुरू आहे. काहीतरी फालतू टॉपिक वर हसणं खिदळण सुरू आहे. चहाच्या भांड्यात चहा वाफळतोय. खुंटीला टांगलेल्या रेडिओ वर मोहब्बतेंच गाणं वाजतेय: 

“सोनी सोनी अखियों वाली, दिल दे या दे जा गाली… हम तेरे दीवाने है, हम आशिक मस्ताने है… “

. . . 

” दिवस पहिला “

{ रात्र }

(आम्ही):

मला जोरदार भूक लागली आहे. त्यामुळे रोजपेक्षा आम्ही लवकर मेसवर आलोय. जेवण अजुन तयार व्हायचं आहे. श्याम ईथनशिया वर अखंड बडबड करतोय. मेस वर टीव्ही नाही आणि मोबाईल अजुन जन्माला यायचा आहे. त्यामुळे ते ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय ही नाही. शेवटी जेवणांच ताट आलं.  मी ईथनशिया आणि भुकेने मरता मरता वाचलो. श्याम रस्त्याकडे तोंड करून बसला होता आणि मी श्याम कडे. जेवता जेवता रस्त्यावर कावरा बावरा फिरताना तो  श्यामला दिसला. श्यामने आधी आवाज दिला आणि नंतर पळत जाऊन थांबवलं. मग दोघं काही तरी बोलले आणि मेसमध्ये आले.

चुरगळलेला पिंक शर्ट, ब्लॅक पँट, धुळीने माखलेले शूज, विस्कटलेले केस, वैतागलेला, भुकेलेला –  हा आपला हिरो! गेस्ट म्हणून एक्स्ट्रा ताट आलं. गडी हाणून जेवतोय. माझ्या पेक्षा ही भुकेली लोकं आहेत याची खात्री झाली. श्यामराव आणि मी त्याच्याकडे प्रश्न चिन्हासारखे बघतोय. तो फक्त जेवतोय. श्यामने चूप बस अशी खूण केली आणि मी शांत बसलोय. आम्ही जेवलो, तो जेवला. आणि तिघं रूमवर आलो.

तो क्षणभर बसला, नंतर हसला. बोलला वरती पाहून, 

“आज मोहब्बतें बघायला अकोल्याला गेलो होतो. पिक्चर संपला, तिची फार आठवण आली. ती औरंगाबादमध्ये असते, असं ऐकलं होतं. बसलो गाडीत.” 

मी खुर्चीतून खाली येऊन बसलो. 

“पत्ता कसा मिळाला?” श्यामचा लॉजिकल प्रश्न. 

“तुझ्या घरचा नंबर होता, फोन करून विचारला” स्मार्ट उत्तर. 

(त्या काळी मोबाईल नव्हते) 

“आणि तिचा पत्ता ?” माझा ईललॉजिकल प्रश्न.

“कॉमर्स करते. थर्ड इअरला असेल.” हिरो.

औरंगाबाद, कॉमर्स आणि थर्ड इअर एवढ्या तुटपुंज्या इन्फॉर्मेशन वर हिरोईन शोधणं म्हणजे हिरोईक म्हणाव लागेल.

“अरे पण. . .” श्याम.

हिरो : ” बस, एकदा बघायचं आहे तिला, मग मी चालला जाईल.”

मी श्यामकडे, श्यामने माझ्याकडे आणि आम्ही दोघांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

एक लांब उसासा घेऊन, डोळ्यात पाणी आणून तो बोलला:

“तिच्या विना जगणं असहय झालं आहे. यापेक्षा मरण बर वाटते, श्याम. “

माझ्या तोंडून पटकन निघालं, ” म्हणजे, ईथनशिया ! ” 

श्यामरावांनी भिंगातून डोळे मोठे करून पाहिलं आणि मानेने ‘ नाही, नाही ‘ म्हणाले.

ईथनशिया ही भानगड हिरोला माहिती नसावी. त्यामुळे त्याला काही कळलं नाही.

” अबे, कैसे ढूंढेगा?” असा विचार करत मी झोपलो.

(हिरोईन):

मेस मध्ये भरपूर टीव्ही बघून आणि भरपूर जेवण करून ‘ सोनी सोनी अखियोंवाली ‘ आपल्या रूम मध्ये आली. 

वॉकमन काढला. 

मोहब्बतें ची नवीन आणलेली  कॅसेट टाकली. 

गाणं सुरू झालं:

” चलते चलते यूंही रुक जाता हूं मैं . . .” 

आणि ती आरश्या समोर येऊन थांबली. 

तिच्या मनात विचार आला, 

“मी शमिता शेट्टी सारखी कधी होईल?”

या विचारांत आरश्यासमोर बराच वेळ गेला आणि मग आपली हिरोईन वॉकमन कानाला तसाच लावून स्वप्नांच्या गावा गेली.

. . .

” दिवस दुसरा “

{ सकाळ }

(आम्ही):

मी आणि श्याम उठून जोशी मास्तरांच्या मॅथच्या क्लासला गेलो. 

श्यामराव गणितं सोडवत होते 

आणि मी आपल्या हिरोचं कोड. 

“कसं शोधेल हा ?”

आम्ही क्लासहून आलो. 

हिरो उठलेला होता. त्याला घेऊन चहा प्यायला आलो. 

माझा एकच प्रश्न, 

“कसं शोधणार?”

हिरो हसला आणि म्हणाला,

” औरंगाबाद मध्ये कॉमर्सचे कॉलेजेस फार नाही आहेत. 

सकाळी सुरू करायचं, एकेका कॉलेज मध्ये जायचं. 

थेट अडमिन डिपार्टमेंट. 

कॅशियरला तीच नाव आणि इअर सांगायचं. 

आणि सांगायचं,  तिचा रीलेटीव्ह आहे, तिची एक्झाम फीज भरायची आहे.

कॅशियर आधी नाव चेक करतो. 

नाव नसलं तर पुढचं कॉलेज.”

माझ्या हातातला चहाचा ग्लास निसटा निसटा वाचला.

(हिरो):

अंघोळ झाली. 

हिरो श्यामला म्हणाला, 

“यार, तिला ब्ल्यू शर्ट फार आवडतो. 

माझा हा शर्ट एनीवे मळला आहे. तुझा ब्ल्यू शर्ट दे.” 

श्यामरावांची इच्छा नव्हती. 

पण रात्रीचा  त्याचा ‘ईथनशिया’ आठवला असेल आणि त्यांनी आपला आवडता ब्ल्यू शर्ट काढून दिला. 

हिरोने आमच्या कडून विवेकानंद, देवगिरी अश्या कॉलेजेसचे पत्ते घेतले. आणि तो निघाला.

आम्हीही आमच्या कॉलेजला निघालो.

(हिरोईन):

सकाळी सकाळी ब्रश करत करत, आरशासमोर उभी. 

“मी शमिता शेट्टी सारखी कधी होईल? ” हा एकच विचार.

मग थेट मेस. 

चहा, बिस्किटे आणि ब्रेड ऑमलेट असा भरपेट ब्रेकफास्ट करून आपली शमिता आवरायला घेणार.

आपली एक्झाम फिज कुणीतरी आज भरणार आहे, याची तिळमात्र कल्पना ही नसतांना ही कॉलेजकडे निघणार.

.  .  .

” दिवस दुसरा “

{ दुपार }

तिसऱ्या कॉलेजमध्ये तीच नाव सापडलंय.

त्याने फीज भरलीय.

तोवर लंच टाईम झालाय.

तो एका झाडाखाली उभा आहे, तीच आवडतं ब्ल्यू शर्ट घालून.

मागे व्हायोलिन वर ‘हमको हमीसे चुरालो. . .’ वाजतय.

उगाच हवा जोरात वाहतेय.

आजूबाजूची वाळलेली पानं उडतायेत.

सगळं प्रचंड रोमँटिक झालं आहे.

मुलींचा एक घोळका, हसत खिदळत हॉस्टेलकडे चालला आहे.

आणि – आणि त्या घोळक्यात ती. तिच्याच नादात…

केसांची बट बोटाने हलकेच कानामागे करत.

सगळं स्लो मोशन मध्ये घडतंय.

हिरोचे हात अचानक शाहरुख सारखे दूर झालेत.

तिची नजर त्याच्या वर पडते.

याच व्हायोलिन आता जोरात वाजतंय.

आणि ती मनाशीच म्हणते,

” हे माकड इथं काय करतंय? “

आणि घोळक्यात पुन्हा विरून जाते.

इकडं, गाणं चेंज. 

” एक लड़की थी दिवानिसी, एक लड़के पे वो मरती थी…

कुछ कहेना था शायद उसको, जाने किससे डरती थी…”

. . .

{ दुपारच आहे अजुन }

(हिरोईन):

मेस मध्ये लंच चालू आहे. 

झालेला प्रकार तर ती हॉस्टेलच्या गेटवरच विसरली आहे. 

मनात एक विचार मात्र आहे,

“मी शमिता . . .? “

(हिरो):

परतीच्या प्रवासात. 

बसच्या खिडकीत.

पळती झाडे आणि बहरलेली शेतं बघतोय.

शेतात दूरवर कुठे तरी ती उभी आहे. रुसलेली.

तिचा आवडता, श्यामरावांचा ब्ल्यू शर्ट तसाच घालून हा पठ्ठ्या निघालाय…

(आम्ही):

मी लेक्चर मध्ये पेंगून बसलोय. 

भूक लागलीय, कदाचित!

श्यामराव एका मुद्द्यावर तावातावात डिबेट करतायेत,

“ईथनशिया इज नॉट एटऑल एथिकल ! ” 

इतर पोस्ट्स