रख्मा

(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

गडाचा डोंगर उतरत रख्मा एका झोपडी समोर येऊन थांबली. डोंगर कडावरची ती झोपडी पाहून तिला आज्जीची शेतातली झोपडी आठवली. लहानगी रख्मा झोपडी पुढे उभी राहून, “आज्जी! आज्जी! ” हाका मारायची. समोरची ही झोपडी बघून तिला, आज्जीला हाक मारून, मी गड उतरतांना वाट विसरली, हे ओरडून सांगावं वाटलं.

रख्मा गडावर दही विकायला येऊन आठवडाही झाला नव्हता. पहाटे गावातल्या बायकांसोबत ती दही घेऊन यायची आणि त्यांच्या सोबतच परत जायची. आज कॉलेजची पोरं तिच्या भोवती  टंगळमंगळ करीत दही विकत घेत होते. “तुम्ही व्हा पुढं.” पोरांच्या घोळक्यातून रख्मानं, घरी निघालेल्या सोबतच्या बायकांना सांगीतलं. शेवटी ती एकटीच मागे राहिली. डोंगर झरझर उतरत वाट चुकली आणि ती या झोपडी समोर उभी होती.  सूर्य डोक्यावर आला होता. घसा कोरडा पडला होता. थोडं पाणी मिळावं आणि घराकडची वाट विचारावी म्हणून तिने झोपडीचं मोडकळीला आलेलं दार आत ढकललं.

अंधारलेल्या झोपडीत, खाटेवर पडलेल्या, म्हातारीने मान वर करून पाहिलं. “आज्जी, पाणी मिळलं का?” घामाघूम झालेल्या रख्माने डोक्यावरची टोपली दाराबाहेर खाली ठेवत विचारलं. म्हातारीने खाटेहूनच झोपडीतला रांजण दाखवला. रख्माने गटागटा पाणी पीलं. म्हातारी खाटेवर उठून बसली. रख्माने तिचं बखोटं धरून तिला झोपडीच्या बाहेर आणलं. दारा जवळच्या दगडावर तिला बसवलं. म्हातारी बहुदा खूप दिवसांनी झोपडी बाहेर आली असावी. ती डोळे मीचीमीची करीत सगळीकडे बघत होती. टोपलीत उरलेल्या दह्याच्या छोट्या छोट्या मडक्या मधलं एक मडकं तिने म्हातारीला दिलं. एक स्वतः घेतलं. “आज्जी एकटीच राहते का?” दह्याचं मडकं संपवत रख्माने विचारलं. थरथरत्या हाताने दही खात म्हातारीने मान हलवली. 

झोपडी शेजारच्या बाभळीची सावली विरळ होती. डोंगराचा तो भाग रुक्ष होता.म्हातारीच्या दारातून गडाची तटबंदी दिसत होती. दोघी जणींना बोलण्या सारखं काही नव्हतं. पुढचा डोंगर, पाखरांची होणारी चपळ ये-जा, त्या दोघी बघत बसल्या. 

“मी गडावर दही घेऊन येते, रोज” आपली टोपली व्यवस्थित करीत रख्मा म्हणाली. “आज कालेजातली पोरं आल्ती. त्यानं उशीर झाला. घाई घाई मंधी वाट विसरली”  जणू लहानगी रख्मा आपल्या आज्जीलाच सांगत होती. आई वडिलांच्या मृत्यूनंतर आज्जीनेच रख्माला मोठं केलं. गड पायथ्याच्या छोट्याश्या गावात रख्माचं लग्न झालं. लग्न होऊन सहा आठ महिनेच झाले होते. या  दिवसांत तिला आज्जी कडे खूपदा जावं वाटलं. या म्हातारीला भेटून तिला आपल्या आज्जीला भेटल्या सारखं झालं. 

तिची माहेर सारखीच सासरची परिस्थिती बेताचीच. नवरा शेतावर कामाला. सासू गुडघे दुखीने घरीच. घराला हातभार म्हणून ती गडावर दही विकायला येऊ लागली होती. “गावातल्या बायकांसोबत जाणार आणि येणार असशील तरच जा”, सासूने या अटीवर हो म्हटलं होतं. ते आठवून रख्मा भानावर आली. 

“चला ! आता निघाया पाहिजे. कशी जाऊ?” टोपली डोक्यावर घेत तिने म्हातारीला विचारलं. म्हातारीने खुणेने बाभळी खालची वाट दाखवली. “येते!” रख्माने वळून म्हटलं. म्हातारी डोळ्यांनी हसली.

.  .  .

“उशीर केलास, पोरी?” दारात वाट बघत बसलेल्या सासूने आल्याआल्या विचारलं. “गडावर लई गर्दी व्हती” टोपली खाली ठेवत रख्मा म्हणाली. 

सासू ओसरीत जेवणाचे पानं मांडीत होती. “गडाच्या डोंगरावर झोपडी कुणाची हाय?” पाय धुताधुता रख्माने विचारलं. “देवकाची. . .” लांब उसासा टाकत सासू म्हणाली. दोघी जेवायला बसल्या.

“देवका तुझ्यासारखं गडावर दही विकायची. नवरा शेतावर काम करायचा. लहान मुलगा गावातल्या शाळेत होता. गडावर ज्या झाडाखाली ती बसायची त्या झाडावरच घुबड तिला एकटक बघायचं. घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणतात, म्हणून तिने दुर्लक्ष केलं. हळूहळू तिच्या मागे ते घरापर्यंत येऊ लागलं. घराच्या भिंतीवर ते रात्र भर बसून तिच्याकडे बघायचं.”जा रं बाबा, नको येऊ मागं.” ती घुबडाच्या मागे काठी घेऊन लागायची. ते फिरून येऊन बसायचं. पहाटे तिच्या मागे मागे गडावर जायचं. ती वैतागली. “का त्या पाखराच्या जीवावर उठलीस?” नवरा तिला चिडवायचा. नंतर नंतर तिलाही घुबडाचं वागणं अंगवळणी पडलं.” 

.  .  .

“एकदा, दह्याचे रिकामे मडके भरत, घराच्या भिंतीवर बसलेल्या घुबडाला ती लाडाने म्हणाली, “जा आता, उद्या ये!” तिचं घुबडाशी हे लाडिक बोलणं रस्त्याने जाणाऱ्या एकानं ऐकलं. गावात बातमी पसरली. ‘देवकानं रानातलं घुबड पाळलंय. घुबडाला हाताशी घेऊन ती काळी जादू करते.’ गावभर चर्चा होऊ लागल्या.”

“दरम्यान एका अज्ञात आजाराने गावातली दोन लहान मुलं मेली. आणि खापर देवकाच्या माथी फुटलं. तिचं घर जाळण्यासाठी सारा गाव उलटला. नवऱ्याने विनवण्या केल्या. लहान मुलाच्या आणाभाका घेतल्या. पण लोकं काही केल्या ऐकेनात. शिक्षा म्हणून गडावरच्या डोंगरावर एकटीला झोपडी बांधून देण्यात आली. तिला गावात प्रवेश बंद झाला.” 

“या प्रकाराने देवका एवढी घाबरली की ती डोंगरावरच्या त्या झोपडीतून बाहेरच पडेना.लहान पोराला सांभाळण्यासाठी तिच्या नवऱ्याने माझ्याशी लग्न केलं. आत राहून राहून शेवटी देवकाने झोपडीत खाटेवरच जीव सोडला. त्या दिवसानंतर ते घुबड ही गायब झालं.” सासूची गोष्ट संपता संपता अंधार पडला.

दह्याचे रिकामे मडके भरण्यासाठी रख्मा अंगणात आली. भिंतीवर बसलेल्या घुबडाला बघून लाडात म्हणाली, “जा आता, उद्या ये!”

रीलेटेड पोस्ट : पुरुषोत्तम

इतर पोस्ट्स