लांब डब्ब्या सारखं घर.
खिडक्या नाहीच. फक्त दारं.
पुढची रूम लिव्हिंग आणि बेडरूम. नंतर बाथरूम आणि किचन.
बसण्यासाठी, घरातल्या सगळ्या गाद्यांच वजन घेऊन वाकलेला कॉट.
एखादं स्टूल.
कपड्यांची गाठोडी.
अंथरूणचे थर.
हिरव्या निळ्या रंगाचे पोपडे आलेल्या भिंती.
काळं झालेलं छत.
जुने पेपर्स.
खुंटीला लोंबकळत कपडे.
बोर्डावर नेहमी साठी चिकटलेले मोबाईलचं काळं चार्जर.
एक कोपरा धरून बसलेला जुना टीव्ही.
देवघरात दाटीवाटी ने बसलेले पिवळे चकचकीत देव.
घरातल्या गृहिणीचं साम्राज्य असलेलं किचन.
छोटं, स्वच्छ.
फळीवर एका रांगेत बसलेली भांडी.
बाहेर नळावर बायकांची गर्दी.
समोरील घरातून डोकावणाऱ्या बायका.
गृहिणीने केलेला चहा.
कमी दुधाचा, जास्त साखरेचा.
नेमकेच चांगले कप.
कपाचा तुटलेला कान लपवत चहा पिणारा घरातला कर्ता पुरुष.
पाहुण्यांसोबत कधीही चहा न घेणारी गृहिणी.
दोन रुमच्या मधल्या दाराच्या चौकटीत एका बाजूस रेटून उभी.
पिकांच्या, पावसा पाण्याच्या गप्पा.
पापड, कुरडयाच्या गोष्टी.
मुलांची शैक्षणिक प्रगती.
चमकत्या डोळ्यांनी हसणारे चेहरे.
काही घरांमधली ऊब एवढी प्रसन्न करणारी असते की तिथून निघतांना आपण अंतर्मुख होतो.
आणि “पुन्हा या!” म्हणत ‘बाय‘ करायला आलेलं ते कुटुंब आणि छोटंसं घर आठवत राहतं.