मनोज वेरूळकर

11
(रीडिंग टाईम 3 मिनिटं )

फसलेला प्रयोग

साल १९६८.
थ्री एम कंपनीची लॅब.
डॉ स्पेंसर सिल्व्हर एक ‘सुपर स्ट्रॉंग अढेझिव्ह‘ म्हणजे अत्यंत चिकट पदार्थ बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करीत होते.
प्रयोगाच्या शेवटी जो अढेझिव्ह बनला तो लो-रेटचा होता.
म्हणजे, कुठल्याही पृष्ठभागाला तो हलकेच चिकटायचा पण काढतांना सहज निघूनही यायचा.
थ्री एम  मॅनेजमेंटच्या लेखी हा अढेझिव्ह कुठल्याही कामाचा नव्हता. त्यांनी हा प्रोजेक्ट बंद केला.

डॉ सिल्व्हर  जिद्दी माणूस .
हा अढेझिव्ह कुठेतरी वापरता येईल याची त्यांना खात्री होती.
पुढची पाच वर्षे डॉ सिल्व्हर आपलं हे सोल्युशन विदाऊट प्रॉब्लेम वेगवेगळ्या कॉन्फरन्स मध्ये लोकांना दाखवत राहिले.

१९७३ मध्ये त्यांचा सहकारी असणाऱ्या अर्थुर फ्रायने  डॉ सिल्व्हर यांचा सेमिनार ऐकला.
फ्राय चर्च मध्ये गाणी गायचा. गाणी म्हणतांना गाण्यांच्या पुस्तकात ठेवलेलं बुकमार्क सारखं खाली पडायचं. डॉ सिल्व्हरच लो-रेट अढेझिव्ह त्याने बुकमार्कला लावून पाहिलं. बुकमार्क सहज चिकटला आणि नंतर सहज काढताही आला.  युरेका !

डॉ स्पेंसर सिल्व्हर आणि अर्थुर फ्राय यांनी थ्री एम ला या प्रोजेक्ट वर पुन्हा काम करण्याची परवानगी मागितली. मॅनेजमेंटने  ती दिलीही.
दोघांनी बऱ्याच गोष्टींसाठी हे अढेझिव्ह वापरण्याचा प्रयत्न केला.
एकेदिवशी त्यांच्या लॅब समोर पिवळ्या रंगाचे स्क्रॅप पेपर्स पडले होते. त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला हा लो-रेट अढेझिव्ह लावण्यात आला.
आणि शेवटी १९७८ मध्ये जन्म झाला थ्री एमच्या सर्वात पॉप्युलर प्रॉडक्टचा - पोस्ट इट स्टिकी नोट्स.  

एक लो- रेट म्हणावल्या गेलेलं प्रॉडक्ट डॉ सिल्व्हर यांच्या जिद्दीने आणि अर्थुर फ्रायच्या डोळसपणाने जगासमोरआलं.
रातोरात व्हाइरल झालं.
लोकांनीही ते अक्षरशः डोक्यावर घेतलं.
प्रत्येक ऑफिस मध्ये दिसायला लागलं.
१९८० पर्यंत ते जगभर पसरलं.
आज पोस्ट इट  इनोवेशन साठीच टूल म्हणूनही वापरण्यात येतं.

स्टिकी नोट्सचं जगभरातलं मार्केट २३०० मिलियन डॉलर आहे.
त्यात एकट्या थ्री एमचा शेयर ७७% आहे.
वर्षाला थ्री एम ५० बिलियन म्हणजे ५००० कोटी पोस्ट इट नोट्स बनवते.

एक फसलेला प्रयोग ते एक पॉप्युलर प्रॉडक्ट हा पोस्ट इटचा प्रवास.

. . . 

दरवाजे

सकाळी घरातून निघालो.
दरवाजा उघडला.
सेफ्टी डोअर उघडलं.
लिफ्ट चं बटण दाबलं. लिफ्ट आली. दरवाजा उघडला.
मग गाडीचा दरवाजा …
असे किती दरवाजे आपण रोज उघडतो.
काही बंद असतात, तर काही सताड उघडे.
प्रत्येक ठिकाणी जातांना आपण कुठल्या तरी दरवाज्यातून आत जातो आपण .
प्रत्येक दरवाज्यात संधी असेलच असं नाही.
मुद्दा हा आहे की, दरवाजे खूप आहेत, संधी कुठेनाकुठे मिळेलच. 

.  .  .

ऑपनहाइमर

गोल्डन ग्लोब मुळे ऑपनहाइमर पुन्हा चर्चेत आला.
या चित्रपटाच्या सिनेमॅटिक एस्पेरीयेंसच फार कौतुक ही झालं. मिळालेल्या पाच गोल्डन ग्लोबने ते अधोरेखित झालं.
विशेष कौतुक आहे ते ख्रिस्तोफर नोलन चं.
दर वेळी काहीतरी नवीन आणून प्रेक्षकांना हा गडी तृप्त करतो.
आपलं वेगळं पण त्याला सिद्ध करण्याची गरज नाही.
पण ते ऑस्कर मिळवणं राहिलय बघा.
कधी देणार आहात तुम्ही नोलनला ऑस्कर?

आता पर्यंत पाच नॉमिनेशन झालीत! 
डंकर्क साठी बेस्ट डायरेक्टर,
मेमेंटो आणि इन्सेप्शन साठी बेस्ट राईटर,
डंकर्क आणि इन्सेप्शन साठी बेस्ट प्रोडूसर.
ऑपनहाइमरच्या रूपानं नोलनच्या पदरात ऑस्कर पडावं एवढीच आम्हां भोळ्या फॅन्सची ईच्छा.

इतर नोट्स


इतर पोस्ट्स

12
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

लाईफ कॅलेंडर

आपण साधारण ऐंशी वर्षे जगतो असं समजूया. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक वर्ष जर एका डॉट ने मांडलं. तर आपलं आयुष्य साधारण खाली दाखवल्या प्रमाणे दिसेल. जेवढी वर्षे आपण पूर्ण केली तेवढे डॉट भरीव. जेवढे वर्षे राहिली तेवढे डॉट पोकळ. खाली दाखवलेलं कॅलेंडर माझं आहे. तुम्ही तुमचं प्लॉट करून बघा. 

उरलेले पोकळ डॉट्स काय सांगतायेत? एवढी वर्षे साधारण तुमच्या हातात आहेत. यातले किती वर्षे तुम्ही अॅक्टिव राहणार आहात? आणखी किती असे वीकेंड आहेत तुमच्या कडे? आणखी किती वेब सिरीज आणि मुव्हीज बघणार आहात? आणखी किती पुस्तकं वाचणार आहात? आणखी किती वेळा बाहेर फिरायला जाणार आहात? आणखी किती वेळा जुन्या मित्रांना भेटणार आहात? आणखी किती वेळ आई वडीलांसोबत, मुलाबाळां सोबत घालवणार आहात? आणखी किती वर्षे एखाद्या बद्दलचा राग मनात धरून बसणार आहात? आणखी किती दिवस कुणाचीतरी मर्जी सांभाळत बसणार आहात? आणखी किती वर्षे हा नाईन टू फाईव वाला जॉब करणार आहात? आणखी किती दिवस तुम्हाला आवडणारं काम टाळणार आहात?

वर्षाच्या सुरुवातीला हा विचार करून बघा. कदाचित, लाईफकडे बघण्याचा नवा परस्पेक्टिव्ह गवसेल.

हा विचार पहिल्यांदा मांडला तो टीम अर्बन नावाच्या व्यक्तीने. त्याचा यावरचा पोस्ट दी टेल एंड तुम्ही वाचू शकता.

.  .  .

मेट्रो

परवा मेट्रोने गेलो. खिडकीतून एक नवीनच शहर बघतोय असं वाटलं. आपलं शहर आपल्याला प्रत्येक टप्प्यावर वेगळं दिसतं.
आधी पायी चालतांना वेगळं वाटायचं. नंतर सायकलवर वेगळं ! मग सिटी बस मधून वेगळंच दिसलं शहर.  टू व्हीलरवर अनुभवलेलं तरुण शहर वेगळं.  कारमधून दिसणारं शहर वेगळं.  आणि मेट्रोतून वरून दिसणारं शहर वेगळं.

गोष्टीपासून आपलं अंतर वाढत गेलं की त्याबद्दलची आपली भावना बदलत जाते.

.  .  .  

वर्ल्ड

लिव दी वर्ल्ड बिहाईंड‘ नावाचा सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे. एक चौकोनी कुटुंब वीकेंडसाठी शहरापासून, जगापासून दूर एका मोठ्या घरात राहायला येतात. 

मध्यरात्री एक वक्ती आपल्या टीनएजर मुली सोबत त्यांच्या दारावर येतो. या घराचा तोच मालक आहे असं सांगतो. शहरात ब्लॅक आऊट झाला आहे आणि आजची रात्र आम्हाला इथे राहु द्या अशी विनंती करतो. त्यासाठी तो रग्गड रक्कम ही देतो. 

तिथून एक एक घटना घडायला सुरू होतात. संपूर्ण जगात काहीतरी भयंकर घडतंय आणि आपण एकतर सेफ आहोत किंवा अडकलो आहोत या मनस्थितीत ही सहा लोकं पर्याय शोधू लागतात.

स्टोरी सांगण्याची पद्धत धरून ठेवणारी. सिनेमॅटोग्राफी अमेझिंग. मुव्हीचे हायलाईट म्हणाल तर, ज्युलिया रॉबर्ट्सची अॅक्टींग आणि प्रोड्यूसर्स आहेत, मिशेल आणि बराक ओबामा !

इतर नोट्स


इतर पोस्ट्स

13
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

त्याच्या चित्रांमध्ये  नेहमी एक छोटीशी स्टोरी असते. कपल मधला एखादा मोमेंट, नवरा-बायको मधलं  संभाषण, लेट-नाईट थॉटस, अर्ली-मॉर्निंग मेडीटेशन्स, पोरांचा दंगा, फॅमिली पिकनिक, वगैरे वगैरे. त्याची चित्रं कमालीची सिंपल असतात. 

‘पास्कल कॅम्पीयोन‘ (Pascal Campion) नावाचा हा आर्टिस्ट मी फेसबूकच्या अगदी सुरुवातीच्या काळापासुन फॉलो करतो.

त्याच्या चित्रांमधे  एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे चित्रं काढतांनाची त्याची कमालीची बेफिक्री. आपण काढलेला हात, हातासारखा दिसत नाही किंवा डोळा, डोळ्यासारखा दिसत नाही याचा तो फारसा विचार करत नसावा. परफेक्शनचा कुठलाही अट्टाहास नाही. त्याचं लक्ष असतं ते रंगांकडे आणि लाईटकडे. त्यामुळे, त्याच्या चित्रांमधला फ्रेशनेस उठून दिसतो. 

सोशल मीडियावर अशी छोटी छोटी चित्रं काढण्याखेरीज हा व्यक्ती काय करत असावा, असा प्रश्न मला नेहमी पडतो. अर्थात तो कन्सेप्ट आर्टिस्ट आहे. बऱ्याच अनिमेशन मुव्हीजसाठी कन्सेप्ट तयार करण्याचे काम तो करतो.

कमालीची सजेस्टिव आणि मिनीमल चित्रं काढणारा हा बिनधास्त व्यक्ती आळशी मात्र नक्कीच नाही, उलट तो गेली बारा ते तेरा वर्ष रोज न चुकता एक चित्र पोस्ट करतो. एवढी वर्ष सातत्याने चित्रं काढणे आणि शेअर करणे म्हणजे कमालच आहे, नाही का?

प्रश्न हा आहे की, सोशल मीडिया पर्यंत ठीक आहे, पण हा गडी आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्येही असाच बिनधास्त असेल का?

तो रोज काढत असणारी चित्रं त्याला तसं घडवत गेली, की तो जसा आहे तसा चित्रांना घडवत गेला? 

काहीही असो,  त्याच्या इनपरफेक्शन मध्ये एक वेगळीच मजा आहे.

त्याच्या चित्रांची झलक तुम्ही येथे बघू शकता-

पास्कलचं फेसबुक

पास्कलचं इंस्टाग्राम

इतर पोस्ट्स

14
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

आपण करत  असलेलं  काम, आणि  त्यातुन मिळणारा पैसा  या दोन अगदी वेगळ्या गोष्टी  आहेत.  

काम नवीन, यूनिक किंवा रिपेटेटिव्ह  असु  शकतं.  पण पैसा हा ऊर्जे प्रमाणे आहे, कायमस्वरूपी.  

तो फक्त  याच्याकडुन त्याच्याकडे  फिरत राहतो. कुणाकडे  कमी तर  कुणाकडे अधिक !

इतर पोस्ट्स

15
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

२००३ ते २०२३.

काल सगळे वीस वर्षांनी भेटलो.

आपल्यामधून वीस वर्ष गेलीत म्हणून ऑकवर्डनेस नाही आला. गळ्यात भेटताना, वाढलेली पोटं मात्र आडवी आली.

एवढ्या वर्षांनी भेटल्यावर काय वाटतं हे अजुन प्रोसेस होतंय. 

मीनव्हाइल, कालच्या दिवसातले काही टेक-अवे :

  • ज्यावेळी जे घडायला पाहिजे ते घडणे, म्हणजे ‘सक्सेस‘.
  • काय अचिव्ह केल्यानंतर थांबायचं हे कळलं, म्हणजे ‘हॅपिनेस‘.
  • “कशा साठी हे सारं?” हा विचार सुरू झाला की येतो,  तो फेज म्हणजे ‘मिडल-एज क्राईसेस‘.
  • ज्या दोन गोष्टींमुळे आपण येथे आहोत त्या म्हणजे आई-वडील आणि कॉलेज.  या दोघांसाठी काही तरी करणं म्हणजेच ‘गिव्ह-बॅक‘.
  • पोस्ट,पद, सक्सेस सगळं एका लेव्हलला आणणारं रिलेशन म्हणजे ‘क्लासमेट‘.
  • कॅपासिटी असुनही ओपोरच्युनिटी न भेटलेल्या आपल्या क्लासमेटला मदत करता यावी म्हणून बनतात ते, त्या बॅचचे ‘ग्रुप‘.
  • “आर यू हॅपी?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केलेली धडपड म्हणजे ‘रियुनियन‘.

इतर पोस्ट्स

16
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

आज्जी. सुबक, ठेंगणी, गोड. रंगबिरंगी फुलं असलेला पांढरा सलवार. पायात पिंक स्पोर्ट्स शूज. डोळ्यांवर काळा गॉगल. वाऱ्यावर उडणारी केसांची पांढरी शुभ्र लट. फूटपाथच्या वळणावर, झाडाच्या सावलीत फोनवर कुणाशी तरी बोलण्यात मग्न.

त्याच फूटपाथवर, समोरून येणारे एक आजोबा. सडसडीत बांधा. अंगात पांढरा इस्त्री केलेला शर्ट. निळ्या रंगाची पँट. कॉलरच्या खाली एक रंगीत रुमाल घडी करून लावलेला. पायात कापडी शूज. वरच्या खिशात छोटासा मोबाईल, डायरी, पेन वगैरे. केसांचा देव आनंद सारखा कोंबडा काढलेला. क्लीन शेव. काळ्या फ्रेमचा चष्मा. हातातली कापडी पिशवी मिरवत आजोबा चाललेले.

वळणावर उभ्या असलेल्या आज्जींकडे त्यांचं लक्ष जातं आणि चालण्यात अचानक तरतरी येते. आधी, हातातली कापडी पिशवी खिशात. फूटपाथ वर डोकावणाऱ्या फुलझाडाची एक लहानशी फांदी ते अलगत हिसका देऊन तोडतात आणि ती फांदी हातात मिरवत ते आज्जीच्या दिशेने चालायला लागतात. हवेची छोटीशी झुळूक फांदी आणि आजोबा दोघांना सुखावून जाते. क्षणभर घरचं आपलं वादळ ते विसरतात. तुरूतुरु चालत आजोबा आज्जीला क्रॉस झाले. दोघांची नजरानजर झाली. आज्जी गोड हसल्या. आजोबांच्या मनात देव आनंदच गाणं सहज तरळून गेलं असेल -

मिल ही जाती हो तुम, मुझको हर मोड़ पे.
चल देती हो कितने, अफ़साने छोड़ के.
ख़्वाब हो तुम या कोई हक़ीक़त, कौन हो तुम बतलाओ.
देर से कितनी दूर खड़ी हो, और करीब आ जाओ.

इतर पोस्ट्स

17
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

जुलै २००३.

संध्याकाळ.

पाऊस कोसळतोय.

ओलं वातावरण. 

रेल्वेचा गजबजलेला फलाट.

लोकांचा कलकलाट. 

इंजिनाचे सुस्कारे.

गाड्यांच्या अनाउन्समेंट

एका डब्या जवळ, खिडकीचे गज घट्ट पकडून उभा मी.

डब्यात मोस्टली अंधार. 

आत प्रवाशांची हळूवार हालचाल.

ती. 

खिडकीत बसलेली. 

स्वतःत रमलेली.

“चल”, तिचा अगदी सहज अलविदा.

मी हो म्हणून मान डोलावली.

मोठ्ठा सुस्कारा सोडत गाडी मागे-पुढे झाली. 

“कधी ये माझ्या गावी” ती.

माझी पावलं आणखी खोल आत रुतली.

कॉलेज संपून महिना झालाय.

पैशांची चणचण आहे तशीच आहे.

नोकरीची शोधाशोध सुरू आहे.

पहिली मिळेल ती नोकरी धरू.

थोडे पैसे गोळा झाले की जाऊ, तिच्या गावी.

गाडीने पुन्हा सुस्कारा टाकला आणि निघाली.

भानावर येऊन, मी केविलवाणं हो म्हटलं.

गजबजलेल्या रेल्वेच्या फलाटाहून मी आयुष्याच्या फलाटावर निघालो.

.  .  .

इंटरव्ह्यू वर इंटरव्ह्यू.

हे ऑफिस, ते ऑफिस.

पांढरा शर्ट. फाईल. रेझुमी.

वडापाव. 

नवा दिवस. 

नवा इंटरव्ह्यू. 

तोच नकार.

या गावात नोकरी मिळणार नाही हे कळायला सहा महिने लागले.

पुण्यात कुठली तरी मोठ्ठी कंपनी इंजिनिअर शोधतेय अशी जाहिरात पाहिली.

आजचंच तिकीट काढलं. 

संध्याकाळची ट्रेन. 

वडापाव खाल्ला.

गाडीत बसलो.

खिडकीतल्या थंड हवेत डोळा लागला.

दहा वाजलेत साधारण. 

गाडी करकर करत थांबली.

स्टेशनावर कुठे चहा मिळतोय का म्हणून मी खिडकीतून बाहेर डोकावलो.

एक दोन प्रवासी उतरलेत. 

काही हमाल धावले. 

बाकी फलाट, स्टेशन शांत. 

निर्मनुष्य.

दूरवर अंधारात, गावाचं नाव सांगणारा पिवळा बोर्ड.

तिचं गाव!

ध्यानात आलं, तोवर गाडी निघाली.

अंधारात गुडूप होऊन शांत झोपलेलं गाव.

दूरवरच्या कुण्या मंदिरातून कानी येणारे भजनाचे स्वर.

आपण कधीही न गेलेल्या गावातील रस्त्यांवर फिरणारे माझं मन.

आणि

मनात गुदमरणारी सुरेश भटांची जुनी कविता :

‘ दुःखाच्या वाटेवर, गाव तुझे लागले,

थबकले ना पाय जरी, हृदय मात्र थांबले.

वेशी पाशी आर्त, हाक तुझी ऐकली,

अन् माझी पायपीट, डोळ्यांतून सांडली. ‘

त्या अंधारात गाव, गाडी, सगळ्या आठवणी आणि मी विरून गेलो

सकाळ झाली.

पुणे आलं.

. . . 

जुलै २०२२

पुणे पुरतं आपलंस झालंय आता.

बाहेर पाऊस कोसळतोय.

स्पॉटीफायवर संदीप खरेची कविता चालु आहे,

‘गाडी सुटली, पडले चेहरे, 

क्षण साधाया, हसरे झाले ‘

रीलेटेड पोस्ट : चहाची टपरी

18
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

‘रेनॉल्ड्सच्या‘ पेनची तर क्रेझ होती तेव्हां. 

निळ्या टोपणाचं, पांढरं शुभ्र असं हे पेन वर्गात सगळ्यांकडे असायचं. त्यावेळी पेनचं असं डिझाईन एकदम नवीन होतं. 

त्या आधीचे पेन म्हणजे अगदी सुमार. निळी आणि लाल रीफिल एकत्र असणारे. जाडे भरडे. कुठलीही रीफिल टाका. चालायचे बिचारे. रीफिल संपायला आली की जास्त शाई सोडायचे. घट्ट शाईचे ठिपके वहीवर पडायचे. रेनॉल्ड्सच्या पेनने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. 

शिवाय, रेनॉल्ड्सची जाहिरात थेट टीव्ही वर यायची. हा पेन इंग्लंडहून भारतात आलाय वैगेरे, वैगेरे. 

तशी, पेन बाहेरून भारतात येण्याची प्रथा जुनी असावी. 

'मेड इन चायना' असं बारीक अक्षरांत लिहिलेलं, गोल्डन टोपणाचं, 'हिरो'चं पेन मिळायचं. बाकी पेन पेक्षा हे पेन महाग. हे पेन म्हणजे स्टेटस सिम्बॉल! वरतून  फाऊंटन पेन.  त्यामुळे हे वापरणाऱ्याचं अक्षर पण सुरेख दिसायचं. 

त्यावेळी मिळणारे, साधे फाऊंटन पेन डोक्याला ताप आणि हाय मेंटेनन्सवाले असायचे. सांभाळून ठेवावे लागत, नाही तर कुठे शाई टपकेल नेम नाही. 

'हिरो'चं पेन मात्र छान होतं. कधी जास्त शाई सोडायची नाही की काही नाही. महाग असल्याने, वर्गात अगदी एक दोघांकडे अशी पेन असायची. 

आम्ही बाकी सगळे, रेनॉल्ड्स वाले! 

लक्झरचं एक पांढऱ्या रंगाचं पेन होतं. त्याला स्टीलची गोल, एक छिद्र असणारी निप असायची. शाई किंवा रिफिल टाकण्याची सोय नव्हती. शाई संपली की पेन फेकून द्या. 

ही म्हणजे, त्या वेळी फारच चैनीची वस्तू असल्यासारखी होती. शिवाय त्या पेन ची शाई पण जरा वेगळ्या रंगाची होती. ना धड निळी ना हिरवी. त्यामुळे असं पेन जर मध्येच संपलं तर वांदे व्हायचे. काही हौशी मंडळी परीक्षेसाठी असे पेन वापरायची.  

पुढे, संपूर्ण काचाचे असावेत असे, पारदर्शक रोटोमॅक्स, मोंटेक्स, सेलो या कंपन्यांचे पेन आले. ते ही भरपूर चालले. रोटोमॅक्सच्या तर टीव्ही वरील जाहिराती प्रचंड फेमस झाल्या. 

कॉलेजात येईपर्यंत रेनॉल्ड्सचं 'जॉट्टर' नावाचं पेन आलं. 

परत तसचं, सगळ्यांकडे तेच पेन ! 

मग हळू हळू 'जेल' पेन आले. अगदी स्मूथ. अक्षर चांगलं यायचं या पेननी. परीक्षेला हमखास हे पेन वापरले जायचे. जेल पेन तर अजुन ही मार्केटमध्ये चालतातेत.


वेगवेगळ्या पेनने लिहिलेले पेपर, चेक करणारे मास्तर मात्र साधेच पेन वापरायचे. दोन रिफिलवाले. जाडे भरडे. भडक रंगाचे. 

शर्टाच्या वरच्या खिशाला लावलेलं अगदी जुनं पेन. एक छोटी डायरी. चष्म्याचं लेदरचं पाकीट. असं सेम सेटअप असणारे वेगवेगळे सर मला अजुनही आठवतात.


'कुठलं पेन वापरायचं?' या बाबतीत माझं कन्फ्युजन अजुनही कायम आहे. त्यामुळे, फेवरेट पेन कुठलं? असं पटकन सांगता येत नाही. 

परवा, लॅमीचं चकचकीत पेन घेतांना हे सगळं आठवलं. 

नशिबाने आता पेपर लिहावे लागत नाहीत. परीक्षा मात्र रोज असते, खिशाला पेन असो की नसो.

रीलेड पोस्ट : सायकलचं दुकान

19
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

रस्त्याच्या कडेला, एखादं मोठ्ठं झाड बघून, त्याच्या सावलीत हे छोटंसं  दुकान मांडलेले असायचं. 

झाडाच्या बुंध्याजवळ मोठी लाकडी पेटी. तिच्या कॉर्नरवर टयुबच्या रबराचे तुकडे खिळ्यांनी ठोकलेले. चाबीची गरज नसलेलं जुनाट कुलूप. 

झाडावर एक-दोन देवांचे फोटो ॲडजस्ट करून बसलेले. त्यांना कुंकवाने लालबुंद केलेले. त्यांच्या आजूबाजूला अगरबत्तीच्या काड्या खोचलेलेल्या. वर एखादं वाळलेलं फुल.

पेटीच्या बाजूला बसण्यासाठी गुळगुळीत झालेला एक लांबलचक दगड. त्यावर रोज येणारा, एखादा लोकल पेपर.

झाडाच्या खुंटीवर डब्याची वायरची पिशवी आणि काळ्या कव्हर मधला रेडिओ अडकवलेला. 

दुकानाच्या मालकाला, काम करतांना बसण्यासाठी लागणारं, एक छोटंसं पत्र्याच वेडवाकडं स्टूल. 

पिवळा, लाल रंग दिलेले हवा भरण्याचे दोन-एक पंप. 

पंक्चर काढण्यासाठी गढूळ पाण्याने भरलेलं एक मोठं टोपलं. त्यात झाडाची पानं निवांत पडलेली.

आजूबाजूला, जुन्या ट्युबचे कापलेले तुकडे. ते घासण्यासाठी लागणारी कानस. वेगवेगळ्या आकाराचे आणि लांबीचे पान्हे. पंक्चर चिटकवण्यासाठी लागणारे लोशनचे पिवळया रंगाचे ट्यूब्स असं बरंच सामान इकडे तिकडे पडलेलं.

मालकाला कंपनी म्हणून एखादा मित्र नेहमी  पेपर चाळत बसलेला.

दिवसभर सायकलच्या ऑईलने हात काळेशार करणारा, या दुकानाचा मालक, कपडे नेहमी पांढरे शुभ्र घालायचा. 

येणारी प्रत्येक सायकल हवा भरून, ब्रेक्स टाईट करून, ऑईल पाणी टाकून तरतरीत करून द्यायची हे त्याच्या जीवनाचं एकमेव ध्येय.

अश्या दुकानावर सायकली तासाप्रमाणे भाड्याने मिळायच्या. त्याचं एक रजिस्टर असायचं. त्यात आपलं नाव, सायकलचा नंबर, आणि वेळ लिहून सायकल घेऊन जायची. 


त्या दुकानाच्या मातीत पडलेले बेयरिंगचे पडलेले छोटे-छोटे छररे, ट्युब्यच्या नोझलची काळी झाकणं गोळा करणे हा माझा आवडता उद्योग. 

पुढे आयुष्यात काहीच केलं नाही, तर असं सायकलचं दुकान तरी टाकू हे माझं ठरलं होतं.


एखाद्या दुपारी, रखरखत्या उन्हात, थोडं थांबावं म्हणून अश्या दुकानावर सायकल लावावी. स्वतः पंप घेऊन हवा भरावी. रस्त्याच्या कडेला, त्या शांत सावलीत, पेपर चाळत बसावं. 

आणि झाडाला अडकवलेल्या रेडीओवर सुरेल गाणं चाललेलं असावं, "याद किया दिलने. . . कहां हो तुम. . ."

रीलेटेड पोस्ट : चहाची टपरी

20
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

शहरातला रोबोट एकदा गावात येतो.

सुख म्हणजे काय? माझ्याकडे बघा म्हणतो.

.  .  .

गावातला गडी, शेतातून दमून आलेला - मातीत खेळून आलेला.

रोबोटची 'थ्री फोर्थ' बघून, आपले कपडे झटकतो.

.  .  .

खाट टाकून तो अंगणात पडतो - चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली.

मोबाईलच्या उजेडात चमकणारा रोबोटचा चेहरा, त्याला भोवतालचा अंधार दाखवतो. कूस बदलून, तो डोळे मिटतो. अंधारातच.

.  .  .

पहाट होते.

बायकोने बांधलेली भाकरी घेऊन तो शेतावर निघतो.

रोबोट झोपलेला पाहून तो हसतो - गालातल्या गालात - स्वतःच्या टायमिंगवर.

.  .  .

सूर्य डोक्यावर येता येता, रोबोट उगवतो.

पोहे खातो - कॉफी पितो - मोबाईल खेळतो.

.  .  .

साइट सीईंग म्हणून शेतावर येतो.

खळखळ पाणी शेतात सोडून, गडी झाडाखाली निवांत बसलेला.

रोबोट, आपल्या मोबाईल मध्ये टिपतो - हिरवा रंग - गड्याच्या आयुष्यातला.

.  .  .

दोघं भाकरी खातात - झाडाखाली - गर्द सावलीत.

गडी पुन्हा मातीत. 

रोबोट मोबाईलमध्ये.

.  .  .

आपल्या चाकाच्या बॅग्स घेऊन रोबोट निघतो.

आज शेतातलं पाणी सोडून, गडी त्याला सोडायला जातो - चाकाची बॅग, डोक्यावर घेऊन.

शहरातला रोबोट एकदा गावात येतो.

रीलेटेड पोस्ट : मिस्ड कॉल

इतर पोस्ट्स