मनोज वेरूळकर

21
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

'सुख' दोन व्हॅरियंट मध्ये येतं.
बेसिक आणि प्रीमियम.


‘खाईन तर तुपाशी' म्हणत प्रीमियमच्या मागे लागलं की, वेळ लागतो.
'काय फरक पडतो?' म्हणून बेसिक आपलंस केलं की, त्याची सवय लागते. 


‘वेळ लावायचा' की 'वेळ मारून न्यायची' हे ज्याचं त्यानं ठरवावं. 


बेसिक मधून प्रीमियम मध्ये शिफ्ट झालं की, उरलेल्या बेसिक गोष्टी नकोशा वाटायला लागतात. मग 'अपग्रेड' होण्याची धावपळ सुरू होते. आणि, हातात आलेलं छोटंसं प्रीमियम सुख उपभोगायचं राहून जातं.

तसंही, सगळ्या गोष्टी प्रीमियम होत नाहीत. आणि नेहमीसाठी बेसिकही राहत नाहीत.

इतर पोस्ट्स

22
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

१.

"सॉरी, कॉल मिस झाला." मी

"हरकत नाही."

"अरे! अर्जंट काम होतं, तू बिझी आहेस का?" मीच

- आता काय अर्जंट काम आहे  -

"कॉल का नाही उचलला . . .?" 

"मी दुसऱ्या रूम मध्ये होतो."

"फोन सायलेंट वर होता."

"बाहेर होतो."

"करणारच होतो."

"कॉल लागत नव्हता." मी

"हा नेहमीच काहीतरी कारणं देतो" 

"कामाच्या वेळी टाळाटाळ करतो"

"बाकीचे पण उचलत नाहीत की, फोन" मी

" त्याचं एवढं अर्जंट नसतं रे, तुझ्या वर जबाबदारी आहे." मीच

- फार कटकट आहे, यार याची -


२.

"सॉरी, कॉल मिस झाला." मी

"अरे, मी कॉल केला होता. थोडा वेळ आहे का?" मीच

- म्हणजे, गेला आता पूर्ण दिवस. सगळं घोड्यावरच पाहिजे -

"हो, बोला !" मी

"नाही. तसं नको करायला. आपला खूप वेळ जाईल." मी

"अरे, पण हे करावंच लागेल. (तुझं काम आहे. तू करायलाच पाहिजे)" मीच

- मी नाही करणार. जा! जे करायचे, ते करून घ्या!! -

"ओके. पण आता नको करायला. पुढे बघू" मी

" नाही. उरकून टाकूयात. पुन्हा प्रश्न नको.' मीच

- जाऊ दे! संपवून टाकू एकदाचं. -


३.

"सॉरी, कॉल मिस झाला." 

"फोन जवळच ठेवायला पाहिजे"

"उगाच भडका भडकी नको"

"रिंग टोन मोठी ठेऊ का?"

"खूप मोठी आहे आपली रिंग टोन. इरेटेतींग आहे. बदलू का?"

"अक्च्युली, फोनच बदलायला पाहिजे"

"नवीन फोन नाही लाँच झाला, इतक्यात."

"तो एक चांगला आहे, की! परवा पाहिला तो."

"एवढा महाग नको."

"तसंही, आपल्याला कशाला हवाय फोन."

इतर पोस्ट्स

23
(रीडिंग टाईम 8 मिनिटं )

बस, स्टँडवर उभी राहिली. रेगेंनी खिडकीतून बाहेर पाहिलं. बसने उडालेल्या धुराळ्यात, लोकांचे लोंढे बसच्या दाराशी येत होते.

उतरणारे - चढणारे दारात दाटी करू लागले. एका हाताने खांद्यावरची बॅग सांभाळत, दुसऱ्या हाताने चढणाऱ्यांना मागे रेटत, रेगे खाली उतरले. फलाटावर उभ्या असलेल्या बसेस खचाखच भरत होत्या. स्टँडच्या गेटवर उभे असलेले ऑटोवाले ओलांडून, रेगे रस्त्याला लागले. मार्केट मधल्या एका साधारण लॉज वर ते थांबले. रस्त्या पलीकडे असणाऱ्या छोट्या हॉटेलात दुपारचं जेवण केलं. लॉजवर जाऊन पडल्यापेक्षा, गावात फेरफटका मारावा म्हणून ते निघाले.

गावा शेजारच्या जंगलात कोळसा सापडला. कोळश्यासाठी खाणी खोदण्यात आल्या. थर्मल पॉवर प्लांट आला. खाणीत काम करणारे मजूर, प्लांट मध्ये लागणारे कामगार, ठेकेदार, इंजिनीयर सगळे या गावात राहायला आले. मजुरांच्या वस्त्या झाल्या. कॉलोनी झाल्या. जंगलात, आजूबाजूच्या खेड्यात राहणारे आदिवासी खाणीत काम करायला आली. गाव वेगानं वाढलं. खाणींचा पसारा वाढत गेला. जंगलं झपाट्याने कापली गेली. 

अलीकडे, पर्यावरण प्रेमी लोकांनी आंदोलनं केली. मोर्चे काढले. धरणे धरली. शेवटी, खाणी बंद पडल्या. पर्यायी, थर्मल पॉवर प्लांट ही बंद करावा लागला. प्रचंड प्रमाणात गावात आलेली मजुरांची फौज, बेरोजगार झाली. लोकं आपल्या गावी परतायला लागली. पुन्हा मोठ्ठं स्थलांतर सुरू झालं. वस्त्या रिकाम्या झाल्या. मार्केट ओसाड पडलं. जत्रा उठून गेल्या सारखी गावाची आता अवस्था होती. पॉवर प्लांट मुळे हवेत असणारा कोरडेपणा आणि जळका वास रेगेंना फिरताना जाणवत होता. प्लांट चे उंच दोन कुलिंग टॉवर्स खिन्नपणे गावाकडे बघत होते.  पुन्हा खाणी सुरू होतील या आशेवर काही लोकं मागेच थांबली. चौकाचौकात, अशी रिकामी मंडळी घोळके करून बसली होती.  संध्याकाळ होईस्तोवर रेगे लॉजवर परतले.


दुसऱ्या दिवशी, सकाळीच, लोकेशनचे कोऑर्डीनेटस् लिहिलेली, छोटी डायरी घेऊन रेगे निघाले. डायरीत लिहिलेले लोकेशन शोधत, गावाबाहेर, टेकडीच्या पायथ्याशी, एका बंद खाणी जवळ ते थांबले. 

पी एच डी झाल्यापासून कॉलेज मधली मटेरियल टेस्टिंगची लॅब रेगेकडे होती. विविध मटेरियलची ताकद मोजण्याची कामं तिथे केल्या जात. जुन्या इमारती, पूल, पाण्याच्या टाक्या यांची उरलेली लाईफ आणि ताकद सुध्दा रेगे मोजून देत. तोडफोड न करता जुन्या गोष्टींची ताकद मोजण्यात त्यांचा हातखंडा होता. या विषयावर त्यांचे तीन चार प्रबंध ही प्रकाशित झाले होते. गेली पंधरा वर्षे ते या कामात सतत व्यस्त होते. 'अर्थक्वेक इंजिनीयरिंग' म्हणजे भूकंप शास्त्र मध्ये त्यांची पी एच डी होती. या विषयावर त्यांना संशोधन करायचं होतं. पण कामाच्या व्यापात राहून गेलं. काही वर्षा पूर्वी त्यांनी लॅब मध्ये एका कोपऱ्यात खोल खड्डा करून त्यात 'सिस्मोग्राफ' बसून घेतला होता. सिस्मोग्राफ भोवतालच्या जमिनीत होणाऱ्या हालचाली नमूद करून ठेवतो. सभोवताली बसणारे भूकंपाचे धक्के त्यावर नोंदवले जातात. 

काही दिवसांपासून या गावाजवळ सौम्य भूकंपाचे धक्के सिस्मोग्राफवर नोंदवल्या गेले. खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे सुध्दा भुकंपासारखे धक्के जाणवतात. पण अलीकडचे हे धक्के, खाणीतल्या स्फोटांमुळे नक्कीच नव्हते. शिवाय खाणीतील कामं सुध्दा बंद होती. या धक्क्यांचा 'इपि सेंटर' म्हणजे केंद्र बिंदू सारखा-सारखा एकच येत होता. त्यामुळे त्याचे कोऑर्डीनेटस् घेऊन रेगे या गावात आले होते. या धक्क्यांच कारण कळालं तर भविष्यात येणारा मोठ्ठा भूकंपाचं भाकीत आधीच करता येईल. शिवाय या विषयावर एखादा प्रबंध इंटरनॅशनल पातळीवर प्रकाशित करता येईल, असा रेगेंचा विचार होता. "सर, इकडे कुठे?" बंद खाणीच्या तोंडाशी विचारात उभे असलेले रेगे या प्रश्नानी भानावर आले. 

टेकडी उतरत प्रकाश त्यांच्या दिशेनं येत होता. प्रकाश. रेगेंचा जुना विद्यार्थी. आता पॉवर प्लांट मध्ये इंजिनिअर आहे. प्लांट बांधकामाच्या वेळी, बऱ्याचदा तो मटेरियल टेस्टिंग साठी कॉलेजात येऊन गेला होता. त्यामुळे ओळख चांगलीच वाढली होती. रेगेंनी प्रकाशला सिस्मोग्राफ वर दिसलेल्या धक्क्या बद्दल सांगीतलं.  

"आमच्या प्लांट मधल्या सिस्मोग्राफ वर पण सेम ऑब्सर्वेशन आलेत." प्रकाश म्हणाला. "म्हणून आमची एक स्पेशल टीम या खाणीत गेली. ही गावातली सर्वात जुनी आणि मोठी खाण. बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. टीम आत गेल्यावर कळलं, जमिनितल्या पाण्याची पातळी वर्षांनुवर्षे वाढत गेली. खाणीच्या प्रत्येक टप्प्यात पाणी भरत गेलं. पाण्याचं प्रेशर इतकं वाढलं की जमिनीतल्या हालचाली बदलल्या. त्यामुळे हे धक्के जाणवत असावेत, असं स्पेशल टीमचा रिपोर्ट आहे." कोयना परिसरात, धरणाच्या साठलेल्या पाण्याच्या प्रेशरमुळे भूकंपाचे धक्के जाणवतात, हे रेगेंना ठाऊक होतं. एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही. उगाच वेळ फुकट गेला, म्हणून रेगेंनी डायरी बंद करत लांब उसासा टाकला. "त्यांचा डिटेल रिपोर्ट मी तुम्हाला मेल करतो." प्रकाश सर आले म्हणून उस्ताहात होता. "सर, आलेच आहात तर, या टेकडीवरच्या मंदिरात चला. इथली देवी जागृत आहे."  तसंही आता दुसरं काही काम नाही, म्हणून रेगेंनी चला म्हणून मान डोलावली.

दर्शन घेऊन दोघं आवरातल्या एका दगडावर बसले. दगडात बांधलेले छोटंसं मंदिर. देवीची पुरातन मूर्ती. समोर मोकळी जागा. आजूबाजूला मोठाले दगड. "पाण्याच्या प्रेशरने हे धक्के बसत असतील यावर माझा विश्वास नाही, सर" प्रकाश, मंदिर न्याहळणाऱ्या रेगेंकडे बघून म्हणाला. "देवीचा कोप आहे हा, साहेब !" रेगेंच्या हातावर प्रसाद ठेवत एक म्हातारा पुटपुटला. जवळच्या वस्तीतला आदिवासी खाण कामगार असावा.  त्याने प्रकाशाच्या हतावरही प्रसाद ठेवला आणि निघून गेला. "माझाही विश्वास नाही" रेगे, म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष करीत, म्हणाले. "कोयना परिसरातले भूकंप पाण्याच्या प्रेशर मुळे होतात हे अजुन सिध्द झालं नाही. त्यामुळे असे डायरेक्ट निष्कर्ष काढू नयेत." प्रकाशने होकारार्थी मान हलवली. त्यांच्या पी एच डी च्या वेळी प्रकाश फायनल इयरला होता. त्याने रेगेंना एक्सपेरीमेंटस् मध्ये मदत केली होती. त्याने पुढे याचं कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करावं आणि आपला रिसर्च स्वतः पुढे न्यावा अशी त्यांची फार इच्छा होती. घरची परिस्थिती बघता प्रकाशने नोकरी करणे योग्य समजलं.

परतल्यावर, लॉजच्या पलीकडच्या हॉटेलमध्ये दोघांनी जेवणं केली. रेगे लॉजवर परत आले. परतीची गाडी उशिरा संध्याकाळची होती. चहासाठी पाचच्या दरम्यान ते पलीकडल्या हॉटेलात आले. बाहेरच्या बाकावर बसत चहा मागवला. धूळ उडवत चाललेली रस्त्यावरची वर्दळ बघत ते चहा पीत होते. "देवी आईचा कोप आहे, साहेब " रेगे या वाक्याने भानावर आले. मंदिरातला म्हातारा जणू त्यांच्या मागेच आला होता. "कोप वगैरे काही नसतो, काका!" रेगे हसत म्हणाले. "चहा पिणार का?" म्हाताऱ्याने मानेने 'हो' म्हटलं. बाकावर न बसता म्हातारा कडेला गुडघे वर करुन बसला. "भूकंपाचे धक्के बसतात हे मला माझ्या गावी कळलं. म्हणून बघायला आलो होतो. इथे येऊन कळलं पाण्याचे प्रेशर वाढल्याने असं होतंय." चहाचा ग्लास म्हाताऱ्याला देत रेगे म्हणाले. "देवीने बोलावलं तुम्हाला." म्हातारा म्हणाला. "तसं समजा हवं तर" रेगे हसत म्हणाले. 

"साहेब, ती गावातली पहिली खाण. खाण सुरू झाली तेंव्हा मी तरुण होतो. मंदिरातली देवीची मूर्ती या खाणीतच सापडली. आम्ही मजुरांनी मूर्ती सापडल्याने पुढे खोदकाम करू नका, असं मालकाला सांगीतलं. त्यावर मंदिर बांधून देण्याचं आमिष देऊन त्याने वर्षांनुवर्षे, रात्रंदिवस, काम सुरूच ठेवलं. शेवटी मंदिर आम्हीच बांधलं. ती अख्खी खाण टेकडीच्या खाली आहे. देवी-आई वरून बघत होती. आम्ही करीत असलेला ऱ्हास तिला सहन झाला नाही. एका रात्री, खाणीत पाणी भरलं. आमचे बरेच लोकं अडकून मेले. प्लांट मध्ये बातमी कळली. मजुरांच्या जिवास धोका आहे म्हणून खाण बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पाणी वाढतच गेलं." म्हातारा सांगत असतांना, त्याच्या सोबतचे दोघं तिघ, बाजूला येऊन बसली. रेगे गोष्ट म्हणून ऐकत होते. 

"दैवी शक्ती असेल असं आपण मान्य केलं तर खाण बंद झाल्यावर ती आता का भूकंपाचे धक्के देईल?" रेगेंनी मिश्किल हसत प्रश्न टाकला. एव्हाना अंधार झाला होता. "धक्के का बसतात हे बघायचे असेल तर रात्री चला आमच्या सोबत" म्हातारा गंभीर चेहरा करून म्हणाला. सोबतच्या इतरांनी माना डोलावल्या. "चला! किती वाजता जायचं?" काही नाही, तर एखादी गोष्ट घेऊन घरी जाऊ या विचारात रेगेंनी विचारलं. " दहा! आम्ही इथं येतो" म्हातारे उठत म्हणाले. 

"साहेब, या लोकांच्या नका नादी लागू. कामधंदा नाही त्यामुळे अश्या श्टोऱ्या बनवून सांगतात, हे. कुणी येणार नाही, दहा वाजता. रात्री दारू पिऊन पडतील कुठे तरी." आतापर्यंत काहीही न बोललेला काउंटर वरचा हॉटेल मालक म्हणाला. "या गोष्टींमध्ये माझी गाडी तशीही चुकली आहे" घड्याळात बघत रेगे म्हणाले. "रात्री मुक्कामाशिवाय पर्याय नाही. ते आले तर, जाऊन येईन" 

त्याच हॉटेलात रात्री जेवण करून रेगे लॉजवर आले. दहाच्या सुमारास ते खाली आले. हॉटेल बंद करतांना मालकाने रेगेंना हात दिला. रेगे लॉज समोर फेऱ्या घालत होते. रस्त्यावर पुरेसे  दिवे नसल्याने बऱ्यापैकी अंधार होता. थोड्या वेळानं, सगळं सामसुम झाल्यावर, तिघे जण हॉटेलपाशी उभे होते.  त्या म्हाताऱ्याच्या हातात कंदील होता. रेगे रस्ता ओलांडून पलीकडे गेले. तिघांनी अंगावर घोंगडं घेतलं होतं. कंदील घेतलेला म्हातारा रेगेंकडे पाहून हसला. रेगेंनी हातानेच 'चला' अशी खूण केली. म्हातारा आणि त्याचे सोबती पुढे आणि रेगे मागे. गाव झोपलं होतं. रस्त्यावर दोन चार कुत्री, एखादा दारुडा दिसत होता. 

"आपण सायन्सचे स्टूडंट आहोत. आपण का अश्या गोष्टींना चालना देतोय?"  रेगेंच्या मनात विचार येऊन गेला तोवर त्यांनी गाव ओलांडलं होतं. टेकडीवरच्या मंदिरात अंधुक प्रकाश दिसत होता. खाणींच्या बाहेर पडलेले मातीचे ढीग, काळे ठीमम् दिसत होते. पॉवर प्लांटचे कुलिंग टॉवर्स अंधारात पांढरे शुभ्र दिसत होते. हवेत गारठा आणि जळका वास होता. म्हातारे शांत चालत होते. रेगेंनीही ती शांतता तोडण्याचा प्रयत्न केला नाही. ते मागे मागे चालत राहिले. 

मंदिराच्या टेकडीला वळसा घालून ते मागच्या बाजूस आले. टेकडी मध्ये असणाऱ्या गुहेत म्हातारे शिरले. 'आत जावं की नाही?' या संभ्रमात रेगे बाहेरच उभे राहिले. कंदील घेतलेला म्हातारा रेगेंना नेण्यासाठी बाहेर आला. चाचपडत रेगे आत गेले. गुहा आत मध्ये मोठ्ठी होती. समोर देवीची भली मोठी, दगडात कोरलेली, मूर्ती होती. सगळीकडे मशाली लावल्या होत्या. देवीची लाल जीभ बाहेर आलेली होती. डोळे मोठे आणि लाल होते. तिच्या समोर पन्नासएक जण उभे होते. बहुतेक सगळे आदिवासी कामगार होते. म्हाताऱ्याने कंदील रेगेंकडे दिला आणि स्वतः गर्दीतून वाट काढत पुढे गेला. 

समोर जाऊन लोकांकडे बघून तो म्हणाला, "देवी-आईचं आपल्यावर प्रेम आहे. आपण केलेल्या चुकांमुळे ती कोपली. भूकंपाचे धक्के देऊ लागली. आईचा हा कोप मैलो दूर या माणसाला पण जाणवला." म्हातारा  रेगेंकडे बोट दाखवत म्हणाला. रेगे गालातल्या गालात हसले. "एवढ्या दुरून आईने त्याला बोलावलं. आईचा शाप दूर करण्यासाठी, आपण जो बळी शोधत होतो, त्याला आई स्वतःच घेऊन आली." रेगेंच्या पाया खालची जमीनच सरकली. ते बाहेर जाण्यासाठी झटकन वळले, तोच दोघांनी त्यांना धरून पुढे नेलं. "मी प्रोफेसर आहे. कॉलेजच्या यंत्रावर हे भूकंपाचे धक्के उमटतात. त्याचं कारण शोधायला मी इथे आलो." रेगे आपले हात सोडवत म्हणाले. "...आणि कसला बळी? त्याने काही होणार नाही." 

"देवी-आईला बळी दिल्या खेरीज हा कोप संपणार नाही" म्हातारा रेगेंची पूजा करत म्हणाला. त्यांना तीन चार जणांनी धरून ठेवलं. त्यांच्या गळ्यात फुलांचा हार टाकण्यात आला. एक धिप्पाड माणूस भली मोठी कुऱ्हाड घेऊन आला. रेगेंचं डोकं देवीच्या पायाशी ठेवण्यात आलं. कुऱ्हाड चालणार, तोच रेगेंना जाग आली. 

बस, स्टँडवर उभी राहिली. रेगेंनी खिडकीतून बाहेर पाहिलं. बसने उडालेल्या धुराळ्यात, लोकांचे लोंढे बसच्या दाराशी येत होते.

रीलेटेड पोस्ट : अवकाळी पाऊस

इतर पोस्ट्स

24
(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

गडाचा डोंगर उतरत रख्मा एका झोपडी समोर येऊन थांबली. डोंगर कडावरची ती झोपडी पाहून तिला आज्जीची शेतातली झोपडी आठवली. लहानगी रख्मा झोपडी पुढे उभी राहून, "आज्जी! आज्जी! " हाका मारायची. समोरची ही झोपडी बघून तिला, आज्जीला हाक मारून, मी गड उतरतांना वाट विसरली, हे ओरडून सांगावं वाटलं.

रख्मा गडावर दही विकायला येऊन आठवडाही झाला नव्हता. पहाटे गावातल्या बायकांसोबत ती दही घेऊन यायची आणि त्यांच्या सोबतच परत जायची. आज कॉलेजची पोरं तिच्या भोवती  टंगळमंगळ करीत दही विकत घेत होते. "तुम्ही व्हा पुढं." पोरांच्या घोळक्यातून रख्मानं, घरी निघालेल्या सोबतच्या बायकांना सांगीतलं. शेवटी ती एकटीच मागे राहिली. डोंगर झरझर उतरत वाट चुकली आणि ती या झोपडी समोर उभी होती.  सूर्य डोक्यावर आला होता. घसा कोरडा पडला होता. थोडं पाणी मिळावं आणि घराकडची वाट विचारावी म्हणून तिने झोपडीचं मोडकळीला आलेलं दार आत ढकललं.

अंधारलेल्या झोपडीत, खाटेवर पडलेल्या, म्हातारीने मान वर करून पाहिलं. "आज्जी, पाणी मिळलं का?" घामाघूम झालेल्या रख्माने डोक्यावरची टोपली दाराबाहेर खाली ठेवत विचारलं. म्हातारीने खाटेहूनच झोपडीतला रांजण दाखवला. रख्माने गटागटा पाणी पीलं. म्हातारी खाटेवर उठून बसली. रख्माने तिचं बखोटं धरून तिला झोपडीच्या बाहेर आणलं. दारा जवळच्या दगडावर तिला बसवलं. म्हातारी बहुदा खूप दिवसांनी झोपडी बाहेर आली असावी. ती डोळे मीचीमीची करीत सगळीकडे बघत होती. टोपलीत उरलेल्या दह्याच्या छोट्या छोट्या मडक्या मधलं एक मडकं तिने म्हातारीला दिलं. एक स्वतः घेतलं. "आज्जी एकटीच राहते का?" दह्याचं मडकं संपवत रख्माने विचारलं. थरथरत्या हाताने दही खात म्हातारीने मान हलवली. 

झोपडी शेजारच्या बाभळीची सावली विरळ होती. डोंगराचा तो भाग रुक्ष होता.म्हातारीच्या दारातून गडाची तटबंदी दिसत होती. दोघी जणींना बोलण्या सारखं काही नव्हतं. पुढचा डोंगर, पाखरांची होणारी चपळ ये-जा, त्या दोघी बघत बसल्या. 

"मी गडावर दही घेऊन येते, रोज" आपली टोपली व्यवस्थित करीत रख्मा म्हणाली. "आज कालेजातली पोरं आल्ती. त्यानं उशीर झाला. घाई घाई मंधी वाट विसरली"  जणू लहानगी रख्मा आपल्या आज्जीलाच सांगत होती. आई वडिलांच्या मृत्यूनंतर आज्जीनेच रख्माला मोठं केलं. गड पायथ्याच्या छोट्याश्या गावात रख्माचं लग्न झालं. लग्न होऊन सहा आठ महिनेच झाले होते. या  दिवसांत तिला आज्जी कडे खूपदा जावं वाटलं. या म्हातारीला भेटून तिला आपल्या आज्जीला भेटल्या सारखं झालं. 

तिची माहेर सारखीच सासरची परिस्थिती बेताचीच. नवरा शेतावर कामाला. सासू गुडघे दुखीने घरीच. घराला हातभार म्हणून ती गडावर दही विकायला येऊ लागली होती. "गावातल्या बायकांसोबत जाणार आणि येणार असशील तरच जा", सासूने या अटीवर हो म्हटलं होतं. ते आठवून रख्मा भानावर आली. 

"चला ! आता निघाया पाहिजे. कशी जाऊ?" टोपली डोक्यावर घेत तिने म्हातारीला विचारलं. म्हातारीने खुणेने बाभळी खालची वाट दाखवली. "येते!" रख्माने वळून म्हटलं. म्हातारी डोळ्यांनी हसली.

.  .  .

"उशीर केलास, पोरी?" दारात वाट बघत बसलेल्या सासूने आल्याआल्या विचारलं. "गडावर लई गर्दी व्हती" टोपली खाली ठेवत रख्मा म्हणाली. 

सासू ओसरीत जेवणाचे पानं मांडीत होती. "गडाच्या डोंगरावर झोपडी कुणाची हाय?" पाय धुताधुता रख्माने विचारलं. "देवकाची. . ." लांब उसासा टाकत सासू म्हणाली. दोघी जेवायला बसल्या.

"देवका तुझ्यासारखं गडावर दही विकायची. नवरा शेतावर काम करायचा. लहान मुलगा गावातल्या शाळेत होता. गडावर ज्या झाडाखाली ती बसायची त्या झाडावरच घुबड तिला एकटक बघायचं. घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणतात, म्हणून तिने दुर्लक्ष केलं. हळूहळू तिच्या मागे ते घरापर्यंत येऊ लागलं. घराच्या भिंतीवर ते रात्र भर बसून तिच्याकडे बघायचं."जा रं बाबा, नको येऊ मागं." ती घुबडाच्या मागे काठी घेऊन लागायची. ते फिरून येऊन बसायचं. पहाटे तिच्या मागे मागे गडावर जायचं. ती वैतागली. "का त्या पाखराच्या जीवावर उठलीस?" नवरा तिला चिडवायचा. नंतर नंतर तिलाही घुबडाचं वागणं अंगवळणी पडलं." 

.  .  .

"एकदा, दह्याचे रिकामे मडके भरत, घराच्या भिंतीवर बसलेल्या घुबडाला ती लाडाने म्हणाली, "जा आता, उद्या ये!" तिचं घुबडाशी हे लाडिक बोलणं रस्त्याने जाणाऱ्या एकानं ऐकलं. गावात बातमी पसरली. 'देवकानं रानातलं घुबड पाळलंय. घुबडाला हाताशी घेऊन ती काळी जादू करते.' गावभर चर्चा होऊ लागल्या."

"दरम्यान एका अज्ञात आजाराने गावातली दोन लहान मुलं मेली. आणि खापर देवकाच्या माथी फुटलं. तिचं घर जाळण्यासाठी सारा गाव उलटला. नवऱ्याने विनवण्या केल्या. लहान मुलाच्या आणाभाका घेतल्या. पण लोकं काही केल्या ऐकेनात. शिक्षा म्हणून गडावरच्या डोंगरावर एकटीला झोपडी बांधून देण्यात आली. तिला गावात प्रवेश बंद झाला." 

"या प्रकाराने देवका एवढी घाबरली की ती डोंगरावरच्या त्या झोपडीतून बाहेरच पडेना.लहान पोराला सांभाळण्यासाठी तिच्या नवऱ्याने माझ्याशी लग्न केलं. आत राहून राहून शेवटी देवकाने झोपडीत खाटेवरच जीव सोडला. त्या दिवसानंतर ते घुबड ही गायब झालं." सासूची गोष्ट संपता संपता अंधार पडला.

दह्याचे रिकामे मडके भरण्यासाठी रख्मा अंगणात आली. भिंतीवर बसलेल्या घुबडाला बघून लाडात म्हणाली, "जा आता, उद्या ये!"

रीलेटेड पोस्ट : पुरुषोत्तम

इतर पोस्ट्स

25
(रीडिंग टाईम 3 मिनिटं )


"तुमच्या सोबत राहतो. सोबतच अभ्यास करतो. मग हा एकटा कसा नापास झाला?" सकाळी-सकाळी मी ब्लँकेट मधून डोकावून पाहिलं. पश्याचे वडील श्यामला विचारत होते. आमच्याकडे असलेल्या एकमेव खुर्चीवर ते बसले होते. चष्म्यातून डोळे वटारत श्यामने माझ्याकडे पाहिलं. मी चटकन उठून बसलो. सकाळचे साडे सहा, सात वाजले असतील. पश्याचे वडील नुकतेच उतरले होते. "काय आहे काका", श्यामराव जरा समजूत घालण्याच्या स्वरात म्हणाले. "मी रात्री लवकर झोपतो, तर प्रशांत माझ्यासोबत झोपतो. आणि हा..." माझ्याकडे बघत श्यामराव, "हा, रोज उशिरा उठतो तर प्रशांत याच्यासोबत उठतो. त्यामुळे त्याला अभ्यासाला वेळच मिळत नाही." काकांनी माझ्याकडे रागाने बघत, मान हलवली. पश्या लेकाचा, गालातल्या गालात हसत होता. त्याचं नापास होण्याचं खरं कारण आम्हां तिघांनाही माहिती होतं. 

.  .  .

पश्या सकाळीच उठून फर्स्ट इयरचे क्लासेस चालतात तिथे जायचा. गल्लीतल्या पोस्टाच्या पेटी शेजारी, ती क्लास मध्ये जाईपर्यंत, उभा राहायचा. ती एकदा क्लासला गेली की हा परत रूमवर. एवढ्या सकाळी रूमवर आल्यावर काय करणार? म्हणून मग झोपायचा. त्याचं हे रूटीन बऱ्याच दिवसांपासून अखंड सुरू होतं. ती होती आमच्याच कॉलेजची, पण दुसऱ्या ब्रांचची, शिवाय डिपार्टमेंट वेगळं. आमचं डिपार्टमेंट आणि बिल्डिंग वेगळी त्यामुळे ती दिवसभर दिसण्याची शक्यता नव्हती. म्हणून सकाळचा हा आटापिटा असायचा. 

एवढ्या दिवसांत एक कळलं, की ती लोकलाइट आहे. आम्ही त्याला जरा उचकावलं. "रोज सकाळी उठून तिच्या क्लासला गेल्यापेक्षा, तिचं घर कळलं तर तुला कधीही जाता येईल." त्यालाही आयडिया पटली. तिचा क्लास सुटल्यावर पश्याने तिच्या मागे-मागे घरापर्यंत जायचं ठरलं. 

ती कुठे राहते, हे शोधण्यासाठी पश्याला एक महिना लागला. तिच्याकडे स्कुटी होती आणि पश्याकडे सायकल. क्लास सुटला की ती भूरकन उडून जायची. हा सायकल दामटत फार तर पुढच्या चौकापर्यंत पोहचायचा. या शर्यतीत आपण टिकणार नाही हे कळल्यावर, रोज वेगवेगळ्या टप्प्यांवर उभं राहत-राहत त्याने घर शोधलं. 

घर शोधल्यावर मात्र तो तिकडे कधी फिरकला नाही. खरं तर प्रत्येक ठिकाणी तिच्या मागे जाऊन तिला स्टॉक करता आलं असतं. पण त्याने कधी तसा विचारही केला नाही. तिच्याशी कधी साधं बोललाही नाही. त्याला सकाळची ती छोटी भेटच आवडायची. त्यात कुठली कंडीशन नव्हती. कुठलं एक्सपेक्टेशन नव्हतं. क्लासेसच्या गर्दीत तो विरून जायचा. तिला असं कुणी आहे, हे ठाऊक ही नसेल. 

या नादात सेमीस्टर झरकन निघून गेलं. रिझल्ट आला आणि सोबत पश्याचे वडीलही आले. आता हे सगळं त्यांना सांगणं अशक्य होतं. 

.   .   .

"तू कधीच तिच्याशी का बोलला नाहीस, उगाच दिवस फुकट घालवलेस" आम्ही त्याला नेहमी डिवचायचो. तो हसण्यावर न्यायचा. 

आज इतक्या वर्षांनी वाटतं, बरं झालं तो नाही बोलला. 

फार तर फार काय झालं असतं? 

ती बोललीच नसती किंवा बोलली असती. यातली पहिलीच शक्यता जास्त होती पण आपण दुसरी पडताळून बघुयात. ती बोलली असती. मैत्री झाली असती. एखादी चहा-कॉफी झाली असती. याची सायकल स्टँडवर लाऊन तिच्या स्कुटीने गावभर भटकंती झाली असती. एखादा मूव्ही झाला असता. सेमीस्टर गेले असते. वर्ष गेली असती. 

(दरम्यान, तिला चुकून एखादा आवडला असता तर आपला गडी डिलीटही झाला असता. पण आपण नको ऑफ ट्रॅक जायला.)

समजा, सगळं सुरळीतच सुरू असतं. सरता सरता इंजिनीयरिंग संपलं असतं. हा तिला सीनिअर असल्याने, याचं होपफुली आधी संपलं असतं. याने जॉबसाठी पुणे गाठलं असतं. हजार खेटे घेत जॉब केला असता. तिचं इंजिनीयरिंग झाल्यावर तिनेही पुण्यातल्या सिलिकॉन व्हॅलीत जॉब धरला असता. 

दोघांनी घरी सांगीतलं असतं. घरच्यांनी आधी नाही-नाही म्हणत, नंतर लग्न लावून दिलं असतं. पुढच्या टप्प्यात दोघांनी पुण्यातल्या एखाद्या नवीन स्कीम मध्ये घर बुक केलं असतं. रोज सकाळी जीच्या मुखदर्शनासाठी मरत-मरत जाणारा हा, लेकराशी खेळत-खेळत टीव्ही बघत बसला असता. आणि ती, 'आज काय भाजी करू?' या विचारात किचन मध्ये भांडी आपटत असती.

मग आज जे आहे तेही बरंच आहे ना! 

ती कुठेतरी परदेशात आहे. 

आणि आपला पश्या लेकरासोबत टीव्ही बघतोय, स्वयंपाक कधी होईल याची वाट बघत. 

इतर पोस्ट्स

26
(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

दादाने ड्रॉइंग बोर्डवर शीट लावलं. जेमतेम स्वतःचं नाव लिहिलं. सर अजुन फळ्यावर ड्रॉइंग काढतच होते. ड्रॉइंग हॉल मध्ये नेहमीचा गोंधळ सुरू होता. संध्याकाळची उन्हं हॉलच्या जाळीदार खिडकीतून आमच्या टेबलांवर पसरली होती. दादा हॉलच्या एका कोपऱ्यात गुमान बसला होता. या सरांबद्दल त्याला फार रिस्पेक्ट. नाही तर, दादा कुणाला म्हणून घाबरत नव्हता. सर हॉलमध्ये आहेत म्हणूनच दादा मुकाट्याने जागेवर बसला होता. सर तसंही अर्ध्या तासात आपलं ड्रॉइंग काढून निघून जायचे. तोवर दादा टंगळमंगळ करायचा. एकूणच, ड्रॉइंग वैगेरे काढण्यात त्याला काही इंटरेस्ट नव्हता. सगळ्या शीटस् दादा कुणाला तरी पकडून काढून घ्यायचा.

. . .

सर वर्गावरून गेले.

दादाने आपली जागा सोडली. 

'कुणाला ड्रॉइंग काढायला लावायचे?' म्हणून हॉल मध्ये दादांचा राऊंड सुरू झाला.

"तेरा ड्रॉइंग अच्छा है !" स्वारी माझ्यापाशी येऊन थांबली.

हे प्रकरण कुठे चाललय ते पटकन माझ्या ध्यानात आलं. पण दादाला नाही म्हणून पंगा कोण घेणार. मागच्या वर्षी, शर्मा दादाला भर वर्गात  ड्रॉइंग काढायला नाही म्हणाला. दादा तेंव्हा काही बोलला नाही. रात्री, त्याला हॉस्टेलवर उचलून आणलं. त्या रात्री शर्माने कुणाकुणाच्या किती शीटस् काढल्या, देव जाणे!

"अरे नही दादा, मला तर ही शीट रिपीट मिळालीय." वेळेवर जे सुचलं ते मी बोललो.

"मग कुणाचं चांगलं आहे?" शीट मध्ये बघत, दादाने भुवया उंच करून विचारलं.

संकट फेस नाही करता आलं तर पास-ऑन तरी करता आलं पाहिजे. 

मी इशाऱ्यानेच मागे बसलेल्या सदशिवकडे बोट दाखवलं. सदाशिवने मनातल्या मनात दिलेली शिवी मला थेट ऐकु आली. असो!  मी तरी काय करणार?

दादाने सदशिवचं शीट आणि एकूण ड्रॉइंग पाहिलं. काहीच न बोलता मोर्चा पुढे वळवला. सदाशिव आणि मी, 'आता कुणाचा नंबर लागतो' म्हणून  मागे वाळून बघत होतो. 

सदाशिव नंतर मुलगी बसली होती. दादा मुलांमध्ये कितीही मोठा डॉन असला तरी मुलींशी कधी आयुष्यात बोलला नाही. आताही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. ती, दादा बोलणार म्हणून उठून उभी पण राहिली. दादाने तोंडातून ब्र जरी काढला असता तर ती तयार झाली असती. पण दादा तिच्याकडे न बघता तसेच पुढे निघाले. हिरमुसून ती खाली बसली. 

आज लागणार कुण्या मुलाचीच होती.

तिच्या नंतर बसलेला रमेश ड्रॉइंग काढण्यात एवढा गुंग होता की काय चाललंय याची त्याला कल्पनाही नव्हती. सदाशिव, मी आणि ती - आम्ही तिघे आणि एव्हाना सगळा वर्ग हातातली कामं सोडून, दादा काय करणार याची वाट बघत होता.

"मेरा ड्रॉइंग तू निकालके देगा!" तीन रिजेक्शन नंतर रिस्क न घेता, दादाने जवळजवळ डीक्लियरच केलं.

"का रं? आम्ही का काढायची ड्रॉइंग तुझी, तुला झेपं ना, व्हय रं?" वर न बघता, ड्रॉइंग काढता काढता, रमेश आपल्या कोल्हापुरी खाक्यात बोलला. 

त्या स्तब्ध हॉल मध्ये रमेशच्या रिस्पॉन्स वर समोरची मुलगी भस्सकन हसली. दादांनी तिच्याकडे पाहिलं. दाढी वरून हात फिरवला. आणि काही न बोलता दादा, थेट ड्रॉइंग हॉलच्या बाहेर निघून गेला. 

रमेशच्या लेखी काही घडलंच नाही. तो त्याचं ड्रॉइंग पूर्ण करत बसला. ती मुलींच्या घोळक्यात मिसळली. मग सगळ्याच जणी हसत सुटल्या. काय झालं आणि पुढे काय होणार, हे मुलांच्या मात्र ध्यानात आलं. 

सदाशिव आणि मी 'सुटलो' म्हणत आपापल्या ड्रॉइंग बोर्ड कडे वळलो. 

. . .

हॉल मधले जुनाट पंखे गरगरत राहिले आणि दोन तास सहज उडून गेले.

'उरलं सुरलं नंतर काढू', म्हणत आम्ही शीटस् गुंडाळल्या. त्यांना रबर बँड लावता-लावता मागे वळून रमेश कडे पाहिलं. तो गडी, आज शीट संपवण्याच्या बेतात होता. मी ' चल ' म्हणून हाक मारली. त्याने हातानेच, तुम्ही व्हा पुढे सांगीतलं. दादा आणि त्याची गँग सायकल स्टँडवर बसली होती. मी आणि सदाशिव बाहेर जाऊन व्हरांड्यात उभे राहिलो.

. . .

बऱ्याच वेळाने रमेश, हातात शीटची गुंडाळी घेऊन बाहेर आला. 

"झाली का शीट?" दादाने रमेशला बोलावत विचारले. 

"झाली, की !" आमच्याकडे न येता, रमेश तिकडेच गेला.

त्याच्या हातातली शीट दादाने हिस्कावली. तो काही बोलणार तेवढ्यात, चुरगळून फाडून टाकली. पुढच्या क्षणाला, दादा आणि त्याचे पंटर्स गाड्यांना किक मारून निघून गेले. 

मला वाटलं तसचं झालं. रमेशची एवढी मेहेनत काही सेकंदात सायकल स्टँडवर विखुरली. 

आम्ही जड पावलांनी रमेश पाशी गेलो. 

रमेश शीटच्या तुकड्यांकडे बघत म्हणाला, "खुळं ! त्याची कोरी शीट हॉल मध्येच सोडून आलं. मी घेऊन आलतो, पठ्ठ्याने फाडून टाकली." 

मी आणि सदाशिव, रमेशच्या पाठीवर लावलेल्या शीट कंटेनरकडे पाहत, हसलो.

रिलेटेड पोस्ट : उत्तराचा प्रश्न

इतर पोस्ट्स

27
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

गर्दीमुळे आम्ही क्लिनिकच्या दारातच उभे होतो. 

सकाळी थोडी कणकण आहे म्हणत, दुपार पर्यंत चांगलाच ताप चढला. श्यामला ताप आला की डॉक्टरांना दाखवाव लागतं. मागे, कणकण आहे म्हणून त्याने अंगावर काढलं आणि नंतर ॲडमिट करावं लागलं होतं. 

भर दुपारी ऑटो मिळणे कठीण. 

गावी जातांना मित्र त्याची बाईक आमच्याकडे सोडून गेला होता. या इमेर्जन्सीला, ती गाडी काढण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीचे चालू होऊन-बंद पडणे, मागे-पुढे झटके देणे, असे सगळे प्रकार करून झाल्यावर, गाडी सुरू झाली आणि आम्ही निघालो. 

हळूहळू चालवत गाडी खड्ड्यातून जाणार नाही याची काळजी मी घेत होतो. पावसाने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येतच होता असं नाही. दोन चार खड्ड्यांमध्ये गाडी घालून, जोरदार झटके देऊन झाले होते. स्वेटर, कानटोपी घालून मागे बसलेल्या श्यामला, हे झटके मुकाट्यानं सहन केल्याशिवाय पर्यायही नव्हता. तो माझे खांदे घट्ट पकडून बसला होता. घरी दिलेल्या क्रोसिनमुळे हा मागच्या मागे झोपू नये याची भीती होती. मधून-मधून मी त्याला काहीही प्रश्न विचारत होतो. तो हां-हुं करून रिस्पॉन्स देत होता. 

थोड्यावेळाने मात्र श्यामराव माझ्या पाठीवर डोकं ठेऊन झोपले. 

'मित्र आजारी पडल्यावर आपण मदत तर केलीच पाहिजे. . . या डॉक्टरांचं क्लिनिक फार दूर आहे. . . जवळच्या डॉक्टरकडे जायला, हा गडी नाही म्हणतो. . .' मी माझ्याच विचारात मग्न. 'सकाळ पासून गुमसुम होता. . . तेंव्हाच आपल्या लक्षात यायला हवं होतं. . . डॉक्टरकडे यायला आता उशीरच झालाय. . .'  

अचानक समोर आलेला खड्डा चुकवण्यासाठी मी गाडी वळवली, आणि ती स्किड होऊन, आम्ही आपटलो! बेसावध असल्याने, श्याम जोरात पडला. स्वेटर, कानटोपी घातलेलं ते लेकरू मोठ्याने ओरडलं. थोड्यावेळ फुटपाथवर बसलं आणि मग पायीपायीच निघालं. क्लिनिक तसं जवळच आलं होतं.

मी गाडी ढकलत मागे मागे गेलो. 

क्लिनिकमध्ये गर्दी. अंगात ताप. त्यात आमच्या दुचाकी अम्बुलेन्सला झालेला अपघात. वैतागून श्याम क्लिनिकच्या दारातच बसला. मी तर, केलेल्या पराक्रमामुळे काही बोलूही शकत नव्हतो. मदत करणे आपले कर्तव्य! म्हणून पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण काही रिस्पॉन्स मिळाला नाही.

गर्दी ओसरत, पाऊण-एक तासाने, नंबर लागला. तोवर आमचा पेशंट कण्हतच होता. 

डॉक्टरांनी श्यामला तपासलं. खुर्चीवर बसत, माझ्याकडे पाहून ते म्हणाले,

"व्हायरल आहे! तीन दिवसांच्या गोळ्या देतो, बरं होईल. हात मात्र फ्रॅक्चर आहे. तीन आठवडे बांधून ठेवावा लागेल." 

हात गळ्यात अडकवून श्याम ऑटोने, आणि मी गाडी ढकलत रूमवर आलो.

रिलेटेड पोस्ट : हिरो, हिरोईन आणि आम्ही

इतर पोस्ट्स

28
(रीडिंग टाईम 3 मिनिटं )

आम्ही त्या गर्दीत कधी मिसळून गेलो कळलंच नाही. 

दरवर्षी, हजारो भाविक, हनुमान जयंतीच्या आधल्या रात्री, पायी पायी भद्रा मारुतीच्या मंदिरात जातात. यंदा, आम्हीही चाललो होतो. जायचं ठरलं त्या दिवसापासून, उत्तम, एकदम उत्साहात होता. त्याने शेजारून टाळ आणि वारकऱ्यांची टोपी  आणली होती. आम्ही, रात्री हिंडायला मिळणार म्हणून एक्साईटेड! रात्रीच्या अंधारात, कुठे तरी, काहीतरी दिसावं अशी माझी फार इच्छा. तसंही, मारुतीला जात असल्याने, भूतं आमचं काय वाकडं करणार?

आम्ही राहायचो तिथून मंदिर तीस किलोमीटर. 

गर्दीचा आणि उत्तमचा उत्साह मॅच झाला. त्याने टाळ कुटायला सुरुवात केली - "जय जय राम कृष्ण हरी . . ." 

आम्ही त्याच्या मागे टाळ्या वाजवत निघालो. थोड्या अंतरावर, रस्त्याच्या दोन्ही बाजुस, भाविकांसाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. पिण्याचे पाणी, सरबत, केळी, साबुदाण्याची खिचडी, फराळी चिवडा, बिस्कीटचे पुडे मोफत वाटण्यात येत होते. आम्ही तर हे इमॅजिनच केलं नव्हतं. 

पहिल्याच स्टॉलला, आम्ही उत्तमला सोडला.

आधीच्या पाच सहा स्टॉल्स वर भरपूर हादडले. पोट भरल्याने, पुढच्या स्टॉल्सवर, सोबतच्या बॅगा भरायला सुरू केल्या. फराळी चिवडा, चिप्स, बिस्कीटचे पुडे, फ्रुटीचे छोटे बॉक्सेस, पाण्याच्या बॉटल्स, असं प्रत्येकाने आपापल्या बॅगेत कोबूंन भरलं. रात्रभर चरत जाता येईल एवढं सामान आमच्याकडे होतं. जवळ जवळ दीड एक तास आम्ही, त्या पंचवीस तीस स्टॉल्सवर रेंगाळत होतो. जणू या स्टॉल्स पर्यंतच येणे, हाच आमचा उद्देश होता. मारुतीरायांकडे पायी निघालेल्या या भक्तांच्या अंगी बळ यावं, आणि सोबतीला आपल्या पदरी 'अन्नदानाचं ' पुण्य पडावं - एवढी निर्मळ भावना स्टॉल्स थाटण्यामागे असावी.

पुढच्या प्रवासासाठी लागणारी भरपूर सामग्री गोळा करून, आम्ही ते प्रेमळ स्टॉल्स एकदाचे सोडले. आमच्या अंगी बळ न येता, आळस मात्र आला. रस्त्यावरची इतर मंडळी झपझप निघाली होती. त्यांच्या स्पीडशी आमचा स्पीड काही मॅच होईना. मागून येणारा प्रत्येक ग्रुप आम्हाला क्रॉस करून पुढे जात होता.

बारा वाजले असतील.

दहाऐक किलोमीटर, आम्ही पार केलं असेल. हनुमंताच्या जन्माला अजुन सहा तास होते. कितीही हळूहळू गेलो, तरी जन्माच्या आधी आरामात पोहचू, एवढा इंजिनिअरचा कॉन्फिडन्स तर होताच. जर आरामातच पोहचणार आहोत, तर थोडा आराम करूयात म्हटलं. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतांमध्ये पाय मोकळे करण्यासाठी लोक बसत होते. पाणी प्यायचं, थोडा आराम करायचा आणि परत सुरू.

"जय जय राम कृष्ण हरी . . ." च्या गजरात, जेव्हां उत्तमने मागे वळून पहिलं - तेव्हा त्याच्या मागे, तीस चाळीस जणांची, दोन दोनच्या रांगा करून दिंडी तयार झालेली. उत्तमला आता थांबणं अशक्य होतं. त्याने तर स्टॉल पाहिलेही नसतील, कदाचित. तो रस्त्यात भेटलाच, तर आमच्या एवढंच त्यालाही पोटभर खाऊ घालू, अशा तयारीत आम्ही होतो.

पावसाची वाट बघत असलेल्या त्या शेतात, आम्ही पाय मोकळे करण्यासाठी टेकलो. मातीच्या ढेकळांचा सुगंध. वर चांदण्यांनी भरलेलं आकाश. गार वारं. रस्त्यावरून टाळ मृदुंगाची संथ किणकिण. एखाद्या मोठ्ठ्या पडद्यावर हे सगळं  आपण बघतोय असं वाटतं होतं. 

या वातावरणाला चिरत, एक विमान, शहरातून आकाशी झेपावलं.  चांदण्यांनी भरलेल्या आकाशात, पौर्णिमेच्या चंद्राकडे जाणारे  विमान बघणे म्हणजे थ्रीलींग अनुभव होता. ढेकळांवर पाठ टेकवून, चंद्राकडे झेपावणारं ते विमान, आम्ही मुग्ध होऊन बघत होतो. मारुतीराया आकाशी उडतांना असेच दिसत असावेत. असेच एकदा, भद्रसेन राजाचं गाणं ऐकून मारुतीराया खाली आले. गाण्याने मुग्ध होऊन, ते कुशीवर कलले आणि जिथे ते निद्रावस्थेत गेले तिथे आज हे मंदिर आहे.

सकाळी जाग आली. 

रात्रीतून, किती विमानं उडून गेली, देव जाणे ! 

आम्ही मात्र, रात्रभर त्या शेतातच पसरलो. जन्म सोहळा पहाटेच आटोपला होता. हिरमुसून, आम्ही शेतातून घराकडे निघालो. रस्त्यात स्टॉल्सची आवराआवर सुरू होती. 

दुपारी उत्तम घरी पोहचला तेव्हा आम्ही स्टॉल्सवर गोळा केलेल्या सामानाची भेळ करून, ताव मारत होतो.

जय जय राम कृष्ण हरी.

इतर पोस्ट्स

29
(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

ड्रॉइंग शीटवर ' रिपीट ' असा रिमार्क घेऊन, मी जागेवर येऊन बसलो. 

ड्रॉइंग हॉलमध्ये अक्षरशः गोंधळ सुरू होता. कुणी दोन-दोन, तीन-तीनचे ग्रुप करून डिस्कशन करीत होते. कुणी हॉलमध्ये उगाच इकडे तिकडे हिंडत होते. कुणी बाहेर ये-जा करीत होते. दोघं-तिघं आपली पूर्ण झालेली शीट घेऊन, सरांसामोर उभे होते. इंजिनीयरिंग ड्रॉइंगच्या प्रॅक्टिकलला हे सर आले की, आधी फळा भरून ड्रॉइंग काढायचे आणि नंतर पुढचे दोन तास निवांत बसायचे. हॉलमध्ये पोरं कितीही गोंधळ घालू देत, या माणसावर कसलाही परिणाम होते नसे. दोन तासाच्या या प्रॅक्टिकलला ते काहीच बोलत नसतं. आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून वर्गाकडे बघून, ते गालातल्या गालात फक्त हसायचे. हसणं मात्र फार उपहासात्मक असायचं. 

त्या गालातल्या गालात हसण्यामागे, काय असेल, याचा अंदाज लावणे फार अवघड.

मी पूर्ण झालेली शीट घेऊन त्यांच्याकडे गेलो. मूर्ती निस्तब्ध बसली होती. मी शीट हळूच टेबलावर सरकवली. ते तंद्रीतून बाहेर आले. माझ्याकडे बघितलं. टेबलावरची शीट थोड्यावेळ न्याहळल्यावर, त्यांनी पेन्सिल मागितली. एक दोन  करेक्शन स्वतःच केले. शीट दोन्ही हातात धरून जरा दुरून पहिली. गालातल्या गालात हसले. पेन्सिल उचलली. आणि उजव्या कोपऱ्या वर रिमार्क मारला -  रिपीट .

त्यांच्याकडे शीट चेकिंगला गेल्यावर तीन शक्यता असायच्या - सही, करेक्शन, किंवा रिपीट. रिपीट म्हणजे संपूर्ण शीट पुन्हा ड्रॉ करा. दोन आठवड्यापासून काढत असलेली ती शीट, पुन्हा काढायचा मला जाम कंटाळा आला होता. 

काय करावं? म्हणून मी इकडे तिकडे बघत बसलो होतो. पोरं आपापली शीट चेकिंगला नेत होती. कुणाला सही, तर कुणाला रिपीट असं चक्र सुरू होतं. सही कुणाला मिळाली आणि कुणाला रिपीट मिळालं हे मला दुरूनच कळत होतं. अर्धा तास, हा पॅटर्न बारकाईने स्टडी केल्यावर, तो कसा वर्क होतोय मला कळलं.  मी शीटवर पेन्सिलने लिहिलेलं ' रिपीट ' इरेझरने व्यवस्थित खोडलं. शीट तशीच उचलून सरांकडे गेलो. त्यांनी शीट पहिली. 

माझ्याकडे पाहून ते गालातल्या गालात हसले. आपल्या खिश्याचा बॉल पेन काढला. आणि सही मिळाली.

प्रोबॅबिलिटी झिंदाबाद !

.  .  .

गुरुवारी त्यांचं पहिलं लेक्चर असायचं. अगदी वेळेवर सुरू व्हायचं. उशीरा येणारे - मे आय कम इन, सर - चा तगादा लावायचे. असं दोन-चार लेक्चरला झाल्यावर, सर क्लासमध्ये आले की, वर्गाचं दार आत मध्ये ओढून बंद करायला लागले. 

दार बंद. प्रवेश बंद. लेक्चर सुरळीत सुरू. 

त्या गुरुवारी उशीर झाला. मी धापा टाकत, व्हरांड्यातच होतो. सर वर्गाचं दार आत ओढतच होते. मी दाराशी पोहचलो आणि दार बंद झालं. सर दार बंद करून फक्त वळलेच असावेत, म्हणून मी पटकन दार बाहेर ओढलं. सरांनी मागे वाळून पाहिलं. दारातून लख्ख प्रकाश आत आल्यामुळे, जाड भिंगाचा त्यांचा चष्मा चमकला. मी केविलवाण्या नजरेने पाहिलं. 

वळलेले सर, गालातल्या गालात हसले. मान हलवून 'नाही' म्हणाले. मी बाहेर सरकलो. 

दाराचे लाकडी, उंच दोन्ही तावदानं, आवाज होणार नाही असे हळूच आत ढकलले. आणि सवयी प्रमाणे बाहेरून दाराची कडी घातली. 

व्हरांड्यातून चालेल्या एका सरांनी, मला कडी घालतांना पाहिलं. हाक मारून थांबवलं. अवधानाने झाल्यामुळे, मी काय केलं हे मला कळलं नाही. त्यांनी रागात माझं बखोट धरलं. दाराची कडी काढली. 

"सर, हा दाराला बाहेरून कडी घालत होता." मला आत नेत ते म्हणाले. 

आमचे सर, माझ्याकडे बघून गोड हसले. खुणेनेच जागेवर बस म्हणाले. 

दार पुन्हा बंद. लेक्चर सुरू.

सर संपूर्ण वर्गात फेऱ्या मारत शिकवीत. मी शेवटच्या रांगेत, मध्ये कुठेतरी बसायचो. तो तास म्हणजे, माझ्या मनात नाही-नाही ते विचार येऊन गेले. लेक्चर काही संपेना.

शेवटी, लेक्चर संपता संपता, आमच्या रांगेतून जातांना, त्यांनी इशाऱ्यानेच मला उभं राहायला सांगितलं. मला क्रॉस करून ते पुढे गेले. सगळा वर्ग माझ्याकडे बघत होता. आणि मी त्यांच्याकडे. वर्गाच्या मागच्या भिंतीपाशी पोहचल्यावर त्यांनी नाव विचारलं. मी दबक्या आवाजात सांगीतलं. 

ते रांगेतून परत आले. फळ्यापाशी असणाऱ्या टेबलाजवळ उभं राहून, त्यांनी उशीर का झाला विचारलं. माझ्याकडे अर्थातच उत्तर नव्हतं. बराच वेळ त्यांनी उत्तराची वाट पाहिली. तोवर त्यांची दुसऱ्या रांगेतली फेरी संपवुन ते परत फळ्यापाशी आले. माझ्याकडे पाहून त्यांनी, "आता उत्तराची अपेक्षा नाही." अश्या सुरात, फक्त मान हलवली. टेबलावरचं आपलं पुस्तक बंद केलं. खडू आणि डस्टर गोळा केले. 

"सुटलो!" मी उभ्याउभ्याच निःश्वास टाकला. 

जाता जाता, क्लासकडे बघत त्यांनी विचारलं, "प्रॅक्टिकलला आपल्या किती शीटस् झाल्यात?"

"बारा!" पहिल्या बाकड्यावर बसणाऱ्याने पटकन सांगितलं.

सर गालातल्या गालात हसले. 

माझ्याकडे बघून म्हणाले, "रिपीट."

इतर पोस्ट्स

30
(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

वाटाणे ऑल क्लिअर झाला.

बस मागे पुढे करत स्टँडहून धकली. हऱ्या मुळे जो उशीर व्हायचा तो झालाच.  वाटाणेला खरंतर कॉलेजात पोहचण्याची घाई होती. कारण ही तसचं होतं. दोन वर्षे ए टी के टी त गटांगळ्या खाल्ल्यानंतर फायनल इअरला वाटाणे ऑल क्लिअर झाला. मार्क शीट घेण्यासाठी तो उतावीळ झाला होता. रिझल्ट कळल्यापासून तो या दिवसाची वाट पाहत होता. मार्कशीटस् दोन दिवसांपूर्वीच आल्यात हे हऱ्याने काल रात्री सांगीतलं. आपली ऑल क्लिअर मार्क शीट मास्तरकडे दोन दिवस झाले पडून आहे या विचाराने तर तो अजुन कासावीस झाला. 

गर्दीने खचाखच भरलेल्या बस मध्ये, तो एव्हाना घामाने चिंब झाला होता. हऱ्या खिडकीपाशी बसून खारे दाणे खात होता. हऱ्या मुलुखाचा खादाड. त्याला सतत काहीतरी खायला लागे. ए टी के टी देण्याची परंपरा हऱ्याने मात्र कायम ठेवली. वाटाणे आणि हऱ्या लहानपणापासून मित्र. दोघं शाळेपासून एकाच वर्गात, एकाच बाकावर बसत आले. वाटाणेच्या ऑल क्लिअर होण्याने आपण मागे पडलो असं त्याच्या गावीही नव्हतं. उलट, वाटाणे ऑल क्लिअर झाला यावर त्याचा विश्वासच नव्हता. वाटाणेची मार्क शीट बघायला म्हणून तो सोबत आला होता.

कॉलेज मध्ये पोहचेर्यंत साडे बारा - एक होऊन गेला. 

वाटाणे केबिन मध्ये शिरला. मास्तर आणि त्यांचे इतर मास्तर मित्र नुकतेच जेवण करून बसलेले होते. 

"सर, मार्क शीट?" वाटाणे दबकत.

"पेढे कुठं आहेत?" वाटाण्याच्या खाली हातांकडे बघून, मास्तर.

"सर...विसरलो"

"अरे जा मग, घेऊन ये!" 

मास्तरांनी आपल्या मित्रांकडे तोंड फिरवलं.

पेढ्यांचा बॉक्स मास्तरच्या टेबलावर ठेवायचा आणि आपली फायनल इअरची मार्क शीट घ्यायची. ही आता प्रथाच झाली होती. पुन्हा थोडीच या मास्तरचं तोंड पहायचं आहे म्हणून ऑल क्लिअर झालेला प्रत्येक जण पावभर पेढ्यांचा बॉक्स घेऊन येई. चांगले मार्क्स मिळालेले, हसत हसत बॉक्स आणत आणि आपलं 'प्रगती पुस्तक' घेऊन जात. असंतुष्ट लोकं, जड मनाने पेढे ठेऊन जात. वाटाणे सारखे, अनपेक्षित रिझल्टवाले फार उत्साहात येत. 

सगळे जण एकाच हलवायाकडून, एकाच प्रकारचा, स्वस्तातला, पेढा आणत. पावभर पेढ्यांच्या चौकोनी बॉक्सची उतरण मास्तरच्या टेबलावर लागे. कॉलेज संपलेले असल्याने, प्रत्येक जण आपापल्या सोईने येऊन, मार्क शीट घेऊन जात. बॉक्सची उतरणही त्यानुसार कमी जास्त होत असे. कधी कधी दहा बारा बॉक्सेस म्हणजे तीनचार किलो पेढे एकदम येत. तर कधी, आज सारखा, एकही बॉक्स येत नसे. ही प्रथा एवढी फोफावली की पेढ्यांविना मार्क शीट मिळेना. 

एवढ्या उन्हात, गावात जाऊन पेढे आणायचे म्हणजे दीड दोन तास जाणार. शिवाय दुपारी कॉलेजपाशी ऑटो मिळत नाहीत. म्हणजे नाक्यापर्यंत, दोन किलोमीटर, पायी चालत जाणं आलं. या विचारात वाटाणे बाहेर आला. हऱ्याला सांगीतलं. 

"गावात जायची गरज नाही. संजुभाऊच्या टपरीवर असतात पेढे." हऱ्या पटकन म्हणाला.

संजुभाऊची टपरी कॉलेजच्या बाहेरच होती. 

"भाऊ, पेढे हैं क्या?" हऱ्याने संजुभाऊला मोठ्या तोऱ्यात विचारलं.

तोंडात खर्रा कोंबलेल्या, संजुभाऊने काऊंटर वरच्या, लाल झाकणाच्या, काचेच्या बरणी कडे बोट दाखवलं. 

त्या बरणीत नेमके दोनच पेढे होते.

"द्या! पण बॉक्स मध्ये द्या", वाटाणे हतबल होऊन म्हणाला.

संजुभाऊ मिश्किल हसले, रद्दीच्या कागदांमधून एक कागद फाडला, बरणी उघडली,आणि कागदावर दोन्ही पेढे उताणे केले. संजुभाऊ पुडी बांधणार तोच हऱ्याने त्यातला एक पेढा उचलला आणि तोंडात टाकला. 

"बहोत भुख लगी थी, यार." हऱ्या लाल झालेल्या वाटाणेकडे बघून म्हणाला. 

हऱ्याला मारायची सुध्दा ताकद आता वाटण्या मध्ये नव्हती. संजुभाऊ, कागद आणि त्यावरचा एकमेव पेढा हातात घेऊन दोघांकडे बघत होते.

"बांधा!" वाटाणे वैतागून म्हणाला. हऱ्या तोंड दाबून हसत होता.

दहा पंधरा मिनिटं भयाण शांततेत गेली. दोघांनी मग चहा घेतला. समोर ठेवलेली पेढ्याची पुडी हऱ्याने उचलली. संजुभाऊ कडून चार पाच कागद घेतले. पुडीवर पुडी बांधत पावभर पेढ्यांची दिसेल अशी पुडी तयार केली. तिला व्यवस्थित दोरा गुंडाळला. पुडी वाटाणेच्या हातावर ठेवत म्हणाला, "चला!" 

सगळी हिम्मत आणि पुडीत बांधलेला एक पेढा घेऊन, वाटाणे आत गेला. हऱ्या, डिपार्टमेंटच्या झाडाखाली, आपण केलेल्या पराक्रमावर हसत उभा राहिला. 

आत गेलेला वाटाणे, थोड्याच वेळात बाहेरही आला. 

त्याने हऱ्याच्या एका हातावर मार्क शीट आणि दुसऱ्या हातावर पेढ्याची पुडी ठेवली. हऱ्या आ वासून बघत राहिला. 

"घाबरत आत घुसलो. सरांसमोर आपल्या क्लास मधली रश्मी बसली होती. सर तिला करीयर गाईडन्सचे धडे देत होते."

"तिच्या हातात एक किलो पेढ्यांचा, चकचकीत, मोठ्ठा, बॉक्स होता. चांगला महागडा." 

"मला बघताच, सरांनी माझी मार्क शीट काढून दिली. मी आपली पेढ्याची पुडी पुढे करत म्हणालो, "सर, पेढे." सरांनी माझ्या पुडी कडे पाहिले, आणि म्हणाले, "अरे, राहू देत." रश्मीच्या हातातले, किलोभर पेढे, आज घरी न्यायला मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता." 

"तसंही, त्या मोठ्ठ्या बॉक्स पुढे, आपला हा टपरी वरचा पेढा कसा टिकला असता? मी आलो पटकन् बाहेर." 

वाटाणे आणि हऱ्या बोलतच होते तोवर रश्मीही बाहेर आली. 

दोघांच्या हातावर ऐक ऐक पेढा ठेवत, किलोभर पेढ्यांचा तो चकचकीत बॉक्स तिने हळूच पर्स मध्ये ठेवला आणि पार्किंग कडे निघून गेली.

इतर पोस्ट्स