मनोज वेरूळकर

31
(रीडिंग टाईम 3 मिनिटं )

तो पूल हायवे आणि कॉलेजच्या मध्ये आहे. पूलापासून अर्ध्या किलोमीटरवर हायवे आणि साधारण एक किलोमीटरवर कॉलेज. हा छोटासा पूल एका कोरड्या ओढ्यावर आहे. जेमतेम दहा फूट रुंद असणारा हा पूल आता जीर्ण झालाय. त्याच्या कडांनी तो पुरता ढासळला आहे. कडेला दोन तीनच छोटे कठडे उरले आहेत. पूलावर आता डांबराचा थर नाही. काँक्रीटचे खडे उखळून पडलेत. पूल फारच बुटका असल्याने पावसाळ्यात वाहून आलेली झुडूपं त्यात अडकून तिथेच वाळली आहेत. ओढ्याच्या काठावर, वेडी वाकडी वाढलेली भकास बाभळीची झाडं आहेत. ओढ्यात माती सारखी वाळू उरली आहे. उघडे पडलेले काही विरळ दगड आहेत. ओढ्याच्या पात्रात दाट झुडूपं वाढली आहेत. 

हायवे ओलांडून आत रस्त्याला लागलं की, रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच आणि मोठ्ठी झाडं आहे. झाडं एवढी दाट आहेत की रस्त्यावर कधीच ऊन पडतं नाही. या रस्त्यावर नेहमी अंधारलेलं आणि गार वाटतं. थेट हाडांपर्यंत जाणारा गारवा या रस्त्याला लागलं की जाणवायला लागतो. रस्त्यावर सहसा वर्दळ नसते. भर दुपारी तर शुकशुकाट असतो. रस्त्याच्या उजव्या बाजूस एनसीसी बटालियनचा शिस्तबध्द पण रुक्ष परिसर आहे. या परिसरात सहसा कुणीच नसतं. रस्त्याच्या डाव्या बाजूला, बऱ्याच वर्षांपासून बंद असलेलं, कॉलेजचं बोटनिकल गार्डन आहे. गार्डन जंगल वाढावं तसं अक्राळविक्राळ वाढलं आहे. हे गार्डन पूलापासून हायवे पर्यंतच्या अर्ध्या किलोमीटर पर्यंत आहे. त्याच्या कुंपणावर जंगली वेलींचं साम्राज्य आहे. वेली एवढ्या दाट वाढल्या आहेत की रस्त्यावरून आतलं काहीच दिसत नाही. गार्डनचं मोठ्ठं कमानीच्या आकराचं गेट जीर्ण झालंय. लोखंड गंजून त्याच्या खपल्या पडतायेत. गेटच्या दोन्हीं बाजुला कमरे एवढं गवत वाढलं आहे. गवत वाळून गेलंय. हे गेट गार्डनचं न वाटता, गावाबाहेर असलेल्या सूनसान स्मशानभूमीचं वाटतेय. गार्डन मध्ये मोठ्ठाली उंच झाडं आहेत. त्या झाडांनाही जंगली वेलींनी वेटोळे घातले आहेत. वाळलेले पिवळे उंच गवत गार्डन भर आहे. गेट मधून गवतात उभी असलेली विहीर पुसटशी दिसतेय. तिच्या बाजूला पंप हाऊससाठी टीनाची एक खोली आहे. ती एका कोपऱ्यातून कोडमडली आहे. त्या खोलीच्या छोट्याश्या खिडकीतून आतला फक्त अंधार दिसतो. विहीर एका भव्य पिंपळाच्या झाडाखाली आहे. पिंपळाच्या पानांची सळसळ अखंड सुरू आहे. पिंपळावर बरेच कावळे आहेत. त्यांची विचित्र कावकाव तेवढी सुरू आहे. बाकी गार्डनमध्ये, रस्त्यावर, पलीकडच्या बटालियन मध्ये, सगळीकडे भयाण शांतता आहे. मोकाट वाढलेल्या गवतामुळे गार्डन मध्ये आता कुठलीच पाऊलवाट उरली नाहीय. सगळीकडे झाडांचा पाचोळा आहे. सगळं वातावरण प्रचंड गूढ आहे.

एखाद्या दुपारी, आपण रस्त्यावरून एकटे जात असताना गार्डनच्या गेटपर्यंत पोहचतो. गेटमधून दिसणाऱ्या, गार्डनमधल्या विहिरीपासून कुणीतरी आपल्या सोबत चालण्याचा भास होतो. आपण रस्त्यावर आणि ते गार्डनमध्ये. वाळलेले गवत हालचालीने सरसर बाजुला होतंय, पायाखाली पाचोळा येतोय हे त्या कमालीच्या शांततेत कळतं आपल्याला. आपल्या वेगाप्रमाणे गार्डन मधली हालचाल होते. आपण चालत असू तर चालतांनाची, सायकल किंवा गाडीवर असू तर पळण्याची. पिंपळावरचे कावळे खाली साप पहिल्या सारखा जिवाच्या आकांताने ओरडत, आपल्या सोबत, ह्या झाडाहून त्या झाडावर जात राहतात. आपण पूलापशी आल्यावर गार्डन संपत. पूलावर आल्यावर फार अस्थिर वाटतं. ओढ्यावरची भयावह बाभळीची झाडं. समोर छोट्या टेकडावर दूरवर असलेलं कॉलेज. पूल आणि कॉलेजच्या मध्ये असणारा ओसाड माळरान. या माळरानावर एक झुडूपही नाही. काही क्षणांसाठी आपण पूलावर असतो.  कावळे ओढ्याच्या काठी असणाऱ्या बाभळीवर येऊन बसतात आणि गार्डन कडे बघून ओरडत राहतात. गार्डन मधली हालचाल कुंपणा जवळ येऊन थांबते. आपण पूल ओलांडेपर्यंत कुंपणापलीकडून कुणीतरी आपल्याकडे एकटक पाहतंय असं वाटत राहतं. पूल ओलांडला की कावळे उडतात आणि पुन्हा विहिरीकडे निघतात. 

भर दुपारी, या पूलावर, माझी सायकल जर पंक्चर झाली आणि दोन मिनिटं मी या पूलावर उभा थांबलो. तर ओढ्याच्या पात्रात अवास्तव वाढलेली ती झुडूपं, वेडीवाकडी वाढलेली बाभळीची झाडं, त्यावरचे कावळे, कुंपणापलीकडचं कुणीतरी, सगळी जण माझ्याकडे वळून बघतील. पूलाखाली अडकलेल्या झुडूपातून कुणीतरी बोलावेल आणि ओढेलही. मी जिवाच्या आकांताने ओरोडलो तरी कुणीच ऐकणार नाही आणि बाभळीवरचे कावळे उडून जातील.

रिलेटेड पोस्ट : आंबा

इतर पोस्ट्स

32
(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

एकंदरीत, खाण्याकडून माझ्या अगदी माफक अपेक्षा आहेत. म्हणजे बघा -

पोहे असतील तर ते वाफाळलेले आणि लुसलुशीत हवेत. प्लेट मध्ये त्यांचा डोंगर तयार व्हावा. त्यात फ्रेश हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता असावा. सोबतीला लिंबाची फोड. असे कोरडे पोहे घश्याखाली जात नाहीत म्हणून त्या सोबत वाटीभर मटकी किंवा चण्याचा झणझणीत तर्री रस्सा हवा. 

तीच गोष्ट मिसळची ! बारीक कापलेला पांढरा स्वच्छ कांदा, त्यावर शिपंडलेला कोथिंबीर, लोळत पडलेल्या लिंबाच्या फोडी. गुबगुबीत आणि खुसखुशीत फरसाण. छोट्या भांड्यात उकळतं सँपल. टवटवीत ताजे पाव. सोबत ताक किंवा मठ्ठा. मिसळ रांगडी हवी, पहिल्या घासात डोक्याला घाम यायला हवा.

बेत साऊथ इंडियन असेल तर पहिला मान इडलीचा. इडली रवेदार आणि स्पंजी हवी. ती गुबगुबीत इडली दोन्ही हातांनी तोडली तर त्यातून तिच्या सारख्याच पांढऱ्या शुभ्र वाफा निघायला हव्या. सांबार सेपरेट - एका वाटीत - पातळ आणि किंचित तिखट हवा. सोबत नारळाची चटणी, तिला हलकीशी फोडणी दिलेली हवी. लाल चटणी जास्त आंबट नको.

डोसा हा नेहमी घी - डोसाच हवा. तोही क्रिस्पी ! बट्याट्याची भाजी सेपरेट, डोस्यात गुंडाळून वगैरे नको. भाजी मऊ आणि पिवळीधम्म हवी. सोबतचा सांबार वाटी तोंडाला लावून पिता येईल इतपत गरम आणि पातळ असावा. इडली सोबत आलेल्या दोन्ही चटण्या तर ओघाने आल्याच. डोसा झाल्यावर आप्प्याचा एक राऊंड चालेल. आप्पे ओबधोबड चालतील पण पूर्ण झालेले असावेत. सोबत नारळाची चटणी एक्स्ट्रा हवी. 

सांबार सोबत मेदू वडाच हवा, बटाटा वडा नको. मेदू वडा सांबारात बुडवून नको. सांबार सेपरेट. मेदू वड्याची वरची लेयर लाल तांबूस आणि खमंग हवी. आत मध्ये वडा जाळीदार हवा. सांबारात वड्याचा तुकडा बुडविला की त्याने वाटीतला सांबार अधाश्या सारखा शोषुन घ्यावा.  

साऊथ इंडियन शेवट, फिल्टर कॉफीने व्हावा. स्ट्रोंग आणि साखर कमी. कॉफी टिपिकल छोट्या ग्लास आणि वाटीत मिळावी.

बटाटा वडा, सँपल सोबत मस्त जातो. सँपल झणझणीत असेल तर वरून थोडा बारीक चिरलेला कांदा आणि सोबत एखादी पाव जोडी हवी.

समोसा, कचोरी, वडापाव आणि ब्रेड पॅटीस हे संध्याकाळचे आयटमस्. समोस्यासोबत गरम गरम रगडा हवा. समोस्याचा सगळा ईगो खोल बाउल मध्ये कुच्करून, त्यावर शिगोशिग गरम रगडा घातलेला असावा. वरून बारीक चिरलेला कांदा. सोबत तळलेली मिरची. 

तळलेली मिरची वडापाव, कचोरी आणि पॅटीस सोबत तर हवीच. तेलातून काढून मीठा मध्ये घुसळवलेल्या पोपटी रंगाच्या या मिरच्या म्हणजे सोबतच्या पदार्थाला उठल्या कुठे नेऊन ठेवतात. 

कचोरी कुरकुरीत असावी. आतलं सारण जरा कमीच असावं. तसचं ब्रेड पॅटीस मध्ये बट्याट्याची भाजी उगाच जास्त कोंबलेलेली नसावी. पॅटीस चे ब्रेड ताजे असावेत नाहीतर ते खूप तेल पितात. बेसनाचा लेयर पातळ असावा. पॅटीस चे समान चार काप करून सोबत पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंचेची आंबट गोड चटणी हवी. मूग भजी सोबत सॉस पण चालेल. पण कांदा भजी असतील तर मात्र कढी हवी. कढी आणि भजी तर डेडली कॉम्बिनेशन !

पाणीपुरीचा ओघ अखंड सुरू असावा. उगाच कुणी किती प्लेट्स झाल्या सांगुन, टोकु नये. पुरी जरा लाल, जळालेली आणि टपोरी असावी. त्यात रगडा टाकणार असाल तर तो एवढा गरम असावा की तोंड पोळलं पाहिजे. पुदिण्याचं पाणी तिखट तर चिंचेची आंबट गोड चटणी थिक हवी. सुकी पुरी बनविणे एक कला आहे. त्यामुळे ते बनवणारा दर्दी असावा. 

.   .   .

जेवणात, वरणभात असेल तर भात थोडा मोकळा हवा. वरण एवढं घट्ट हवं की भाताला सोडून ताटात इकडे तिकडे पळायला नको. त्यावर गावरान तुप ओघाने आलेच. सोबतीला मस्त वांग्याची भाजी हवी. भाजीला थोडा अंगी रस्सा तर हवा. जमलंच तर सोबत कोशिंबीर, पापड, लोणचं आणि एखादी चटणी. 

भरलेली वांगी छोटी छोटी आणि काटेरी असावीत. त्यातला मसाला थोडा काळपट आणि आतलं खोबरं किंचित जळलेलं असावं. वांग्याचं देठ बोटांनी दाबले तर वांग्याच्या फुला सारख्या पाकळ्या खुलाव्या. सोबत भाकरी बेस्ट. 

डाळ पालक असेल तर डाळ मूगाची हवी. डाळ कमी, पालक जास्त. हिरव्या मिरच्या शिजवतांनाच टाकलेल्या असाव्या. सोबत जरा जास्त पाणी घालून शिजवलेला इंद्रायणी तांदळाचा भात असावा. एखादा पापड.

मेथी मध्ये मात्र लाल मिरची टाकलेली असावी. तिला थोडं पाणी सुटलेलं असावं. सोबत कडक भाकरी. लाल मिरच्यांची चटणी. आणि पापड.

वांग्याचं भरीत हे खान्देशी हिरव्या वांग्याचं हवं. ते अगदी मऊ होऊन त्याला मस्त तेल सुटलेलं हवं. भरीत तोंडात टाकताच विरघळलं पाहिजे. सोबत हिरव्या मिरच्यांचा ठेचा, कांद्याची पात. आणि भाकरी - ज्वारीची किंवा कळन्याची. कळन्याच्या भाकरी सोबत लाल मिरच्यांची चटणी हवी. भरीत पुरी पण मस्त बेत आहे. सोबत खमंग कढी, पापड किंवा बिबड.

पिठलं भाकरी. पिठलं अंगीच तिखट हवं. कडक भाकरीला आलेला पोपडा काढायचा आणि त्यावर पिठलं घ्यायचं. सोबत ओला कांदा, ठेचा किंवा लाल मिरच्यांची चटणी.

शेव भाजी, पाटवडीची भाजी या भाज्या अश्या तिखट हव्या की पहिल्या घासात डोक्याला घाम आला पाहिजे. भाजी एवढी पातळ हवी की भाकरीचा कुचकरून काला करता आला पाहिजे. सोबत लिंबू आणि कांदा हवा. चपाती असेल तर जरा जाडजूड हवी. तिचे पापुद्रे निघाले पाहिजे.

साधी खिचडी मूग डाळीची हवी. त्यावर लसूण, जिरे आणि लाल मिरची घालून केलेले फोडणीचे तेल हवे. सोबत भाजलेला पापड. खिचडी फोडणीची असेल तर सोबत कढी हवी.

पुरण पोळी घरंदाज, कडक आणि जाडजूड हवी. महत्त्वाचं म्हणजे ती हाताला चटका लागेल एवढी गरम हवी. वरून गावरान तुपाची धार. पोळी एकच पुरे, उगाच आग्रह नको.

जीभ पोळेल एवढा गरम हलवा. गुलाबजाम सोबत व्हॅनिला आइस्क्रीम. जिलेबी सोबत रबडी. ही सगळी गोड मंडळी एकएकटे किंवा जोडीने आले तरी हरकत नाही.

तर, खाण्याचे तसे माझे फार नाटकं नाहीत. 

इतर पोस्ट्स

33
(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

त्या संध्याकाळी आभाळ भरून आलं होतं. काळया आभाळावर अंगणवाडी पांढऱ्या ठीपक्या सारखी दिसत होती. अंगणवाडीच्या मोठ्ठया पटांगणात विजा लख्ख चमकत होत्या. कुणीतरी दोघं अंगणवाडीत राहतात, असं आजच पाटलांच्या कानावर आलं होतं. न सांगता पोरांच्या शाळेत असं कोण राहतंय म्हणून पाटलांचा पारा चढला होता. दुपारी शेतावर झालेल्या भांडणाची सल अजुनही टोचत होतीच. पाटील पटांगणातून अंगणवाडीकडे झपझप चालत होते. मोठ्या मिश्या. करारी डोळे. पांढरा कुर्ता. धोतर. पायात कोल्हापुरी वहाणा. पाटील - एकंदरीत भारदस्त माणूस. त्यात, आज डोक्यात राग.

दरवाजा उघडाच होता. लाईट गेल्याने, खोलीत अंधार होता. पाटील आत घुसले. बाहेर रपरप पाऊस सुरू झाला. ती दोघं पाटलांना पाहून उभी राहिली. एक जण उंच पण स्थूल होता. दुसरा बारीक, अशक्त. एका कोपऱ्यात त्यांचं सामान होतं. अंगणवाडी चे पत्रे कोसळणाऱ्या पावसामुळे ताडताड वाजू लागले. पाटलांनी त्यातल्या उंच व्यक्तीची कॉलर धरून, वर उचललं. दुसरा पळत बाहेर अंगणवाडीच्या व्हरांड्यात गेला. पाटलांचे डोळे रागाने लाल झाले होते. ते रागातच म्हणाले, "पहाटेस्तोवर अंगणवाडी खाली करायची." त्याला झटकून खाली सोडलं. पाटलांचा हा अवतार बघून त्याची बोबडीच वळली. तो घाबरून पायात डोकं घालून बसला. दुसरा व्हरांड्यात थरथरत उभा होता. पाटील त्याला हाताने बाजुला करायला गेले. जोरात दिलेल्या धक्क्याने तो व्हरांड्याच्या पायऱ्यावरून खाली पडला. जोरात विव्हळलला. त्याच्यात उठण्याची ताकदच नव्हती. वरून पाऊस त्याच्यावर अक्षरशः आदळत होता. पाटलाने त्याला पायानेच बाजुला केलं. आले त्याच वेगाने पाटील फाटकावर उभ्या केलेल्या आपल्या जीपकडे गेले. अवकाळी आलेल्या पावसाने फार जोर पकडला होता. वातावरण धूसर झालं होतं. 

पाटलांनी गाडीला स्टार्टर मारला. शेतावरच दुपारचं भांडण, अंगणवाडीत घुसलेले हे दोन लोकं या सगळ्यांचा राग घेऊन जीप अंधार आणि पाऊस चिरत पळू लागली. पाटलांना संध्याकाळीच शहरात पोचायचं होतं. या प्रकारामुळे उशीर झाला. त्यात असा अवकाळी पाऊस. उद्याचं मेव्हण्याच लग्न होतं. "लवकर या!" पाटलीन बाईने सकाळीच ठणकावून सांगितलं होतं. ती मंगल कार्यालयाच्या दारावर छत्री घेऊन उभीच होती. रस्त्याच्या वळणावर जीप दिसली. तिचा जीव भांड्यात पडला. पाटील आवरून मेव्हण्याला भेटले. जेवणं उरकली. पाटलीन उद्याच्या धावपळीत होती. पाटील झोपायला वरच्या खोलीत गेले. शहरात राहणारा - पाटलांचा हा मेव्हणा, जवळच्या खेड्यावर शिक्षक. अख्ख्या खानदानात एकटा व्यक्ती शिकलेला. पाटलांना त्याचा फार अभिमान. 'मास्तर' म्हणायचे पाटील त्याला. स्वतः पाटलाने कधी शाळेत पाय ठेवला नाही. पण शिक्षकांबद्दल फार आदर. शाळेची जागा कमी पडते म्हणून गावालगतच्या स्वतःच्या शेतात, अंगणवाडी बांधून दिली होती पाटलांनी. सगळ्या सोयी करून दिल्या होत्या. गावातली लहान लहान लेकरं यायची तिथे. मोठ्ठ्या पटांगणात दिवस भर खेळायची. शेतावर जातांना, पाटील गाडी थांबून कौतुकाने बघायचे. त्याच अंगणवाडीत कुणी कसं काय घुसून राहतंय? पाटील परत बेचैन झाले. "मी असं होऊ देणार नाही" मनाशीच पुटपुटत ते झोपी गेले. अवकाळी आलेला हा पाऊस कोसळत राहिला, रात्रभर.

सकाळच्या मुहूर्तावर लग्न होतं. पाऊस थांबून लख्ख उन पडलं होतं. पाटील-पाटलीन खुश होते. दोघांनी जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले. खरंतर हे लग्न पाटलांमुळे झालं. मुलीच्या घरचे, मेव्हन्याची मास्तरकी आणि परिस्थिती बघता तयार नव्हते. पण पाटलांनी मध्यस्ती केली. शिक्षक म्हणजे समाजातील महत्त्वाची व्यक्ती, हे मुलीकडच्यांना पटवून दिलं. एका शिक्षकाच्या नवीन आयुष्याची आपण सुरुवात करून दिली, याचं पाटलाला फार समाधान होतं. 

पंगती सुरू झाल्या. पाटील काय हवं नको ते बघत होते. गावातला तुक्या पाटलाला कोपऱ्यात घेऊन गेला, "पाटील, अंगणवाडीत काहीतरी झालंय. अख्खा गाव जमा झालाय. पोलिस आलेत." पाटलांनी ताबडतोब जीप काढली. गावच्या दिशेनं निघाले. अवकाळी पावसानं रात्री सगळीकडे प्रचंड नासधूस केली होती. रस्त्यात ठीकठिकाणी झाडं पडली होती. पाटील पोहचले तेव्हां, गावातली लोकं फाटकाजवळ गर्दी करून उभे होते. हवालदार त्यांना मागे रेटत होता. पाटलाला पाहून त्याने फाटक उघडले. पटांगणात झालेला चिखल तुडवत, पाटील अंगणवाडीच्या दिशेनं जड पावलांनी निघाले. सगळं वातावरण सुन्न होतं. बाहेर उभ्या असणाऱ्या लोकांची कुजबुज कानावर येत होती. अंगणवाडीच्या त्या खोलीजवळ दोन तीन पोलिस उभे होते. एक जण काही तरी लिहीत होता. दोघांचं सामान बाहेर आणून ठेवलं होतं. उंच, स्थूल माणूस पायात डोकं घालून बसला होता. त्याच्या पुढ्यात पांढऱ्या कपड्यात प्रेत गुंडाळून ठेवलेलं होतं. पाटील व्हरांड्यापाशी पोहोचले. पाटील काही बोलण्याच्या आधी, त्यातला एक पोलिस प्रेताकडे पाहून म्हणाला, "पाय घसरून पडला. डोकं दगडावर आपटलं. रात्रभर पावसात पडून होता. कधी जीव गेला कळलं नाही. हा दुसरा तापानं फणफणतोय. काहीच बोलत नाही." प्रेताजवळ बसलेला तो, पाटलाकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होता. तोवर शाळेचे मुख्याध्यापकही पोहचले. पाटलाकडे बघून म्हणाले, "फार दुर्देवी झालं. मीच अंगणवाडीची चाबी दिली होती या दोघांना. राहण्याची सोय होईस्तोवर रहा म्हटलं इथे. आपल्या शाळेत आलेले, नवीन शिक्षक होते हे दोघं." 

इतर पोस्ट्स

34
(रीडिंग टाईम 5 मिनिटं )

'महाराज !' म्हणायचो आम्ही त्याला. कारण? आम्हाला मिळणारी प्रजेसारखी ट्रीटमेंट. प्रजेसारखी ही ट्रीटमेंट आम्ही मात्र फार एन्जॉय केलीय. महाराजाचं एक इमॅजिनरी 'संस्थान' तयार केलं. घडणारी प्रत्येक घटना जर संस्थानांत घडली असती तर महाराजांनी कसं रिॲक्ट केलं असतं, काय डिसिजन दिलं असतं, यावर तासनतास डिस्कशनस् व्हायची. तो ही त्याचं राजेपण आणि संस्थान एन्जॉय करायचा. पाच साडे पाच फुट उंची. अंगाने काकट. केसांचा डावीकडे पाडलेला फुगा. शर्ट असो वा टी शर्ट, व्यवस्थित टक इन केलेलं. पायात स्पोर्ट्स शुज. चेहऱ्यावर निखळ भाव. एका वेगळ्याच रुबाबात चालणं. अशा या साधारण व्यक्तीचं एक सूत्र होतं - "एकदा ठरलं की ठरलं." मग त्यात कधीच आणि कुणीच, कुठलाच बदल करू शकत नव्हता. माझा निर्णय तुम्ही मान्य करावा असा हट्ट नाही. पण मी करणार असंच!

तर या महाराजांचे काही आठवणीतले क्रोनिकल्स - म्हणजेच इतिहासात नमूद करून ठेवावेत असे प्रसंग. घडलेले सगळे पराक्रम हे महाराजांचे एकट्याचे आहेत. प्रजा फक्त साक्षीदार होती.

मेसचे बंड

आयुष्यात चांगली मुलगी आणि चांगली मेस मिळणे फार अवघड. अत्रे काकूंची मेस मुळातच आमच्या घर मालकीण काकूंच्या प्रयत्नांतून सुरू झाली. आमच्या आधीच्या मेस चे हाल पाहूनच आमच्या काकूंनी अत्रे काकूंना मेस साठी कसं तरी तयार केलं. ही मेस मुळातच जन्माला आमच्या साठी आली होती. आम्ही सगळे मिळून सहा जण त्या मेसचे मेंबर्स झालो. अत्रे काका - काकू फारच उत्साहात होते. मेस चालविण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने, काकुंचं जरा ट्रायल आणि एररच चाललं होतं.  आम्ही पण 'नवसाची मेस' म्हणून धकवत होतो. त्यांचं मिळमिळीत जेवण कुणाला काही पटेना. पण एवढा खटाटोप करून सुरू झालेली मेस बंद नको पडायला म्हणून आम्ही गप्पपणे गिळत होतो. महाराजांना हे काही सहन होईना. जेवणात लक्ष लागे ना. प्रजेने एक दोनदा समजूत  काढली. "अत्रे काकू नवीन आहेत एवढा स्वयंपाक त्यांना झेपत नसेल. हळू हळू होईल बरोबर." पण कसलं काय, सांगून काही फरक नाही. ऐकतील ते महाराज कसले? एके दिवशी महाराजांनी मेस वर जाऊन आपल्या कराऱ्या आवाजात सांगीतलं, "मला तुमचं जेवण आवडत नाही. उद्या पासून माझा डबा देत जाऊ नका." अत्रे काका - काकू शॉक! काकूंना तर रडूच कोसळलं. पण महाराज डळमळले नाही. बोलून शांतपणे आपल्या रूमवर निघून गेले. काकूंनी उरलेल्या प्रजेला बोलावलं, छोटीशी फीडबॅक मीटिंग झाली. क्वालिटी बद्दल चर्चा झाली. बदल सुचवण्यात आले. महाराजांना परत येण्याची विनंती करण्यात आली. पण एकदा ठरलं की ठरलं, त्यात बदल नाही. नंतर महाराजांनी दुसरीकडे डबा वगैरे लावला. महाराजांच्या या बंडामुळे प्रजेचं मात्र कल्याण झालं.

जिन्यातून सुटका

रॅगिंग घेणे अलाऊड नव्हतं आमच्या कॉलेज मध्ये. पण ज्युनियर्सचे इंट्रो घ्यायला बंदी नव्हती. इंट्रो म्हणजे नाव गाव विचारायचं. दोन तीन फालतू प्रश्न विचारायचे. म्हणजे बघा, "कॉम्प्युटरला मराठीत काय म्हणतात?" पोरं सांगायची,  "संगणक !" खरा प्रश्न पुढचा, "संगणक या शब्दात अनुस्वार स वर आहे की ग वर?" इथे पोरांची विकेट पडायची. तेवढीच आमची मजा. आमच्या सोबत महाराज असायचेच, पण कधी काही बोलायचे नाहीत. एकदा म्हणाले, "उद्या मी घेतो इंट्रो !" आम्ही काही फार सिरीयसली घेतलं नाही. पण महाराजांचं, ठरलं म्हणजे ठरलं. दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंटच्या जिन्यात महाराज एकटेच ज्युनियर्सच्या घोळक्यात उभे दिसले. काय चाललंय बघावं म्हणून सहज जिन्यातून गेलो. तर पठ्ठ्या स्वतःच इंट्रो देत होता. ज्युनियर्स पोरं पोरी हसत होती, महाराजांना प्रश्न विचारत होती. प्रकरण जरा हाताबाहेर गेलेलं होतं आणि मला एकट्याला आवरणारंही नव्हतं. मी त्याच पावलांनी खाली गेलो प्रजेची एक तुकडी तयार करून जिन्यावर हमला केला आणि महाराजांची सुखरूप सुटका केली. 

कलाश्रय

महाराजांना कलेची कदर आणि हौस दोन्ही होत्या. कॉलेज - प्रेम - कविता हे सर्कल वर्षानुवर्षे फिरतय. आमच्या डिपार्टमेंटच वॉल मॅगझिन होतं. तिथे प्रेमविरांच्या बऱ्याच कविता प्रकाशित होत. आवडलेली प्रत्येक गोष्ट करून बघायचे महाराज. कविता आवडल्या. कराव्या वाटल्या. पण प्रेमाच्या भानगडीत महाराज कधी न पडल्याने जरा गोची झाली. त्यांनी झाड, पक्षी, माणूस अश्या सामाजिक विषयांवर कविता करायला सुरुवात केली. मग काय? एकावर एक कविता. कविता तयार झाली की महाराज आमच्या रूमवर.  ऐकण्यासाठी आणि दाद देण्यासाठी हक्काची प्रजा होतीच. कवितांचे बरेच प्रयोग महाराजांनी केले. काही फसले काही वॉल मॅगझिनवर गेले. पण कवितेनं महाराजांच्या पदरी आश्रय घेतला तो कायमचा.

मोहीम

प्रत्येक गोष्ट एखाद्या मोहिमेला चाललोय या सारखी चोख करण्याची सवय. पैशांचे काटेकोर नियोजन. महिन्याभराच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या. प्रजेने कितीही विनवण्या केल्या तरी ठरलेल्या दिवशीच पाणीपुरी खाऊ घालायचे, महाराज. 

आम्ही सगळ्यांनी जिम लावली. सहा महिन्याचे पैसे भरले. सकाळी सहाची बॅच. महाराज पाऊने सहाला हजर. बाहेरून आवाज द्यायचे. आम्ही घोडे विकून झोपलेलो. दोन तीन दिवस गेलो होतो आम्ही, नंतर त्या जिमच तोंडही पाहिलं नाही. महाराज मात्र रोज जायचे आणि आम्हाला न चुकता आवाज द्यायचे. आजूबाजूचे लोकं उठत पण आम्ही कधी उठून बाहेर आलो नाही. एकही दिवस जिमला दांडी मारली नाही त्यांनी. कारण सोप्प होतं, पैसे भरलेत, मग वसुल करावेच लागणार. जिमची मोहीम महाराजांनी फत्ते केली, पण हातास आणि अंगास काही लागलं नाही. 

महाराजांची मोहीम एकदा पुण्याला होती. पैशाचं काही तरी कॅल्क्युलेशन करून, फोन आला, "शिवाजीनगरहून कोथरुडला यायला ऑटोने किती पैसे लागतात?" तोपर्यंत मी कधी स्पेशल ऑटोकरून शिवाजीनगरहून आलो नव्हतो. तरी मी अंदाजे ठोकलं, "तीस रुपये होतील, मीटरने." महाराज येणार म्हणून मी स्वतः खाली रिसिव्ह करायला गेलो. महाराज रागातच ऑटोतून उतरले आणि म्हणाले, "ऐंशी रुपये लागले!" चिडलेले महाराज पाहून मनातून आनंद झाला पण मी आधी सॉरी म्हणालो आणि मग विचारलं, "कसा आहेस?"

. . .

तो शाळेत होता माझ्या. पण वेगळ्या वर्गात. डिप्लोमाला एका वर्गात आलो. खरंतर, कॉलेज लाईफ मधला हा माझा पहिला मित्र. दोघंही सामान्य बॅकग्राऊंड मधून आलेले. एकमेकांना सपोर्ट करत करत आम्ही पुढे जात राहिलो. सेकंड इअर नंतर तो मागे पडला. इंजिनीअरिंगला आम्ही पुन्हा एका कॉलेज मध्ये आलो. त्याची रूमही माझ्या रूम जवळच होती. आमचं शाळा- डिप्लोमाचं कनेक्शन अजुन घट्ट झालं. काही लोकं त्यांच्या युनिक स्वभावामुळे लक्षात राहतात. सगळ्यांचं शांतपणे ऐकून त्याला वाटेल तेच करणारा होता तो. इंजिनिरिंग झाल्यावर कॉन्टॅक्ट कमी झाला. पुढे त्याने मास्टर्स केलं. प्रत्येकाची स्टोरी जशी पुढे सरकत जाते तशी बदलत जाते. त्याचा काही वर्षांचा प्रवास मी अगदी जवळून पाहिलाय. मित्रांमध्ये मिसळण्यासाठी त्याने स्वतःला भरपूर डेव्हलप केलं. आता मुंबईत स्थाईक आहे. परवा त्याचा फोन आला आणि झरझर सगळं आठवलं. मित्र म्हणून खरंच राजा माणूस. तुम्ही एकदा त्याचे मित्र झालात की मागे वळून पाहण्याची गरज नाही. 

महाराज ! या पोस्टसाठी, क्षमा असावी.

इतर पोस्ट्स

35
(रीडिंग टाईम 4 मिनिटं )

नेटफ्लिक्स आणि मल्टीप्लेक्सच्या आधी असणाऱ्या सिंगल स्क्रीन टॉकीज बद्दल थोडंस :

गावात नवा सिनेमा लागला की तीन-चाकी-सायकल रिक्षा प्रमोशनसाठी फिरायची. तिला दोन्ही बाजुला सिनेमाचे पोस्टर्स आणि समोरून बाहेर निघालेला अल्युमिनियमचा लांब भोंगा असायचा. "श्याम टाकिज मे रोजाना चार खेलो में देखिए…" असं ओरडत हा भोंगा गाव भर फिरायचा. सिनेमा कुठलाही असो - टॉकीज कुठलीही असो, नवीन सिनेमाची ही जाहिरात, कुण्या एकाच माणसाच्या आवाजात रेकॉर्ड केलेली असायची. 

सिनेमाचे मोठ्ठाले पोस्टर्स फक्त टॉकीजच्या भिंतीला दिसायचे. आणि छोटे छोटे पोस्टर्स तर कुठल्याही भिंतीला चिकटवली जात. एकाच भिंतीवर अशी सेम पोस्टर्स एका रांगेत लावण्याची पद्धत होती.

थियटरच्या पॅसेज मध्ये, नोटीस बोर्ड सारख्या काचेच्या बॉक्स मध्ये, एखादा सिन दाखवणारे काही फोटोज् लावलेले असायचे. त्या फोटोज् मधून प्रत्येक जण स्टोरी गेस करत टाईम पास करायचा.

रफ पेपरवर प्रिंट केलेले- लाल, निळा, पिवळा असे भडक शेडस मधले तिकिटं असतं. त्यावर तिरपा तारपा कसाही तारखेचा शिक्का मारलेला असे. हॉलच्या दारात अर्धे तिकीट फाडून घेतल्या जायचं. हिट सिनेमाला टॉर्च घेऊन चालू पिक्चरमध्ये तिकीट चेकिंग पण व्हायचं.

'गजानन' टॉकीजचं दारच थेट रस्त्याला लागून होतं. तशीच तिकीटाची खिडकीही. तिकीटासाठीची रांग नेहमी रस्त्यावर. टॉकीज समोरचा रस्ता ब्लॉक झालं की समजायचं, पिक्चर हिट आहे.

बऱ्याच टॉकीज मध्ये सीटला नंबर्स नव्हते. फर्स्ट कम - फर्स्ट सर्व्ह. त्यामुळे मागची सीट पकडायला झुंबड उडायची. चेंगरा चेंगरी व्हायची. माझ्या ओळखीच्या एकाला तर हॉल मध्ये पोहचल्यावर कळलं, शर्टाची एक बाही आपण गर्दीत गमावली.

'सादिया'चा मालक जुन्या सिनेमातल्या व्हीलन सारखा होता. उंच पुरा. पांढरे शुभ्र केस, पांढरीच दाढी. पांढरे कपडे, पांढरे शूज. आणि जुन्या काळातली लांब पल्ल्याची पांढरी मर्सिडीज. हा माणूस प्रत्येक शोची तिकीटं स्वतः हॉलच्या दारात उभं राहून फाडायचा.

'स्मृती' आणि 'लिबर्टी' मध्ये ब्लॅक फार चालायचं. बाहेर उभ्या असलेल्या गर्दीतून ब्लॅक वाला ओळखायचा, त्याला नजरेनेच विचारायचं. त्याचा सिग्नल मिळाला की, किती तिकिटं हवेत हे इशाऱ्याने सांगायचं. मग आपल्यातल्या एकानं जाऊन डील फायनल करायची. हे नेहमीच होतं.

पेपरच्या आधी स्ट्रेस ब्रस्टर म्हणून पिक्चर पाहिले. पेपर खराब गेला म्हणून पिक्चर पाहिले. पेपर चांगला गेला म्हणून ही पिक्चर पाहिले.

परत-परत वेळ वाया घालवण्यापेक्षा, वेगवेगळ्या पिक्चर्सचे दोन शोज लागोपाठ पाहणे, हे अगदी नॉर्मल होतं. आजही आहे.

टॉकीज नुसार तिथला ऑडीयनस बदलतो. 'दिल चाहता है' मी आमच्या गावात पाहिला होता. अक्षय खन्ना ने लाँग पॉज घेतला की अख्खी टॉकीज हसायची. लोकं ओरडायची,"अबे, अब तो बोल!"

'सुदामा' मध्ये पिक्चर सुरू व्हायला उशीर झाला की लोकं खालून ओरडायची, "सुधाकर, चालु कर." प्रोजेक्टर रूम मधल्या त्या माणसाचं नाव खरंच सुधाकर होतं की प्रोजेक्टर ऑपरेटरला सुधाकर म्हणतात, देव जाणे !

'सुदामा' लोकांना एवढी घरची टॉकीज वाटायची की, आमिरचा 'मंगल पांडे' बघतांना लोकांनी स्वयंघोषित एक इंटर्वल घेतला होता. आणि सुधाकरने पिक्चर थांबवलाही होता.

पिक्चर चालू असताना लाईट जाणे फार कॉमन. जनरेटर सुरू व्हायला पाच - दहा मिनिटं लागायची. तोपर्यंत अंधार.  कल्ला हल्ला आणि शिट्टया. लोकं अख्खं थिएटर डोक्यावर घेत.

'बाल्कनी' नावाचा एक सेक्शन, वर असायचा. तिथे बसणारी लोकं म्हणजे सभ्य, असा जनरल समज होता. ती लोकं शांतपणे पिक्चर बघायला आलेली असायची. जागेसाठी मरमर नाही. कल्ला हल्ला, शिट्टया, काही नाही. 

अनिमॅशन मूव्हीच फार वेड होतं. आजही आहे. 'हनुमान रिटर्न्स' हा सिनेमा बघायला पवन आणि मी गेलो तेव्हा सर्व बाल गोपालांमध्ये आम्ही दोघंच मोठी होतो. आमच्या आजूबाजूला बसलेली सगळी लहान मुलं, स्क्रीनच्या मध्ये समोरच्या खुर्च्या येतात म्हणून, उभे राहून सिनेमा बघत होते.

'लक्ष्मी' थिएटरची साऊंड सिस्टीम जबऱ्या होती. मी आणि कप्या एक हॉरर पिक्चर बघून थिएटरच्या बाहेर पडलो. आवाजाचा आणि सिनेमाचा इम्पॅक्ट एवढा होता की, भर दिवसा आम्ही एकमेकांचा हात धरून घरी आलो होतो.

'इन्सेप्शन' हा पिक्चर समजला नाही म्हणून चारदा पहिला होता. पहिल्या वेळेस तर सब-टायटल्सही नव्हती. टॉकीज मध्ये जाऊन इतक्यांदा पाहिलेला हा एकमेव पिक्चर आणि तो ही कळला नाही, म्हणून.

'टायटॅनिक' आणि 'जुरासिक पार्क' हे दोन पिक्चर्स सोडले तर, रसेल क्रो चा 'ग्लॅडियेटर' हा टॉकीज मध्ये पाहिलेला, पहिला इंग्लिश पिक्चर. त्याच्या भव्यतेचा इम्पॅक्ट आजही आहे.

'लगान' ची शेवटची मॅच आम्ही उभं राहून पहिली होती. 'हॉबिट ' ट्रायओलॉजीचा शेवटचा पार्ट सुरू झाला, 'हॉबिट' हे नाव स्क्रीन वर झळकलं आणि थिएटरभर टाळ्या वाजल्या होत्या. फॅन्सचा तो रिस्पॉन्स, आजही अंगावर शहारे आणतो.

दिवसागणिक सगळे स्क्रीन अपग्रेड झाले. मल्टीप्लेक्स आले. नेटफ्लिक्स आलं. आणि टॉकीज, कल्ला हल्ला, शिट्टया आणि अंगावर शहारे आणणारे क्षण कमी झाले.

इतर पोस्ट्स

36
(रीडिंग टाईम 5 मिनिटं )

चहाच्या टपरीने, दिवस सुरू होण्याचे, दिवस होते ते. 

टपरीवरचा चहा कसा आहे याला महत्त्व नव्हते. त्या चहाची टपरी कुठे आणि कशी आहे यावर तिचं महत्त्व ठरायचं. "अ लॉट कॅन हॅपेन ओव्हर कॉफी"असं म्हणतात. पण चहा आणि चहाच्या टपरीवर बरचं काही घडतं. अश्याच काही लक्षात राहिलेल्या टपऱ्या. 

चहा आणि पेपर

आम्ही राहायचो तिथून जवळच्या चौकात चहाची एक गाडी लागायची. सकाळी साडे-सहा, सात पर्यंत एक काका ती गाडी लावायचे. सात पर्यंत चहा बनायचा. आम्ही आधीच येऊन चहाची वाट बघत बसलेलो असायचो. गरम गरम चहाचा ग्लास एकदाचा हाती आला की दिवस सुरू व्हायचा. 

गाडी साधी होती. गाडीच्या पुढ्यात लाकडी फ्रेमचा काचेचा बॉक्स. गाडीच्या तीन बाजूला लाकडी फळ्यांचे कान. गॅसची शेगडी, सिलेंडर. चहा-दुधाची भांडी. काळी लोखंडी कढई. वडे-भजी ठेवण्यासाठी अल्युमिनियमच्या पराती. पावासाठी टिनाचा चौकोनी डबा. काचेचे ग्लास. प्लास्टिकच्या प्लेट्स. वडा-रस्सा खाण्यासाठी इलीपस् आकाराच्या स्टीलच्या खोल प्लेट्स.  पाण्याची स्टीलची छोटी टाकी. त्यावर दोन एक ग्लास. प्लेट्स धुण्याच्या साठी, एक प्लास्टिकचं टोपल. दोनतीन प्लास्टिकचे स्टूल, चार पाच खुर्च्या.  गाडीचे मालक म्हणजे काका रोज हा पसारा गाडीत लोड करून आणायचे आणि संध्याकाळी घरी घेऊन जायचे. काका राहायला नीटनेटके. पांढरा हाफ शर्ट. व्यवस्थित ठेवलेली दाढी. चष्मा. डोक्यावर विरळ केस. नेहमी हसतमुख. हाताला भारी चव. वडा आणि सोबत मटकीचा रस्सा म्हणजे बहारच. चहा घेऊन आम्ही वडा तयार होण्याची वाट बघत असू. काकांचा वडा आणि रस्सा साधारण साडे-आठपर्यंत रेडी व्हायचा. 

काकाच्या गाडी समोर, आमचा पेपरवाला त्याचा छोटासा स्टॉल लावायचा. पेपर आमच्या रूमवर टाकण्याआधीच आम्ही गाडीवर हजर असायचो. पेपर तो मग आमच्या हातातच  टेकवायचा. त्याने पेपर कधी रूम वर टाकल्याच आठवत नाही. बऱ्याचदा स्टॉल आमच्या भरवशावर सोडून तो इतर ठिकाणी पेपर टाकून येई. आम्ही तोपर्यंत, त्याच्या स्टॉल वरचे इंग्लिश मराठी सगळे पेपर वाचून काढत असू. त्याची ही हरकत नव्हती. फक्त वाचलेल्या पेपरची नीट घडी करून ठेवायची एवढीच अट. सगळे पेपर वाचून होईस्तोवर काकांचा वडा तयार होई. 

सुट्ट्या पैशांच्या अडचणीतून सुटण्यासाठी काकांनी आमच्या साठी एक वही बनवली. जे काही खाल्लं ते तारखेनिशी स्वतःच वहीत लिहून ठेवायचं. हिशेब लावून पैसे महिनाअखेर द्यायचे. हे दोघांना ही सोईस्कर होतं. वही खातं बनल्यामुळे आम्ही तर सुटलोच. वडा सिंगलचा आपोआप डबल झाला. नंतरचा एक चहा वाढला. चहा, वडा आणि सोबत पेपर - रोजची सकाळ धमाकेदार व्हायला लागली.

.   .   .

मिनिमलिझम

अण्णा अगदी मिनीमल चहा वाला होता. छोटीशी टपरी. आत बसण्यासाठी एक लाकडी छोटा बाक. तसाच एक बाक बाहेरही. एक गॅसची भट्टी. मोजून तीन भांडे. एक मोठ्ठं दुधाच. दोन चहाचे. छोटं स्पेशल चहासाठी. मोठं रेगुलर चहाचं. साखर आणि चहाचे मिळून दोन डबे. दोन अल्युमिनियमच्या केटल्या. काचाचे दहा-बारा ग्लास. ग्लास नेण्यासाठीचे तारेचे स्टँड. टपरीचा रंग आतून बाहेरून एकच - निळा. कुठे चहाचे डाग नाही. कुठे पाणी सांडलेले नाही. सगळं स्वच्छ. सुटसुटीत.

अण्णा टिपिकल साऊथ इंडियन. मोठ्ठं पोट. त्यावर तरंगणारा शर्ट. खाली पायजामा. डोक्यावर टक्कल. पक्का काळा रांग. चहाची गरम वाफ चेहऱ्यावर आली की जसा त्रासलेला चेहरा होतो, तसा चेहरा. गरम गरम चहा सारखा हातावर घेऊन टेस्ट करण्याच्या सवयी मुळे पोळून जाड झालेली जीभ. त्यामुळे घोगरा आवाज. तसंही अण्णा फार काही बोलत नसे. त्याच्या टपरीवर तेलगू मधलं एक वृत्तपत्र नेहमी असायचं. फावल्या वेळात अण्णा ते वाचित बसे. सोबतीला एक जुना रेडिओ पण होता. एका खुंटीला टांगलेला. पण रेडिओ ऐकण्याचा योग कधी आला नाही. 

कॉलेज सुटलं की, संध्याकाळी घरी जाता जाता, आम्ही हमखास अण्णाच्या या टपरीवर थांबायचो. आम्ही जायचो त्या वेळी अण्णाची आवराआवर सुरू असायची. केटली मध्ये दिवसाचा शेवटचा चहा भरून  बाकड्यावर अण्णा निवांत बसलेला असायचा. आम्ही दोघं तिघ असलो आणि चहा तेवढा नसेल तर अण्णा स्पष्ट चहा संपला सांगायचा. त्यावेळी कितीही लोकं आली तरी अण्णाचा पवित्रा तोच. गिऱ्हाईक येतय म्हणून परत चहा बनवायचं वैगरे त्याच्या तत्वात नव्हतं. 

अण्णाची टपरी फक्त चहाचीच होती. बाकी काहीच मिळत नसे. एकाच  गोष्टीवर वर्षानुवर्षे फोकस असल्याने अण्णाने गिऱ्हाईकं नाही तर फॅन्स मिळवले. आमच्या सारखे. जे तिथे थांबल्या शिवाय पुढे गेले नाहीत. चहा म्हणजे चहा. त्यात कुठला मसाला नाही, आलं नाही, गवती चहा नाही. सगळं गणित प्रपोर्शन्स आणि एक्सपेरिएन्सचं. अण्णाच्या टपरीवर बसून नेहमी वाटायचं, साधी माणसंच मिनिमलिझम चांगलं फॉलो करतात.

.   .   .

चहा आणि इतर ड्रग्स

'रामू काका' अतिशय कॉमन नाव. पण चहा मात्र अन-कॉमन. शंकर नगर गार्डनच्या कोपऱ्यावर रामू काकाची टपरी होती. टपरी म्हणजे हातगाडीवर तयार केलेली. हातगाडी वर्षानुवर्षे जागची कधी हलवली नाही म्हणून त्याची टपरी झाली. गार्डनचे कंपाऊंड आणि गाडीचं छत या दोघांना बांधलेली ताडपत्री. टपरी मध्ये अगदी जुजबी समान. बसण्यासाठी स्टूल किंवा खुर्च्या नाही. कंपाऊंडचा बाहेर निघालेला कठडा, रस्त्याच्या खोदकामात बाहेर काढलेला एखादा सिमेंटचा हुम पाइप, अश्या गोष्टीवर बसायचे किंवा उभे राहायचे. 

रामू काका म्हणजे बुटकं, हाडकुळं व्यक्तीमत्व. नेहमी चौकडीचा हाफ शर्ट. ढीली-ढगळी पँट. पुढे आलेले दात. वयानुसार विरळ झालेले केस. रामू काका नेहमी भांड्यात चहा घोटतांना दिसायचा. चहाच्या भांड्यात चमच्याने घोटतांना, रामू काका स्वतःशीच काही तरी पुटपुटत असे. त्याच्याकडे स्टीलची एक छोटी डबी होती. चहा शिजत आला की हळूच त्या डबीतून मसाल्याची चिमूट तो चहात  टाकायचा. मी खूपदा विचारलं, "काय आहे त्या मसाल्यात?" त्यावर रामू काका म्हणायचा, " हर एक का अपना सिक्रेट फॉर्म्युला होता है, बाबू !"  मला तर अजूनही वाटतं, हा माणूस नक्कीच चिमूट भर कुठला तरी ड्रग टाकत असावा. नाहीतर एवढी लोकं का येतात मरत-मरत. रामू काकाची टपरी आणि चहा अड्डिक्शन होतं. रामू काका सकाळी सहाला टपरी चालू करायचा ते थेट रात्री दहाला बंद. गर्दी मात्र कुठल्याच वेळेला कमी होईना. बऱ्याचदा रामू काका आपलं आवरून, टपरी बंद करून निघून जायचा. लोकं तशीच बसून राहायची, गप्पा मरत. खरं तर रामू काकाची टपरी नसून तो कट्टा होता. प्रत्येक वयोगटातील लोकं इथं येत. वेळा फक्त वेगवेगळ्या. रामू काकाच्या टपरी वरून एकच चहा पिऊन कुणी परत गेला असं झालं नाही. आणि एकदा चहा पिल्यावर कुणी परत आला नाही असं ही झालं नाही. रामू काकाच्या चहाची नशाच तशी होती.

.  .  .

या टपऱ्यांना नावं नव्हती. कुणी त्यांना रेटिंगचे स्टार नाही द्यायचं. त्या फेसबुक किंवा गुगल वर सापडत नाहीत. आठवणीत मात्र आहेत. 

चहाच्या टपरीने, दिवस सुरू होण्याचे, दिवस होते ते.

इतर पोस्ट्स

37
(रीडिंग टाईम 5 मिनिटं )

इंजिनीअरिंग ड्रॉइंग या विषयात भरपूर ड्रॉइंग शिटस् काढाव्या लागत. ह्या शिटस् पूर्ण करण्याचे दोन टप्पे होते. पहिला- शिट ड्रॉ करणे. आणि दुसरा- पूर्ण केलेल्या शिटवर मास्तरची सही घेणे.  दोन्ही टप्प्यातलं ऍडव्हेंचर आणि मेहनत सेम होती.

टप्पा पहिला: शिट ड्रॉ करणे

एक ड्रॉइंग शिट ए-वन साइजची, म्हणजे ५९ बाय ८४ सेंटिमीटर असते. म्हणजे कॅरम बोर्ड पेक्षा मोठी. वर्षभरात साधारण अशा वीस ते पंचवीस शिटस् काढव्या लागतात. खरं तर ह्या शिटस् ड्रॉइंगच्या प्रॅक्टिकल मध्ये संपवणं अपेक्षित असतं. पण कुणा कडून त्या कॉलेजेमध्ये कधी संपल्याच नाहीत. मग घरी काढण्या शिवाय पर्याय नव्हता. 

हा बॅकलॉग घरी पूर्ण करण्यासाठीच 'टोपो' या तंत्राचा जन्म झाला असावा. एखाद्याच्या रूमवर याच प्लानिंग व्हायचं. एक भली मोठी काच, लाईट बल्ब, सोबत होल्डर आणि रूम भर फिरेल एवढी वायर.  तीन चार जाड पुस्तकं एकमेकांवर ठेऊन दोन सपोर्ट तयार करायचे. त्यावर काच ठेवायची. खालून बल्ब लावायचा. 

एखाद्याची पुर्ण झालेली शिट काचेवर ठेवायची. 

वर आपली कोरी शिट ठेवायची. 

बल्ब सुरू करायचा. 

खालच्या प्रकाशामुळे, पूर्ण झालेली शिट तुमच्या कोऱ्या शिटवर दिसू लागते. 

मग ती शिट आपल्या शिट वर ट्रेस करायची. 

एवढं सोप्प टेक्निक ! 

सोपं असलं तरी हे प्रकरण जरा डेलिकेट होतं. 

काही वेळाने बल्बच्या प्रकाशाने काच गरम होते आणि तडकण्याची भीती असते. मग थोडं थांबावं लागतं. 

चुकून काच गरम झाली तर पूर्ण झालेली काचे वरची शिट पिवळी पडायची. 

कोऱ्या शिटवर फार दाबून ट्रेस केलं तर खालच्या शिटच्या रेषा आपल्या शिटवर मागून उमटायच्या. 

फार वरवर ट्रेस केलं की टोपो मारला आहे पटकन कळायचं. 

शिट चेक करणारे मास्तर या सगळ्या प्रोसेस मधून गेलेले असल्याने त्यांच्या पासून वाचणं हे मोठ्ठं स्किल. 

त्याच्या काही प्रो टिप्स पण होत्या. 

जसं की, आपल्या शिटवर उगाच खाडाखोड करायची. 

शिटवरचं लेटरींग टोपो न मारता स्वतः करायचं. 

शिटचा कोपरा मुद्दाम दुमाडायचा, वगैरे, वगैरे.

.  .  .

एका रात्रीत साधारण तीन ते चार शिटस् टोपो मारून व्हायच्या. त्या दिवशी पहाटेचे चार वाजले असतील. आमच्या तीन शिटस्  टोपो मारून झाल्या होत्या. टोपो मारलेल्या तीन आणि ओरिजनल एक अशा चार शिटस् च्या सेपरेट गुंडाळ्या टेबलवर ठेवल्या. टोपोचा बल्ब बंद केला. काच थंड होई पर्यंत पाठ मोकळी व्हावी म्हणून पडलो. थंड झाल्यावर काच भिंतीला लावून ठेवली. ड्रॉइंग बोर्डस, ड्राफ्टर, बॅग्स आवरून ठेवल्या. सकाळ झालीच आहे तर थोडं बाहेरून फिरून यावं म्हणून आम्ही बाहेर पडलो. 

थंडी कमी होत आली होती. 

उजाडायला अजुन वेळ होता. 

पाखरांची किलबिल सुरू व्हायची होती. 

घरं शांत.

रस्ते शांत. 

झाडं शांत. 

बंद असलेली दुकानं, शांत.

रस्त्यावर एखादी पांढरी पेंगलेली कार, शांत.

घाई घाईत तिरप्या लावलेल्या आणि रात्र भर तश्याच उभ्या असलेल्या काही बाईकस्, सायकली पण शांत.

ही शांतता अनुभवत, "कुठे चहा मिळतोय का?", हे आम्ही शोधत होतो. 

कोपऱ्यावरचा एक टपरीवाला नुकताच आला होता. 

दुधाची पिशवी अजुन सायकलीलाच होती. 

तो म्हणाला, "चहाला पंधरा मिनिट लागतील!"  

"चहा पिऊनच जाऊ" असं म्हणून आम्ही रस्त्या लगतच्या कठड्यावर बसलो. 'जिंदगी' या विषयावर गप्पा रंगल्या. 

तोवर दहा पंधरा मिनिटं गेली आणि चहा आला. 

हळूहळू उजाडयला लागलं. 

किलबिल सुरू झाली. 

पेपरवाले, दुधवाले सायकलीवर दिसू लागले. 

उत्साही मंडळी फिरायला निघालेली दिसली. 

मग दुसरा चहा संपवुन, आम्ही परत निघालो. 

जातांना शांत असणाऱ्या बहुतेक घरांमध्ये एक तरी लाईट लागलेला होता. 

कुठे रेडिओवर भक्तीगीते ऐकु येत होती. 

सगळं वातावरण रिफ्रेशिंग करणारं होतं. रात्रभराचा सगळा थकवा निघून गेला होता. 

"हा चहा प्यायला रोज जायला पाहिजे!", असं म्हणत आणि रूमवर आलो. 

दार उघडून पाहतो तर काय: ओरिजनल शिटची गुंडाळी टेबलावरून घरंगळून खाली ठेवलेल्या कच्छवा छाप अगरबत्तीवर पडली होती. शिट जळून तिला मोठ्ठं भोक पडलं होतं. सकाळ झाल्यामुळे अगरबत्ती संपली म्हणून पूर्ण शिट न जळता फक्त भोकच पडलं. 

आम्ही एकमेकांकडे पाहिलं. 

टोपोचा सेट-अप परत लावला. 

सकाळी नऊपर्यंत आळीपाळीने काम करून टोपोवरून टोपो करून ओरिजनल शिट बनवली. 

आणि ज्याची होती त्याला, काहीही न सांगता, नेऊन दिली.

टप्पा दुसरा : मास्तरची सही घेणे

मास्तरची सही घेण्यासाठी केबिन बाहेर रांग लागे. आज सगळा वर्ग वैतागला होता. प्रत्येकाची काही तरी चूक काढून मास्तर परत पाठवत होते. आज प्रत्येक जण दोनदा तरी आत मध्ये जाऊन आला. कुणालाच सही मिळेना. श्याम माझ्या समोर एकदा परत आलेला. मी दुसऱ्यांदा परत आलो तेंव्हा हा पठ्ठ्या शांत बसलेला. 

मी विचारलं, "का रे, सही?" 

तो म्हणाला, "झाली!" 

टोपो तर आम्ही सोबतच मारला मग याला कशी सही मिळाली आणि मी का केबिनच्या येरझारा घालतोय, 

म्हणून मी विचारलं, "कशी काय?" 

तो म्हणाला, "सर आज कुणालाच सही देत नाही आहेत. मग मी सरांची सहीच टोपो मारून टाकली !!" .

म्हणजे शिटही टोपो आणि मास्तरांची सहीपण टोपो !

मी आपली शिट घेऊन मुकाट्याने रांगेत उभा राहिलो.

. . .

मास्तरांच्या सहीचा अजुन एक किस्सा आहे. 

काही प्रॅक्टिकलस् वर सरांच्या सह्या नव्हत्या. आणि सबमिशनचा शेवटचा दिवस. ढगे घाबरला. त्याने स्वतःच सरांच्या सह्या ठोकल्या. खरं तर त्या सरांच्या सह्या करण्याची काहीही गरज नव्हती. कारण ते सबमिशनसाठी कधीही त्रास नाही द्यायचे. त्यांनी ढगेला सह्या दिल्याही असत्या. पण पॅनिक होऊन याने गोंधळ केला. सबमिशनच्या आधी फाईल चाळतांना ढगे पकडल्या गेला. ढगेचे तर पायच गळाले. 

सर चिडून ढगेला म्हणाले, "कॉल यूर पॅरेंट्स, आफ्टर लंच." 

आणि ते तावातावाने लंचसाठी निघून गेले. 

"कॉलेजमध्ये पॅरेंट्स?" 

आम्हालाही थोडं ऑड वाटलं पण ढग्याने पराक्रम ही तसाच केला होता. 

ढगेचे आई-बाप गावाकडे. हा आपल्या आजी सोबत शेजारच्या खेड्यात राहायचा. नाईलाज म्हणून तो घरी आला, तर आजी शेतात गेलेली. मग शेतात गेला. आजीला सोबत घेतलं. काय घडलं ते सांगितलच नाही आणि कॉलेजात आला. येतायेता चार वाजले होते. आपल्या नातवाच्या शाळेत काहीतरी झालं, एवढंच आजीला कळलं. ती बिचारी हातातले कामं टाकून तरातरा आली होती. उन्हात आल्याने दमली होती. तिला केबिन बाहेरच्या स्टूलावर बसवून ढगे सरांची वाट पाहू लागला. 

सर लेक्चरला गेलेले. अर्ध्या तासाने ते आले तेंव्हा, त्यांना आधी ढगे दिसला आणि मग घामाघूम झालेली, स्टूलावर बसलेली आजी. 

सरांनी ढगेला विचारलं, "ह्या कोण?" 

ढगे म्हणाला, "सर, पॅरेंट्स." 

तोंडापर्यंत आलेलं 'मूर्खा!' त्यांनी आवरलं. 

आजी बाईंना कॅबिन मध्ये घेऊन गेले. पाणी दिलं. 

पाणी पिता पिता आजीचा प्रश्न, "काय केलं माह्या नातवान, सर?" 

सर एक आवंढा गिळून म्हणाले, "काही नाही आजी, जा तुम्ही घरी. काळजी करण्यासारखं काही नाही."

सर ढग्याकडे पाहून म्हणाले, "जा, सोडून ये घरी." 

आजीला काही कळेना. 

बाहेर जाता जाता ती आपल्या नातवाला म्हणाली, 

"पाणी प्यायला कशाले बोलीवल रे मले?" 

कॅबीन मध्ये सर आणि बाहेर आम्ही जोरात हसलो. 

ढग्या मूळे सबमिशनचं टेन्शन थोडं का होईना हलकं झालं.

इतर पोस्ट्स

38
(रीडिंग टाईम 6 मिनिटं )

शर्मा मास्तरची ट्युशन

नववी ते दहावी असे दोन वर्ष मी शर्मा मास्तरची ट्युशन केली. शाळेत असताना क्लासला 'ट्युशन' म्हणायचे.  नववीत आल्याआल्या शर्मा मास्तर स्वतः म्हणाले "बेटा, गणित की ट्युशन तो लगानी ही पडती हैं " मी पण घरी तेच सांगीतलं. "लगानी ही पडती हैं !" सकाळी सहाची बॅच होती. रोज भल्या पहाटे उठा. सायकल वरून दूर राहणाऱ्या त्या मास्तरच्या घरी जा. असा गणिताच्या क्लासचा प्रवास सुरू झाला.

शर्मा मास्तरचं घर एका लांब डब्यासारखं होतं. पण दुमजली. म्हणजे एकमेकांवर दोन डबे ठेवल्यासारखं. वरच्या डब्ब्यात, म्हणजे मजल्यावर लांब हॉल होता. खास क्लास साठी बनवलेला. त्यावेळी मास्तरांची घरं तशीच बांधली जायची. एक स्वतंत्र रूम क्लाससाठी.  शर्मा मास्तरच्या या हॉल मध्ये साठ ते सत्तर जण बसतील अशी सोय होती. एका तीन पायाच्या लाकडी स्टँड वर मोठ्ठा काळा फळा ठेवलेला होता. खाली आमच्या साठी सतरंज्या अंथरलेल्या. त्यावर आम्ही मांडी मारून बसायचो. ट्युब लाईटस् आणि फॅन्स सोडले तर बाकी त्या हॉल मध्ये काहीच नव्हतं. 

शर्मा मास्तर म्हणजे गोरंपान, स्थुल, बुटकं व्यक्तीमत्व. केस भरपूर तेल लावून एकीकडे चोपून लावलेले. तोंडात सदैव खर्रा. त्यामुळे तोंडातल्या तोंडात बोलायचे. कधी कधी काय बोलले कळायचे पण नाही. मराठी फार नाही यायची. आठवी, नववी आणि दहावी मिळुन भरपूर बॅचेस चालायच्या. शर्मा मास्तरकडे हिरव्या रंगाची स्कूटर होती. त्या वेळी फारच कमी लोकांकडे गाड्या होत्या. ज्यांचे क्लास तुडुंब भरलेले ते गाड्या आणायचे आणि बाकी शिक्षक मंडळी सायकली वरून यायची. असो! 

मास्तर शाळेत आणि क्लास मध्ये काहीच वेगळं शिकवायचे नाही. स्टाईल तीच. फक्त शाळेत कमी गणितं व्हायची आणि क्लास मध्ये जास्त. जेवढी जास्त गणितं तेवढे जास्त मार्क्स, असं सरळ साधं गणित होतं. मास्तर पुस्तकांतून गणितं फळ्यावर लिहायचे. आम्ही फळ्यावरून वहीत लिहायचो. मग त्या वहीतून प्रॅक्टिसच्या वहीत. आणि प्रॅक्टिसच्या त्या वहीतून थेट पेपरात. सगळी गणितं याच वाटेनं फिरत राहिली. डोक्यात कधी गेलीच नाहीत.    

शर्मा मास्तरच्या या क्लास मुळे माझे मार्क्स  काही वाढले नाही. मुळात गणितात मार्क्स वाढावेत हा विचार ही कधी नव्हताच. पास झालो तरी मिळवली. आमच्या वेळेस  गणिताचा पेपर दीडशे मार्क्सचा असायचा. आधीच भीती वाटणाऱ्या या विषयाचा पेपर दीडशे मार्क्सचा का ठेवायचे देव जाणे. गणितात मार्क्स बरे पडले तर क्लास मुळे आणि मार्क्स कमी आले तर, तु प्रॅक्टिस कमी केल्यामुळे. म्हणजे गणिताच्या मास्तरचं महत्त्व कधीच कमी झालं नाही.

. . .

वाघ मास्तरचा क्लास

कॉलेजला येईस्तोवर गणिताचं ' मॅथ ' होतं आणि ट्युशनचा ' क्लास '.

काहीही करून मॅथ निघाला पाहिजे म्हणून धावपळ सुरू होते. मी डिप्लोमाला असतांना मॅथ साठी वाघ मास्तर फारच फेमस होता. खरं तर एकच मास्तर होता जो मॅथस् चे क्लासेस घ्यायचा.

वाघ मास्तरचं घर साधं होतं. दहा बाय बाराची एक पक्की रूम होती आणि मागे टीनाचं छोटं घर. रुममध्ये एक भला मोठा कॉट होता आणि काही लोखंडी खुर्च्या. भिंतीला लटकवलेला छोटा कापडी फळा. आमची बॅच सकाळी सहाची. मास्तर च्या घरासमोर येऊन रूमचा दरवाजा उघडण्याची वाट बघायची. सहा - पाच, सहा - दहा पर्यंत मास्तर दार उघडायचे. सकाळच्या क्लासला सुगंधी अगरबत्ती लावलेली असायची. साधारण आठ ते नऊ जण कॉटवर बसायचे. बाकी खुर्च्यांवर. कॉटवर बसायला मिळणे म्हणजे नशीबच. कारण सकाळी सकाळी कॉट वर झोप चांगली लगायची. बहुतेक वेळा मी पोहचायचो तोवर दार उघडलेले असायचे. त्यामुळे कॉटवर बसायचा चान्स फार आला नाही. उलट, जो उशिरा यायचं तो रूम लहान असल्याने मास्तरच्या अगदी पुढ्यातच जाऊन बसायचा. 

वाघ मास्तर वयाने तरुण, पण त्याच्या शिकवण्याच्या स्टाईल मुळे फेमस. मास्तरने कधीच शिकवतांना पुस्तक बघितले नाही. हा व्यक्ती कुठेही शिक्षक नव्हता. डिप्लोमाचे क्लासेस हीच त्याची कमाई. पांढरा शुभ्र झब्बा घालून मास्तर शिकवायचा. सहसा गणित शिकवणाऱ्या मास्तरांचं अक्षर चांगलं नसतं, पण वाघ मास्तर याला अपवाद होता.  वाघ मास्तर एकदम नो- नॉनसेन्स माणूस. या मास्तरला दोन वर्षात मी कधीच हसतांना पाहिले नाही. मास्तरच्या रूमची साइज छोटी होती त्यामुळे बॅचेस जास्त होत्या. शेवटचं गणित झालं की मास्तर बाहेर जाऊन उभा राहायचा. आतली बॅच बाहेर जाऊन, बाहेरची बॅच आत सेटल होईपर्यंत मास्तर शून्यात बघत उभा राहायचा. मुलींची बॅच असली की मास्तरला जरा जास्त वेळ थांबावं लागायचं - मुली आत येई पर्यंत आणि बाहेरची सगळी मुलं घरी जाई पर्यंत.

दोन वर्ष आम्हाला गणित शिकवून वाघ मास्तरने आम्हाला तर काठाला लावलं. पण सगळ्या बॅचेस हाऊसफुल चालवून सुध्दा पैशांचं गणित काही मास्तरला सुटलं नाही. वर्षानुवर्षे झाले मास्तरची आर्थिक परिस्थिती तशीच होती. याचं दुःख त्या रस्त्याने कधीही गेलं की वाटतं. 

काही गणितं, हाडाच्या गणिताच्या मास्तरला ही सुटत नाहीत हे मात्र खरं.

. . .

जोशी सरांचा क्लास

इंजिनीयरिंगला आल्यावर मॅथस् चे ' एम ' होतात. 

एम-वन, एम-टू, एम-थ्री, एम-फोर. 

हे ' एम ' यमाचे लहान भाऊ असल्यासारखे वागतात. एकदा सुटला तर सुटला. नाही तर तो सुटता सुटत नाही. असं म्हणतात, एम-थ्री, एम-फोर निघाले की इंजिनीयरिंग झालं. असे चिवट ' एम ' आयुष्यातून घालवण्यासाठी गणितातला  कर्मठ संन्याशी लागायचा. जोशी सर त्यातलेच एक.

जोशी सर मॅथस् चे रिटायर्ड प्रोफेसर. आमचा क्लास घ्यायला त्यांनी स्पष्ट नाही सांगीतलं. त्यावेळी ते फक्त पार्ट टाईम बी ई करणाऱ्या काका लोकांचा क्लास घेत. आम्ही तीन चार जणांनी खुप रिक्वेस्ट केली आणि ते कसेबसे तयार झाले. सकाळी सातच्या या क्लासला आम्ही तिघे - चौघे आणि पंचवीस - तीस काका लोकं. ही काका लोकं घरी गेल्यावर क्लासच्या वहीत ढुंकूनही पाहत नसतील हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचं.

जोशी सरांचा क्लास त्यांच्या बंगल्याच्या मागच्या रूम मध्ये व्हायचा. टापटीप ठेवलेली रूम. व्यवस्थित मांडून ठेवलेल्या खुर्च्या. दारापाशी भला मोठ्ठा फळा. जोशी सर म्हणजे अगदी चिअरफुल व्यक्तिमत्त्व. एक रिटायर्ड आनंदी माणूस. पैशांसाठी वैगरे ते क्लास घेत नव्हते. आपण सकाळी बिझी राहावं आणि पार्ट टाईम शिकणाऱ्यांना मदत व्हावी एवढंच क्लासच अेम. आम्ही रेगुलरवाले कसे तरी मधे कोंबलेले. 

सर त्या वयातही फार उत्साहात शिकवायचे. सातच्या ठोक्याला क्लास सुरू करायचे. सात नंतर सहसा कुणी येण्याची हिम्मत करीत नसे.  चुकून कुणी सात नंतर आलाच तर शिकवणे थांबून सर आपल्या खास शैलीत म्हणायचे, "या s s s !" आलेली व्यक्ती मेल्याहून मेल्यासारखी येऊन बसे. हा प्रसंग माझ्यावर इतक्यांदा आला की मला मरणाची भीतीच वाटेनाशी झाली. 

सरांची शिकवण्याची पद्धत मात्र जुनीच होती. त्यांच्या वहीतुन गणितं फळ्यावर, फळ्यावरून आमच्या वहीत, आमच्या क्लासच्या वहीतुन प्रॅक्टिस च्या वहीत. आणि त्या वहीतुन डायरेक्ट पेपरात. सर शिकावतांना मध्येच प्रश्न विचारायचे आणि कुणी उत्तर नाही दिलं की म्हणायचे " प्रॅक्टिस s s s" आम्ही 'एम' पासून वाचण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस केली. गणितं डोक्यात गेली नाहीत तरी पाठ केली. शेवटी एम-थ्री आणि एम-फोर च्या गराड्यातुन सुटलो.

आणि इंजिनीअरिंग झालं. 

मॅथस् शी संबंध सुटला. 

पण गणितं मात्र तशीच राहिली. 

म्हणजे बघा :

का आपण ऐन जवानीतल्या सकाळी खराब करून घेतल्या? 

पहाटे उठून शिकलेल्या डेरेव्हेटीव्ह आणि इंटिग्रेशनने पुढे आयुष्याची फार गणितं सुटली असही नाही. 

दहा रुपये पाव, म्हणजे चाळीस रुपये किलो !

"एक किलो घेतो, पस्तीसला द्या!" 

एवढंच गणितं वापरलं मी आतापर्यंत. 

आणि जर भाजीवाल्या कडे कॅल्क्युलेटर असलं, तर विषयच संपला. 

टेक्नॉलॉजी वर माझा पूर्ण विश्वास आहे.

बरं शाळेपर्यंत ठीक होतं, नंतर तर देवही मदत करत नसेल. नाहीतर एम-थ्री, एम-फोर राहणाऱ्यांची संख्या कमी झाली असती. समजा एखाद्या इंजिनीरिंगच्या पुंडलिकाला देवाने मदत करायची ठरवलीच, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचे सिलॅबस वेगळे. पुण्या - मुंबई मध्ये फक्त एम-थ्री, औरंगाबाद मध्ये एम-थ्री, एम-फोर, अमरावती, नागपूर वाल्यांच तर भलतंच. 

म्हणजे भक्तांसाठी देवाने किती डेटाबेस गोळा करायचा ?

गणित विषय आवडणारे लोक पण आहेत. 

पण त्यांना गणितं जमतात म्हणून गणित आवडतं की त्यात गंमत वाटते म्हणून आवडतं, हे सांगणं कठीण आहे. 

आज माझा बॉस सोडला तर कुणाचेच पाढे पाठ नाहीहेत. पण त्याने काय घंटा फरक पडतोय? कॅल्क्युलेटर आहेत की आमच्याकडे. आणि आम्ही थोडीच ऑफिसात पाढे म्हणायला जातो. 

असो ! या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत भल्या पहाटे 'गणिताचे क्लास' असेच सुरू राहतील, येणाऱ्या जनरेशनच्या सोनेरी सकाळी आणि साखर झोपा खराब करत.

39
(रीडिंग टाईम 3 मिनिटं )

दादांची परीक्षेला फेस करण्याची एक सॉलिड सिस्टीम होती. कॉलेजात जुनं वास्तव्य असल्याने दादांना सगळे ओळखायचे. रोल नंबरची सेटिंग अशी केली जायची की दादांचा नंबर कुठल्या ना कुठल्या खिडकीत यायचाच. आमचे सगळेच पेपर पहिल्या मजल्यावर व्हायचे.

तर, दादांची सिस्टीम अशी होती:

- दादा हॉल मध्ये येतांना मागच्या वर्षीची जुनी प्रश्न पत्रिका घेऊन येणार.

- या वर्षीच्या प्रश्न पत्रिका वाटून झाल्या की, दादा ही नवीन प्रश्न पत्रिका खिडकीतून खाली भिरकावून देणार. सोबत आणलेली जुनी डेस्क वर काढून ठेवली जाणार.

- खिडकी खाली आधीच दोघं तिघ दादांचे पंटर्स तैनात असणार. 

- प्रश्न पत्रिका खाली पडली रे पडली की दोघं जण बाईक वर जाऊन पटकन झेरॉक्स करुन आणणार.

- हॉल मध्ये एक विद्यार्थी उशिरा जाणारा. तो दादांची यंदाची प्रश्न पत्रिका घेऊन हॉल मध्ये येणार.

- आपल्या जागेवर जाता जाता, नवीन प्रश्न पत्रिका परत दादांकडे.

- खाली यंदाची प्रश्न पत्रिका आणि ज्यांचा आज पेपर नाही असे ज्युनियर रेडीच असणार.

- मग हे ज्युनियर, पुस्तकातुन उत्तरं शोधून भरभर लिहिणार.

- त्याचे बोळे बनवून टॉयलेटच्या तुटलेल्या खिडकीतून आतमध्ये फेकले जाणार.

- एका विशिष्ट पद्धतीने बाइकचा हॉर्न वाजवून दादांना सिग्नल मिळणार.

- मग दादांचा बाथरूम ब्रेक!

- टॉयलेट मधले दगडाला बांधून आलेली सगळी उत्तरे दादा गोळा करून हॉल मध्ये आणणार.

( ही उत्तरे म्हणजे, ज्युनियर लोकांनी जेवढे कळले आणि जेवढे पुस्तकात सापडले ते सगळे कागदावर भरभर उतरवून दिलेले. )

दादा शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसणार.

अल्फाबेटीकली दादा अमोलच्या मागच्या बेंच वर यायचे. अमोल म्हणजे युनिव्हर्सिटी टॉपर. 

हॉलवर असलेल्या मास्तरांची नजर चुकवून, दादा आणलेल्या कागदांमधून एक कागद हळूच बाहेर काढणार. समोर बसलेल्या, पेपर लिहिण्यात मग्न असलेल्या अमोलला तो कागद दाखवत विचारणार, 

"या उत्तराचा प्रश्न कोणता?"

अमोलसाठी दादांचा हा प्रश्न परीक्षेतल्या प्रश्नांपेक्षा अवघड असायचा.

.  .  .

एकदा, ठरल्याप्रमाणे दादांनी प्रश्न पत्रिका खाली भिरकावली. 

नेमके त्याच वेळी एचओडी खालून चालले होते. ते दिसल्यामुळे खाली प्रश्न पत्रिकेसाठी उभी असलेली मंडळी गायब झाली होती. दादाने फेकलेली ती पत्रिका सरांच्या अंगावर पडली. 

कुणाचा तरी पेपर खाली पडला म्हणून ते वर आले. 

"ही प्रश्न पत्रिका कुणाची?"  त्यांनी खडसावून विचारलं. 

कुणी सांगे ना. 

मग वर्गावरच्या मास्तरला सगळ्यांच्या प्रश्न पत्रिका चेक करायला लावण्यात आल्या. दादांकडे मागच्या वर्षीची जुनी प्रश्न पत्रिका होतीच ती उघडून त्यांनी ठेवली. मास्तर काही पाहिलं पानं चेक करतच नव्हते. 

"सगळ्यांच्या पत्रिका जागेवर आहेत तर ही खाली कुणाची पडली ?" 

असं सर विचारातच होते तेंव्हा, ठरल्या प्रमाणे उशिरा येणारा आत आला. 

"एवढ्या उशिरा का आला?" 

असं झापझाप झापून सरांनी ती प्रश्न पत्रिका त्याच्या हातात टेकवली. 

तो ही मुकाट्याने आपल्या जागेवर जाऊन बसला. 

त्या दिवशी, दादांकडे प्रश्न जुनेच होते पण उत्तरे मात्र नव्हती.

. . .

जुन्या आणि नवीन प्रश्न पत्रिकेची ही सेटिंग एव्हाना बऱ्याच जणांना कळली होती. दादा विरुध्द बोलण्याची कुणाची हिम्मत नव्हती. कुजबूज मात्र सगळी कडे होती. 

एका दिवशी, वर्गावरच्या हुशार मास्तरने दादांना प्रश्न पत्रिका भिरकवतांना पाहिलं. त्याने एकेकाच्या प्रश्न पत्रिका निरखुन पाहायला सुरुवात केली. दादा जवळ येता येता मास्तरला बराच वेळ झाला. 

मास्तर दादांच्या डेस्कपाशी आला आणि ठरलेला उशिरा येणारा गडी हॉल मध्ये आला. 

"प्रश्न पत्रिका टेबलवरून घे" मास्तरने दादा जवळूनच सांगीतलं. 

तो गडी, दादांकडे बघत, आपल्या जागेवर जाऊन बसला. दोन प्रश्नपत्रिका घेऊन. 

सगळा वर्ग पेपर लिहिणे सोडून "आज काय होणार?" म्हणुन दादांकडें बघू लागला.

दादा चुळबुळ करू लागले.

दादांची प्रश्न पत्रिका मास्तरने हातात घेतली तेव्हा वर्गातला एका जण दबक्या आवाजात बोलला, 

"मागच्या वर्षीची आहे " 

कळू नये म्हणून दादाने नेहमी प्रमाणे मधलं पान उघडून ठेवलं होतं. मास्तरने पहिलं पानं पाहिलं आणि त्या मुलाला उद्देशून बोलला, 

"नाही, या वर्षीचीच आहे !" 

दादाने प्रश्न पत्रिका मास्तरच्या हातातून हिस्कावली आणि स्वतः चेक केली. 

खरंच या वर्षीचीच होती. 

म्हणजे जी खिडकीतून खाली गेली ती मागच्या वर्षीची होती. 

जुन्या प्रश्नांची उत्तरं टॉयलेट मध्ये फेकून, पंटर्स खालून हॉर्न मारून गेले. पण त्या दिवशी दादांनी बाथरूम ब्रेक काही घेतला नाही. 

एकंदरीत, आम्ही परीक्षेच्या आधी जीवाचा आटापिटा करायचो आणि दादा परीक्षेत. 

रिलेटेड पोस्ट : संकट

इतर पोस्ट्स

40
(रीडिंग टाईम 7 मिनिटं )

ही घटना एका दिवशी दुपारी सुरू होऊन, दुसऱ्या दिवशी दुपारी संपली.  या घटनेचे तीन साक्षीदार आहेत. 

आम्ही म्हणजे मी आणि श्याम. 

हिरो - जो श्यामचा मित्र आहे. 

आणि हिरोईन अर्थात जी हिरोचीच आहे.

या सगळ्यांत कर्ता करविता हिरो असला तरी निमित्त हिरोईन आहे.  आणि आम्ही?  आम्ही प्रेक्षक! रसिक प्रेक्षक म्हणा हवं तर.

.  .  .

" दिवस पहिला "

{ दुपार }

(आम्ही):

औरंगाबादेत, मी कॉलेज मध्ये बसलोय. लेक्चर्स वर लेक्चर्स सुरू आहेत. जरी डोळे उघडे असले, तरी आतून मी झोपलोच आहे.  

"जाऊ दे, झोप आता !" असं जर कुणी म्हटलं तर मी तिथेच आडवा होईल, अशी परिस्थिती आहे.

श्याम कुठल्या तरी डिबेट ग्रुप मध्ये कुठल्या तरी विषयावर चर्चा करतोय. ' कॅट ' ही एक्झाम प्रीपेयर करणारे सहसा असच काही तरी करत असतात.

(हिरो): 

शेगाव इंजिनीरिंग मध्ये शिकणारा हा गडी आपल्या मित्रांसोबत अकोल्याला नुकताच रिलीज झालेला ' मोहब्बतें ' नावाचा पिक्चर बघायला आला आहे. (शेगाव - अकोला अंतर 50 किमी)  शेगाववाले 'न्यू रिलीज' बघायला इतके दूर नेहमीच येतात. त्यामुळे उगाच कौतुक नको.

(हिरोईन):

कॉलेजमध्ये लेक्चर्सही असतात हे माहीतच नसलेलं  'फ्री बर्ड'. हॉस्टेलच्या मेस मध्ये जेवण झाल्यावरही, कॅन्टीन मध्ये मॅगी खात बसलेलं. हसणं, खिदळनं ओघाने आलचं.

.  .  .

" दिवस पहिला "

{ संध्याकाळ }

(आम्ही) :

मी सगळं नॉलेज झेलून घरी निघालोय. आपल्याला झोप नाही, भूक लागली आहे, हे वडापावची गाडी पाहिल्यावर कळलं. एकच वडापाव खाऊन, मन मारून कसा तरी मी रूमवर आलोय. 

श्यामराव टाईम्स ऑफ इंडिया वाचत बसले आहेत. आपला जाड भिंगाचा चष्मा नीट करून, श्यामराव म्हणाले, " ईथनशिया इज एथिकल ऑर नॉट?" (Euthanasia is ethical or not?) 

मला वाटलं, ईथनशिया म्हणजे इंडोनेशिया पासून वेगळा झालेला देश असावा आणि तो एथिकल आहे की नाही असा श्यामला प्रश्न पडला असावा. 

तरी मी आपला मध्यम वर्गीय - मराठी मिडीयम प्रश्न विचारलाच, 

"ईथनशिया म्हणजे काय?" 

श्यामरावांनी हातातला टाईम्स बाजूला ठेवला. 

आणि 'कुठे शिकलास रे?' असं न विचारता म्हणाला, 

"ईथनशिया म्हणजे इच्छामरण, इच्छामरण नैतिक की अनैत्तीक?" 

इंजिनीयरिंग करणे म्हणजेच ईथनशिया आहे असं समजणारा मी,  पटकन म्हणालो, "अनैतिक! अनेथिकल आहे ते!" 

बसलेले श्यामराव उभे राहिले. रुममध्ये फेऱ्या घालत सांगू लागले,

"एखादा खुप दुःखात आहे, जगणं असह्य झालं आहे, तर इच्छामरण नैतिकतेला धरून आहे. हाच माझा पॉईंट आहे, उद्याच्या डीबेटचा." 

तर, पाणी इथे मुरतंय हे कळलं.  चूप बसण्याशिवाय पर्याय नव्हता. 

मी आता मेस वर जाण्याची वाट बघत बसलोय.

(हिरो): 

दुपारी ' मोहब्बतें ' बघून शेगावी परत न जाता हा हिरो थेट औरंगाबादच्या एसटीत बसला होता. 

(अकोला - औरंगाबाद अंतर अंदाजे 250 किमी) 

एव्हाना संध्याकाळ झाली होती. 

बस प्रत्येक छोट्या छोट्या गावात थांबत थांबत चालली आहे. घरी जाणारी मंडळी दाटीवाटीने जमेल तिथे बसलेत, उभे आहेत. कंडक्टर गर्दीतून रस्ता काढत, हातातलं तिकिटाला भोक पडण्याचं पंचींग जोरजोरात वाजवतोय.  बायका बडबड करतायेत. लेकरं रडतायेत. म्हातारी मंडळी खोकतायेत. कुणी खारे शेंगदाणे खातंय. कुणी भजी बांधून आणलीयेत. सगळ्या बस मध्ये घामाचा, वेगवेगळ्या पदार्थांचा वास येतोय. गोंगाट सुरू आहे. बस रस्त्यातील खड्ड्यातून उसळते आहे. लोकं एकमेकांवर आदळले जात आहेत. 

आणि हिरो?

हिरो खिडकीपाशी बसलाय. 

थंड हवेची झुळूक येतेय. 

मागे व्हायोलिनचे मंद स्वर कानावर येतायेत.

बाहेर झाडं पळतातेय. शेतं बहरली आहेत. 

आकाशाला संध्याकाळची लाली चढली आहे.

गुडघा भर वाढलेल्या पिकातून, 

आपली ओढणी वाऱ्यावर उडवत, 

हिरोईन पळते आहे...

व्हायोलिनचे स्वर फास्ट आणि

गाडी स्लो मोशन मध्ये धावते आहे.

सगळं, सगळं रोमँटिक झालं आहे…

(हिरोईन):

हॉस्टेल समोरच्या टपरीवर, मैत्रिणी सोबत चहा आणि क्रीम रोलचा रतीब सुरू आहे. काहीतरी फालतू टॉपिक वर हसणं खिदळण सुरू आहे. चहाच्या भांड्यात चहा वाफळतोय. खुंटीला टांगलेल्या रेडिओ वर मोहब्बतेंच गाणं वाजतेय: 

"सोनी सोनी अखियों वाली, दिल दे या दे जा गाली… हम तेरे दीवाने है, हम आशिक मस्ताने है… "

. . . 

" दिवस पहिला "

{ रात्र }

(आम्ही):

मला जोरदार भूक लागली आहे. त्यामुळे रोजपेक्षा आम्ही लवकर मेसवर आलोय. जेवण अजुन तयार व्हायचं आहे. श्याम ईथनशिया वर अखंड बडबड करतोय. मेस वर टीव्ही नाही आणि मोबाईल अजुन जन्माला यायचा आहे. त्यामुळे ते ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय ही नाही. शेवटी जेवणांच ताट आलं.  मी ईथनशिया आणि भुकेने मरता मरता वाचलो. श्याम रस्त्याकडे तोंड करून बसला होता आणि मी श्याम कडे. जेवता जेवता रस्त्यावर कावरा बावरा फिरताना तो  श्यामला दिसला. श्यामने आधी आवाज दिला आणि नंतर पळत जाऊन थांबवलं. मग दोघं काही तरी बोलले आणि मेसमध्ये आले.

चुरगळलेला पिंक शर्ट, ब्लॅक पँट, धुळीने माखलेले शूज, विस्कटलेले केस, वैतागलेला, भुकेलेला -  हा आपला हिरो! गेस्ट म्हणून एक्स्ट्रा ताट आलं. गडी हाणून जेवतोय. माझ्या पेक्षा ही भुकेली लोकं आहेत याची खात्री झाली. श्यामराव आणि मी त्याच्याकडे प्रश्न चिन्हासारखे बघतोय. तो फक्त जेवतोय. श्यामने चूप बस अशी खूण केली आणि मी शांत बसलोय. आम्ही जेवलो, तो जेवला. आणि तिघं रूमवर आलो.

तो क्षणभर बसला, नंतर हसला. बोलला वरती पाहून, 

"आज मोहब्बतें बघायला अकोल्याला गेलो होतो. पिक्चर संपला, तिची फार आठवण आली. ती औरंगाबादमध्ये असते, असं ऐकलं होतं. बसलो गाडीत." 

मी खुर्चीतून खाली येऊन बसलो. 

"पत्ता कसा मिळाला?" श्यामचा लॉजिकल प्रश्न. 

"तुझ्या घरचा नंबर होता, फोन करून विचारला" स्मार्ट उत्तर. 

(त्या काळी मोबाईल नव्हते) 

"आणि तिचा पत्ता ?" माझा ईललॉजिकल प्रश्न.

"कॉमर्स करते. थर्ड इअरला असेल." हिरो.

औरंगाबाद, कॉमर्स आणि थर्ड इअर एवढ्या तुटपुंज्या इन्फॉर्मेशन वर हिरोईन शोधणं म्हणजे हिरोईक म्हणाव लागेल.

"अरे पण. . ." श्याम.

हिरो : " बस, एकदा बघायचं आहे तिला, मग मी चालला जाईल."

मी श्यामकडे, श्यामने माझ्याकडे आणि आम्ही दोघांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

एक लांब उसासा घेऊन, डोळ्यात पाणी आणून तो बोलला:

"तिच्या विना जगणं असहय झालं आहे. यापेक्षा मरण बर वाटते, श्याम. "

माझ्या तोंडून पटकन निघालं, " म्हणजे, ईथनशिया ! " 

श्यामरावांनी भिंगातून डोळे मोठे करून पाहिलं आणि मानेने ' नाही, नाही ' म्हणाले.

ईथनशिया ही भानगड हिरोला माहिती नसावी. त्यामुळे त्याला काही कळलं नाही.

" अबे, कैसे ढूंढेगा?" असा विचार करत मी झोपलो.

(हिरोईन):

मेस मध्ये भरपूर टीव्ही बघून आणि भरपूर जेवण करून ' सोनी सोनी अखियोंवाली ' आपल्या रूम मध्ये आली. 

वॉकमन काढला. 

मोहब्बतें ची नवीन आणलेली  कॅसेट टाकली. 

गाणं सुरू झालं:

" चलते चलते यूंही रुक जाता हूं मैं . . ." 

आणि ती आरश्या समोर येऊन थांबली. 

तिच्या मनात विचार आला, 

"मी शमिता शेट्टी सारखी कधी होईल?"

या विचारांत आरश्यासमोर बराच वेळ गेला आणि मग आपली हिरोईन वॉकमन कानाला तसाच लावून स्वप्नांच्या गावा गेली.

. . .

" दिवस दुसरा "

{ सकाळ }

(आम्ही):

मी आणि श्याम उठून जोशी मास्तरांच्या मॅथच्या क्लासला गेलो. 

श्यामराव गणितं सोडवत होते 

आणि मी आपल्या हिरोचं कोड. 

"कसं शोधेल हा ?"

आम्ही क्लासहून आलो. 

हिरो उठलेला होता. त्याला घेऊन चहा प्यायला आलो. 

माझा एकच प्रश्न, 

"कसं शोधणार?"

हिरो हसला आणि म्हणाला,

" औरंगाबाद मध्ये कॉमर्सचे कॉलेजेस फार नाही आहेत. 

सकाळी सुरू करायचं, एकेका कॉलेज मध्ये जायचं. 

थेट अडमिन डिपार्टमेंट. 

कॅशियरला तीच नाव आणि इअर सांगायचं. 

आणि सांगायचं,  तिचा रीलेटीव्ह आहे, तिची एक्झाम फीज भरायची आहे.

कॅशियर आधी नाव चेक करतो. 

नाव नसलं तर पुढचं कॉलेज."

माझ्या हातातला चहाचा ग्लास निसटा निसटा वाचला.

(हिरो):

अंघोळ झाली. 

हिरो श्यामला म्हणाला, 

"यार, तिला ब्ल्यू शर्ट फार आवडतो. 

माझा हा शर्ट एनीवे मळला आहे. तुझा ब्ल्यू शर्ट दे." 

श्यामरावांची इच्छा नव्हती. 

पण रात्रीचा  त्याचा 'ईथनशिया' आठवला असेल आणि त्यांनी आपला आवडता ब्ल्यू शर्ट काढून दिला. 

हिरोने आमच्या कडून विवेकानंद, देवगिरी अश्या कॉलेजेसचे पत्ते घेतले. आणि तो निघाला.

आम्हीही आमच्या कॉलेजला निघालो.

(हिरोईन):

सकाळी सकाळी ब्रश करत करत, आरशासमोर उभी. 

"मी शमिता शेट्टी सारखी कधी होईल? " हा एकच विचार.

मग थेट मेस. 

चहा, बिस्किटे आणि ब्रेड ऑमलेट असा भरपेट ब्रेकफास्ट करून आपली शमिता आवरायला घेणार.

आपली एक्झाम फिज कुणीतरी आज भरणार आहे, याची तिळमात्र कल्पना ही नसतांना ही कॉलेजकडे निघणार.

.  .  .

" दिवस दुसरा "

{ दुपार }

तिसऱ्या कॉलेजमध्ये तीच नाव सापडलंय.

त्याने फीज भरलीय.

तोवर लंच टाईम झालाय.

तो एका झाडाखाली उभा आहे, तीच आवडतं ब्ल्यू शर्ट घालून.

मागे व्हायोलिन वर 'हमको हमीसे चुरालो. . .' वाजतय.

उगाच हवा जोरात वाहतेय.

आजूबाजूची वाळलेली पानं उडतायेत.

सगळं प्रचंड रोमँटिक झालं आहे.

मुलींचा एक घोळका, हसत खिदळत हॉस्टेलकडे चालला आहे.

आणि - आणि त्या घोळक्यात ती. तिच्याच नादात...

केसांची बट बोटाने हलकेच कानामागे करत.

सगळं स्लो मोशन मध्ये घडतंय.

हिरोचे हात अचानक शाहरुख सारखे दूर झालेत.

तिची नजर त्याच्या वर पडते.

याच व्हायोलिन आता जोरात वाजतंय.

आणि ती मनाशीच म्हणते,

" हे माकड इथं काय करतंय? "

आणि घोळक्यात पुन्हा विरून जाते.

इकडं, गाणं चेंज. 

" एक लड़की थी दिवानिसी, एक लड़के पे वो मरती थी…

कुछ कहेना था शायद उसको, जाने किससे डरती थी…"

. . .

{ दुपारच आहे अजुन }

(हिरोईन):

मेस मध्ये लंच चालू आहे. 

झालेला प्रकार तर ती हॉस्टेलच्या गेटवरच विसरली आहे. 

मनात एक विचार मात्र आहे,

"मी शमिता . . .? "

(हिरो):

परतीच्या प्रवासात. 

बसच्या खिडकीत.

पळती झाडे आणि बहरलेली शेतं बघतोय.

शेतात दूरवर कुठे तरी ती उभी आहे. रुसलेली.

तिचा आवडता, श्यामरावांचा ब्ल्यू शर्ट तसाच घालून हा पठ्ठ्या निघालाय…

(आम्ही):

मी लेक्चर मध्ये पेंगून बसलोय. 

भूक लागलीय, कदाचित!

श्यामराव एका मुद्द्यावर तावातावात डिबेट करतायेत,

"ईथनशिया इज नॉट एटऑल एथिकल ! " 

इतर पोस्ट्स