मनोज वेरूळकर

41
(रीडिंग टाईम 9 मिनिटं )

ढगळा पांढरा शर्ट आणि पायजामा. पायात टायरच्या चप्पल. डोळे बारीक करून बघण्याची सवय. डोक्यावर बारीक केस. खुरटी दाढी. खांद्यावर उपरण. अंगाने दणकट. त्याला बोलतांना फारसा कुणी ऐकलं नाही. सगळ्यांना माहीत असणारा पण कुणात न मिसळणारा. आपल्या कामाशी काम ठेवणारा हा गडी. पुरुषोत्तम.

पुरुषोत्तमची परिस्थिती तशी बेताचीच. छोटं मातीच घर. त्यावर टिनाचं छप्पर. तो, बायको, मुलगा आणि मुलगी असं चौकोनी कुटुंब. पुरुषोत्तम अंगकाम करणारा. विहिरी खोदणे, रस्त्याच्या कडेने नाल्या खोदणे, माती वाहणे अशी कामं तो अंगावर घ्यायचा. बायको इतर बायकांसोबत शेतात जायची. तीही नवऱ्या प्रमाणे फारशी कुणात न मिसळनारी. मुलगी इतर पोरींसारखी. त्या घरात मुलगा तेवढा बडबडाआणि चंचल. 

बाप कधी कुठे बोलला नाही आणि मुलगा कुठे शांत बसला नाही. 

एकंदरीत हे कुटुंब, शांत. 

त्या छोट्याश्या घरातून कधी भांडणाचे स्वर ऐकू आले नाही. 

तसे कधी हसण्याचे ही नाही. 

तसं खाऊन पिऊन सुखी कुटुंब. 

' कष्ट करायचे ' हा एकच मंत्र. 

. . .

नवरा बायकोची आठवड्याची मजुरी जमा झाली की, पुरुषोत्तम गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात जायचा. हा आठवडी बाजार त्याला फार आवडे. गुरुवार म्हणजे कामाला सुट्टी. सकाळी उठून, तयार होऊन, भाकरी वगैरे खाऊन हा गडी, पायी पायी बाजारात निघायचा. एरवीही पुरुषोत्तम सगळीकडे पायीच फिरायचा. तालुक्याला भरणाऱ्या या बाजाराची त्याला फार ओढ होती. 

पंचक्रोशीत भरणारा हा सर्वात मोठा बाजार. एका मोठ्या ग्राउंड वर हा बाजार भरे. गर्दीतून रस्ता काढत आत शिरलं की आधी कपड्यांचा बाजार. रंग बिरंगी रेडिमेड कपडे विकणारे, कापडाचे ताव घेऊन बसलेले कापड व्यापारी, ताबोडतोब शिवून पायजमे देणारे शिंपी असे सगळे या बाजारात बसलेले असत. मग भांड्यांचा बाजार. भांडी विकणारे. कलही करणारे. जुन्या भांड्यांची मोड घेणारे. या सर्वांची दुकानं चमकत असतं. त्याला लागून धान्याचे व्यापारी आपापली मोठी दुकानं लाऊन बसत. नंतर गावा गावातून आलेले भाजीवाले शेतकरी, कांद्या बतातेचे अडते, मसाल्याचे व्यापारी यांची दुकानं. मग फळांवाले. वेगवेगळी फळं थाटात रचून ठेवलेली दुकानं. पिवळ्या पिवळ्या केळांनी लदबदलेल्या एका रांगेत उभ्या असलेल्या हातगाड्या. हिरवीगार खायची पानं घेऊन बसलेल्या म्हाताऱ्या, इत्यादी. हिवाळ्यात ग्राउंडच्या, एका कोपऱ्यात उसाच्या गाड्या लागत.  आणि उन्हाळ्यात तिथेच आंबे वाले बसत. ग्राउंडच्या कडेला जुना बाजार. जुन्या वस्तू स्वस्तात मिळण्याचे ठिकाण. कधी चोरीचा माल पण विकला जाई. लोखंडी टेबलं, खुर्च्या, डबे, जुन्या सायकली असं सगळं.  शेवटी गुरांचा बाजार. शेतातल्या कामासाठी बैल विकणारे. भरपूर दूध देण्याची हमी देणारे म्हशी वाले, बकऱ्या विकणारे, ओझी वाहण्यासाठी लागणारी गाढवं विकणारे असे या गुरांच्या बाजारात उभे असत.  शेजारीच या गुरांचा चारा विकणारी दुकानं पण मांडलेली असायची. असा हा मोठ्ठा बाजार एकदा फिरून यायचं म्हटलं तरी दोन तास सहज जायचे.

जुना बाजार आणि त्याला लागून असणारा गुरांचा बाजार पुरुषोत्तमचा कुतूहलाचा विषय.  

पोरांच्या अभ्यासा साठी टेबल खुर्ची बघणार. 

मग मजुरीचे गणित मांडून पुढे जाणार. 

जुन्या सायकली निरखून बघणार. 

'पोरगा मोठा झाला की घेऊ' असा विचार करत पुढे. 

मग गुरांच्या बाजारात रेंगळणार. बैलं बघणार. म्हशींच्या किमती ऐकणार. म्या म्या करणाऱ्या बकऱ्यांच्या पिल्लांवरून हात फिरवत कुरवळणार.

मुळातच स्वभाव अबोल असल्याने कुणाशी न बोलता सगळ्या बाजारात फेरफटका मारणार. दुपारची उन्हं कलली की मग भाजी कडे वळणार.  भाजी लवकर विकून घरी जाण्याच्या घाईत असल्याने भाज्या जरा स्वतही होतात हे त्याला चांगलच ठाऊक होतं. सोबत आणलेल्या दोन पिशव्या भरून भाजीपाला, कधी केळी, कधी फळं घेणार. मग एक पिशवी डोक्यावर आणि एक हातात घेऊन पुढल्या खेपेस काय काय विकत घेऊ असा विचार करत, तो घरी येई. 

रात्री, आपली खाट घराबाहेरच्या रस्त्यावर टाकून तो शांत आकाशाकडे बघत पडणार.  आपण ही बाजारात काही तरी विकू असा विचार करत, दर गुरुवार जाई.

. . .

सणा सुदीला बाजारातून एक कापड घेऊन त्यात स्वतःला आणि पोराला शर्ट शिवून घ्यायचा. पोरीला रेडिमेड फ्रॉक. बायकोला कधीतरी नवीन साडी. 

नवीन कपड्यांचा सण बहुदा दिवाळी असे. बायको काही तरी गोडधोड करी. झाला सण. 

पोरांनी कधी फटाक्यांचा हट्ट केला नाही. 

दुसरी पोरं फटाके फोडताना बघायची यातच आनंद. 

न फुटलेले फटाके गोळा करायचे. उन्हात वळवायचे आणि फोडायचे. 

बाकी सगळे सण कोरडेच !

बाजाराचा दिवस  मात्र या कुटुंबाचा फार आनंदाचा असे, जणू सणच. 

पुरुषोत्तमच तर आयुष्यच हा बाजार तो पुढचा बाजार असे फिरत असे. 

. . .


वर्ष लोटली.

 

. . .

पोरं मोठी झाली. 

पुरुषोत्तमच बाजारावरच प्रेम काही कमी झालं नाही. 

पोरंही बापासोबत बाजारात जाऊ लागली. कधी बायको पण जात असे. 

पोरगा आठवीत गेल्यावर, पुरुषोत्तमने जुन्या बाजारातून सायकल घेतली. सायकलचे सीट बखोट्यात दाबून, एका हाताने सायकलचा दांडा आणि एका हाताने हॅण्डल पकडून, पोराने सायकल फार दामटली.  पुरुषोत्तम फक्त मजा बघायचा. त्याने स्वतःहून कधी पोराला सायकल शिकविली नाही. पोरगं त्याचं त्याचं शिकलं आणि सायकलघेऊन शाळेतही जाऊ लागलं. बहीण भाऊ सोबत सायकलवर जाऊ लागले. 

गुरुवारी मात्र सायकल पुरुषोत्तमच्या ताब्यात असे. 

पोरांना शाळेत सोडून द्यायचं आणि आपण थेट बाजारात. 

परत येताना लेकरांना घेऊन यायचं. 

सायकल मुळे आयुष्याला थोडा वेग आला होता. 

पोरगा मात्र शेफरला. 

सायकलवर इकडे तिकडे हुंदडायला लागला. 

शाळेला दांड्या मारणं सुरू झालं. 

त्याच्याकडे लक्ष द्यायला त्या मजूर माय-बापाला खरं तर वेळही नव्हता. वयाप्रमाणे दोघं ही थकत चालले होते. 

. . .

मुलीने हट्ट करून स्वतःसाठी नवीन सायकल मागितली. पुरुषोत्तमने पोरीचा लाड पुरवलाही. 

अपेक्षेप्रमाणे पोरगं दहावीत नापास झालं आणि शाळा सुटली. 

पुरुषोत्तम खट्टू झाला. पोरावर राग राग झाला पण बायकोने आवरलं म्हणून तो काही बोलला नाही. 

पुरुषोत्तमने त्या दिवशी पोराकडून सायकल हिसकावून घेतली. 

. . .

पोराच्या उनाडक्या काही कमी झाल्या नाही. 

पोरगं कधी कधी आईसोबत शेतावर जायचं. 

इकडे तिकडे फिरायचं. दिवस भर उनाडक्या करायच्या.

रात्री कट्ट्यावर बसून गप्पा मारायच्या. रात्री बेरात्री घरी यायचं.

. . .

पुरुषोत्तम आणि त्याच सारखं वाजायला लागलं. 

घरातून पुरुषोत्तम जोरजोरात बोलण्याचे आवाज यायला लागले.

पोराने त्या घराची शांतता घालवली. 

पुरुषोत्तम हताश झाला होता.  

त्याच कामात मन लागे ना. 

बाहेर खाट टाकून एकटाच बसून राहायचा. 

आठवडी बाजारातही त्याचं मन रमेना. 

हळू हळू तर त्याने बाजारात जाणंच बंद केलं.

. . .

पुरुषोत्तम आता थकला होता. डोक्यावरचे आणि दाढीचे केस पांढरे झाले होते. पूर्वी सारखं कामही होत नव्हतं. पोराची मदत घेऊन कामं खरं तर लवकर उडवता येणार होती. पोरगं पुरतं वाया जाण्याआधी पुरुषोत्तमने त्याला आपल्या सोबत कामावर न्यायला सुरुवात केली. 

पोरानेही बापाला कामात हातभार लावला. दोघं मिळून कामं घेऊ लागली. विहीर खोदून देणे, खड्डे खोदून देणे. 

कामं जोरात सुरू झाली.  

पुरुषोत्तमला धीर आला. 

जरा चांगलं चालायाला लागलं. 

पुरुषोत्तमचं बाजारात जाणं नियमित सुरू झालं.

. . .

हे सगळं मात्र काही दिवसच टिकलं. पोरग उडंत होतंच. एका कामात त्याच फार काळ लक्ष लागे ना. खुप कामं आंगावर घेऊन ठेवली आणि बापाला एकटा सोडून, त्याच दांड्या मारणं सुरू झालं. 

पुरुषोत्तम एकटाच सगळी कामं ओढू लागला. 

सोबत त्याची चीडचीड ही वाढली. 

कुठल्याच कामात पोरगा फार दिवस टिकत नव्हता. 

पोरासाठी काही तरी करून द्यावं या विचारात तो नेहमी असायचा. 

आपलं पोरगं शिकलं नाही, याची खंत तर होतीच.

. . .

एका गुरुवारी, आठवडी बाजारातून पुरुषोत्तम बकरीची दोन छोटी पिल्लं घेऊन आला. घराच्या दारापाशी दोन खुंटे ठोकून ती पिल्लं त्याने बांधून ठेवली. हुंदडून रात्री घरी आल्यावर पोराला पुरुषोत्तमने थोडं रागातच सांगीतलं.  ' ही पिल्लं उद्यापासून रानांत घेऊन जायची. त्यांना चारायचं. पाणी पाजयचं. संध्याकाळी घरी घेऊन यायचे. बकऱ्यांची वाढ जोरात होते. सहा महिन्यांनी त्यांची चांगली किंमत मिळते.'  पुरुषोत्तमने बाजारातून सगळी माहिती काढून आणली होती. आणि या व्यवहाराचा हिशेब ही फार सोपा होता. पोरगा ही गुंतून राहिलं आणि पैसे ही मिळतील. बापाच्या या हुशारीवर पोराला आधी हसु आलं. पण परत कटकट नको म्हणून त्याने पण मान्य केलं. 

सकाळी भाकरी बांधून निघायचं. कुणाच्या तरी शेताच्या बांधावर बकऱ्या सोडून द्यायच्या. आणि आपण निवांत गप्पा ठोकत बसायचं. पोरासाठी हे काम फारच सोप्पं होत. दिवस रानात फिरल्याने पोरगं घरी आलं की मुकाट्याने झोपून जायचं. बकऱ्यापाशी आपली खाट टाकून गालातल्या गालात हसत पुरुषोत्तम झोपी जाई. नवऱ्याच्या या हुशारीवर बायको आणि मुलगी पण खुश होते. 

. . .

बघता बघता महिने निघून गेले.बकऱ्या मोठ्या होऊ लागल्या. कडकडीत ऊन पडू लागलं. शेतांच्या बांधा वरचं गवत वाळून गेलं. पोराच्या ते ध्यानी मनी ही आलं नाही. त्याचं आपलं रूटीन तसचं.  सकाळी बकऱ्या घेऊन जायच्या आणि स्वतः इकडे तिकडे फिरायचं. संध्याकाळी बकऱ्या ओढत घरी घेऊन यायच्या. 

बकऱ्या उपाशी राहू लागल्या.  

रात्रभर म्या - म्या करू लागल्या. 

रात्री बेरात्री उठून पुरुषोत्तम त्यांना पाणी पाजायचा.  

तास दोन तास गप्प बसल्या वर पुन्हा तसंच म्या - म्या. 

. . .

त्या दिवशी गुरुवार होता. बाजारातुन आल्यावर पुरुषोत्तम खाटेवर पडला होता. आज  गुरांच्या व्यापाऱ्याशी तो बोलून आला होता. पुढच्या गुरुवारी बकऱ्या घेऊन जाऊ. चांगले पैसे मिळतील या विचारात त्याचा डोळा लागला. मध्यरात्री बकऱ्यांची म्या - म्या सुरू झाली आणि पुरुषोत्तमला जाग आली. नेहमी प्रमाणे त्याने टोपल्यात पाणी आणलं आणि बकऱ्यासमोर ठेवलं. थोडं पाणी पिऊन त्या परत ओरडायला लागल्या. 

आज मात्र त्याचा पारा चढला. बाजारातुन आणलेली सगळी भाजी त्याने बकाऱ्यांसमोर टाकली. त्यांनी ती हपापल्या सारखी फस्त केली.  आपल्या बकऱ्या तहानेनी नाही तर भुकेने ओरडतात ते त्याच्या लक्षात आले. तावातावात घरात जाऊन त्याने झोपलेल्या पोराला जोरात लाथ घातली.  'बकऱ्या भुकेल्या कश्या राहतात' त्याने मारता मारता विचारले. 

बायको मुलगी खडबडून उठल्या. 

एकच रडारड सुरू झाली. 

त्या दिवशी बाप लेकाच खुप भांडण झालं. 

सगळी गल्ली जागी झाली.   

'तुमच्या बकऱ्या, तुम्हीच चारा' असं म्हणत पोरगं पारावर झोपायला निघून गेलं. पुरुषोत्तमच हे रूप कुणीच पहिलं नव्हतं. 

बायकोने त्याला शांत केलं. 

पोटभर भाज्या खाऊन बकऱ्या झोपी गेल्या होत्या.  

कधी गुरुवार येतो आणि या बकऱ्या विकून टाकतो अश्या विचारात पुरूषोत्तमला झोप आली नाही.  

सकाळी पोरगं घरी आलं. 

तोवर पुरुषोत्तम कामावर निघून गेला होता. 

पोराने चहा पिला. 

भाकरी सोबत न घेताच त्याने बकऱ्या सोडल्या 

आणि रानात निघून गेला. 

त्या दुपारी पोराने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 

बापाने खोदलेल्या विहिरीत पोराने जीव दिला. 

पुरूषोत्तम तिथे पोहचेपर्यंत त्याला बाहेर काढलं होतं. 

पुरूषोत्तमने जो हंबरडा फोडला की सगळं गाव हळहळल. 

बायकोची दातखिळी बसली. 

त्या कुटुंबाचं दुःख पाहून बरीच लोकं आवरायला गेली. 

पुरुषोत्तम पुरता खचला. 

आधीच अबोल असणारा हा आता एक शब्दही बोलेनासा झाला. 

. . .

पुढल्या गुरुवारी बकऱ्या घेऊन तो बाजारात गेला. बाजाराचा शेवटच्या टोकपर्यंत जाणे त्याला अशक्य झाले. 

पोरासाठी पहिल्यांदा घेतलेले कपडे आठवले. 

सायकल घेतली तो दिवस आठवला. 

त्याच सायकल शिकणं आठवलं. 

गुरांच्या बाजारात जाई पर्यंत त्याचे पाय जड झाले होते. 

बकऱ्या कश्या तरी फरफटत मागे मागे जात होत्या. 

बकऱ्यांच्या बाजारात पोहचल्यावर त्याला जाणवलं की आपल्या बकऱ्या फारच सुदृढ आहेत. ताज्या तवाण्या आहेत. आणि बाकी बकऱ्या पेक्षा त्या कमी ओरडतात. 

काळीज चिरत जावं असं झालं.

पण जे घडलं ते बरोबर करताही येणार नव्हतं. 

अपेक्षेपेक्षा खुप जास्त भाव बकऱ्याना मिळाला. 

झालेल्या घटनेची व्यापाऱ्याला माहिती होती. 

त्याने पुरूषोत्तमला समजावलं. 

'आयुष्य तर पुढे जगावं लागणार आहे. पोरगा गेला मान्य, पण घरी बायको आणि मुलगी आहे. त्यांचा विचार कर.' त्या व्यापाऱ्याने वडिलकीच्या नात्याने समजावुन सांगीतलं. 

मिळालेल्या पैशातून काही पैसे बाजूला ठेवत अजुन चार बकऱ्यांचे पिल्लं घेऊन दिली. 

पुरुषोत्तम त्या दिवशी ते चार पिल्लं आणि रिकाम्या पिशव्या घेऊन घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बकऱ्या रानांत घेऊन गेला.  

बकऱ्या चरायला सोडून तो एकटा झाडा खाली बसून राहायचा. 

. . .

गावातल्या एका म्हातारीने तिच्याही बकऱ्या रोज रानात घेऊन जायची विनंती केली. सोबत महिन्याला पैसे ही देण्याचे कबुल केले. 

पुरुषोत्तम घेत असलेली काळजी बघून बऱ्याच जणांनी आपल्या बकऱ्या, गायी वासर त्याच्या सुपूर्त केले. 

मोठ्ठा कळप तयार झाला. 

महिन्याकाठी चांगले पैसे मिळू लागले. 

कळपातल्या गुरांची खरेदी विक्रीची जबाबदारी पण पुरुषोत्तमने स्वीकारली. 

. . .

दर गुरुवारी गुरांच्या बाजारात तो स्वःता गुरे विकण्यासाठी उभा राहू लागला. त्या म्हाताऱ्या व्यापाऱ्याने त्याला जागा ही करून दिली. 

ओळखीही करून दिल्या आणि हळू हळू आपला कारभार ही पुरुषोत्तमवर सोपवला. 

. . .

भरभराटीचे दिवस आले. 

गुरांचा व्यापारी म्हणून पुरुषोत्तमची पंचक्रोशित ओळख तयार झाली.  

मोठ्ठं घर बांधलं. 

मुलीचं थाटात लग्न झालं. 

पण या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे आठवलं की आजही पुरुषोत्तमच मन भरून येतं 

आणि पुढे उभा असलेला अख्खा बाजार निरर्थक वाटायला लागतो.

इतर पोस्ट्स

42
(रीडिंग टाईम 14 मिनिटं )

मोहर

मारोतरावांच्या वडिलांची परिस्थिती तशी जेमतेमच. घरातलं सोनं मोडून त्यांनी शेत घेतलं. दूर. गावाबाहेर. ते या शेताला काळ सोनं म्हणायचे. त्यांची पत्नी म्हणजे; मारोतरावांची आई नवऱ्यासोबत खंबीर उभी राहिली. माळावरची ही ओसाड जमीन या दोघांच्या मेहनतीने फुलली.थोडे बरे दिवस आले. शेताच्या कडेला रस्ता होता. बैलगाड्यांचा, गुरांचा, कच्चा रस्ता. शेताच्या बांधावर उभे राहून मारोतरावांचे वडील कौतुकाने पिकाकडे बघत. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारत. तसं ते माळरान सपाट होतं. दूरवर कुठेही झाड नाही. छोटी छोटी विरळ झुडप. गावातली घरं शेतावरून ठीबक्या सारखी दिसायची.

एकेदिवशी वडिलांच्या मनात आलं, त्यांनी शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला आंब्याची दहा रोपं लावली. लहानगा मारोत त्या रोपांना रोज आपल्या सोबत आणलेलं पाणी घालत असे. मारोतरावांचे वडील नेहमी म्हणायचे, "या आंब्यांनी आपली भरभराट होईल." पुढे दहा पैकी एकच आंबा जेमतेम टिकला. आंब्याच्या नादात बाप लेकानी दुसरी झाडंही लावली नव्हती. त्यामुळे पंचक्रोशित मोठ्ठं म्हणावं असं एकच झाड. झाड मोठं होऊनही त्याला मोहर येईना. मारोतरावांचे वडील वृध्दपकाळाने गेले. त्यांनी लावलेल्या झाडाचा आंबा त्यांच्या नशिबी आला नाही.

मारोतरावांचंही आंब्यांचं वेड हळूहळू कमी झालं. शेतीच्या कारभारात ते व्यस्त झाले. पुढे त्यांचं लग्न झालं. नवरा बायकोने मिळुन शेती बहरास आणली. थोडे पैसे जमा झाल्यावर विहीर खोदण्याचं ठरलं. पाणाड्याला बोलवलं. शेतभर फिरून त्यानं आंब्यालगतची जागा सांगितली. खोल-खोल मोठ्ठी विहीर खोदण्यात आली. शेवटच्या कुदळीत धबधबा कोसळावा तसं पाणी उसळलं. विहिरीला खुप पाणी आलं. मारोतरावांनी शेती बागायती केली. सुगीचे दिवस आले. मारोतरावांनी गावात वाडा बांधला. घरी, शेतात गडी माणसं काम करू लागली. आंब्याच्या गर्द सावलीत बसून मारोतराव मजुरांवर देखरेख करत. विहिरीवर मोट होती. मोटीच पाणी विहिरी लगतच्या हौदात पडायचं. मग रस्त्याच्या कडेला केलेल्या छोट्या कालव्यातून पाणी शेताच्या चारी बाजूस फिरे. येणारे जाणारे आंब्यापाशी थांबत, विहिरीच पाणी पीत. मग पुढे जात. गाडीचे बैल, गुरं कालव्यातलं पाणी प्यायला थांबत. मारोतराव आणि त्यांची बायको दोघंही मजुरांसोबत आंब्याखाली भाकरी खात. बऱ्याचदा येणारे जाणारेही आपली शिदोरी इथेच उघडत. पिकामागून पिकं गेली. हंगाम गेले. पण आंब्याला काही मोहर येईना. याची खंत मारोतरावांना नेहमी सलायची. आंबा हे फळ सोडलं तर या झाडाने मारोतरावांना सगळं काही दिलं. दर हंगामात ते मोहोर येण्याच्या आशेने आंब्याकडे बघत. पण हंगाम तसाचं जाई.

एका हंगामात मात्र मोहोर आला. आंब्याच गर्द हिरव झाड पिवळ झालं. मारोतरावांचा आनंद गगनात मावेना. कैऱ्यांनी झाड लदबद झालं. मारोतरावांच्या बायकोने कैऱ्यांच लोणचं घालून शेजारी पाजारी वाटलं. रस्त्यावरून जाणारा येणारा एकतरी कैरी घेतल्या शिवाय जात नसे. मारोतराव स्वतः कैऱ्या तोडायला मदत करत. कैऱ्यांचे पुढे गोड रसरशीत आंबे झाले. पिकलेल्या आंब्यांची पहिली टोपली जेव्हा वाड्यावर आली तेव्हा मारोतरावांना वडिलांची फार आठवण आली. पहिला आंबा त्यांनी वडिलांच्या फोटोखाली ठेवला आणि दुसरा देव्हाऱ्यात. मारोतरावांनी स्वतः आंबे घरोघरी वाटले.त्या वर्षी अख्ख्या गावाने मारोतरावांच्यां आंब्याचे आंबे खाल्ले. पुढची दोन चार वर्ष हाच उपक्रम.

हळूहळू लोकं मात्र शेफारली. न सांगता कैऱ्या तोडू लागली. नासधुस करू लागली. काही जण कैऱ्या तोडून तालुक्याला विकायला लागली. मारोतरावांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण त्रास फारच वाढला. एके वर्षी तर मारोतरावांना एक आंबा ही मिळाला नाही.

* * * 

किसना

किसना लहानपणापासून आपल्या आईसोबत मारोतरावांच्या वाड्यावर यायचा. त्याची आई मारोतरावांकडे धुणी भांडी करायची. मारोतरावांची बायको किसनाला फार जीव लावायची. त्याला जेवू खाऊ घालणं. कपडे लत्ते करणं. असं सगळं करायची. मारोतरावांना मुलबाळ नव्हतं. दोघंही नवरा बायको प्रेमळ. कुठल्याही गडी माणसाला नोकरासारख वागवलं नाही. त्यांच्या सोबत आंब्या खाली जेवणं. अडीअडचणीला पैशाची मदत करणं. पोरीबाळींच्या लग्नाला हातभार लावणं. हे सगळं मारोतराव मन लाऊन करायचे. बायको प्रमाणे त्यांचाही किसनावर फार जीव होता. किसना लहानाचा मोठा मारोतरावांकडेच झाला. आंब्याची पहिली टोपली किसनानेच वाड्यावर आणली होती. वडिलांच्या फोटोखाली आणि देव्हाऱ्यात आंबा ठेवल्यावर मारोतरावांनी पुढचा आंबा किसनालाच दिला होता. किसना मारोतरावांसोबत सावली सारखा असायचा. तेही त्याला मुलाप्रमाणेच वागवायचे. किसना रात्री वाड्याच्या ओसरीतच झोपत असे. तसं तर किसनाच घर वेशीपाशी होत. घर म्हणजे झोपडीच होती. त्यात त्याचे आई बाप राहत.

किसनाचा बाप पाटलाकडे कामाला होता. गावचा पाटील बेरकी वृत्तीचा. दृष्ट सावकार. कर्ज देऊन देऊन गरिबांच्या जमिनी हडपलेल्या. किसनाच्या बापावरही दारू मुळे कर्जाचा डोंगर झालेला. स्वतःच्या बापावरून किसनाची फार चिडचिड व्हायची. दोघं एकमेकांसमोर आली की भांडणं व्हायची. त्यामुळे किसनाने रात्री घरी जाणं बंदच केलं होतं. मारोतराव त्याचं कर्ज फेडायला तयार होते पण किसनाने तसं करू नाही दिलं. आपला बाप दारू पिऊन परत कर्ज करून ठेवेल याची त्याला खात्री होती. किसनाची आई, बाप - लेकाच्या वैरामुळे मारोतरावांच्या बायकोकडे फार रडायची. किसनाच्या बापाला मारोतरावांनी समजावुन सांगावं अशा विनवण्या करायची. पण किसनाचा बाप पुर्णपणे दारू आणि पाटलाच्या आहारी गेला होता. पाटलाची वसुली करणे, दारू आणणे, पार्ट्यांची तयारी करणे, तमाशाचे फड लावणे, वगैरे, वगैरे. शेजारच्या गावातली श्रीमंतांची पोरं जेव्हा गायब झाली तेंव्हा पोलीस किसनाच्या बापाला घेऊन गेले होते. पाटलाच्याच सांगण्यावरून त्यानं ही पोरं पळवली अशी चर्चा गावात होती. पुढं पाटलानेच किसनाच्या बापाला जामीन वर सोडवून आणलं. 'किसनाला माझ्या कडे कामाला आण तुझी सगळी कर्ज माफ करतो' ,असं तो नेहमी किसनाच्या बापाला म्हणत असे. यावरून बापलेकांमध्ये नेहमी वाद व्हायचा.

या वतिरिक्त किसनाच्या बापाचा वडिलोपार्जित एक धंदा होता. अंतयात्रेसमोर' डफड ' वाजवण्याचा. डफड हे ओबडधोबड वादय डफली सारखंच असतं, जे सहसा अंतयात्रेत वाजवतात. जाड्या भर्ड्या चामड्याच्या पात्यावर टीपरूने जोरात दणका मारायचा आणि एक ठोका निघायचा. हा ठोका सगळी शांतता चिरून टाकायचा. या डफड्याचा आवाज आला की, गावात कुणी तरी मेलं हे समजायच. हा ठोका ऐकून खेळणारी पोरं घरात पळून जायची. चव्हाट्यावर बसलेले उठून उभे राहायचे. दुकानं बंद व्हायची. बैलगाड्या रस्त्याच्या कडेला लागायच्या. बायका पोरी खिडकीत उभ्या राहायच्या. जोर जोरात रडण्याचे आवाज यायचे. आणि काळजाचा ठोका चुकवेल असा या डफड्याचा ठोका यायचा. त्या मागून सुरात ' राम बोलो भाई राम बोलो ' ऐकु यायचं. सगळं वातावरण सुन्न व्हायचं. किसनाचा बाप प्रत्येक अंतयात्रेत दारू पिऊन वाजवायचा. डुलत डुलत एक एक ठोका मारत तो समोर चालायचा. त्याच्या वेगावर अंतयात्रेचा वेग ठरायचा. या प्रकारामुळे लोक वैतागायचे. किसनाने डफड वाजवाव म्हणून सांगायचे. पण किसनाला हा सर्व प्रकार काही आवडत नसे. एखादं वादय एवढी स्मशान शांतता का तयार करतं हेच त्याला कळेना. यातून वेगळे सुर निघत असावेत आणि ते काढावेत असं त्याला सारखं वाटत असे. पण बाप त्याला डफड्याला कधी हातही लावू देत नसे. डफड हे कुणी मेलेकीच वाजवयाच असा त्याच्या बापाचा पक्का समज होता. एरवी ते वाजवणे अभद्र मानल जायचं. त्यावेळी जे सुर निघतील ते आपले मानायचे असं त्याचा बाप म्हणायचा. एकदा बाप घरी नसतांना किसनाने डफड वाजवायला सुरुवात केली. किसना तेव्हां लहान होता. आजूबाजूचे लोक गोळा झाले. बंद कर, नाहीतर कुणी तरी मरेल म्हणू लागले. एकाने पाटलाच्या वाड्या वरून त्याच्या बापाला बोलावले. बापाने किसनाला खुप बदडले. त्या नंतर किसनाने डफड्याला हात नाही लावला.

एके दिवशी पाटलाच्या शेताच्या बांधावर किसनाचा बाप पडलेला सापडला. दारू पिऊन मेला असावा असं सगळे म्हणाले. पण पाटलाची शांतता किसनाला टोचत राहिली. त्याने मारोतरावांना ती बोलून ही दाखवली. पण मारोतरावांने त्याला शांत राहून आई कडे लक्ष द्यायला सांगितले. नवऱ्याच्या अशा जाण्याने तिने घराबाहेर जाणं बंद केलं. किसना तिच्या सोबत झोपडीत राहू लागला. डफड नेहमी साठी दाराच्या खुंटीला लटकलं. अंगणात, खाटेवर पडल्या पडल्या खुंटीवरच डफड किसनाला अस्वस्थ करायचं. यातून वेगळे सुर आपण काढू शकू असं वाटायचं.

* * *

डफड

लोकांच्या कैऱ्या चोरण्याला मारोतराव पुरते वैतागले होते. हंगामात ते सारखे आंब्याच्या अवतीभवती रहायचे. लोक पहाटे चोरी करतात म्हणून चार वाजताच विहिरीवर जाऊन बसायचे. दबकत आलेल्या चोरांना टॉर्चच्या उजेडाने आणि हाताततल्या कुऱ्हाडीने घबरावयचे. मारोतराव तसे अंगा पिंडा ने दणकट. तलवारी सारख्या मिश्या, पांढरे शुभ्र धोतर, पांढरे शर्ट, डोक्यावर रुबाबदार फेटा. सहा फुटाच्या मारोतरावाला बघून चोरांच्या तोंडचे पाणी पळायचे. मारोतरावांचा हा अवतार पाहून जाणारे येणारे ही कैऱ्या मागायला धजावत नसतं. मारोतराव जर तालुक्याला गेले तर किसनाची ड्युटी लागायची. किसनाही मारोतरावांसारखा रांगडा पैलवान गडी. शेजारच्या गावातून येणारे हे चोर किसनाला फार घाबरून असतं.पहाटे कुणी शेताकडे फिरकला तर किसना त्याला धरून आणायचा उलट सुलट उत्तरं मिळाली की चोपून काढायचा. मारोतराव आणि किसनाच्या या गस्ती मुळे त्या वर्षी खुप आंबे लागले. मारोतरावांच्या वाड्यातील एक खोली आंब्यानी भरली. किसनाच्या ओळखीने तालुक्याच्या एका अडत्याला आंबे विकण्याचे ठरले. एवढे आंबे पाहून अडत्याचे डोळेच पांढरे झाले. छोट्या छोट्या लाकडी पेट्यांमध्ये गवता सोबत त्याने आंबे भरले. या लाकडी पेट्यांच्या गाड्यांच्या गाड्या मारोतरावांच्या वाड्याहून तालुक्याला गेल्या. अडत्याने आंब्याला खुप चांगला भाव दिला. आंब्याच उत्पन्न शेतीच्या पिकांपेक्षा जास्त झालं. आलेल्या पैशात मारोतरावांनी ' राजदुत ' नावाची मोटारसायकल घेतली. गावात आता दोन राजदुत झाल्या. एक पाटलाची आणि दुसरी मारोतरावांची. आता तालुक्याला जाणं सोपं झालं आणि वरचे वर वाढलंही. मारोतराव कधी कधी बायकोला तालुक्याला घेऊन जाऊ लागले. त्यांची बायको चालत चालत वेशी बाहेर यायची आणि कुणी बघत नाही याची खात्री करून मग राजदुत वर बसायची. रस्त्यात चुकून कुणी मारोतरावांना राम राम केला तर तिच्या जिवाचं लाजेन पाणी पाणी व्हायचं. पण किसना सोबत ती बिनधास्त वाड्याहूनच बसून जायची. लेकाच्या मागे बसायची कसली आली लाज. असं ती नेहमी मारोतरावांना म्हणायची.

आंबा भरभराट आणत होता. नफाही दरवर्षी वाढतच होता. पण चोरट्यांचे कारनामे काही केल्या कमी होईनात. मारोतराव आणि किसनाच्या गस्तीने पहाटेच्या चोऱ्या थांबल्या. चोरांच्या टोळक्याने नवीन शक्कल काढली. आठ दहा जण एकत्र येऊन रात्रीच माल पसार करू लागली. कैऱ्या ऐन भरात येत होत्या. पण चोरी रात्रीच होते हे मारोतरावांच्या लक्षात आलं. किसना म्हणाला मीच रात्री गस्त घालतो, बघतोच कोण येतो ते. रात्री जेवण करून किसना आंब्या खाली आला. राजदुत विहिरी पाशी लावली. आंब्याला दोन चार घिरट्या मारल्या. बारा एकच्या दरम्यान त्याचा डोळा लागला. दोन तीनच्या सुमारास टोळकं आलं. किसना गाढ झोपलेला पाहून त्यांनी कैऱ्या तोडण्यास सुरू केले. पडलेल्या कैऱ्यांचे पोते भरणे सुरू झाले. चालू असलेल्या हालचालीने किसना ला जाग आली. तो चवताळून उठला. सोबत आणलेली कुऱ्हाड घेऊन चोरांवर धावून गेला. पोती तिथेच सोडून चोर पसार झाले. सकाळीच वाड्यावर जाऊन त्याने मारोतरावांना झालेला प्रकार सांगितला. मी जागी आहे हे चोरांना दुरूनच कळावे असे काही तरी करावे लागेल या विचारातच तो घरी आला. त्याच लक्ष बापाच्या डफड्यावर गेलं. तसही बाप मेल्या पासून गावातल्या अंतयात्रेत डफड वाजवन बंदच झालं होतं.

रात्री जेवण झाल्यावर त्यानं डफड पाठीला टांगलं आणि आंब्यावर निघाला. बऱ्याच वर्षांची डफड्यातून काही निराळे सूर काढण्याची त्याची इच्छा होतीच. गाव पासून दूर असल्याने त्याने डफड वाजवलेलं कुणाला फारसं कळणार ही नव्हतं. झोप यायला लागली की तो ते वाजवत आंब्याला घिरट्या घालत बसला. चोरांनी दुरूनच कानोसा घेतला डफड्याचा आवाज ऐकून ते पसार झाले. सकाळ झाली. किसनाने डफड आंब्याच्या फांड्यांमध्ये लपवलं आणि तो घरी आला. वाड्यावर जाऊन त्याने आपली शक्कल मारोतरावांना सांगितली. त्यांना मजा वाटली. तालुक्याला जाऊन चांगला बँडच आणुयात म्हणाले. किसना नाही म्हणाला. म्हणाला, ही माझ्या बापाची आठवण आहे. बापाने आयुष्य भर अंतयात्रेत हे डफड वाजवलं. वातावरणात स्मशान शांतता पसरवली. पोरं बाळांना घाबरवलं. मी याच वाद्यातून काही तरी सुंदर काढेल. मारोतरावांना किसनाचं कौतुक वाटलं. ते म्हणाले वाजव, "तुला वाटेल तसं."

* * *

गस्त

रोज रात्रीचा किसनाचा कार्यक्रम ठरला. जेवण अाटोपलं की आंब्यावर निघायचं. बारा एक नंतर डफड वाजवायला सुरू करायचं. वेगवेगळे प्रयोग करून बघायचे. पण त्या मुर्दाड डफड्यातून एकच सुर निघे. प्रत्येक ठोका रात्रीची शांतता चिरत जाई.

एका रात्री तालुक्याहून उशिरा परत येणाऱ्या एकाने दुरूनच डफड्याचे ठोके ऐकले. तो जागीच गार झाला. रस्ता सोडून शेतातून सैरावैरा पळत सुटला. प्रत्येक मिनिटाला ऐकु येणारा ठोका त्याचा जीव घेत होता. जीव मुठीत घेऊन, धापा टाकत तो गावात पोहोचला. घामाने ओला चिंब. अंग तापाने फणफणतेय. तोंडातून शब्द बाहेर निघत नाही आहे. त्याची ही अवस्था बघून बायको घाबरली. तिने आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं. तो अंगणात खाटेवर पडलेला. काय झालंय कळेना. एका म्हातारीने काळा बिबा गरम केला. त्याचं तेल काढलं आणि त्याचा कपाळी लावलं. तो शांत झाला. थोड्या वेळानं बोलला, "किसनाचा बाप परत आलाय. आंब्याखाली डफड वाजावतोय."

जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. बायका मुलांना घेऊन घराकडे निघाल्या. गावच्या चावडीवर घोळका झाला. पाटलाने मारलेल्या किसनाच्या बापाच भुत सूड घ्यायला आलय अशा चर्चा सुरू झाल्या. त्यात आज अमावस्या असल्याचं कळलं. चार पाच उत्साही तरुण, "आपण जाऊन बघुयात."म्हणाले. ते वेशीपासून थोडे दूर आल्यावर, डफड्याचे ठोके स्पष्ट ऐकु येऊ लागले आणि त्यांची पळता भुई थोडी झाली. ती रात्र गाव जागी होता.

सकाळ झाली. लोकं पाटलाच्या वाड्यावर गेली. रात्री पिऊन पडलेल्या पाटलाला काय घडलं ते ठाऊकच नव्हतं. ' किसनाचा बाप कसा परत येईल. मी तर त्याला गळा दाबून मारलं होतं. तडफडत त्याचा जीव जातांना मी पहिलं होतं ' पाटलाच्या मनांत विचार आला. पण त्याने तो मनातच ठेवला. "आज रात्री बघु" म्हणत वाड्यावर झालेली गर्दी त्याने पांगवली. इकडे किसना घरी आला तेंव्हा आईच्या रडण्याचा आवाज येत होता. अंगणात आईभोवती बायका बसलेल्या. त्याला पाहून आई त्याच्या गळ्यात पडली. "किसना तुझा बाप परत आलाय. बघ, डफड घेऊन गेलाय. आंब्या खाली वाजवतोय."किसनाने हसु दाबलं. बायकांना घरी जाण्यास सांगितलं. आईला घरात नेलं. खाऊ पिऊ घातलं. आणि ती शांत झोपली. किसना हसत हसत मारोतरावांच्या वाड्यावर आला. घडलेला किस्सा सांगितला. मारोतराव आणि त्यांची बायको खुप हसले. मग मारोतराव म्हणाले हे गुपित कुणालाच नाही सांगायचं. यामुळे आपले आंबे वाचत आहेत.

त्या रात्री पाटील पोरांसोबत वेशी बाहेर आला. त्याने डफडयाचे ठोके ऐकले आणि तो हादरलाच. तरी, तो तावातावाने आंब्या कडे निघाला. पोरांनी पाटलाला अडवलं. वाड्यावर आणलं. पाटलाच्या वाड्यावर डफड्याचा आवाज ऐकू येत होता. पोरं हळूहळू पांगली. पाटलाला काही केल्या झोप येईना. किसनाच्या बापाचं भूत आपला सूड घेणार या विचाराने त्याला झोप येईना. वाड्यावर स्पष्ट ऐकु येणारे डफड्याचे ठोके त्याला बेचैन करू लागले.

आंब्याखालच्या भुताचं पेव फार वाढलं. लोक दिवसाही बिचकत जाऊ लागले. पण मारोतरावांना सांगायची कुणाची हिम्मत होईना. मारोतराव आणि किसना मात्र खूष होते. कैऱ्या पिकायला सुरुवात झाली होती. यंदा दुपटीने आंबे येणार हे स्पष्ट होतं. त्या दिवशी आंब्याचं पीक बघायला अडत्या गावात आला. यंदा आंबा थेट मुंबईला पाठवू म्हणाला. "मुंबईचा व्यापारी उद्या तालुक्याला येणार आहे, तुम्ही बोलणी करण्यासाठी या." अडत्या मारोतरावांना म्हणाला. मारोतराव किसना कडे बोट दाखवत म्हणाले, "आंब्याचे सगळे व्यवहार आजपासून आमचा किसना बघेल. तोच येईल उद्या बोलणी करण्यासाठी." किसना चमकला आणि खुशही झाला. त्या रात्री किसनाने डफड खुप बदडलं. पाटलाचं पिण फार वाढलं होतं. डफड्याच्या आवाजाने त्याला झोप येईना. तो पिसाळलेल्या लांडग्या सारखं झाला होता. एकदा जाऊन त्या भुताचा सोक्षमोक्ष लावूनच टाकावा असं त्याला वाटतं होतं. पण हिम्मत होईना.

सकाळ झाली. किसना घरी आला. तयार होवून मारोतरावांच्या वाड्यावर आला. दोघांनी मिळुन न्याहारी केली. मारोतरावांनी जबरदस्ती त्याच्या खिशात पैसे कोंबले. "अंधार झाला तर तालुक्यालाच थांब. सकाळी ये." मारोतराव काळजीने म्हणाले. बाप लेकांचा हा संवाद ऐकून दारात उभ्या असलेल्या मारोतरावांच्या बायकोचे डोळे भरून आले. किसना तालुक्याला पोहोचला. आंब्याला दरवर्षी पेक्षा खुप जास्त भाव मिळाला. आंबेपण झाडावरून व्यपारीच उतरवणार होता. अडत्या मिळालेल्या कमीशन मुळे खुश. किसना पहिलीच बोलणी यशस्वी झाली म्हणून खुश. पण ही मीटिंग संपता संपता फार उशीर झाला. रात्र बरीच उलटून गेली म्हणून किसना जवळच्याच लॉज मध्ये थांबला. सकाळी कधी एकदाचं मारोतरावांना सांगतो असं त्याला झालं.

इकडे गावात, किसना अंधार पडल्याने आता येणार नाही म्हणून,मारोतराव स्वतः आंब्याच्या गस्तीसाठी निघाले. आंब्याखाली बराच वेळ इकडे तिकडे केल्यावर, त्यांना आंब्याच्या फांद्यांमध्ये लपवून ठेवलेलं डफड दिसलं. गंमत म्हणून आपण ही थोडा हात फिरवून बघुया, म्हणून त्यांनी ते काढलं आणि वाजवायला सुरुवात केली. थोडं वाजल्यावर त्यांना मजा आली. मग त्यांनी ते बदडायला सुरुवात केली. वाजवत वाजवत आंब्याशी गोल गोल फिरू लागले.

डफड्याचे आवाज ऐकुन आज पाटलाला असह्य झालं. उरली सुरली दारूची बाटली घश्यात ओतून त्याने आपली कुऱ्हाड काढली. झोकांड्या मारत राजदुत काढली आणि आंब्याकडे निघाला. जसा जसा आंबा जवळ येत होता, डफड्याचा आवाज मोठा होत होता. रात्रीच्या थंड हवेने त्याचं डोकं सुन्न झालं होत. डफड्याच्या आवाजात त्याला राजदुतचा आवाजही येत नव्हता. पाटील घामाने लदबद झाला होता. थंड हवेने त्याला कापरं भरलं होतं. त्यानं राजदुतचा हेड लाईट बंद केला. वेग कमी केला. आंब्यापासून थोड्या अंतरावर राजदुत रस्त्यावर झोपवली. कुऱ्हाड खांद्यावर घेतली आणि सगळी हिम्मत एकवटून आंब्याकडे पळत सुटला. मारोतराव डफड वाजवण्यात मग्न होते. आंब्याला घिरट्या घालत होते. पाटील आंब्यापाशी पोहचला तेंव्हा मारोतराव पाठमोरे होते. पाटलाने खांद्यावरची कुऱ्हाड मारोतरावांवर उगारली. पाटलाच्या एका दणक्यात मारोतरावांच मुंडकं धडापासून वेगळं झालं. मारोतराव डफड वाजवण्यात एवढे गुंतले होते की ते बिना मुंडक्याच धड डफड वाजवत पुढे गेलं आणि मग कोसळलं. पाटील धड कोसळण्या आधीच ते वाजवणारं धड बघून पळाला. पळतांना त्याला खालची जमीन जाणवतच नव्हती. कसाबसा तो राजदुतपाशी आला आणि राजदुत उचलतांनाच ती अंगावर घेऊन तो कोसळला. भीतीने पाटील तिथेच मेला. मारोतराव रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. धड वेगळं, मुंडक वेगळं.

सकाळी मारोतरावांचे मजूर वाड्यावर पळत आले. मारोतरावांची बायको, बातमी ऐकुन जागीच बसली. कसेबसे सावरत मजुरांनी तिला आंब्यावर आणलं. एव्हाना सारा गाव गोळा झाला होता. धडापासून वेगळे झालेले मारोतराव बघून तिने जो हंबरडा फोडला की सारं गाव विव्हळल. तिला श्वासच घेता येईना. बायका तिला आवरत होत्या. थोड्या वेळानं ती शांत झाली. मोठी हिम्मत करून उठली. लोकं रस्त्यावर अंतयात्रेची तयारी करण्यात जुंपले होते. हिने मारोतरावांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. चेहऱ्याला लागलेली माती आपल्या पदराने पुसली. एकदा मनभरून मारोतरावांना पाहिलं आणि क्षणाचा ही विलंब न करता स्वतःला शेजारच्या विहिरीत झोकून दिलं. एकच आरडाओरड झाली. तिला वाचवण्या साठी लोकांनी पटापट विहिरीत उड्या टाकल्या. तिला वर काढलं पण तोवर तिने जीव सोडला होता. नवऱ्या सोबत जाण्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं.

सकाळीच तालुक्याहून निघालेला किसना एव्हाना आंब्यापर्यंत येऊन पोहचला. गर्दी बघून त्याने राजदुत दूरच थांबवली. आणि पळतच आंब्यापशी आला. समोरचं दृश्य पाहून तो खालीच बसला. सगळं सुन्न झालं. कुणाचेच आवाज ऐकू येईनासे झाले. गावकऱ्यांनी त्याला सावरलं. किसनाने सख्ख्या पोराप्रमाने मारोतराव आणि त्यांच्या बायकोचे अंत्य विधी केले. गावातल्या थोरल्यांच्या सांगण्याहून किसना वाड्यावर राहू लागला. ठरल्या प्रमाणे व्यापाऱ्याची माणसं आंबे उतरवून घेवून गेली. त्या दिवशी किसना लहान मुलासारखा रडला.

हंगाम ओसरला. किसनाने शेत कामात मन लावून घेतलं. पुढच्या वर्षी आंब्याला पुन्हा मोहर आला. कैऱ्या येऊ लागल्या.पण आता आधी सारखी रात्रीची गस्त द्यावी लागत नाही.कारण, बिना मुंडक्याचं मारोतरावांचं धड, डफड वाजवत गस्त घालतं, दरवर्षी.

इतर पोस्ट्स

43
(रीडिंग टाईम 3 मिनिटं )

सकाळी कोकिळेच्या कुहू कूहू ने जाग आली.
मोबाईल मध्ये वेळ पहिला - पाचच वाजलेत !

(सकाळी सकाळी ही कोकिळा काय " वसंत आला गड्यांनो…" असं सांगतेय.
लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या आम्हां गड्यांना ' वसंत ' काय आणि ' शरद ' काय एकूण एकच.)

. . .नंतर हळू हळू सगळेच पक्षी उठले.
किलबिलाट सुरू झाला.

मनात आलं, माणसानं का नाही पक्ष्यांसारखं सिंपल ठेवलं?

सकाळी उजाडलं की गाणं गात गात उठायचं.
मावळलं की झोपायचं.
पण एवढंच नाही,
बऱ्याच गोष्टी पक्ष्यांसारख्या कराव्या लागल्या असत्या.

दिवस उजाडला की माणसं किलबिलाट करत उठली असती. अर्थातच उडता येत नसल्याने, इकडे तिकडे पळाली असती.
(आपल्या भाषेत त्याला ' मॉर्निंग वॉक ' किंवा ' जॉगिंग ' म्हणतात, काहीजण.)
पण समजा सगळीच पळायला लागली असती, तर ?
मग पळता पळता, पकडापकडीचा खेळ खेळली असती.
आणि तोंडाने गाणं सुरूच.

नंतर काय दिवसभर अन्नासाठी शोधाशोध !

(बाल्कनीत रोज येणाऱ्या पोपटांसाठी दाणे टाकता टाकता बायको म्हणाली " अरे! असे दाणे कोण टाकेल माणसांसाठी? "
मी: "जे बिझिनेस वाले आहेत ते टाकतील की. ते थोडीच पक्षी होणार होते. असले विचार तर ' वर्क फ्रॉम होम ' करणाऱ्या नोकरदार मंडळींचे आहेत ना ! ")

मग पोट भरलं की इकडे तिकडे हुंदडायला मोकळे.
नको नको त्या गॅलरीत, खिडकीत, बाल्कनीत जाऊन बसून बघायचे. उगाच काहीतरी गुणगुणत मोर्चा पुढे.

एखाद्या तारेवर मीटिंग भरवायची. सगळ्यांनी एकदम बोलायचे आणि तण तण करत निघायचे…
थोडं करेक्शन आहे -
तारेवर दहा बारा माणसं लोंबकळत बरी नाही दिसणार. महा वितरण वाले ' लोड शेडींग ' करतील.
मीटिंग आपण रस्त्याच्या कडेला एखाद्या कठड्यावर भरवू.

आयुष्यात टी व्ही नाही. मोबाईल नाही. आणि ऑफिस ने दिलेला लॅपटॉप पण नाही. त्यामुळे उडता उडता म्हणजेच पळता पळता दिसलाच कोणी तर द्यायचा निरोप.
पण त्यात ही भेदभाव आलाच.
कावळे कबुतरांशी बोलणार नाही.
आणि कबुतरं पोपटांना बघून माना मुरडणार.

दिवसभर ड्रोन सारखं उडत शहराचा ' बर्ड आय व्ह्यू ' घ्यायचा.
थोडं बाहेर पडून नदीवर जायचं.
झाडांच्या गर्द सावलीत नदीच्या पाण्यात खेळायचं.
एकमेकांवर पाणी उडवत गाणी म्हणायची.
असा सगळीकडे आनंदी आनंद.
उगाचच्या ऑनलाईन मीटिंग नाही. कॉन कॉल्स नाही.

संध्याकाळ झाली की थवे करत घराकडे परत.
घरं मात्र आता जशी आहेत तशीच ठेवावी लागतील.

रात्रभर, झाडांच्या फांदयांवर, वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या वजनाचे माणसं झोपवणे शक्य नाही.
मुळातच माणसांना पुरतील एवढी झाडाचं नाहीत शहरात.
काहींना शहराबाहेर दूर झाड घ्यावं लागेल. मग जाण्या येण्याचा प्रॉब्लेम.
आणि सगळी माणसं झाडावर राहू लागली तर पक्षांचं ' पुनर्वसन ' करावं लागणार.

समजा झाडावर झालीच सोय,
तर माणसं सवयी प्रमाणे वेगवेगळे आवाज काढत झोपणार.
त्यात इंजिनीअरिंगचे काही वटवाघूळ जागीच.
उरलेल्यांना नेटफ्लिक्स बघावं वाटणार.
पण टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप नाही.
जाऊ देत, मरू देत ते नेटफ्लिक्स!!

शेवटी, अशी मजल दर मजल करत, तुम्ही झोपलाच.

सुंदर पहाट झाली…
आणि तुमच्या बाजूला झोपलेली कोकिळा कुहु कूहु करत उठली,
तर उगाच कावळ्या सारखे काव काव करू नका.
लॉकडाऊन् सुरू आहे अजुन.

इतर पोस्ट्स

44
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

बाल्कनीत बंगई आहे. त्यावर शांतपणे बसून काका चहा घेत असतात. पांढरी दाढी. पांढरे केस. काळा टी शर्ट - काळीच थ्री फोर्थ. साठीतला, निवांत रिटायर झालेला माणूस. आणि माझ्या बाल्कनीतून रोज दिसणारं हे दृश्य का कोण जाणे मला नेहमीच हेवा वाटून अस्वस्थ करतं.

. . .

आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहणारे हे काका- काकू.
त्यांच्या घराला दोन बाल्कनी.
पहिली - बंगई असणारी.
आणि दुसरी बेडरूमला जोडलेली, ऐसपैस.

पहिल्या बाल्कनीत,
लोखंडी पाईपची फ्रेम. एक टोक भिंतीला तर दुसरं रेलिंग वरून काढलेल्या कॉलमला. त्या फ्रेमला रुबाबात झुलणारी लाकडी बंगई.
दोन कुंड्या, दोन कोपऱ्यात रेलिंगला खेटून उभ्या.
त्या कुंड्यांमध्ये कुठलिशी छोटी रोपटी.
एक शू रॅक, खिडकी खाली.
दोन डस्ट बिनच्या बादल्या. निळ्या रंगाच्या.
अडगळीतलं एक छोटंसं कपाट.
त्यावर काकांची तंबाखू ची पुडी आणि चुन्याची डबी. बहुदा लपून ठेवलेली.
बाल्कनीला वर कपडे वाळू घालण्यासाठी दोरीने खाली घेता येतं असं इझी ड्रायर.
त्यावर लोळत पडलेले कपडे.
बाल्कनीच्या भिंतींना बिल्डिंगचाच पांढरा रंग. रेलींग मात्र काळी.
या बाल्कनीत सहसा काकूंचा वावर नसतो. मात्र काका सारखे दिसतात.

याच्या एकदम विरुद्ध दुसरी बाल्कनी.
ती काकूंच्या निगराणी खाली असणार.
या बाल्कनीला तिन्ही बाजू मोकळ्या.
त्यामुळे तिन्ही बाजुस कुंड्या ठेवलेल्या.
कुंडीच्या प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घेतलेली.
रोपांच्या आधारासाठी ठिकठिकाणी बांबूच्या चौकटी तयार केलेल्या. त्यांना पांढरा शुभ्र रंग दिलेला.
एक वेल कॉलम वर सर सर चढत गेलेली.
तिला पांढऱ्या रंगाची छोटी छोटी फुलं.
साठीतल्या या काकू कधी कधी सकाळी सकाळी आपली ही छोटी बाग कौतुकानं न्याहाळताना दिसतात.
कधी वेलीची फुले वेचतांना दिसतात.
या बाल्कनीत एक उभी ठेवलेली केरसुणी.
पांढऱ्या रंगाची छोटीशी चेअर. एकच. काकुंसाठी.

त्या छोट्याश्या बागेला पक्षी ही कुतूहलाने बघतात.
पण ते आत येऊ नयेत म्हणून बाल्कनीला संपूर्ण नेट लावलेली.
पक्ष्यां प्रमाणेच काकाला सुध्दा इथे प्रवेश नसावा. ते नाही दिसत फारसे इथे.

काकू मात्र बाल्कनी पेक्षा किचनच्याच खिडकीत जास्त दिसतात.
किंवा सोफ्यावर बसून निवांत टी व्ही बघत असतात.
एरवी शांत चहा पित बसलेले काका, बिलकुलही शांत नाहीत.
तिथल्या तिथे सारखी काहीतरी धावपळ सुरू असते.

चहा पिऊन झाला की पटकन कप बशी आत नेऊन ठेवणार.
इकडे तिकडे कानोसा घेऊन, तंबाखू चोळून पटकन तोंडात टाकणार.
झटदिशी आत जाणार, आतून मोबाईल आणणार, उगवत्या सूर्याचा फोटो काढणार.
मग बंगईत बसून, तो फोटो फॉरवर्ड करीत बसणार.
कुणाच्या रिप्लायची वाट न बघता, परत आत जाणार.
केरसुणी घेऊन उगाच बाल्कनी झाडणार.
तंबाखू नीट ठेवली आहे की नाही चेक करणार.
मग दोरी खाली ओढून कपडे खाली घेणार, घड्या करणार.
त्यांची लगबग सारखी खिडक्यांमधूनही दिसत राहते.

बऱ्याच वर्षांच्या संसारानंतर नवरा बायको आपल्या रूम वाटून घेतात म्हणे, तश्या बाल्कनी पण वाटून घेत असावेत.
मात्र एखाद्या संध्याकाळी काका काकू दोघंही बंगईत चहा घेताना दिसतात.
आणि त्यांना पाहून माझं हे वाटणं चुकीचं वाटायला लागतं…

इतर पोस्ट्स

45
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

इंजिनीअरिंगच्या आयुष्यात ड्रॉइंग हॉल येतोच.
एक मोठ्ठा हॉल.
त्यात पन्नास ते साठ मोठी टेबलं.
प्रत्येक टेबल एवढा मोठा की ड्रॉइंग बोर्ड ठेवल्यावर, ड्राफ्टर, पेन्सिल्स, पेन, सोबत आणलेली एखादी वही किंवा स्केच बुक ठेऊन बरीच जागा उरेल.
एवढा टेबल प्रत्येकाला एक.
त्याच्या समोर एक उंच स्टूल.
टेबालाची उंची एवढी की सहज उभे राहून ड्रॉइंग काढता येईल.
स्टूलची उंची एवढी की त्यावर बसून लिहिता येईल.

हॉलच्या एका भिंतीला तीन फळे. हिरव्या रंगाचे.
त्यापैकी एकावर ग्राफ सारखे चौकोनी रकाने काढलेले.
सरांसाठी तीन फळ्यांच्या मधोमध एक लांब टेबल आणि एक स्टूल.
सरांचं हे टेबल आणि स्टूलच सेटअप एका डायस वर ठेवलेलं.
हे डायस ही लाकडाचं.
लाकडी डायसच्या खाली कागदांचे बोळे.
डायसवर फळ्याच्या खाली पडलेली खडुची पावडर.
सरांच्या टेबल वर डस्टर. रंगीबिरंगी खडूंचे तुकडे.
एखादा बिनकामाचा कागद.
खडूंची पावडर इथेही, टेबल भर.

एका भिंतीवर तीन चार स्वीच बोर्डस, जवळ जवळ बसवलेले.
त्यावर काळया रंगाचे गोल स्विचेस.
छताला ठिकठिकाणी लोंबकळत फॅन्स आणि ट्यूब लाईट्स.
छताच्या कोपऱ्याला जाळे. ठीक ठिकाणी.

फळ्यांचा भिंतींच्या कोपऱ्यात एखादं रिकाम टेबल.
त्यावर जुन्या शीटस्.
जर्नल्स च्या फायलींची कव्हर्स.
त्यावर धूळ.
टेबल, शीटस् आणि फाईल्स कुणालाच कधी दिसतच नाहीत अश्या पडलेल्या.

आमच्या टेबल वर पेन ठेवण्यासाठी दोन खाचा.
ठिकठिकाणी शाईचे डाग.
परीक्षेचे रोल नंबर्स चिकटलेले कागद. काही फाडलेले, काही तसेच.
टेबलावर अगम्य अक्षरात काहीतरी लिहिलेलं.
ड्राफ्टर घासून घासून लाकडावर कोरल्या गेलेल्या रेषा.
टेबलावर वर्षानुवर्षापासून लिहिलेली नावं.
बदामी आकाराने जोडलेली काही जुनी नाती.
तर काहिंतून आरपार गेलेले बाण.

त्या टेबलाला सहजासहजी न उघडता येणारा एका मोठ्ठा ड्रावर.
त्या ड्रावरमध्ये धुळीचा थर.
एखादा कागद किंवा कागदाचा बोळा.
दोन फळ्यांचा रुंद फटीत व्यवस्थित घडी करून लपवलेली कॉपी.
टेबलाच्या सोबतीला उभा असलेला स्टूल.
पिढ्यानपढ्या बसून गुळगुळीत झालेला.
त्याला उचलण्यासाठी मध्ये एक भोक.
खाली सिमेंटच फ्लोरिंग.
त्याला काळया रंगाचे जॉइंट.
काही ठिकाणी उखडलेले.
त्यातून घरांगळणारे वाळूचे खडे अगदी पायाशी पोहचलेले.

कोपऱ्यात पाय तुटलेला, धुळीत माखलेला एखादा स्टूल.
एकटाच.

हॉलला मोठ्ठ्या खिडक्या.
पण त्यावर बारीक लोखंडी जाळी लावलेली. त्यामुळे दबकत येणारा प्रकाश. खिडक्यांच्या बाहेर अशोकाची उंच झाडं, रस्ता. रस्त्यापलीकडलं हॉस्टेल. सायकल स्टँड.
हॉलला दोन तावदाने असलेलं मोठ्ठं दार.
दारावर बाहेरील बाजूस परीक्षेच्या वेळेस चिकटवलेली रोल नंबर्स ची लिस्ट.
दार नेहमी अर्ध बंद.

या हॉल मध्ये आम्ही फक्त ड्रॉइंग काढली असं नाही.
सगळी सबमिशन केली.
परीक्षा दिल्या.
खरं तर या हॉल ने आमचं इंजिनीअरिंग पाहिलं
आणि तो ही जगला आमच्या सोबत.

रोज संध्याकाळी, कॉलेज मधून घरी जातांना, हॉल मध्ये डोकावून बघण्याची सवय होती मला. त्याचं किणकिणत दार हळूच बाहेर ओढायचं आणि आत डोकावून बघायचं.
हॉल शांत, तृप्त.
सगळी मंडळी पांगल्यावर एकटा उभा असलेल्या मंडपासारखा.

इतर पोस्ट्स

46
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

आम्ही इंग्लिश मुळातच पाचवीत शिकलो.
माजगावकर सर. आमचे पाचवीत क्लास टीचर.
इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्हीं भाषा तेच शिकवायचे.
पुर्ण टक्कल, सोबतीला राहीलेले शेवटचे काही केस. टकला एवढंच ठळक पोट. डोळ्यांवर लाल दांड्यांचा, जाड भिंगाचा चष्मा. हाफ शर्ट. खांद्याला कापडी शबनम. हाताला कायम खडूची पांढरी पावडर लागलेली आणि ती पँट पर्यंत पोहचलेली. तोंडात कधी कधी पानाचा तोबरा. असं काहीसं स्थुल पण हसरं, गोंडस व्यक्तिमत्व.

तुम्हाला आठवत असेल, इंग्लिश साठी तीन रेघी एक स्वतंत्र वही असे. माजगावकर सर वर्गात येतांना एक लांब लाकडी पट्टी आपल्या सोबत घेऊन येत. मग इंग्लिशच्या त्या तासामधले काही मिनिटं आमच्या वहीत आहेत तश्याच तीन रेघा फळ्यावर काढण्यात जातं. त्या दरम्यान जर कोणी कुजबुज किंवा गडबड केली तर "अरे ओ हिऱ्या !!" असे ते जोरात खेकसावत. मग तो हिरा गोंडस सरांचा हा अगोंडस अवतार बघूनच शांत बसे.

माजगावकर सरांच्या लेखी आम्ही सगळे हिरे होतो. पैलू पाडण्याचं काम त्यांचं. आणि पैलू पण इंग्लिशचे! मग ते हळू हळू आमच्या कडून ए - बी - सी - डी गिरवून घ्यायचे.

माझं अक्षर जे काही चांगल आहे ते माजगावकर सरांमुळे. पुढे बऱ्याच मस्तारांमुळे अक्षर सुधारलं आणि बिघडलं. म्हणजे माझ्या मोत्या सारख्या अक्षराला ही पैलु पडले म्हणा. असो.

तर माजगावकर सरांनी आम्हाला इंग्लिश आणि हिंदी चे बाळकडू पाजले.
इंग्लिशशी अजून लढतो आहे आणि पुण्यात राहत असल्याने हिंदीची मी फार चिंता करीत नाही.

लहानपणी नवनीत प्रकाशनचे "शब्दार्थ" नावाचं, डायरीच्या आकाराचं, छोटंसं, आडवं पुस्तक यायचं. प्रत्येक इय्यतेसाठी, दरवर्षी मी हे पुस्तक विकत घेतलं आहे. पण शब्द आणि त्यांचे स्पेलिंग कधी पाठ नाही झाले. पुढे बिल गेट्स ने स्पेल चेक आणून वाचवलं. (ऑटो करेक्ट या ऑप्शन बद्दल आपण नंतर कधी सेपरेट बोलू.)

. . .

माजगावकर सर इतक्या वर्षांनी इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये दिसल्याने मी थोडा गोंधळलो. सगळी हिम्मत एकवटून मी त्यांच्यापाशी गेलो.
" सर, मी तुमचा स्टूडेंट! तुम्ही पाचवीला मला क्लास टीचर होतात"
ते प्रसन्न हसले.
बरेच म्हातारे झाले होते पण हसू तसचं होतं.
आपल्या कारखान्यातील एक हिरा या शो रूम मध्ये! असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
" तुम्ही इथं कसे?" मी विचारलं.
"माझ्या मुलासोबत आलोय एडमिशनसाठी."
'म्हणजे घरीच पैलू पडलेला हिरा म्हणा की.' मी शब्द मनातच गिळून घेतले.
पण तो होम मेड हिरा बघण्याची उत्सुकता मला लागली . . .

. . .

त्या हिऱ्या बद्दल म्हणजेच,
पुढे माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक झालेल्या या अवलिया बद्दल नंतर कधीतरी .

इतर पोस्ट्स

47
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

एकाचं नाव रवींद्र. दुसरा अमोल.
दोघेही कॉलेज पासून बरेच दूर राहतात. एकाच गाडीवर येतात.
'सभ्य, अभ्यासू' असं त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणीही सांगेल.
रवींद्र धीट.अमोल जरा लाजरा. कमी बोलणारा.

मी जबरदस्तीने शाळेत पाठवलेल्या मुलासारखा.
आणि ही शिकायला आलेली कार्टी !

शिकायला आलेले आणि पाठवलेले असे सगळे इथेच सायकल स्टँड वर भेटायचे.
यात एक तिसरा ग्रुप होता. जेपी दादाचा. ही लोकं फक्त कॉलेजला यायची.

ग्रुप प्रमाणे स्टँड आणि तिथे बसण्याच्या वेळा बदलायच्या.

"पार्किंग" हा शब्दच नव्हता आमच्या कॉलेजात.
सायकल स्टँड होते ठिकठिकाणी.
आमच्या डिपार्टमेंट ला दोन होती.
एकमेकांसमोर तोंड करून असलेली.
कॉलेज चा दिवस इथून सुरु व्हायचा आणि इथे आल्या खेरीज संपायचा नाही. एखादा कुठेच सापडला नाही तर इथेच बसलेला असायचा.
लेक्चरला न जाता सायकल स्टँड वर बसणे म्हणजे एनलाईटमेंटच !

एकीकडे उतार असलेले साधं टीन शेडचं होतं हे स्टँड.
तिन्ही बाजूस पटकन बसता येईल असा कठडा.
खाली जुन्या खिळखिळ्या झालेल्या शाहबादी फरश्या.
आजूबाजूला वाळलेल पिवळ गवत.
पक्की फरशी पाहून लावलेल्या बाईक.
साइड स्टँड वर लावलेल्या स्कुटी.
एखादी सायकल.
बाकी सबमिशनचे पेपर्स, कागदाचे बोळे इकडे तिकडे.

ही सायकल स्टँड मला उन्हातलीच आठवतात.
जोरात पाऊस सुरु झाला आणि आम्ही पळत सायकल स्टँड वर आलो असं आठवत नाही.
एकंदरीतच कॉलेजातला पाऊसच आठवत नाही, आता.

या स्टँड वर बऱ्याच गप्पा व्हायच्या.
पास्टच्या.
फ्युचरच्या.
इथून बाहेर पडलो की हे करू, ते करू, वगैरे वगैरे.

बऱ्याच गोष्टीही घडल्या या स्टँडवर.
जेपी दादा आणि उत्तम ची जुगलबंदी इथेच झाली.
मक्याच्या स्टोरीला गती मिळावी म्हणून केडी ने केलेला पराक्रम ही इथेच.
पण त्या गोष्टी नंतर.
पुढे कधी तरी. . .

इतर पोस्ट्स

48
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

आमचं डिपार्टमेंट म्हणजे कॉलेजची ऍनेक्स बिल्डिंग.
सी आकाराची. दोन मजली, दगडी इमारत.
सी आकाराच्या पोटात लांब व्हरांडा.
व्हरांड्याला खालपासून वर पर्यंत लोखंडी चौकोनी जाळी.
समोर अशोकाची टोकदार झाडं.
एकमेकांसमोर तोंड करून उभे असलेले सायकल स्टँड.
इमारतीच्या बरोबर मध्ये भल मोठ्ठं दार.
दारासमोर पटांगणात एक बंद असलेला कारंजा.
त्याभोवती लोखंडी कंपाऊंड. एक तुटकं गेट. आतली झाडं झुडपे वाळलेली.
कागदांचे बोळे इकडे तिकडे.
सायकल स्टँड वर मोजक्याच बाईकस्.
मुलींच्या स्कुटी, एम एटी आणि सायकली.
पटांगणात एक स्कुटर.
पांढऱ्या रंगाची मारुती 800.
तिरपी लावलेली एक बॉक्सर.
आणि सायकल स्टँड वर बसलेले आम्ही.

इतर पोस्ट्स

49
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

कॉलेजमध्ये बरं होतं.
मित्र होते.
कट्टा होता.
वेळही होता.

रोज कट्ट्यावर चक्कर टाकणे हा नियम होता.
आणि सवयही.
हळू हळू एक एक जण जमायचा.
चहा कॉफी सोबत, गप्पा, जोक्स, किस्से व्हायचे.

आय टी वाला,
फायनान्स वाला,
मार्केटिंग वाला
अशी कुणाला लेबलं नव्हती.
मित्र फक्त मित्र होते.

हसत खिदळत कॉलेज संपलं.
ऑफिस आलं.
येण्या जाण्याचे रस्ते वेगळे झाले.
कट्टा सुटला.
मित्र ?
आहेत.
व्हॉट्सअपच्या ग्रुप वर.

कॅफे आपो, सीसीडी किंवा स्टारबक्स सारखं नाही.
कारण ती कुठली यशस्वी फूड चैन नाही.
तर कुणाचं तरी पॅशन आहे.
आणि ते तुम्हाला सारखं जाणवतं.

एक तर, आपण ऑकवर्ड मीटिंग उगाच कॅजूअल् वाटावी म्हणून कॅफेत भेटतो.
किंवा "कुठे घरी बोलवायचं ?" असं न म्हणता "कन्व्हेनीयंट ठिकाणं आहे!" म्हणुन कॅफेत भेटतो.
कॅफेत बसल्यावर, जो रस्त्याकडे तोंड करून बसतो, तो निम्मा वेळ बाहेरच्या ट्रॅफिकची हालचाल पाहतो.
आणि समोरचा, भिंतीवरचं सारखं सारखं तेच वाचतो.

आपो ला मोठ्ठया खिडक्या आहेत. लख्ख प्रकाशलेल्या.
पण जनरली कॅफेतून दिसणारी बाहेरची ट्रॅफिक नाही.
बाहेर सुंदर झाडी आहे.
येलो आणि व्हाईट कॉम्बिनेशन असलेल्या सुंदर भिंती आहेत.
भिंतीवर बरीच आर्ट वर्क्स आहेत.
मिस मॅच चेअर्स आणि त्याला शोभतील अशी टेबल आहेत.
मोठ्ठ्या ग्रुपने आरामशीर बसून दंगा करावा एवढी ऐसपैस सोय आहे.
गोष्टी परफेक्ट नसून प्रत्येकाला एक ह्यूमन टच आहे.
पॅशन आहे.
तीच गोष्ट फूड मध्येही आहे.
कॉफीत ही आहे.

एकदा तुमचं ठरलं, की सगळं सगळं पॅशनेटली होतं.
सुनेत्रा आणि सार्थक या कपलचही असच झालं असावं.
आणि कॅफे आपो जन्माला आलं.
"आम्हाला कुल जागा बनवायची होती जी एक कट्टा असेल, सगळ्यांसाठी!" दोघंही सांगत होती.
दोघं नवरा बायकोचं स्वप्न दिसतं त्यांच्या डोळ्यांत.

आपो खरंच कुल आहे. कोझी आहे.
परफेक्ट नाही. ह्यूमन आहे. आपलं वाटावं असं आहे.

आपो हे फिलिपीन्स मधलं कासावांसाठी प्रसिध्द असलेलं एक बेट.

कासव म्हटलं की मला उगाच आपण ससा आहोत असं वाटतं.
खरं तर आपण रेस मधले उंदरं आहोत.
शेवटी जिंकणार कासवच.
माहीत आहे. सगळयांना.
अगदी लहानपणपासूनच.
आणि आपो सारख्या ठिकाणी आलो की कासवाच जिंकण स्वाभाविक वाटतं.

या रेस मध्ये आपलं काय मागे सुटलं ते जाणवतं.

मित्र सुटले.
कट्टे सुटले.
कट्टया वर रोज चक्कर मारायची सवय सुटली.
तास अन् तास च्या गप्पा सुटल्या.
"जॉब नही, कुछ और कर दिखांयेगे" वाले स्वप्न सुटले.
आपले या ह्रदयी चे त्या हृदयी असलेले सगळे संवाद सुटले.

म्युट केलेले व्हॉटसअप चे ग्रुप आणि फॉरवर्ड मेसेजेस उरलेत.

म्हणून आज कॅफे आपो ला आलो तेंव्हा कुणास ठाऊक का, वाटलं :
हळू हळू एक एक जण येईल आता.
आणि पुन्हा सुरू होतील गप्पा…

कधी ऑफिसच्या ब्रेक मध्ये,
तर कधी ऑफिस मधून घरी जाता जाता,
सुनेत्रा आणि सार्थकच्या या कट्टयावर चक्कर टाका.
बघा हा अनुभव येतो का?

इतर पोस्ट्स

50
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

दुपारी घरी जाता जाता रामबाग कॉलनीच्या वळणावर ही ऊसाची गाडी दिसली. गर्द झाडाच्या सावलीत उभी असलेली. हाताने उसाचा रस काढणारं हे कपल बघून मी आणि जयश्री थांबलो. त्या सावलीत फूटपाथ वर बसून मस्त रस पीला. शांत वाटलं. हाताने काढलेल्या उसाच्या रसाला जी चव असते ती मशीनवर काढलेल्या रसाला येत नाही.

आम्ही बराच वेळ बसून त्या कुटुंबाची लगबग बघत होतो.
गाडी स्वच्छ, नीटनेटकी. नेमके सामान. व्यवस्थित कापून ठेवलेले ऊस.स्वच्छ सात आठ ग्लासेस, रस गाळण्यासाठी पांढरे शुभ्र कापड, पैसे जमा करण्यासाठी छोटीशी ज्युटची पिशवी, पाणी साठवण्यासाठी स्टीलची टाकी, पिण्याच्या पाण्यासाठी छोटा काळाशार माठ, झाडाच्या बुंध्याशी त्यांचा डबा. असा सगळा संसार आम्ही दोघं कुतुहलाने बघत होतो.

लोकं जाता येता थांबत होती. रस पिऊन पुढे जात होती. काही जण बॉटल मध्ये नेत होती. गर्दी कितीही असो ही दोघं शांत काम करत होती. प्रत्येकाशी हसून बोलत होती. थोडा अबोल, हसऱ्या चेहऱ्याचा हा गडी दिवस भर रसासाठी तो घाणा ओढतो. बायको पण खांद्याला खांदा देऊन समर्थपणे उभी.

थोडी गर्दी ओसरल्यावर सवयीप्रमाणे आम्ही गप्पा मारल्या. धनाजी नाव त्याच. रांगडा सोलापूरचा गडी. सकाळी नऊ वाजता हे कुटुंब आपला हा छोटासा बिझीनेस सुरू करतात. रात्री साडे दहा पर्यंत लोकं येतात म्हटले. मग घरी जायला बारा वाजतात. घरी गेल्यावर कुकर लावायचा काहीतरी बनवायचं आणि खायचं. सकाळी पुन्हा सुरू.

“समोरच्या मशीनवाल्या रसवंती वर फार गर्दी असते. आम्हाला हातांनी रस काढायला थोडा उशीर लागतो म्हणून लोकं थांबत नाहीत. पण आम्ही आमच्या कष्टात खुश आहोत. तसंही दोघांच्या संसाराला काय हवं?” दोघं बराच वेळ बोलत राहिली आणि आम्ही दोघं कौतुकान ऐकत राहिलो.

नंतर मी फोटो काढले. धनाजी जातांना जवळ येऊन म्हटला “साहेब, यातले काही फोटो धुऊन द्या, आमच्या होणाऱ्या पोरांना दाखवीन, आमची ही ऊसाची गाडी.”

या उन्हाळ्यात, कुण्या वळणावर झाडाच्या सावलीत अशी ऊसाची गाडी दिसली तर जरूर थांबा.

इतर पोस्ट्स