मनोज वेरूळकर

51
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

भर दुपारचं ऊन. लग्नाची वरात. झिंगाटवर नाचणारी मंडळी. उस्फुर्तपणे ट्रॅफिक सांभाळणारे पाहुणे. लाल-पिवळ्या कपड्यातले बँडवाले. डोळ्यात कौतुक घेऊन आलेली जेष्ठ मंडळी. उडया मारणारी पोरं. बँजो वाल्याची मोठ्ठी गाडी. मागे लगबग करणाऱ्या, यंदा ‘कर्तव्य’असणाऱ्या काही पोरीबाळी. वरातीच्या शेवटी, घोडीवर बसलेला ‘आनंदी जीव’! एकंदरीत उत्साही वातावरण.

. . .

या सर्वांत, ‘बँजो वाला’ ही व्यक्ती अत्यंत अध्यात्मिक. अलिप्त. उदास. कुठलंही गाणं अगदी थंड रक्ताने वाजवणारा कलाकार. नाचणाऱ्यांकडे उदासपणे बघायचं. बँजोवर लीलया बोटे फिरवायची. बँजो वाजवतांना मोबाईल वर व्हाट्सअप्प खेळतानांही पाहिलय मी. कमाल मास्टरी!

. . .

लाल-पिवळे बँडवालेही त्यातलेच. आपला बँजोवाला मित्र काहीही का वाजावो, ह्यांचा सूर एकच. धडाम-धुडुम. धुडुम-धडाम. नागीण डान्स करणाऱ्या आणि रुमलाचा फणा असणाऱ्या नागा समोर मधुन मधुन मान हलवणे हे त्यांचे आद्य कर्तव्य. पण तेही निर्विकार चेहऱ्याने. ‘आता उरलो उपकरा पुरता…’ ह्या भावनेने.

. . .

आपल्याच वरतीतले सगळे ‘लाईफ-लेसन्स’ हा ‘आनंदी जीव’ नंतर फार ‘हार्ड-वे’मधून शिकतो, याच मात्र दुःख वाटतं.

. . .

म्हणजे बघा ना, आयुष्यात कुठंलही गाणं असलं तरी बँजोवाल्या सारखं राहिलं पाहिजे.
शांत. कोल्ड ब्लडेड.
आपण गाणं वाजवायचं.
त्याच काय करायचं हे नाचणारे बघतील.
कुणी मुंगळा म्हटलं तर मुंगळा.
कुणी झिंगाट म्हटलं तर झिंगाट.

नाहीच जमलं तर बँडवाल्या सारखं जगायाचं.
गाणं कुठलंही असो. सूर एकचं.
धडाम-धुडुम. धुडुम-धडाम.
घरातील नागीण फणा काढून गुरगुरली तर मधुन मधुन मान हलवायची. निर्विकार. भावना तीच, ‘आता उरलो उपकरा पुरता…’

. . .

आयुष्यातली मंडळी वरातीतल्या सारखीच असते.

नाचणारे नाचतात.
सोबतीने चालणारे सोबत चालतात.
काही उगाच प्रोब्लेमची ट्रॅफिक सांभाळल्या सारखे करतात.

दुरून सगळा आनंद सोहळा.

आपली ही आयुष्याची वरात आपण सांभाळावी.
आपला सूर टिकवून ठेवावा.
धडाम-धुडुम. धुडुम-धडाम.

बघा पटतंय का.

इतर पोस्ट्स

52
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

संध्याकाळचे ट्रफिक सिग्नल जरा लांब पल्ल्याचे असतात. अशाच एखाद्या सिग्नलवर घरी जाता जाता तुम्ही कंटाळून उभे असता.

. . .

एखादं कपल, टू व्हिलरवर, तुमच्या बाजूला किंवा थोडं पुढे उभं राहतं. कष्टाळू. कामाहून घरी चालेललं. दोघही थकलेली. अख्खा दिवस अंगावरून गेलेला. त्यामुळे बुरसेटलेले. काही तरी गहन विषयावरून तुटकतुटक डिस्कशन चालेललं.
हॉर्नसचा कलकलाट. त्यांचं बोलणं फारसं ऐकू येत नाही. मात्र हावभावातून थोडं फार कळतं. 

. . .

अश्याच काही कष्टाळू कपलस् ची मी बऱ्याचं दिवसांपासून केलेली काही निरीक्षणं :

कर्ती स्त्री मागे आपली फाटायला आलेली पर्स, नवऱ्याची काळी तेलकट बॅग, त्याचा डबा असे सगळे धरून बसलेली असते. खंबीर. निर्विकार चेहऱ्याने.

काही जणींची नजर सभोवतीच्या दुकानांवर झरझर भिरभिरत असली तरी कान नवऱ्याकडेच असतात.

‘मला ही नाही आवडलं ते’ अशी एखादी कंमेन्ट देऊन परत इकडे तिकडे बघणे. मधेच ‘हो…हो’ म्हणणे वगैरे सहज पाहायला मिळतं.

शर्टाच्या खिशात हिशेबाची जाड डायरी, मोबाईल, पेन, कोंबलेली बिलं असे सगळे सांभाळत उभे असलेले भिंगाच्या चष्म्यातले काका, काही तरी मिश्किल बोलल्याने हळूच लाजलेल्या काकुही पाहिल्यात मी.

काही जण शांत उभे असतात. ट्रफिक बघत. आपापल्या विचारात. आपल्या मागे कुणी बसलंय किंवा आपण कुणाच्या मागे बसलोय हे ही विसरलेले.

दिवसभराताल्या एखाद्या जोकवर खळखळून हसणारी कपल दिसतात. पण फार विरळ.

. . .

शहराच्या या टोकावरून त्या टोकाला घरी जाणारी ही लोकं,
कधी पोहचत असतील?
ती कधी जेवण बनवत असेल?
घरी गेल्यावर एकमेकांशी बोलत असतील का? असे बरेच प्रश्न पडतात.

रोजच्या परतीच्या प्रवासात बरीच प्लॅंनिग होत असतील. बरीच डीसिजन्स होत असतील. शहराच्या प्रदूषणात काही विरून जात असतील, काही टिकत ही असतील.

. . .

अश्या रोज दिसणाऱ्या कपल्स बद्दल मला अतीव आदर वाटतो.

आम्हीही आयुष्याची बरीच उलटीपुलटी डीसिजन्स अशीच गाडीवर फिरतांना घेतली.

. . .

पुढच्या वेळी लांब पल्ल्याच्या सिग्नलला एखाद्या संध्याकाळी थांबलात तर आजूबाजूला बघा एखादं डबल सीट कपल दिसतंय का?

इतर पोस्ट्स

53
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

काल रात्री व्हाईट हाऊस डाउन नावाचा सिनेमा बघता बघता झोप कधी लागली कळलंच नाही. अमेरिकन प्रेसिडेंटचं व्हाईट हाऊस कसं नेस्तनाबुत करतात अशी कथा आहे.

गोळ्यांचे आवाज, आकाशात भिरभिरणारे हेलिकॉप्टर्स, लोकांच्या किंकाळ्या, सगळीकडे धूर धूर…अश्या सगळ्या वातावरणात मी झोपेत, झोपेेतून स्वप्नात, आणि स्वप्नातून थेट व्हाईट हाऊस ग्राउंड झिरो वर पोहोचलो.

अडीअडचणीत नेहमी सोबत येणारा जितू सोबत होताच.

बायकोला असल्या विषया वरील सिनेमे आवडत नसल्याने, तिला घरीच ठेवले होते.

अर्थात आम्ही पोहोचलो तोवर सकाळ झाली होती. व्हाईट हाउसच्या अंगणातच या सिनेमाचं शुटींग सुरु होतं. भली पहाट असली तरी बरीच गर्दी होती. धुळीने माखलेले आर्टिस्ट इकडे तिकडे पळत होते. दोन वारकरी पहिल्यांदा पंढरीत आल्यागत आम्ही भिरभिर सगळीकडे बघत होतो. जितू कॅमेरे आणि मी शुटींगच सेटअप न्याहाळत होतो.

थोडं कवडसं पडलं होत, गर्दीतून आमचा डायरेक्टर मित्र आला, त्यानी सगळा सेट फिरवला. ( डाय हार्ट फॅन मित्रच असतात हो!)

व्हाईट हाऊसच्या एका गॅलरीत शांत उभे राहून ‘ओबामा’ बघत होते. पेठेतल्या एखाद्या गॅलरीतुन विसर्जनाची मिरवणूक बघायला मिळावी असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एज एक्सपेकटेड, मला पाहताच स्वारी खुश झाली. “wait downstairs, I’m coming” ओबामांनी आरोळीच ठोकली. यथावकाश ते खाली आले. समोरच्याच लॉन मध्ये टेबल खुर्च्या मांडण्यात आल्या. चहा कॉफीच्या केटल आल्या. मी, जितू आणि ओबामा, गेल्या गेल्याच वैशालीत जागा मिळावी अश्या आनंदात बसलो.

गप्पा सुरु झाल्या.
मी: “Thanks for your time Mr President. We are honored.”
ओबामा : “No. No. Pleasure is mine! I always like to meet new people around the world. And you know, Some Indians are my good friends.”
इंडियन फ्रेंड वर जितुने हळूच खालून लाथ मारल्याची ओबामाला ही कळली. नंतर बऱ्याच गप्पा झाल्या. अमेरिका-इंडिया, ऍमेझॉन -फ्लिपकार्ट, उबर-ओला आणि बरंच काही… शेवटी विषय सध्या सुरू असलेल्या शुटींगवर आला.
मी: “Sir, how do u allow people to shoot movie here. यामुळे अडथळे येत नाहीत का?” ओबामांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला माझी चूक कळाली. मी लगेचच सावरून, म्हणालो, “Sorry Sir, I spoke in Marathi.”

त्यावर ओबामा म्हणतात कसे, “बोल रे, कळते मला मराठी. तुम्ही साले हो, लहानपनी इंग्लिश शिकत नाही अन मग आम्हाला मराठी शिकावी लागते.”

मी आणि जितुने एकमेकांकडे पाहिलं आणि एकदा ओबामांकडे.
शांतपणे कॉफी प्यायलो.
आणि आपल्या पुण्यात परत.
अमृतात पैजा जिंकणारी आमची मराठी आम्ही अमेरिकेतही जिंकून आणली.

इतर पोस्ट्स

54
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

पैसे देऊन घाबरवून घेण्याचा हा सिनेमा. 'फाडून घेण्याचा'ही म्हणू शकता.

मुलांना उगाच गाणी म्हणणारी, तालासुरात वाजणारी खेळणी घेऊ नयेत, हे पार्ट वन ज्यांनी पहिला त्यांना माहीतच आहे. याही वेळेस ते सांगायला डायरेक्टर विसरला नाही.

सायरन वाजवणाऱ्या लाल दिव्याच्या फायर ब्रिगेड च्या गाडया ही घेऊ नये. 'खेळिया'त जाऊन अश्या गाड्या कुणाला बर्थडे गिफ्टही देऊ नये. रात्री तुम्ही गाढ झोपेत असताना अशी छोटी गाडी सायरन वाजवत जर घरभर फिरली तर काय होईल जरा विचार करा.

olx वर जुनं फर्निचर घेतांना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात:

आपण विकत घेत असलेली ती अँटिक आर्म चेअर कधी कुण्या आजोबांच्या जिवाभावाची ही असेल.
काय ठाऊक आजोबा त्याच आर्म चेअर मध्ये गचकले असतील.
नातवाने ती चेअर olx वर टाकली आणि तुम्ही घरी आणली.
आता आजोबा रोज रात्री त्या चेअर वर येऊन निवांत बसले तर…

तुम्ही घरात बसून 'चला हवा येऊ द्या' बघताय आणि चेअर मधल्या आजोबांना जर 'दहाच्या बातम्या' बघायच्या असतील तर…

आपल्या घरात भूत आहे एवढं कळणे पुरेसं नाही. भुताचं नाव काय असेल हे जाणण्याचा प्रयत्न करावा.
त्याला विचारावे, "बाबारे काय नाव तुझे?"
भूत सांगतं बिच्चारं.
या सिनेमात वयही सांगतं.

आपल्या घरातली उपकरणे सारखीच बंद पडत असतील तर सिरियसली विचार करण्याची गोष्ट आहे.
परदेशात भुतं काढायला आलेली एक्स्पर्ट मंडळीच हि उपकरणे दुरुस्त करतात.

आपल्या कडे उपकरणे दुरुस्ती वाली ही भुतं शोधून आणावी लागतात.

असे सिनेमे पाहून पाहून सापडलेल्या काही फाईडिंग्स :

१.थिएटर मध्ये जेव्हा सगळे जोर जोरात हसत असतात तेव्हा
सगळ्यांची टरकली आहे हे समजावे. त्या आवाजात तुम्ही किंचाळलात तरी चालतं.

२.कान बंद ठेवले की भीती कमी वाटते असे माझ्या बायकोचं म्हणणे आहे. हा सल्ला घरीही कामी येतो.

३.असे सिनेमे शक्यतो दिवसा बघावे, बाहेर आल्यावर दिवस बघून जरा हायसं वाटतं.

४.बाहेर आल्यावर जरा तास भर गर्दीच्या ठिकाणी वावरावे. आजूबाजूची जिवंत भुतं बघून जरा बळ येतं.

५.रविवारी अश्या सिनेमाचा बेत करावा म्हणजे 'उद्या ऑफिस!' या भावनेनं आणि त्या 'हॉरर' जागेच्या आठवणीने आपण किती शूर आहोत याची खात्री येते.

बाकी, असे सिनेमे अधून मधुन बघत राहावेत.

इतर पोस्ट्स

55
(रीडिंग टाईम 2 मिनिटं )

आज सासुबाई आल्या.

जळगावहून साधारण सकाळी साडे पाचच्या दरम्यान बस पुण्यात पोहचते.
सासुबाई यथावकाश घरी आल्या.
गप्पा झाल्या.

पंधरा वीस मिनिटांनी….
त्यांची पर्स बस मध्येच राहिल्याच लक्षात आलं. सकाळी सकाळी एकच गोंधळ.
पळापळ. रडारड. आणि बरचं काही.

मुलीने आई साठी पटापट फोन लावले.
आईने आज 'गुरुवार' असल्याने दत्ताचा धावा सुरु केला.

बस शेवटी कुठे उभी राहते हे एका मित्राने अर्ध्या झोपेतच सांगितले.
बस शोधत असतांनाचे माझ्या डोक्यात आलेले काही विचार:
….

" सासुबाईनीं दत्ताचा धावा सुरु केल्यावर दत्ताचा गाभारा दणाणला असावा. दत्तासहित त्याचा सारा स्टाफ घाबरून इकडे तिकडे पळत असेल.

कुठली पर्स होती, कोणती बस होती याचं एनालिसिस सुरु झालं असेल. बस आता उभी असलेलं लोकेशन सैटेलाइट वरुन मागवन्यात आलं असेल.

बस मध्ये असलेल्या गणपतीला संपर्क करण्यात आला असावा.

वेळ सकाळची असल्याने गणराया पेंगलेले असतील.

बसचा ड्राईवर माझी कशी हेळसांड करतो… त्या पर्स हरवलेल्या बाईंनी चढतांना माझ्या कडे कसे लक्षही दिले नाही… अशा नाना प्रकारच्या तक्रारी गणरायांनी केल्या असतील.

येणाऱ्या सुट्टीच्या मूड मध्ये असणारे गणराज वैतागले असतील. ऑफिशीयल ईमेल आल्याशिवाय आम्ही इनक्वायरी पुढे नेत नाही असेही ठणकावुन सांगितले असावे.

सगळा इगो आणि गाई वासरे बाजूला ठेवून दत्तानी आपल्या लाडक्या भक्ता साठी रिक्वेस्ट केली असेल.

मग गणरायानी 'फक्त तुम्ही आहे म्हणून' असे म्हणून, "ड्राईवरला सांगतो!" म्हणत फोन आपटला असेल "
…..

दरम्यान आम्ही बसपाशी पोहचलो. बसच्या ड्राईवरने प्रामाणिकपणे पर्स परत केली. आम्ही त्याला बक्षीसही दिलं.

पण…
पर्स ड्राईवरच्या प्रमाणिकपणा मुळे मिळाली
की दत्ताच्या फोन कॉल मुळे
की गणरायाच्या कृपेने
हे मात्र देवच जाणे !

इतर पोस्ट्स

56
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

पुण्यात पेठांमध्ये फिरतांना जर चहा प्यावा वाटला तर 'अमृततुल्य' जरूर प्यावा.

पुणेकराचं हे अमृत अगदी गोड खीर प्यावी असं असत. हल्ली या अमृता सोबत क्रीम रोल नावाचा 'एनर्जी बार' पण मिळतो.

गोड + अती गोड = काय? याचा अनुभव एकदा घेऊनच बघा.

डायबेटिस असणाऱ्याने याच्या वाट्याला जाऊ नये. उगाच अमृताच्या नादात उरलं सुरलं अमरत्व जायचं.

या अमृताची दुकाने नेहमी 'नो पार्किंग' च्या हद्दीतच असतात. पण अमृत प्राशन करणाऱ्या कुठल्याच पुणेकराची गाडी ट्राफिकच्या 'यमांनी' उचलतांना मी पाहिली नाही. आपण देव आहोत अश्या थाटात पुणेकर ते अमृत ढोसतात. आपण ब्रेड पेटिस, वडा पाव अस काही निकृष्ट खात असतांना आपली गाडी उचलली जाऊ शकते. पण अमृत प्राशन करताना नाही.

असेच एकदा, मी पेटिस खात असताना माझी गाडी उचलायला ते दानव आले होते. पण मी ही आमच्या घरची लक्ष्मी गाडी वर बसवून ठेवली होती म्हणून वाचलो. देवीचा प्रकोप त्यांना माहित असावा. आणि आमच्या घरचा प्रकोप बघण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला नाही. नशीब एकेकाच. असो.

तर,
बायको तुळशी बागेत सैरावैरा भटकत असतांना, रस्त्याच्या कडेला एकाकी हताश उभे राहण्याची वेळ जर तुमच्या वर आली,
तर एकदा अमृततुल्य जरूर प्यावा.

आणि आपण रोज सकाळी घरी चहाच्या नावाखाली काय काय पितो हे ज्याच त्यानं ठरवाव.

घरी पोहचे पर्यंत तुम्ही 'अमर' आहातच.

इतर पोस्ट्स

57
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

बायकोच्या शाळेतल्या वर्ग मैत्रिणींच गेट टू गेदर होत काल.

कुठला ड्रेस घालू यावर चर्चा सुरु झाली,
मग बोल चाल झाली
आणि शेवटी भांडणाने निर्णय झाला.

चांगली फिटिंग आहे असं म्हणुन एक अतिशय टाइट जीन्स मलाही घालावी लागली! नंतर खिशातही हात घालता आला नाही ती गोष्ट वेगळी. चांगली फिटिंग म्हणे.

दोन्ही पाय कडक करून मी तिच्या सोबत पोहचलो.
मुलींच्या गप्पा सुरु झाल्या.
कोण आधी कसे बारिक होते आता कसे वजन 'पुट ऑन' झाले. कोणी कसे हेयर स्ट्रैट केलेत. वगैरे वगैरे…

नवरे मंडळीनी एकमेकांना हाय हैलो केले.
एकदा एकमेकांच्या पोटांकडे पाहिले.
शक्य तेवढे पोट आत घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.
आणि मग आमच्या गप्पा…
यंदा फार उन होते. सगळे सहमत!
पाऊस कमी होईल यंदा. सगळे सहमत!
मोदीने आता काम करायला पाहिजे. सगळे सहमत!

साधारण पंधरा मिनिटांत सगळी चर्चा संपली.
मग सगळे नवरे सवयीप्रमाणे 'म्यूट'.
एरवी घरात दोनच गोष्टी म्यूट होतात. टीव्ही आणि नवरा.

पुढचा अर्धा तास ताटात जे येईल ते आणि जेवढे येईल ते पोटात घातले.
तिकडे गप्पाचा ओघ सुरूच होता.

नंतर सेल्फ़ी सेशन झालं. ऑकवर्ड नवरे म्यूट मध्येच हसत, पोट आत घेत उभे राहिले.

मग असं मजल दर मजल करत गेट टू गेदर संपल.
येतांना त्या चांगल्या फिटिंगच्या जीन्सची एक हुक उघडूनच मी घरी आलो.

इतर पोस्ट्स

58
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

हल्ली ती मला ऑफिसला ड्रॉप करते.
संध्याकाळी पिक करते.
निदान त्यामुळे तरी मी ऑफिस मधून लवकर काढता पाय घेतो.

पण आज म्हटलं 'वटसावित्रीचा' स्पेशल दिवस आहे, आमच्या सावित्रीला थोडा आराम द्यावा.
म्हणून आज रिक्षानी गेलो.

सकाळी मोबाईल खेळताखेळता माझं फारस लक्ष ही नव्हतं.

येतांना मात्र रिक्षात बसलो न बसलो तो रिक्षावाला असा सुटाट सुटला की…

तिने आज वडाला गुंडाळलेले सगळे धागे गळुन पडले असतील कदाचित!

बर, आता हा रिक्षात बसलेला 'सत्यवान' आजच वर येतो की काय ह्या भीतीने
आणि
हा आला तर ती खालची सावित्री आपल्याला काही सोडणार नाही या धाकानं
बिच्चारे देव ही वर दबा धरून बसले असतील.

जिव मुठित धरून मी कसाबसा घरी आलो.
आमची सावित्री किचन मध्ये 'बिसिबेले भात' बनवत होती.

त्याचा घमघमाट देवांपर्यन्त पोहचला असावा
कदाचित, म्हणूनच मी वाचलो.

इतर पोस्ट्स

59
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

गोव्यातील लोकांची परिस्थिती आज पंढरपूरातील लोकांसारखी आहे.

भाविकांचे लोंढेच्या लोंढे येतायेत. लोकं आपली छोटी छोटी दुकानं मांडून बसली आहेत.
कारमधून येणारे, बाईकवरून फिरणारे, पायी हिंडणारे सगळे चंद्रभागेच्या दिशेने जातायेत. कुणी कीर्तनाचा गजर ऐकून तिकडे धाव घेतायेत. कुणी 'उपवास' सोडण्याची सोय करतोय.

शेवटी उद्देश एकच, मार्ग फक्त वेगळे.

येणारं वर्ष आपल्याला 'मार्ग' दाखवणारं येवो हीच देवा चरणी प्रार्थना.

इतर पोस्ट्स

60
(रीडिंग टाईम < 1 मिनिट )

ऑफिस मध्ये बराच उशीर झाला होता.
आठ वाजले असतील साधारण.
मी कामात गर्क होतो.
तेवढ्यात बॉसचा फोन आला.
अमेरिकेतल्या एका प्रोजेक्ट मध्ये सॉलिड प्रोब्लेम झालाय म्हणे.
"ताबोडतोब अमेरिकेसाठी निघ!"
मी आपला सर्वसाधारण मध्यमवर्गीय प्रश्न विचारला "सर, वीसा?"
आधीच वैतागलेला बॉस जवळजवळ खेकखसलाच "तु ऐरपोर्टवर पोच आधी वीसा तुला तिथेच मिळेल."
मी कंपनीच्याच कारने कसाबसा पोहचलो.
फ्लाइट मध्ये बसल्या बसल्या जी झोप लागली ती सरळ जे एफ के ला उतरल्यावरच उघडली.
बाहेर एक कलीग उभाच होता. त्याच्या सोबत गाडीत बसलो.
सुसाट धवणाऱ्या त्या गाडीतून ओझरती अमेरिका मी न्याहळत होतो. दिवसभरतली एक एक गोष्ट आठवत होती.
अचानक वीज चमकावी तसा डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
मी अमेरिकेला चाललोय हे तर मी बायकोला सांगीतलेच नाही.
दरदरून घाम फुटला.
खाडकन जाग आली.
बायको शांतपने पेपर वाचत बसली होती.
मी पांघरुणातूनच तिच्याकडे पाहून हसलो
आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
आज रविवार आहे मी विसरलोच!

इतर पोस्ट्स