रस्त्याच्या कडेला, एखादं मोठ्ठं झाड बघून, त्याच्या सावलीत हे छोटंसं दुकान मांडलेले असायचं.
झाडाच्या बुंध्याजवळ मोठी लाकडी पेटी. तिच्या कॉर्नरवर टयुबच्या रबराचे तुकडे खिळ्यांनी ठोकलेले. चाबीची गरज नसलेलं जुनाट कुलूप.
झाडावर एक-दोन देवांचे फोटो ॲडजस्ट करून बसलेले. त्यांना कुंकवाने लालबुंद केलेले. त्यांच्या आजूबाजूला अगरबत्तीच्या काड्या खोचलेलेल्या. वर एखादं वाळलेलं फुल.
पेटीच्या बाजूला बसण्यासाठी गुळगुळीत झालेला एक लांबलचक दगड. त्यावर रोज येणारा, एखादा लोकल पेपर.
झाडाच्या खुंटीवर डब्याची वायरची पिशवी आणि काळ्या कव्हर मधला रेडिओ अडकवलेला.
दुकानाच्या मालकाला, काम करतांना बसण्यासाठी लागणारं, एक छोटंसं पत्र्याच वेडवाकडं स्टूल.
पिवळा, लाल रंग दिलेले हवा भरण्याचे दोन-एक पंप.
पंक्चर काढण्यासाठी गढूळ पाण्याने भरलेलं एक मोठं टोपलं. त्यात झाडाची पानं निवांत पडलेली.
आजूबाजूला, जुन्या ट्युबचे कापलेले तुकडे. ते घासण्यासाठी लागणारी कानस. वेगवेगळ्या आकाराचे आणि लांबीचे पान्हे. पंक्चर चिटकवण्यासाठी लागणारे लोशनचे पिवळया रंगाचे ट्यूब्स असं बरंच सामान इकडे तिकडे पडलेलं.
मालकाला कंपनी म्हणून एखादा मित्र नेहमी पेपर चाळत बसलेला.
दिवसभर सायकलच्या ऑईलने हात काळेशार करणारा, या दुकानाचा मालक, कपडे नेहमी पांढरे शुभ्र घालायचा.
येणारी प्रत्येक सायकल हवा भरून, ब्रेक्स टाईट करून, ऑईल पाणी टाकून तरतरीत करून द्यायची हे त्याच्या जीवनाचं एकमेव ध्येय.
अश्या दुकानावर सायकली तासाप्रमाणे भाड्याने मिळायच्या. त्याचं एक रजिस्टर असायचं. त्यात आपलं नाव, सायकलचा नंबर, आणि वेळ लिहून सायकल घेऊन जायची.
त्या दुकानाच्या मातीत पडलेले बेयरिंगचे पडलेले छोटे-छोटे छररे, ट्युब्यच्या नोझलची काळी झाकणं गोळा करणे हा माझा आवडता उद्योग.
पुढे आयुष्यात काहीच केलं नाही, तर असं सायकलचं दुकान तरी टाकू हे माझं ठरलं होतं.
एखाद्या दुपारी, रखरखत्या उन्हात, थोडं थांबावं म्हणून अश्या दुकानावर सायकल लावावी. स्वतः पंप घेऊन हवा भरावी. रस्त्याच्या कडेला, त्या शांत सावलीत, पेपर चाळत बसावं.
आणि झाडाला अडकवलेल्या रेडीओवर सुरेल गाणं चाललेलं असावं, “याद किया दिलने. . . कहां हो तुम. . .”
रीलेटेड पोस्ट : चहाची टपरी